Remove ads
हिंदू देवता From Wikipedia, the free encyclopedia
शिव ही हिंदू धर्मातील एक देवता आहे.[१][२]
शिव | |
भगवान शिव शंकर | |
मराठी | शिव 6313 |
निवासस्थान | कैलास, स्मशान |
लोक | शैव |
वाहन | नंदी |
शस्त्र | त्रिशूळ |
वडील | अज्ञात |
आई | अज्ञात |
पत्नी | सती, पार्वती, |
अपत्ये | कार्तिकेय, गणपती, अशोक सुंंदरी |
अन्य नावे/ नामांतरे | महादेव, उमापती, भोलेनाथ, उमेश, गंगाधर, त्रिनेत्र, त्र्यंबक, नीलकंठ, महेश, रुद्र, शंकर, शंभू, शूलपाणि, सदाशिव, सांब, गौरीहर, दीनानाथ, खंडोबा, |
या देवतेचे अवतार | खंडोबा, ज्योतिबा, कालभैरव, |
या अवताराची मुख्य देवता | महादेव |
मंत्र | ॐ नमः शिवाय ! |
नामोल्लेख | लिंग पुराण |
तीर्थक्षेत्रे | १२ ज्योतिर्लिंग |
भगवान शिव यांची अनेक नावे आणि विविध रूपे प्रसिद्ध आहेत. सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून त्यांना "महादेव" असे संबोधले जाते. समुद्रमंथातून निर्माण झालेले विष प्राशन करून ते आपल्या कंठात साठविल्यामुळे त्यांचा गळा निळ्या रंगाचा झाला, आणि म्हणूनच त्यांना "नीलकंठ" किंवा "नीलग्रिव" म्हणले जाऊ लागले. समस्त प्राणिमात्रा व पशूंचे स्वामी असल्याने ते "पशुपती" म्हणून देखील ओळखले जातात. भगवान शंकर हेही या देवतेच्या अनेक नावांपैकी एक नाव आहे.[३] शिव हे या जगताचे आदियोगी, प्रथम योगी, आदि गुरू, प्रथम गुरू आहेत अशी मान्यता आहे. शं करोती इति शंङ्कर: (संस्कृत शंङ्कर) | म्हणजे जो आपले कल्याण करतो तो शंकर होय. भारतीय सप्तऋषींना भगवान शिवाने प्रथम ज्ञान दिले असे मानले जाते. भगवान शिव हे सर्व सृष्टीचे कारण आहेत. रुद्र हे शिव शंकराचे वेदांतील नाव आहे. पार्वती त्यांची अर्धांगिनी (शक्ती) आहे. आणि स्कंद आणि गणेशही त्यांची मुले आहेत. भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली व भगवान विष्णू हे ह्या सृष्टीचे पालन करतात. परंतु सृष्टीचे कल्याण हे भगवान शिव शंकरामुळेच होणार आहे. भगवान शंकर हे तमोगुणाचे कारक असून सृष्टीचा संहार आणि विघटन त्यांच्या अधिपत्याखाली आहे. हे त्रिदेव म्हणजे नित्य नियमित जन्म-मरण चक्राची रूपके आहेत. भगवान शिवाच्या अनेक रूपांमध्ये उमा-महेश्वर, अर्धनारीश्वर, पशुपति, कृतिवास, दक्षिणमूर्ती आणि योगीश्वर इत्यादी रूपे प्रसिद्ध आहेत. शिव हा योगी मानला जातो आणि शिव शंकराची पूजा लिंग स्वरूपात केली जाते.भगवान शंकराला बेलपत्र प्रिय आहे .[४]
