पुणे
भारतातील(महाराष्ट्र) मोठे शहर From Wikipedia, the free encyclopedia
भारतातील(महाराष्ट्र) मोठे शहर From Wikipedia, the free encyclopedia
पुणे हे भारताच्या दख्खन पठारावरील महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे शहर आहे. पुणे जिल्ह्याचे आणि पुणे विभागाचे हे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११ जनगणनेनुसार, शहराच्या हद्दीतील ३.१ दशलक्ष लोकसंख्येसह पुणे हे भारतातील नववे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. महानगर प्रदेशातील ७.२ दशलक्ष रहिवासी लोकसंख्या आहे, यानुसार ते आठवे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. [८]पुणे शहर पुणे महानगर प्रदेशाचा एक भाग आहे. [९] भारतातील सर्वात मोठ्या आयटी हबपैकी पुणे एक आहे. [१०] [११]हे भारतातील सर्वात महत्वाचे ऑटोमोबाईल आणि उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. पुणे हे एक विकसनशील शहर आहे. [१२]या शहराला येथील उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमुळे "पूर्वेकडील ऑक्सफर्ड" म्हणून संबोधले जाते. [१३] [१४] [१५] "भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर" म्हणून अनेक वेळा पुण्याला स्थान देण्यात आले आहे. [१६] [१७]
पुणे
Puṇē | ||
---|---|---|
| ||
| ||
Nickname(s): | ||
गुणक: 18°31′13″N 73°51′24″E | ||
Country | India | |
State | महाराष्ट्र | |
District | पुणे जिल्हा | |
Division | पुणे विभाग | |
Established | इ.स. ७५८[३] | |
सरकार | ||
• प्रकार | ||
• Municipal Commissioner | विक्रम कुमार, भा.प्र.से. [४][५] | |
• महापौर | रिक्त | |
क्षेत्रफळ | ||
• पुणे महानगरपालिका[६] | ४८४.६१ km२ (१८७.११ sq mi) | |
Elevation | ५७०.६२ m (१,८७२.११ ft) | |
• Rank |
भारतात ९ वी जगात ५९ वी | |
Demonyms | पुणेकर, पुणेरी | |
वेळ क्षेत्र | UTC+५:३० (भा.प्र.वेळ) | |
PIN Code(s) |
४११००१ – ४११०९०[७] | |
क्षेत्र कोड | ०२० | |
वाहन नोंदणी |
MH-१२ पुणे महानगरपालिका
| |
संकेतस्थळ | pmc.gov.in |
पुण्यावर राष्ट्रकूट राजघराणे, अहमदनगर सल्तनत, मुघल, आदिल शाही घराणे यांनी राज्य केले आहे .१८ व्या शतकात हे शहर मराठा साम्राज्याचा भाग होते, आणि मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, पेशव्यांची हे आसन होते. [१८]पाताळेश्वर लेणी, शनिवारवाडा, शिंदे छत्री, विश्रामबाग वाडा यासारख्या अनेक ऐतिहासिक खुणा या कालखंडातील आहेत. वेगवेगळ्या कालखंडातील ऐतिहासिक स्थळे शहरभर पसरलेली आहेत.
संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाबाई , संत तुकाराम, पहिले बाजीराव पेशवे, बालाजी बाजीराव, माधवराव पहिले, नाना फडणवीस, महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींसह पुणे ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र राहिले आहे. पुणे शहरात किंवा पुणे महानगर प्रदेशात येणाऱ्या भागात त्यांचे जीवनकार्य केले. गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांसारख्या लोकांनी त्यांच्या काळात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावल्याने पुणे हे ब्रिटिश राजवटीच्या प्रतिकाराचे प्रमुख केंद्र होते.
पुणे या शहरात सात नद्या वाहतात. त्या म्हणजे :- मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना, राम नदी, देव नदी, नाग नदी. पैकी मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी याच फक्त वाहत्या नद्या आहेत.
पुणे हे नाव इ.स.८व्या शतकात ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११व्या शतकात ते ‘कसबे पुणे’ किंवा ‘पुनवडी’ नावाने ओळखले जाऊ लागले.मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव ‘पुणे’, आणि बोलीभाषेत ‘पुणं’ असे वापरले जात होते. पुढे शहराच्या नावाचे स्पेलिंग Pune असे केले. तरीही पूर्वीपासूनच हे शहर पुणे याच मराठी अधिकृत नावाने ओळखले जात होते.
काहीजण पुण्याला पुण्यनगरी असे म्हणतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर असून किंवा महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.{संदर्भ हवा}.समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते किंवा ओळखले जाते.
पुणे काबीज केल्यावर औरंगजेबाला ते खूपच आवडले. त्याने या शहराला ’मुहियाबाद’ नाव दिले होते. पण प्रत्यक्ष पत्रव्यवहारात तो या शहराचा उल्लेख ’शहर नमुना’ असा करीत असे. पुणे येथील शनिवार वाडा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. त्यामुळे अनेक शहरातील लोक शनिवारवाड्याला भेट द्यायला येतात.
आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे/होते. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स.७५८चा आहे. त्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती. या जहागिरीमध्ये शहाजीच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे महाराजांचा यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९ साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी असून. पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली होती. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली होती. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. लाल महाल, शनिवारवाडा, विश्रामबाग वाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ठिकाणे मानली आहेत. लालमहाल हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते. शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई माधवराव पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबागवाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते.
इ.स. ८५८ आणि ८६८. मधील तांबे प्लेट्स दर्शवितात की ९ व्या शतकात पुन्नका नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याच्या ठिकाणी अस्तित्वात होती. या प्रदेशांवर राष्टकुट घराण्याचे[१९] शासन होते असे या पाट्या सूचित करतात. याच काळात पाषाणातुन कोरलेले पातालेश्वर मंदिर बांधले गेले. ९ व्या शतकापासून ते १७२७ या काळात पुणे हे देवगिरीच्या सौना यादव यांनी राज्य केले होते.[२०]
शिवपूर्वकाळात कासारी, कुंभारी आणि पुनवडी या वस्त्यांतून कसबे पुणे आकाराला आले. मुळा-मुठा नदीकाठी झांबरे पाटील यांचे वाडे होते आणि पाटलांच्या चावडीवर गावचे न्यायनिवाडे होत असत. गावगाड्याची ही प्रथा अनेक वर्षे रूढ होती. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे. स्वराज्याचे संकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीचे पुणे हे गाव होय.
