Remove ads
महाराष्ट्रातील तिसरे मोठे शहर. From Wikipedia, the free encyclopedia
नाशिक( उच्चार (सहाय्य·माहिती) (प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप नाशक) हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील शहर आहे. नाशिक हे भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. हे ऑटोमोबाईल हब मधील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे.नाशिक हे महाराष्ट्रातील चौथे मोठे शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरातील लोकसंख्या अंदाजे १४,००,००० आहे. या शहरात नाशिक विभाग, नाशिक जिल्ह्याचे व नाशिक तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
?नाशिक महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
२६४.२३ चौ. किमी • १,००१ मी |
जवळचे शहर | मुंबई |
जिल्हा | नाशिक |
लोकसंख्या • घनता |
१८,६२,७६९ (२०११) • ७,०५०/किमी२ |
भाषा | मराठी |
महापौर | सतीश कुलकर्णी(भारतीय जनता पक्ष)(इ.स. २०१९) |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२५३ • MH 15 |
संकेतस्थळ: नाशिक महानगरपालिका |
येथे मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावरील हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहे, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिमेस ३५किमी अंतरावर त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व कांद्याचे उत्पादन होते. त्याप्रमाणेच वाईन-निर्मितीसाठीही नाशिक प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे 'भारताची नापा व्हॅली' म्हणून आता नाशिक व नजीकचा परिसर नव्याने प्रसिद्ध होत आहे. जगातील सर्वांत पहिले व मोठे मातीचे धरण नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण येथेच आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (य. च. म. मु. वि.) नाशकातच आहे. नाशिक-मुंबई महामार्गावर सिटी अँड इंडस्ट्रीज डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने सिडको नावाचा शहराचा एक नवीन विभाग वसवला आहे. मुंबई व पुण्याप्रमाणेच येथे नाशिक शहर विकास प्राधिकरण स्थापन झालेले आहे.
पंचवटी हा सुद्धा नाशिकचा एक भाग आहे. नाशिकमधील अशी धार्मिक स्थळे पाहिल्याबरोबर माणसाला पुरातन काळाचे महत्त्व कळते. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. गोदावरी ही नदी नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. नाशिकमधील गोदाघाट प्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये काळाराम मंदिर आहे. पेशवे काळामध्ये ही या शहराला विशेष धार्मिक स्वरूप प्राप्त झाले. तांब्या पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक हे शहर विशेष प्रसिद्ध आहे. शहराला प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाची दीर्घ परंपरा लाभलेली आहे.
'नाशिक' जिल्हा दख्खन पठारावरील, सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील जिल्हा आहे. या जिल्ह्यात पश्चिमवाहिनी तापी व पूर्ववाहिनी गोदावरी या नद्यांच्या खोऱ्यांचा भाग येत असल्याने या जिल्ह्याच्या उत्तरेस दख्खन पठाराच्या भूस्तररचनेत महत्त्वपूर्ण बदल होतात. सह्याद्रीची प्रमुख रांग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून दक्षिणोत्तर दिशेने जाते व या रांगेच्या तीन शाखा या जिल्ह्यात पश्चिम–पूर्व दिशेने जातात. अगदी उत्तर भागात पश्चिमेस १,३०० मी. पासून पूर्वेस ६५० मीटर. पर्यंत उंचीची सेलबारी डोंगररांग असून,तिच्यातील मांगीतुंगी डोंगराची उंची १,३३१ मी. पर्यंत आहे.त्यांच्या पूर्वेस सेलबारी व हिंदबारी खिंडी व थेरमाळ आणि गाळणा किल्ले आहेत. गाळण्याच्या टापूत दक्षिणोत्तर रस्त्यावर खिंड आहे. याच्या दक्षिणेस १,६१३ मी.पर्यंत उंचीची घोलबारी डोंगररांग आहे.या रांगेतच घोलबारी खिंड व साल्हेर किल्ला आहे.या रांगेच्या दक्षिणेस जिल्ह्याच्या मध्यातून जाऊन तापी व गोदावरी यांची खोरी अलग करणारी सातमाळा किंवा चांदवड वा अजिंठा डोंगररांग आहे.ही रांग प्रथम पूर्वेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी ईशान्येस पसरते. तिची सरासरी उंची १,१०० ते १,३५० मी.असून धोडप,सप्तशृंरगीसारखी काही शिखरे १,४०० मीटर पेक्षा उंच आहेत.अचल व जावाता हे किल्ले या रांगेमध्ये असून डोंगरमाथे अरुंद व सपाट आहेत. या रांगेच्या दक्षिणेकडील छोट्या रांगेत, आलंदी व बाणगंगा नद्यांदरम्यान रामशेज डोंगर आहे. त्याच्या पूर्वेस एका शंकु–टेकडीत चांभार लेणी नावाची जैन लेणी आहेत. सातमाळेच्या दक्षिणेस त्रिंबक–अंजनेरी डोंगररांग असून,भास्करगडाच्या पूर्वेस हरीश किल्ला आहेआणखी पूर्वेस तीन अलग टेकड्या आहेत,त्यांस त्रिरश्मी म्हणतात. त्यांतील अगदी पूर्वेची टेकडी त्रिशीर्ष नावाची असून तेथे पांडव लेणी आहेत.