भारतीय संस्कृतीचे मूळ असलेल्या वैदिक साहित्यात रुद्र या नावाची देवता आढळते.[५] यजुर्वेदातील रुद्रसूक्त प्रसिद्ध आहे.[६] हीच रुद्र देवता पुराणकाळात शंकर किंवा शिव या नावाने उदयाला आलेली दिसते.[७] शिव या देवतेला लोकप्रिय करण्यासाठी शैव संप्रदायाचे मोठे योगदान आहे. या संप्रदायाचे साहित्य म्हणजे शिव पुराण, लिंग पुराण ही शंकर या देवतेशी संबंधित शैव पुराणे होत.[८]
भगवान शिव यांचे कुटुंब खूप मोठे आहे. शिवपुत्र गणपतीला ऋद्धी-सिद्धी या दोन पत्नी, आणि शुभ और लाभ असे दोन मुलगे आहेत. शिव ही पुरुष देवता असून ब्रह्मा, विष्णू या देवतांच्या जोडीने तिचे उल्लेख सापडतात. प्रलयाच्या वेळी शिव हा या सृष्टीचा तारणहार आहे असे मानले जाते. या देवतेचे वास्तव्य कैलास पर्वतावर असून पार्वती ह्या त्याच्या पत्नी सह तिथे वास आहे. गणपती आणि कार्तिकेय हे शिवाचे पुत्र तर अशोकसुंदरी त्याची पुत्री मानले जातात.[९]
वैदिक काळात शिव हा रुद्र या स्वरूपात पूजिला जात असे.[१०] रुद्र ही ऋग्वेदात मध्यम स्वरूपाची देवता मानली जाते. धनुष्य बाण हे त्याचे आयुध असून तो जटाधारी आहे. तो एक महान वैद्य असून त्याच्याजवळ वेगवेगळी औषधे असतात असे मानले जाते.[९]
अथर्ववेदात व्रात्यकाण्ड आहे. यामध्ये रुद्र हा व्रात्यांशी संबंधित देव आहे असे नोंदविले आहे. याला महादेव असे संबोधिले आहे. हा देव नंतर पशूंच्याकडे गेला. त्याला नंतर पशुपती असेही नाव पडले आहे. ब्राह्मणग्रंथांच्या काळात रुद्र ही वैदिक धर्मातील एक महत्त्वाची देवता बनली होती. त्यानंतर उपनिषद साहित्याने देखील महेश्वर, शिव या नावाने या देवतेला सन्मान दिलेला दिसतो.[९]
रामायण हा जरी वैष्णव संप्रदायाचा ग्रंथ असला तरी त्यामध्ये शिवाच्या पूजनाचे संदर्भ दिसतात. रामायणातील शिवाची उपासना ही केवळ मानव करतात असे नसून देव आणि दानवसुद्धा शिवाची पूजा करतात. रावणाने केलेली शंकराची तपश्चर्या हा यातील विशेष उल्लेख मानला जातो.[९]
महाभारतात शिवाचे एक दार्शनिक रूप दिसते आणि दुसरे रूप हे लोकांमध्ये प्रचलित असे आहे. शिवाचा योगदर्शनाशी असलेला संबंध हा ही महाभारतात दिसून येतो. त्याला महायोगी असे संबोधिले आहे.[९]
शिवाचा रंग कर्पूरासारखा (कापरासारखा) पांढरा आहे; म्हणून त्याला `कर्पूरगौर' असेही म्हणतात. हे राखाडी रंगाचे आवरण म्हणजे चिताभस्म असते.[११] शिवाला रोज नवीन चिताभस्म लागते.
जी (स्नानकर्त्या जिवाला) भगवत्पदाप्रत पोहोचवते ती गंगा’. ही गंगा स्वर्गात होती. भगीरथाच्या कठोर तपश्चर्येमुळे ती पृथ्वीवर आली. त्या वेळी गंगेच्या प्रवाहाचा भयानक वेग अन्य कोणीही थोपवू शकत नव्हता म्हणून शंकराने गंगेला आपल्या जटेत धारण केले, म्हणून शिवाला गंगाधर असे म्हणतात.[१२]
शिवाने भाली, म्हणजे कपाळी चंद्र धारण केला आहे.[१३] चंद्रमा ही क्षमाशीलता, ममता आणि वात्सल्य या तीन गुणांची एकत्रित अशी अवस्था आहे.