१५९९ मध्ये निजामशाही (अहमदनगर सल्तनत)[२०] यांच्या सेवेसाठी मालोजी भोसले यांना देण्यात आलेल्या जहागिरीचा एक भाग होता.. १७ व्या शतकात मुघलांच्या ताब्यात येईपर्यंत पुण्यावर अहमदनगरच्या सुलतानाचे राज्य होते. मालोजी भोसले यांचे नातू, छत्रपती शिवाजी महाराज[२१], मराठा साम्राज्याचे संस्थापक, यां जन्म पुण्यापासून फार दूर नसलेल्या शिवनेरी येथे झाला. १६८० ते १७०५ या काळात मुघल आणि मराठे यांच्यात बरेच वेळा राजवट बदल झाला.
१६३०मध्ये आदिलशाही राजवंशांनी छापे टाकून शहराचा नाश केल्यावर आणि १६३६ ते १६४७ च्या दरम्यान पुन्हा धडाफळेचा(???) उत्तराधिकारी दादोजी कोंडदेव याने शहराच्या पुनर्रचना घडवून आणली. त्याने पुणे आणि शेजारच्या मावळ क्षेत्राच्या भागातील महसूल संकलन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली. त्याने जमिनीसंबंधीचे आणि अन्या वाद यांवर निर्णय देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पद्धती देखील विकसित केल्या. लालमहालाचे बांधकाम १६३१ मध्ये सुरू करण्यात आले आणि १६४० साली पूर्ण झाले. शिवाजी महाराजांनी आपली तरुण वर्षे लालमहाल येथे घालविली. त्याची आई, जिजाबाई हिने कसबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते. या मंदिरात अभिषेक केलेली गणेशमूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता (ग्रामदेवता) म्हणून आजही गणली जाते.
१७०३ ते १७०५पर्यंत, २७-वर्षांच्या मुघल-मराठा युद्धाच्या शेवटी, या शहरावर औरंगजेबचा ताबा होता आणि त्याचे नाव बदलून मुहियाबाद करण्यात आले. दोन वर्षांनंतर मराठ्यांनी सिंहगड किल्ला आणि नंतर पुणे पुन्हा मोगलांपासून ताब्यात घेतले.
जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९" पूर्व असे आहेत. पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे.
पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७, २००४ रोजी ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.
पुणे शहराच्या हद्दीतून इंद्रायणी, मुळा, मुठा,पवना, राम व देव या नद्या वाहतात. एकेकाळची नाग नदी ही आता नागझरी झाली आहे.
पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत, त्यांपैकी काही या :-
एकेकाळी पुण्यात बरेच हौद होते/. या हौदांत एकतर पाण्याचे झरे होते किंवा कात्रजहून कालव्याद्वारे या हौदांना पाणीपुरवठा होत असे.अजूनही काही हौद शिल्लक त.अशा काही अस्तित्वात असलेल्या नसलेल्या हौदांची नावे :
पुणे शहरात ८९ बगीचे/उद्याने आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
एकेकाळी पुण्यात पोलीस चौकीला पोलीस गेट म्हणले जाई. अशीच काही पुण्यातील गेटे खालील यादीत आहेत. या बहुतेक गेटांच्या ठिकाणी आज पोलीस चौक्या आहेत.
पेशव्यांच्या काळात पुण्यात ८५ हौद होते.या सर्व हौदांत कात्रजच्या तलावातून खापराच्या नळांतून पाणी पुरवठा होत होता. कमी उंचीवरून जास्त उंचीवर पाणी चढवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे उसासे बांधले होते. रस्तारुंदीमध्ये सिंहगड रस्त्यावरील सर्व उसासे रातोरात काढून टाकण्यात आले.
पुणे शहरात सध्या १५८ किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पावसाळी चेंबर्सची संख्या ३८ हजार ८१ असून, पावसाळी गटारांची लांबी १७८ किलोमीटर आहे, तर कल्व्हर्ट्सची संख्या ४२९ आहे.
पुण्यात खाली दिलेल्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून-करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले जुळली आहेत. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत. उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बँक कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरांच्या पुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत. आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्कजवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते. हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या, शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत. पिरंगुटला अन् मुळशी तालुक्याला जोडणारा तारेचा पूल, आजमितीला अस्तित्वात नाही
मुठा नदीवरील पूल एकूण १६ -
या पुलावर दररोज सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुचाकी वाहनास प्रवेशबंदी असते.
मुळा नदीवरचे एकूण पूल १० आहेत, त्यांबद्दल माहिती पुढीलप्रमाणे :
मुळा-मुठा नदीवरचे पूल -
ओढ्या-नाल्यांवरील पूल -
दांडेकर पूल हा पुण्यामधील आंबील ओढ्यावारील एक महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे 'नरवीर तानाजी मालुसरे सिंहगड रस्ता' आणि 'लाल बहादूर शास्त्री रस्ता' हे दोन रस्ते जोडले गेले असल्याने यावर नेहमीच वाहनांची तसेच पादचाऱ्यांची वर्दळ असते. सदैव असलेली अस्वच्छता आणि दुर्गंधी हे या पुलाचे वैशिष्ट्य होय. पुलावर सतत वाहणारी कचराकुंडी, इतस्ततः पडलेला कचरा आणि भटकी रोगट कुत्री हे या पुलावरचे नेहमीचेच दृश्य असते. कचरा, कुत्र्यांची विष्ठा, विक्रीसाठीची मच्छी यामुळे या पुलावर सदैव दुर्गंधी असते.
पुणे शहरात रस्त्यारस्त्यात उभे केलेले शेकडो पुतळे आहेत. त्यांतील किमान ७७ पुतळे पुण्याच्या मध्यभागात आहेत. ३७ पूर्णाकृती व ४०० अर्धपुतळे आहेत. १३ पुतळे तर केवळ स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातच आहेत. या पुतळ्यांची देखभालही केली जात नाही.. शहरात वाहतुकीला अडथळा ठरू शकणारेही बरेच पुतळे आहेत. पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे कमीतकमी चाळीस पुतळे आहेत. त्यांशिवाय अन्य पुतळेही आहेत. फुले मंडईमध्ये अगदी मध्यभागी असलेला विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा अर्ध पुतळा मंडईतील समाजकंटक दलालांनी काही वर्षांपूर्वी उखडून नष्ट केला, तो परत बसवला गेला नाही. जिजामाता उद्यानातील एक मूर्तिसमूहात असलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा तोडून काढला, तोही परत बसवला गेला नाही. पुणे विद्यापीठामध्ये एका खासगी संस्थेने बसविलेला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा चांगला नाही या कारणास्तव तो तोडून त्या जागी विद्यापीठ स्व-खर्चाने नवीन पुतळा बसवणार आहेत. मराठी लेखक राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी उखडून मुठा नदीत टाकला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो नदीतून बाहेर काढला, पण परत बसवला नाही.