त्रिंबक डोंगररांगेतच गंगाद्वार येथे गोदावरीचा उगम आहे. डोंगरपायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे मंदिर आहे. अंजनेरी डोंगररांग बरीच उंच व खडकाळ आहे. त्रिशूळ ही त्या रांगेची शाखा विशेष प्रसिद्ध आहे.तिच्या पूर्व भागातच घारगड व शिव डोंगर आणि बहुला किल्ला आहेत. या डोंगरांतील एका खिंडीतून मुंबई–आग्रा महामार्ग जातो. जिल्ह्याच्या आणि इगतपुरी तालुक्याच्या अगदी दक्षिण टोकाशी पश्चिम–पूर्व पसरणाऱ्या उपशाखेमध्येच कळसूबाई (१,६४६ मीटर) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे.या रांगेत १,५०० मी. पेक्षा उंच अशी अनेक शिखरे आहेत. कळसूबाईच्या उत्तरेस इगतपुरीजवळच्या खिंडीवर झुकलेला एक प्रचंड कडा आहे. या डोंगराळ प्रदेशात मदनगड–बितनगड, अलंग–कुलंग, रौलिया–जौलिया, अंकाई–टंकाई, औंढा–पट्टा, साल्हेर–मुल्हेर, मंगिया–तुंगिया, इ. अनेक जोडकिल्ले मोक्याच्या जागी बांधलेले आढळतात. जिल्ह्यात सुमारे ३८ डोंगरी किल्ले असून त्यांपैकी २३ सह्याद्रीत आणि १५ सातमाळा रांगेत आहेत. सह्याद्रीच्या पश्चिमेस वाहणाऱ्या, तापीच्या खोऱ्यातील व गोदावरी खोऱ्यातील नद्या असे नद्यांचे तीन प्रमुख भाग आहेत. कोकणात किंवा सह्याद्रीच्या पश्चिम उतारावरून वाहणाऱ्या नद्यांत चोंदी, कावेरी, सासू किंवा तान, मान किंवा बामती, नार, पार, बारीक, दमणगंगा, वाल, वैतरणा व भीमा या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी काही नद्या जिल्ह्यांच्या किंवा राज्याच्या सीमेवरून काही अंतर वाहतात. त्या तीव्र उताराच्या आणि बऱ्याच लहान आहेत. वैतरणा नदीने दारणेच्या खोऱ्यात नदी अपहरण केले असल्याची शक्यता आहे. तापीच्या खोऱ्यातून ईशान्य दिशेस वाहणाऱ्या नद्यांत गिरणा व बोरी या नद्या प्रमुख आहेत व त्या स्वतंत्रपणे तापीस मिळतात. गिरणा नदी सह्याद्रीमध्ये हातगडपासून ८ किमी. नैऋत्येस, चेराई गावाच्या दक्षिणेस उगम पावते व कळवण, सटाणा व मालेगाव तालुक्यांतून वाहत जाऊन जळगाव जिल्ह्यात शिरते. नासिक जिल्ह्यात गिरणेस तांबडी, पुनंद, आराम, मोसम व पांझण या प्रमुख उपनद्या मिळतात. मन्याड ही गिरणेची उपनदी या जिल्ह्यात उगम पावते आणि गिरणेस जळगाव जिल्ह्यात मिळते. पांझण आणि मन्याड या खोल, अरुंद दऱ्यांतून व उंच दरडींमधून वाहत असल्यामुळे जलसिंचनास फारशा उपयुक्त नाहीत; परंतु गिरणा व तिच्या बाकीच्या उपनद्या मात्र त्या दृष्टीने चांगल्या उपयोगी पडतात. या जिल्ह्यात गोदावरी ही दक्षिण भारतातील सर्वांत मोठी नदी, नासिकपासून जवळच गंगाद्वार (त्र्यंबकेश्वर) येथे उगम पावते. तिला १४ कि. मी.वर किकवी मिळते. काश्यपी (कास)–गोदावरी संगमापासून जवळच गंगापूर धरण बांधले आहे व तेथून दहा किमी. अंतरावर नासिक शहर आहे. जलालपूरजवळ आलंदी नदी गोदावरीस मिळाल्यानंतर काही अंतरावर गोदावरी अरुंद, खडकाळ पात्रातून जाऊन सु.१० मी.खोल उडी घेते व तोच दूधस्थळी धबधबा होय. नासिक शहरात प्रवेश करण्यापूर्वी ती सु. दोन मी.ची छोटीशी उडी घेते.तिच्या काठी अनेक देवळे असून पात्रात अनेक कुंडले बांधलेली आहेत. नासिक व निफाड या दोन तालुक्यांतील गोदावरीचा ९६ किमी. प्रवाह या जिल्ह्यातून वाहतो. दारणा ही गोदावरीची या जिल्ह्यातील प्रमुख उपनदी होय. ती इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. वर सह्याद्रीमध्ये उगम पावते. दारणेवर नांदगावजवळ धरण बांधण्यात आले आहे व त्यामुळे लेक बीले हा जलाशय निर्माण झाला आहे. दारणेस वाकी, उंदुलोह व वालदेवी या प्रमुख उपनद्या मिळतात व त्यांसह दारणा निफाड तालुक्यात गोदावरीस मिळते. या पूर्ववाहिनी नद्या बऱ्याच उथळ असून वर्षातून सहा ते आठ महिने कोरड्या असतात. दारणेशिवाय गोदावरीस या जिल्ह्यात देव, झाम, बाणगंगा, काडवा व गुई या प्रमुख नद्या मिळतात. गोदावरी व तिच्या उपनद्या यांचा जिल्ह्याला सिंचनाच्या दृष्टीने बराच उपयोग होतो.