शिवाने हलाहल हे समुद्रमंथनामधून निघालेले विष प्राशन केले; या विषाचा दाह कमी व्हावा यासाठी वासुकी नाग शिवाने गळ्यात घातला. नागाला शिवाचे आयुधही समजले जाते, यामुळे शिवाला नागेन्द्र असे संबोधले जाते.[१४]
शिवाचा कपाळावर भुवयांच्या मध्ये जरा वर ऊर्ध्व नेत्र म्हणजे तिसरा डोळा आहे.[१५] हा डोळा तेजतत्त्वाचे प्रतीक आहे. शंकर त्रिनेत्र आहे, म्हणजे तो भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या त्रिकाळातील घटना पाहू शकतो. असे मानले जाते की जर महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे सर्व काही जळून खाक होऊ शकते, अशी मान्यता आहे. मदनाचा (कामदेवाचा) मृत्यू असाच झाला. महादेवांचा तिसरा डोळा हा खरा सत्यदर्शक प्रतिक आहे. त्यात क्रोध ही आहे आणि ममत्व ही. न्याय अन्याय या ही पलिकडे जाऊन तो सत्य पाहतो आणि दर्शवतो.
वाघ हा रज-तमांचे प्रतीक आहे. अशा वाघाला (रज-तमांना) मारून शिवाने त्याचे आसन केले आहे.
शिवाने गजचर्मसुद्धा परिधान केले आहे.[१६]
भगवान शिवाची सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वेश्वर, त्र्यंबक, वैद्यनाथ, नागेश, रामेश्वर आणि घृष्णेश्वर ही प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगे आहेत.[१७]
देवांचे देव महादेव यांनी भक्तांना वेळोवेळी आपले दर्शन दिले आणि जेथे - तेथे आपल्या भक्तांच्या आग्रहास्तव नैसर्गिक लिंग स्वरूपात बारा ठिकाणी ठाण मांडले, त्यांनाच " ज्योतिर्लिंगे " म्हणून ओळखले जाते.[१८] संपूर्ण भारतात अवघ्या महाराष्ट्रातच शिवाची पाच ज्योतिर्लिंगे आहेत. ह्या प्रत्येक ज्योतिर्लिंगासोबत शिवाची एक एक आख्यायिका आहे.[१९]
सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालम् ॐकारममलेश्वरम्॥ परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमाशंकरम्।
सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने॥ वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे। हिमालये तु केदारम् घुश्मेशंच शिवालये॥
१. सोमनाथ, सोरठ-सौराष्ट्र ( गुजरात )
२. मल्लिकार्जुन, श्री शैलम ( आंध्र प्रदेश )
३. महाकालेश्वर, उज्जैन ( मध्यप्रदेश )
४. ओंकारेश्वर, शिवपुरी ( मध्यप्रदेश )
५. वैद्यनाथ, परळी ( महाराष्ट्र )
६. औंढ्या नागनाथ, हिंगोली / परभणी ( महाराष्ट्र )
७. केदारेश्वर, केदारनाथ ( उत्तरांचल)
८. त्र्यंबकेश्वर, नाशिक ( महाराष्ट्र )
९. रामेश्वर, रामेश्वरम / सेतुबंधन ( तामिळनाडू )
१०. भीमाशंकर, डाकिनी / पुणे ( महाराष्ट्र )
११. विश्वेश्वर, वाराणसी ( उत्तरप्रदेश )
१२. घृष्णेश्वर, वेरूळ / औरंगाबाद ( महाराष्ट्र )