गेल्या काही वर्षांत बरेच पुतळे काढून टाकले किंवा हलवून दुसऱ्या जागी नेले आहेत. उदाहराणार्थ, कोथरूडमधील महर्षी कर्वे यांचा पुतळा चौकातून हटवून कर्वे रोडच्या एका कोपऱ्यात प्रस्थापित केला आहे. स्वार गेट चौकातला केशवराव जेधे यांचा पुतळा हलवून स्वार गेट काॅर्नरला नेला आहे.
शिवाजी रोडवरील शनिवारवाड्याजवळचा काकासाहेब गाडगिळांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ झालेल्या अपघातात अथर्व डोंगरे या शाळकरी मुलाचा २००८ साली मृत्यू झाला. त्यानंतरही तो पुतळा अजून तेथेच आहे. त्या पुतळ्याची नीट निगाही राखली जात नाही.
पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील एकूण २३ पुतळे चौकाच्या मध्येच आढळले असून रहदारीला अडथळा करणारे आहेत. जिथे टिळक रोड आणि बाजीराव रोड मिळतात त्या पुरम चौकातील अभिनव शाळेजवळ वसंतराव पाटलांचा पुतळा आहे. तो पुतळा सणस मैदानात वसंतराव पाटलांच्याच स्मरणार्थ बांधलेल्या सभागृहात हलवावा अशी सूचना होऊनही, आणि तो पुतळा आहे तेथेच असून रहदारीला अडथळा करीत उभा आहे. दुरवस्थेत असलेला बाजीराव रोडवरील बाबुराव सणसांचा पुतळा हटवून सणस मैदानावर नेण्याचा ठरावही अजून बासनात आहे.
पुण्यात सध्या (२०१४) असलेल्या काही पुतळ्यांची जंत्री :
स्वारगेट-मार्केटयार्ड परिसरातील पुतळ्यांची यादी पुढीलप्रमाणे :
पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून- नाना फडणीस, नारायणराव पेशवे, सदाशिवरावभाऊ, सरदार रास्ते- ठेवली गेली आहेत. इ.स. १६२५ मध्ये शहाजीराजे भोसले यांनी रंगो बापूजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली. रंगो बापूजी धडफळे यांनी कसबा पेठ, सोमवार पेठ, रविवार पेठ आणि शनिवार पेठ या पेठा बांधल्या. इ.स. १६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोंडदेव यांनी या पेठांची पुन्हा उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:
कसबा पेठ, रविवार पेठ ऊर्फ मलकापूर पेठ, सोमवार पेठ (हिला शाहापूर पेठ म्हणत), मंगळवार पेठ (हिची जुनी नावे अष्टपुरा व शास्तापुरा पेठ), बुधवार पेठ ऊर्फ मुहियाबाद पेठ, गुरुवार पेठ ऊर्फ वेताळ पेठ, शुक्रवार पेठ (जुने नाव विसापूर), शनिवार पेठ, गंज पेठ ऊर्फ मीठगंज (महात्मा फुले पेठ ?), सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, भवानी पेठ, मलकापूर पेठ (म्हणजेच रविवार पेठ), मुहियाबाद पेठ (म्हणजेच बुधवार पेठ), नाना पेठ, रास्ता पेठ (जुने नाव शिवपुरी पेठ), गणेश पेठ, वेताळ पेठ (म्हणजेच गुरुवार पेठ), सेनादत्त पेठ, नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ), भवानी पेठ (टिम्बर मार्केट असलेली), घोरपडे पेठ.
गुरुवार पेठ नवापुरा पेठ, हनमंत पेठ , बाजीराव पेठ
कर्वेनगर, कल्याणीनगर (हे नाव उद्योगपती नीळकंठ कल्याणी यांच्या रहिवासामुळे मिळाले), गणेशनगर, गोखलेनगर, चव्हाणनगर, फातिमानगर, बालाजीनगर, लिंबोणीनगर, शांतिनगर, शिवाजीनगर, संभाजीनगर, सहकारनगर क्रमांक १, सहकारनगर क्रमांक २, सुवर्णयुगनगर, लक्ष्मीनगर, वाळेवकरनगर, विमाननगर, संतनगर, संभाजीनगर,
जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत त्यांतल्या काहींची नावे:
शनिवारवाड्याकडे तोंड करून उभे राहिल्यावर नव्या पुलाच्या उजव्या हाताला बारामतीकर-जोशी आणि काळे यांचे जुने ऐतिहासिक वाडे आहेत. बारामतीकर जोशी हे पेशव्यांचे व्याही होते.आणि काळे हे पेशव्यांचे परराष्ट्रीय वकील. खर्ड्यांच्या लढाईत जोशीनी मोठाच पराक्रम गाजवला होता. (बारामतीकर जोश्यांनी बाजीराव पेशव्यांना लुटीत मिळालेला एक हत्ती परवानगी न घेता आपल्या वाड्यात नेऊन ठेवला होता. चिमाजी अप्पांनी लिहून ठेवलेल्या हिशोबात बाजीरावांना ही गोष्ट सापडली. बाजीरावांनी बारामतीकर जोश्यांना तो हत्ती परत करायला भाग पाडले आणि त्यांच्या वाड्यावर चौक्या बसवल्या. बारामतीकरांवर चौक्या बसवण्याची ही पहिली, पण शेवटची नसलेली वेळ!)
या वाड्यांपासून थोडे पुढे गेल्यावर रस्ता वळतो तेथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार सरदार ओंकारांचा वाडा आहे. त्याकाळी मोठमोठी कर्जे सरकारला लागत. सरदार ओंकार हे काही प्रमुख सावकारांपैकी एक. चिमाजी अप्पांची मुलगी या ओंकारांकडे दिली होती.
ही शनिवारवाड्याच्या मागची व पश्चिमेची बाजू. पेशव्यांचे बरेच मेव्हणे तिथे राहात असत म्हणुन त्याला मेहुणपुरा म्हणतात. थोरल्या माधवरावांच्या काळातही मेहुणपुरा अस्तित्वात होता. मेहुणपुऱ्यात सकाळ कार्यालगतच्या चौकात अण्णासाहेब पटवर्धनांचा मोठा वाडा होता, आणि जिथे सकाळची कचेरी आहे तिथे पानिपत लढाईत शौर्य गाजविणाऱ्या सरदार विसाजीपंत बिनीवाल्यांचा वाडा होता. तिथेच शेजारी घोरपडेंचा वाडा. दक्षिणमुखी मारुतीच्या जवळच पेशव्यांचे प्रसिद्ध सरदार हसबनीस यांचा वाडा होता.
