Remove ads
सहकारातील योगदान From Wikipedia, the free encyclopedia
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.
वसंतदादा बंडूजी पाटील | |
कार्यकाळ १७ एप्रिल, इ.स. १९७७ – ८ जुलै, इ.स. १९७८ | |
पुढील | शरद पवार |
---|---|
कार्यकाळ २ फेब्रुवारी, इ.स. १९८३ – १ जून, इ.स. १९८५ | |
पुढील | शिवाजीराव निलंगेकर |
जन्म | १३ नोव्हेंबर, इ.स. १९१७ पद्माळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र |
मृत्यू | १ मार्च, इ.स. १९८९ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
राजकीय पक्ष | अखिल भारतीय काँग्रेस |
आई | रुक्मिणीबाई बंडूजी पाटील |
वडील | बंडूजी पाटील |
पत्नी | प्रथम पत्नी - मालतीबाई पाटील
द्वितीय पत्नी - शालिनीताई पाटील |
नाते | प्रतीक पाटील (नातू) |
अपत्ये | प्रकाशबापू पाटील |
निवास | सांगली |
व्यवसाय | राजकारणी |
धर्म | हिंदू |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
या लेखाच्या निःपक्षपाती दृष्टिकोनाबद्दल विवाद आहे. कृपया तशी परिस्थिती निर्माण होईपर्यंत, हा संदेश हटवू नका. |
परिचय :
त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.
सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हणले जाते.
महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकऱ्यांना कमी व्याज दराने कर्जपुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. दादांच्या या लोकहितकारक निर्णयांची बीजे त्यांच्या देशभक्तीत व त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यांत आढळतात.
वसंतदादा अगदी लहान वयातही (१९३०) स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. १९४० पासून त्यांनी लढ्यात जोमाने सहभाग घेतला. फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल-बाँबचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी कामांच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात, १९४२ मध्ये आपला ब्रिटिश विरोध प्रखर केला. कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला चार युवक हुतात्मे झाले. या हौतात्म्याची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता. दादा काही काळ भूमिगत होते. त्यांना सुमारे ३ वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. १९४३ मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना खांद्याला गोळी लागली होती, व त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा-मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते. या प्रयत्नांत रामानंद भारती, बॅ. नाथ पै देखील सहभागी होते. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य-सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन, त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते.
वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वतःशेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.
सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, समाजमन-आकलन शक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव - इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्या वेळी केवळ एक वर्षाचे असणाऱ्या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास-कार्याची फळे आज महाराष्ट्र चाखतो आहे. म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.