दशरथेश्वर महादेव मंदिर, मुखेड (महाराष्ट्र )
अजय अमहेश्वर-महेन्द्रपर्वत | अमरनाथ-काश्मीर | एकलिंग-उदयपूर | कण्डारिया महादेव-खजुराहो | मणिमहेश्वर-भारमौर हिमालय |
कपालेश्वर-क्रौंचपर्वत | कुंभेश्वर-कुंभकोणम | कुमारेश्वर-क्रौंचपर्वत | गौरीशंकर-जबलपूर | त्रिलोकीनाथ-हिमाचल |
तारकेश्वर-पश्चिम बंगाल | पशुपतिनाथ-नेपाळ | पक्षीतीर्थ-चेंगलपेट | प्रतिज्ञेश्वर-क्रौंचपर्वत | अमृतेश्वर-भंडारदरा |
बृहदीश्वर-तंजावर | भुवनेश्वर-ओरिसा | मध्यमेश्वर-काशी | गोकर्ण महाबळेश्वर-कर्नाटक | वाळकेश्वर-मुंबई |
मुक्तपरमेश्वर-अरुणाचल | वैद्यनाथ-कांगडा | व्यासेश्वर-काशी | सर्वेश्वर-चितोडगड | गुप्तेश्वर-नेपाळ |
सुंदरेश्वर-मदुरा | स्तंभेश्वर-चितोड | हरीश्वर-मानससरोवर | हाटकेश्वर-बडनगरू | जागनाथ-ठाणे |
नागेश्वर-द्वारका | गोपेश्वर-चमोली उत्तराखंड | गोंदेश्वर-सिन्नर नाशिक | वडक्कुनाथन-अथिरापल्ली | कोंडेश्वर-बदलापूर |
बाबुलनाथ-मुंबई | भुलेश्वर-मुंबई | ओंकारेश्वर-बोरिवली मुंबई | गावदेवी-दहीसर मुंबई | तृंगारेश्वर-वसई विरार |
शेषनाग महादेव-विरार | मंगेशी-गोवा | हरेश्वर-गोवा | वायकोमशिवा-केरळ | मुरूडेश्वर-कर्नाटक |
गोकर्ण-कर्नाटक | अंजनी महादेव-हिमालय | बिजली महादेव-हिमाचल | श्रीखंड महादेव-हिमालय | तुंगनाथ-उत्तराखंड |
काशी विश्वेश्वर-उत्तरकाशी | कोपेश्वर-कोल्हापुर-कर्नाटक सीमेवर | रामलिंग-कोल्हापूर | हरिहरेश्वर-हरिहरेश्वर | कालभैरवशिव-श्रीवर्धन समुद्र |
महादेव मंदिर-रावलनगर मीरारोड | महादेवालय-कांदिवली मुंबई | साईधाम-कांदिवली मुंबई | वडक्कुनाथन-अथिरापल्ली | कोंडेश्वर-बदलापूर |
मुक्तेश्वर-नैनीताल | शिवमंदिर-खारदुग्ला लड्डाख | शिवमंदिर-अशोकवन बोरीवली मुंबई | कवियुर-केरळ | नटराजा-सातारा |
पाटेश्वर-सातारा | बागनाथ-उत्तराखंड | बैजनाथ-उत्तराखंड | महाबळेश्वर-महाबळेश्वर | केदारकल्प-हर्सील |
सोमेश्वर महादेव-नाशिक | मध्यमहेश्वर-नाशिक | रामेश्वर-कोंकण | सीताबनी-काॅर्बेट | नागेशी-गोवा |
शिवतांडवस्तोत्रम् या रचनेमध्ये शिवाचे वर्णन आणि स्तुती अतिशय कुशलपणे योग्य ते शब्द वापरून केली गेली आहे. हे स्तोत्र रावणाने रचले असे मानले जाते. तसा उल्लेखही या स्तोत्रात आहे.[२०]
महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकराच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो. उपवास, पूजा, रुद्र पठन, विविध शिव मंदिरातील यात्रा आणि जत्रा यांनी महाशिवरात्री उत्सव संपूर्ण भारत देशात संपन्न केला जातो.[२१]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.