आता जिथे प्रभात चित्रपटगृह (किबे नाट्य-चित्र मंदिर) आहे तिथे पेशवाईतले प्रसिद्ध सावकार किबे राहात. इंदूरकर, होळकर यांचेही किबे हे सावकार होते. नंतरच्या काळात तिथे नूतन मराठी विद्यालय भरत असे. या वाड्यातला आरसे महाल मोठा प्रेक्षणीय होता. त्याच्या समोरच मोरोबादादांचा सहा चौक असलेला मोठाच्या मोठा दोन-तीन मजली वाडा होता.
आनंदाश्रमाच्या शेजारीच नूतन मराठी विद्यालय आहे. ज्यावेळी किबेंच्या वाड्यात शाळा भरत असे, त्यावेळी येथे न्यू पूना कॉलेज होते, आणि त्याही आधी खाजगीवाल्यांचा वाडा होता. हा वाडा पाडून त्याठिकाणी आता नूमविची इमारत उभी आहे.
पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
अप्पर इंदिरा नगर, अरण्येश्वर, आनंदनगर (सिंहगड रस्ता), आंबेगाव, एरंडवणे, औंध, कॅंप, कर्वेनगर, कल्याणीनगर, कात्रज, कोंढवा बुद्रुक , कोथरूड, कोरेगाव पार्क, खडकी, खराडी, गुलटेकडी, गोखलेनगर, घोरपडी, डेक्कन जिमखाना, दत्तवाडी, बोपोडी, धनकवडी, धायरी, पद्मावती, पर्वती, पाषाण, पिसोळी, बाणेर, बालाजी नगर (सातारा रस्ता), बावधन, बिबवेवाडी, बोपखेल, भुसारी कॉलनी, मुंढवा, येरवडा, लोहगांव, वडगांव (बुद्रुक), वडगांव शेरी, वडारवाडी, वाकडेवाडी, वाघोली, वानवडी, वारजे माळवाडी, विठ्ठलवाडी, विमाननगर, विश्रांतवाडी, शिवाजीनगर, सॅलिसबरी पार्क, सांगवी, सुस, हडपसर, धानोरी, केशवनगर.
पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.
जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनच्या वाऱ्यांमुळे पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरीमुळे पुणे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.
मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत असतो. पुण्याला भेट देण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°सेच्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. जानेवारी १९९१(?)मध्ये पुण्यात २.८°से इतके किमान तापमान नोंदवले गेले.
पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.
दिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्षअभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हणले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.
पुणे महानगरात १९९८ साली केलेल्या वृक्षगणनेनुसार सुमारे ३३ लाख वृक्ष होते. त्यांची जातिनिहाय नावे अशी :-
दिल्ली हे भारताच्या सर्वाधिक वृक्षसंख्या असलेले महानगर आहे. त्याखालोखाल बंगलोर, कलकत्ता, नागपूर आणि पुणे यांचे क्रमांक लागतात. असे असले तरी, पुणे शहर हे भारताच्या सर्वाधिक वृक्षविविधता असलेले महानगर आहे असे वृक्षअभ्यासक श्री.द. महाजन यांचे मत त्यांनी २००५ साली एका राष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या निबंधात म्हणले होते. या वृक्षांपैकी ५० टक्के वृक्ष देशी आहेत.
- पुणे परिसर आणि जंगलात ५०हून अधिक प्रकारच्या वेली आहेत.
- पुण्यात दिसणाऱ्या बहुतांश वेली या दक्षिण अमेरिकेतून आणि आफ्रिकेतून आल्या आहेत.
अंकोळ, अंजन, अंजनी, अजानवृक्ष, अर्जुन, अशोक, आईन (ऐन), आपटा, आंबा, आवळा, एरिओलिना, उंडी (कॅलोफिलम इनोफिल्युम), औदुंबर, धेड उंबर, कडुनिंब (नीम-लिंबोणी), कढीलिंब, बकान नीम (बकाणा), महानीम, कदंब, कनकचंपा, करंज, मोठा करमळ, कवठ, कहांडळ, कळम (कळंब), काकड, कांचन, पिवळा कांचन, रक्तकांचन, श्वेतकांचन, काजरा, काटेसावर किनई, काळा कुडा, पांढरा कुडा, कुंती, कुंभा, कुसुम (कुसुंब) किंवा कोशिंब, कोकम, खडशिंगी, खरवत, खिरणी, खेजडी म्हणजेच शमी (प्रोसोपिस सिनेरारिया), खैर, गणेर ऊर्फ सोनसावर, गरुडवेल, गुंज, रतनगुंज, गेळा, गोळ, घटबोर, चंदन, चंदनचारोळी, चारोळी, चाफा, नागचाफा, सोनचाफा, चिंच, चिचवा, चीड (सरल किंवा पाईन - पायनस एक्सेलसा), जांभूळ, जायफळ, टेटू, टेमरू, टोकफळ, डलमारा, ताड, तांबट, तामण, दहीवण, दालचिनी, देवदार, धामण, धावडा, महाधावडा, रेशीम धावडा, नाणा, नांद्रुक (नांदुरकी), निरगुडी, नेपती, पळस, काळा पळस (तिवस किंवा रथद्रुम), पांगारा, बूच पांगारा, रानपांगारा, पाचुंदा, पाडळ, पायर, पारिजातक, पिंपळ, परस पिंपळ, पुत्रंजीव, पेटरा, पेटारी, पोलकी, फणस, फणशी, फालसा, बकुळ, जंगली बदाम, बहावा, बाभूळ, दुरंगी बाभूळ, बारतोंडी, बिब्बा, बीजा, बुरगुंड, बुरास, बूच, बेल, बेहडा, बोर, भुत्या, भूर्जपत्र, भेरा, भोकर, भोमा, माड, भेरली माड, मारवा, मुचकुंद, मेडशिंगी, मोई, मोखा, मोह, दक्षिण मोह, रबराचे झाड, रिठा, रुद्राक्ष, रोजवुड (शीशम-शिसवीचे झाड), रोहितक, लकूच, वड, वानवृक्ष, वायवर्ण, वारंग, पिवळा वारस, वावळ, वाळुंज (सावरकर स्मारकाजवळ असलेले हे झाड एकमेव आहे), शिवण, शिरीष, काळा शिरीष, संदन, साग, सात्विणी, सालई, सुकाणू, सुपारी, सुरंगी, सोनसावर ऊर्फ गणेर (कोच्लोस्पेरम रेलिजियोसम), हिंगणबेट, हिरडा, हिवर, हुंब, वगैरे.
अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री ॲंटिगोनान, रोज ॲपल (जाम), स्टार ॲपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आकाशनीम, ऑंकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हॉंगकॉंग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, ऑस्ट्रेलियन चेस्टनट (न्यू इंग्लिश स्कूल समोर पंताच्या गोटात हे दुर्मीळ झाड आहे), मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टिया नोबिलिस), कॅंडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कॅंपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, कॅश्युरिना, खडसावर ऊर्फ सुरू, कांचनराज, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), किलबिली, कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गुलमोहर, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, खुरचाफा (अनंत प्रकार), तांबडा चाफा (रेड फ्लॅंगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, चौरीसिया, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डॉंबेया (वेडिंग प्लॅंट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, ताम्रवृक्ष (पीतमोहर, पेल्ट्रोफोरम), तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), नीलमोहर, पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लॅंबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), रायआवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), वांगीवृक्ष, शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सॅंडबॉक्स ट्री), हुरा क्रेपितान्स, पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.
पुण्यात सुमारे ४०० जातींचे पक्षी आढळतात. त्यापैकी १५० जातींच्या पक्ष्यांची प्रभाकर कुकडोलकर यांनी काढलेली छायाचित्रे या ‘पुण्याचे पक्षी वैभव’ या पुस्तकात आहेत. या १५० जातींपैकी ४०हून अधिक जाती सहसा आढळून न येण्याऱ्या आहेत.
पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारताच्या बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारताच्या सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स, अल्फा लावल, सॅंडविक एशिया, थायसन क्रूप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्ज इंडिया, फोर्ब्स मार्शल, थरमॅक्स इत्यादी.
विद्युत व गृहोपयोगी वस्तूनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.
पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.
महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस., टेक महिंद्रा, विप्रो, पटनी, सत्यम, कॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जॉमेट्रिक सॉफ्टवेर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.
महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेर, अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजीज, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., यूजीएस, कॉग्निझंट, सिमॅंटेक, सनगार्ड, व्हर्संट, झेन्सार टेक्नॉलॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.
पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यू.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या मोठ्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.
पुण्यातील काही मोठ्या कंपन्यांची मुख्यालये -
कमिन्स इंडिया लिमिटेड, टेल्को/टाटा मोटर्स लिमिटेड, बजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९०च्या दशकात केपीआयटी कमिन्स, इन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमॅंटेक,आय.बी.एम.,कॉग्निझंट सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारताच्या एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई (जुने नाव रे मार्केट) या ठिकाणे कृषी उत्पादनांचा तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापार चालतो. बुधवार पेठ ही विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हॉंगकॉंग-लेन महिलांवर्गात लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी लोकप्रिय आहे. अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता हा कपडा, तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कॅंप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट येथे पाश्चात्त्य शैलीची उत्पादने मिळतात. त्याप्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, कर्वे रस्ता या भागांतसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.
पुण्यातल्या महात्मा फुले मंडईतून अनेक राजकीय कार्यकर्ते उदयास आल्याने या मंडईला लोक कौतुकाने मंडई विद्यापीठ म्हणतात. मंडईत महात्मा फुले मंडई प्रतिष्ठान या नावाच्या संस्थेचे कार्यालय आहे. प्रतिष्ठानच्या खटपटीमुळे मंडईचा ३०० मीटर त्रिज्येचा परिसर ‘वाय-फाय’ झाला आहे. ५०,००० गिगाबाईट्स एवढी या वाय-फाय सेवेची क्षमता असून त्या परिसरात एकाच वेळी कितीही लोक मोफत इंटरनेट वापरू शकतात.
पुण्यामध्ये असंख्य चहाच्या टपऱ्या आहेत. मनपसंत चवीचा चहा ह्या टपऱ्यांवर स्वस्त दरात मिळत असल्याने या टपऱ्यांचा धंदा जोरात चालतो. अशा चहाच्या दुकानांना अमृततुल्य (मुंबईत शंकर विलास) चहाची दुकाने म्हणतात. खाद्यपदार्थ विकणारे गाडीवालेही आहेत. पुण्यात गाडीवर मिळणारी भेळ आणि वडापाव अन्या कोणत्याही शहरांत मिळत नाही. एकेकाळी गाडीवर भजी मिळायची, आता मिळत नाहीत. उसाच्या रसाची गुऱ्हाळे विशिष्ट मोसमात असतात.
व्यवसायाचा प्रकार | नोंदणीधारक | परवानाधारक |
---|---|---|
चहा, कॉफी, वडापाव, ऑम्लेट, स्नॅक्स | ३६२८ | ३४५ |
भेळ, पाणीपुरी, चाट | ७६९ | २० |
चिनी खाद्यपदार्थ | ३१२ | १३ |
उसाची गुऱ्हाळे | १९७ | |
पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय.ए.एस. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.
अधिक माहितीसाठी पहा पुणे जिल्हा
पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.
पोलीस आयुक्त हा पुणे पोलिसांचा प्रमुख असतो. यो राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
पुणे शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरून एक मिलिटरी विमानतळ आहे. पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूर व दुबईला जाणाऱ्या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.
नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरू करणार असून तो चाकण व राजगुरुनगर या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवली गेली आहे.
शहरात पुणे व शिवाजीनगर ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळादरम्यान उपनगरी रेल्वे वाहतूक चालते. त्यामुळे पिंपरी, खडकी व चिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्या लोणावळ्यापर्यंत जातात तर मुंबईच्या कर्जत पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्ग आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसऱ्या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.
पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गामुळे वेगवान झाली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्याला मुंबई, हैदराबाद व बंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.
पुणे शहर हे महत्त्वाचे आय.टी. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) केंद्र आहे. पुण्यात चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे.
तीन माणसे बसू शकतील अशा रिक्षा हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. डिसेंबर २०१४ मध्ये पुण्यात सुमारे ५० हजार ऑटोरिक्षा होत्या. त्यांपैकी पेट्रोलवर चालणाऱ्या ११,३१२, डिझेलवरच्या १,९८४, सीएनजी (कॉंप्रेस्ड नॅचरल गॅस)वरच्या २७,०९४ तर एलपीजी (लिक्विड पेट्रोलियम गॅस)वर चालणाऱ्या ३,९५१ रिक्षा होत्या. हे आकडे पिंपरी-चिंचवडसाठी अनुक्रमे, १,५६८, ८०६, २,८२१ आणि ३६ होते.
पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वगैरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी. (पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) व पी.सी.एम.टी. (पिंपरी-चिंचवड म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट) या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण होऊन आता पी.एम.पी.एम.एल. (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड) ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.
पुणे रेल्वे स्थानकच्या ऐतिहासिक इमारतीचे उद्घाटन मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांच्या उपस्थितीत २७ जुलै १९२५ रोजी करण्यात आले. इमारतीचा आराखडा १९१५ मध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामास प्रारंभ १९२२ मध्ये झाला आणि तीन वर्षात काम पूर्ण झाले. इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशी मुंबईहून एक विशेष रेल्वेगाडी पुण्यात आणण्यात आली होती. पुणे स्थानकाच्या इमारतीचा मूळ आराखडा ब्रिटिशकालीन आहे. पुणे स्टेशन आणि लाहोर जंक्शनचे डिझाइन एकसारखे आहे. पुण्याच्या स्टेशनची इमारत बांधण्यासाठी त्या वेळी पाच लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला होता.
इ.स. १९२९ मध्ये पुणे स्थानकात पहिली विजेवरची गाडी धावली. १९३० मध्ये जागतिक कीर्तीची डेक्कन क्वीन ही गाडी सुरू झाली. आशियातील पहिली दोन मजली आगगाडी- सिंहगड एक्सप्रेस (जुने नाव जनता एक्सप्रेस)- ही पुण्यातूनच निघाली होती.
पुणे रेल्वे स्थानकाला २००२ साली रेल्वे बोर्डाने मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून गौरविले होते. सुपर फास्ट, गरीब रथ, एक्स्प्रेस, मेल, पॅसेंजर, लोकल यांसारख्या २३० गाड्या दररोज पुणे स्थानकावरून धावत असून दरोरज चार ते पाच लाख प्रवासी प्रवास करतात. २०१५ च्या सुमारास स्थानकात सात साधारण आणि दोन व्हीआयपी असे एकूण नऊ फलाट होते.
पुणे शहराच्या लोकसंख्येत गेल्या २० वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारताच्या सातवे मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.
पुण्यात राहणाऱ्यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.
काही अपवाद वगळता पुणे हे भारताच्या एक कायदा आणि सुव्यवस्था असलेले प्रगतीशील शहर समजले जाते.
ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते.
इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशपरदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिव्हल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.
पुण्यात अनेक देवांची मंदिरे आहेत. ते देव आणि ती देवळे त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-
फार पूर्वीपासून, पुणे शहरात असलेल्या तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि चतुःशृंगी या तीनच देवींच्या देवळात नवरात्राची खास पूजा होत आली आहे. या देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. या नऊ दिवसांत चतुःशृंगीची यात्राही असते. दसऱ्याच्या दिवशी त्या यात्रेची समाप्ती होते.
पुण्यातल्या आणखीही काही देवळांमध्ये अशाच प्रकारे नऊ दिवस वेगवेगळी आरास करून देवीला नटवण्याची प्रथा काही वर्षांपासून सुरू आहे. कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाची कासारदेवी त्यांपैकी एक आहे. नवरात्र जिथे साजरा होतो अशी आणखी काही देवळे :-
सप्तशृंगी महालक्ष्मी मंदिर, शिवदर्शन-सहकारनगरमधील महालक्ष्मी मंदिर, भवानी पेठेतील भवानी माता मंदिर, मुक्तांगण शाळेजवळील लक्ष्मीमाता मंदिर, वगैरे.
या दिवसात मुलींचे भोंडले होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्याची जागा आता गरब्याने घेतली आहे.
एके काळी पुण्यातील काही विशिष्ट देवळांमध्येच साजरे होणारे नवरात्र आता (२०१३ साली) २६८ देवळांत होऊ लागले आहे. असा नवरात्राचा उत्सव साजरा करणारी एकूण १२९२ मंडळे पुण्यात आहेत. त्यांपैकी १०२४ ठिकाणी सार्वजनिक उत्सव होतो. ३३१ मंडळे दुर्गापूजेच्या दिवशी मिरवणूक काढतात, तर २७२ मंडळे दसऱ्याच्या दिवशी आणि ३६४ मंडळे कोजागिरी पौर्णिमेला मिरवणूक काढतात.
पुणे शहरात २०१३सालच्या विजयादशमीला २९ ठिकाणी रावणदहनाचा कार्यक्रम ठेवला होता.
पंडित भीमसेन जोशी ह्यांनी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. दरवर्षी हिवाळ्यामध्ये हा अभिजात संगीताचा सोहळा पुण्यात होतो. चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत हिंदुस्तानी व कर्नाटकी गायन, वादन व नृत्याचे संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. हा महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळ भरवते.
दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीत महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात अनेक कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते.
पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सुदर्शन रंगमंच, गणेश कला क्रीडा मंच, नेहरू मेमोरियल हॉल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, विजय तेंडुलकर नाट्यगृह व रामकृष्ण मोरे - पिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बऱ्याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे (amphitheatres) आहेत.
पुण्यात होणारे नाट्योत्सव :-
पुण्यात २३ मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत एकूण ११६ पडदे आहेत. या पडद्यांवर मराठी, हिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. अजून १० मल्टिप्लेक्स (५४ पडदे) सुरू होणार आहेत (५-१०-२०१७ची स्थिती). पुणे स्थानकाजवळील आयनॉक्स, नगर रस्त्यावरील पी.व्ही.आर व सिनेमॅक्स ,विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, सातारा रस्ता, कोथरूड, डेक्कन, सिंहगड रोड येथील सिटीप्राइड, कल्याणीनगर येथील गोल्ड लॅब्स आणि आकुर्डी येथील फेम गणेश व्हिजन ही पुण्यातील मल्टिप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात. (प्रभात टॉकीज डिसेंबर २०१४मध्ये बंद होऊन २०१७मध्ये परत चालू झाले.).
पुण्यात बंद झालेली एकपडदा चित्रपटगृहे :- अनंत, अल्पना (शिरीन), आर्यन, एक्सेलसिअर, न्यू एम्पायर, जय हिंद, डीलक्स, नटराज (हिंदविजय), निशांत, भानुविलास, भारत, मिनर्व्हा, लिबर्टी, विजयानंद, वेस्टएंड, श्रीनाथ (ग्लोब), सोनमर्ग,
पुण्यात चालू असलेली एकपडदा चित्रपटगृहे :- अपोलो, अप्सरा, अरुण, अलका, अलंकार, अशोक, गुंजन, जयश्री, नीलायम, फन स्क्वेअर (दोन पडदा), रतन (पॅरेमाऊंट), राहुल (दोन पडदा), लक्ष्मी किबे (प्रभात), लक्ष्मीनारायण, वसंत, विजय, वैभव (दोन पडदा), व्हिक्टरी, श्रीकृष्ण.
पुण्यात वक्तृत्वोत्तेजक सभा नावाची एक खूप जुनी संस्था आहे. तिच्यातर्फे पुण्यात अनेक वर्षे वसंत व्याख्यानमाला चालू आहे. त्यात भर पडत पडत आज २०१८ साली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड भागात सुमारे ३२ व्याख्यानमाला चालतात. यांच्याद्वारे वर्षातील १००हून अधिक दिवस विविध व्याख्याने होत असतात. या चळवळीत पिंपरी-चिंचवड शहर व्याख्यानमाला समन्वय समितीचे मोठे योगदान आहे.
काही व्याख्यानमाला आणि वक्तृत्वस्पर्धा:-
चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतुःशृंगी देवस्थान पाहते. दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते.
शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.
पुण्याजवळील आळंदी व देहू येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपुरात वारी पोहोचते.
पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. पुण्यात ओहेल डेव्हिड हे इस्रायल देशाबाहेरचे आशियातील सर्वांत मोठे, लाल चर्च म्हणून ओळखजे जाणारे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे.
पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. कै.रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन या बागा व एक मोठे ध्यानगृह आहे.
कबरी, मशिदी, दर्गे
काका हलवाई यांचे गोड पदार्थ, चितळे बंधूंची बाकरवडी, बुधाणींचे बटाटा वेफर्स, लक्ष्मीनारायण चिवडा हे सर्व पदार्थ म्हणजे पुण्याची खासियत. जंगली महाराज रस्ता, कॅंप मधील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट, फर्ग्युसन रस्ता ही पुण्यातील खवय्यांची आवडती ठिकाणे आहेत. पुन्यातील बेडेकर मिसळ प्रसिद्ध आहे. अमृततुल्य नावाची चहाची दुकाने शहराच्या संस्कृतीचा भाग आहे. इतर महाराष्ट्रीय शहरांप्रमाणे मिसळ, वडा-पाव हे खाद्यपदार्थ पुण्यात जागोजागी मिळतात.
पुण्यातील डायनिंग हॉल्स हे अजून एक वैशिष्ट्य. स्वस्त असणारे हे हॉल आरामदायक तर असतातच पण 'अमर्यादित खा!' हा भाग विशेष उल्लेखनीय. रस्त्यांवरील गाड्यांवर मिळणारे कच्छी दाबेली, भेळ, पाणीपुरी इत्यादी गोष्टी इतर शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रसिद्ध आहेत. जुन्या शहरातील कोल्हापुरी जेवण पुणेकरांना आवडते.
शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासून बनवलेले कणीदार साजुक तुप घालुन उकडीचे मोदक आणि पुरणपोळी म्हणजे पुणेकरांचा वीक पॉईंट.
पुण्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली बहुतांशी उपाहारगृहे शाकाहारी आहेत. जंगली महाराज ह्या सुप्रसिद्ध रस्त्यावर अशी जवळ जवळ २५ हॉटेले आहेत. (महाराष्ट्रात उपाहारगृहाला हॉटेल म्हणतात.)
३१ मार्च २०१२ अखेरच्या वर्षभरात ५१२ कोटी रूपयांची दारू पुण्यात रिचविली गेली.[२२]
सकाळ, लोकसत्ता, लोकमत, पुढारी ,महाराष्ट्र टाइम्स, केसरी, प्रभात, आपलं महानगर ही मराठी वृत्तपत्रे तर इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, सकाळ टाइम्स, व महाराष्ट्र हेराल्ड ही इंग्लिश वृत्तपत्रे लोकप्रिय आहेत. आकाशवाणी, ज्ञानवाणी,रेडियो मिर्ची, रेडियो सिटी, विविध भारती, रेडियो वन व पुणे विद्यापीठाची विद्यावाणी ही रेडियोकेंद्रे पुण्यात ऐकता येतात. कलर मराठी, झी मराठी, ई टीव्ही मराठी, सह्याद्री दूरदर्शन या मराठी दूरचित्रवाहिन्या पुण्यात विशेष लोकप्रिय आहेत. पुणेकर अनेक हिंदी व इंग्रजी वाहिन्या देखील पाहतात. बीएसएनएल, टाटा व रिलायन्स या प्रमुख कंपन्या आंतरजाल (इंटरनेट) सेवा पुरवतात.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुणे हे शिक्षण व संशोधन क्षेत्रात आपले वर्चस्व गाजवू लागले. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्था स्थापन झाल्यामुळे पुण्याला हे शक्य झाले. फर्ग्युसन महाविद्यालय, स.प. महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थांमुळे पुणे हे इ.स. १९०० पासून नामांकित होतेच.
पुण्याला जवाहरलाल नेहरू यांनी पूर्वेकडचे ऑक्सफर्ड असे संबोधले होते. पुण्यात अनेक नामांकित शिक्षण संस्था आहेत. येथे शिकायला देशातून व परदेशातूनही विद्यार्थी येत असतात. तसेच पुणेकर देखील उच्च शिक्षण-संशोधनाबद्दल जागृत आहेत. संपूर्ण पुणे जिल्हा व अहमदनगर, सातारा, नाशिक या भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्याला येतात.
पुणे महानगरपालिका अनेक शाळा चालवते. परंतु पालकांचा कल मुलांना खाजगी शाळेत घालण्याकडे असतो.
यातील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC Board) किंवा केंद्रीय बोर्ड (सीबीएसई) या संस्थांशी संलग्न असतात. काही शाळा सीनियर केंब्रिज पुरस्कृत ICSE अभ्यासक्रम चालवतात. पुणे हे जपानी भाषेच्या शिक्षणाचे भारताच्या सर्वांत मोठे केंद्र आहे. पुणे विद्यापीठासह इतरही अनेक संस्था जपानी भा़षेचे शिक्षण देतात. जर्मन (मॅक्स म्युलर भवन), फ्रेंच (आलियॉंस फ्रॉंसे द पूना) या भाषादेखील (कंसात दिलेल्या संस्थांमध्ये) शिकविल्या जातात. काही शाळा इयत्ता आठवीपासून रशियन, जर्मन व फ्रेंच या भाषा पर्यायी विषय म्हणून शिकवतात. रमण बाग प्रशाला,न्यू इंग्लिश स्कूल, ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, अक्षरनंदन, नू.म.वि., साधना विद्यालय हडपसर या काही शाळा पुण्यात प्रसिद्ध आहेत.
विद्यापीठाचे नाव | विद्यापीठाचा प्रकार | व्यवस्थापन |
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ | खाजगी विद्यापीठ | खाजगी |
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) - अभ्यास केंद्र | वैधानिक, मुक्त विद्यापीठ | केंद्र शासन |
एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ | खाजगी विद्यापीठ | खाजगी |
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था | अभिमत विद्यापीठ | खाजगी |
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ | अभिमत विद्यापीठ | खाजगी |
डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था | अभिमत विद्यापीठ | राज्य शासन |
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी) | अभिमत विद्यापीठ | केंद्र शासन |
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ | अभिमत विद्यापीठ | खाजगी |
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (जुनी नावे - भारतवर्षीय महिला विद्यापीठ; इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी) | वैधानिक विद्यापीठ | राज्य शासन |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ | वैधानिक विद्यापीठ | राज्य शासन |
फ्लेम विद्यापीठ | खाजगी विद्यापीठ | खाजगी |
भारती विद्यापीठ | अभिमत विद्यापीठ | खाजगी |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (वायसीएमओयू) - अभ्यास केंद्र | वैधानिक, मुक्त विद्यापीठ | राज्य शासन |
विश्वकर्मा विद्यापीठ | खाजगी विद्यापीठ | खाजगी |
डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ | खाजगी विद्यापीठ | खाजगी |
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ | अभिमत विद्यापीठ | खाजगी |
सिंबायोसिस कौशल्य व मुक्त विद्यापीठ | खाजगी विद्यापीठ | खाजगी |
फर्गसन महाविद्यालय (डेक्कन एज्युकेशन सोसायटी) विद्यापीठ | खाजगी विद्यापीठ | खाजगी |
स्पायसर ॲडवेंटिस्ट विद्यापीठ | खाजगी विद्यापीठ | खाजगी |
महाविद्यालय (कॉलेज) / संस्था (इन्स्टिट्यूट) | प्रकार | व्यवस्थापन |
अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | संस्था | राज्य शासन |
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च (इंडसर्च) | संस्था | खाजगी |
एमआयटी ॲकॅडमी ऑफ इंजिनियरिंग | संस्था | खाजगी |
कमिन्स अभियांत्रिकी महिला महाविद्यालय | महाविद्यालय | खाजगी |
जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय | संस्था | खाजगी |
फर्ग्युसन महाविद्यालय | महाविद्यालय | खाजगी |
विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन अँड टेक्नॉलॉजी | महाविद्यालय | खाजगी |
सिंबायोसिस संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय | महाविद्यालय | खाजगी |
सेंट मीरा महिला महाविद्यालय | महाविद्यालय | खाजगी |
आदर्श बहुव्यापी शिक्षण व संशोधन महाविद्यालय | महाविद्यालय | अशासकीय अनुदानित |
डेक्कन एजूकेशन सोसायटी | महाविद्यालय |
पुण्यातील बव्हंशी महाविद्यालये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. काही महाविद्यालये अभिमत विद्यापीठांशी संलग्न आहेत.
कला/विज्ञान/वाणिज्य महाविद्यालये | अभियांत्रिकी महाविद्यालये | वैद्यकीय महाविद्यालये | व्यवस्थापन महाविद्यालये | इतर |
---|---|---|---|---|
नेस वाडिया महाविद्यालय | एम.आय.टी. | बी.जे. मेडिकल कॉलेज | सिंबायोसिस | राष्ट्रीय विमा अकादमी (नॅशनल इन्शुअरन्स अकॅडमी) |
बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स | पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नोलॉजी | लष्कराचे ए.एफ.एम.सी.(आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) | इंदिरा इन्स्टिट्यूट वाकड | आय.एल.एस. विधि महाविद्यालय |
आबासाहेब गरवारे महाविद्यालय | भारती विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालय | भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय | पुणे विद्यापीठाचा व्यवस्थापनशास्त्र विभाग (पुम्बा) | भारतीय विद्याभ्यास (आयुर्वेद व सामाजिक शास्त्रे) |
नौरोसजी वाडिया महाविद्यालय | आय.एम.डी.आर. | |||
स.प. महाविद्यालय | ||||
पुणे विद्यापीठ |
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी १०,००० इंजिनियर यशस्वी होऊन बाहेर पडतात.[ संदर्भ हवा ]
पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त पुण्यात अनेक सुप्रसिद्ध व महत्त्वाच्या संशोधन संस्था आहेत. विद्यापीठाजवळ राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तर विद्यापीठाच्या आवारात आयुका, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ स्ट्रोफिजिक्स व नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, राष्ट्रीय विमा अकादमी, केंद्रीय जल शक्ती संशोधन संस्था (Central Water and Power Research Station), उष्ण कटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, आघारकर संशोधन संस्था, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था या संस्थाही पुण्यात आहेत.
लष्करी शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था पुण्यात आहेत. श्री शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूल (एस् एस् पी एम् एस), राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन डी ए), कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (सी एम् ई), आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग वगैरे. लष्कराच्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (ए.एफ.एम.सी. वैद्यकीय महाविद्यालयाचे) विद्यार्थी भारतीय लष्कराच्या सेवेसाठी रूजू होतात. आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (जुने नाव - डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी), एक्सप्लोझिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट लॅबोरेटरी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन व आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या लष्कराशी संबंधित संशोधन करणाऱ्या संस्था देखील पुण्यात आहेत.
क्रिकेट हा पुण्यातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हॉकी, फुटबॉल, टेनिस, कबड्डी व खो-खो हे खेळ देखील खेळले जातात. पुण्यात दरवर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली जाते. पुण्यातील नेहरू स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय आहे. येथे क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. डेक्कन जिमखान्यात अनेक खेळ खेळण्याची सुविधा उपलब्ध आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये इ.स. १९९४चे राष्ट्रीय खेळ व इ.स. २००८ मध्ये दुसरे यूथ कॉमनवेल्थ खेळ भरले गेले होते.
मूळ पुण्यातील असलेले प्रसिद्ध खेळाडू - हेमंत व हृषीकेश कानेटकर, राधिका तुळपुळे व नितीन कीर्तने (टेनिस) हे आहेत. ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अनिल शिरोळे हे पुण्याचे माजी खासदार आहेत.
पुण्याजवळील गहुंजे येथे क्रिकेटचे एक अप्रतिम स्टेडियम आहेत. त्याचे नाव सुब्रतो रॉय स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.
• शनिवारवाडा • लाल महाल • पर्वती •सिंहगड किल्ला • नाना वाडा • दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर • सारसबाग • राजा दिनकर केळकर संग्रहालय • पेशवे उद्यान • कात्रज तलाव • बोपदेव घाट ह्वु पॉइंट
ओशो आश्रम (आचार्य रजनीश आश्रम), कात्रज सर्प उद्यान, खडकवासला धरण, चतुःशृंगीचे मंदिर, डायमंड वाटर पार्क, पर्वती, पाताळेश्वर लेणी, पु.ल.देशपांडे गार्डन, फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, बंड गार्डन, महात्मा फुले वाडा, मुळशी धरण, लवासा सिटी, लक्ष्मी रोड, लाल महाल, विश्रामबाग वाडा, वेताळ टेकडी, शनिवार वाडा, शिंद्यांची छत्री, सारसबाग
पुण्यातील एका निष्कलंक आणि ख्यातनाम नागरिकाला दरवर्षी पुण्यभूषण हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती :
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.