नाशिक समुद्र सपाटीपासून ६०० मीटर (२,००० फूट) उंचीवर आहे. गोदावरी नदीचा उगम नाशिकपासून २४ कि.मी. (१५ मैल) त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतावर झाला असून ती नाशिकच्या जुन्या निवासी भागातून शहराच्या उत्तर सीमेलगत वाहते. कारखान्यातील निर्माण झालेल्या प्रदूषणामुळे नदी खूप प्रमाणात दूषित झाली आहे. गोदावरीव्यतिरिक्त वैतरणा, भीमा, गिरणा, कश्यपी, दारणा इत्यादी महत्त्वाच्या नद्या नासिकमधून वाहतात. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून निर्माण झालेल्या दख्खन पठाराच्या पश्चिम काठावर नासिक वसलेले आहे. संपूर्ण जिल्ह्यात, चुनखडी व कंकर प्रत्यक्षपणे आढळतात. जळगाव आणि औरंगाबाद नाशिकच्या पूर्वेला आहेत. ठाणे व गुजरात भाग नाशिकच्या पश्चिमेस आहेत, तर अहमदनगर दक्षिणेला आहे. येथील काळी माती शेतीसाठी अनुकूल आहे. त्र्यंबकेश्वर जेथे गोदावरी नदी उगम पावते, नासिक शहरापासून ३० कि.मी. (१९ मैल) अंतरावर आहे. शहराचे एकूण जमीन क्षेत्र २५९,१३ किमी२(१००.०५ चौरस मैल) असून महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश व पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रदेशांनंतर तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. नाशिक शहराच्या महानगर पालिकेमध्ये ६ विभाग आहेत.
नाशिक शहरात पंचवटी, भद्रकाली, तिवंधा, पाथर्डी, अंबड़, सातपूर, द्वारका, आडगाव, सिडको, नवीन नाशिक, विल्होळी, मेरी, म्हसरूळ, जुने नाशिक, महात्मा नगर, कॉलेज रोड, गंगापूर रोड, इंदिरानगर, नाशिकरोड, जेलरोड, , मुंबईनाका, बेलगांव, उपनगर, इत्यादी प्रमुख उपनगरे आहेत.
शहराच्या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. या महाकाव्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे.त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां"असे म्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच २८ किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे.
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. 'जनस्थान,त्रिकंटक,गुलशनाबाद', नासिक, आणि विद्यमान नाशिक'अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात.ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. महाकवी कालिदास व भवभूती यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ रामायणाशी आहे. राम, त्यांची पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मण नाशिक मधील पंचवटी परिसरात वास्तव्यास असताना शूर्पणखा या रावणाच्या बहिणीचे नाक (संस्कृत भाषेमध्ये 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही सह्याद्रीच्या नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.
भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. दर १२ वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. येथील मंदिरे व गोदावरी नदीवरील घाट प्रसिद्ध आहेत. इ.स. १२०० सालाच्या सुमारास खोदलेली त्रिरश्मी लेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात.
नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय)
नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते. सातवाहन साम्राज्य |सातवाहन] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स. १५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता.
१ इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नहपान या क्षत्रपाने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.
२ इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नहपानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला.नहपानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.
३ इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.
४ इ.स ८०-१२५ हा क्षत्रप वर्चस्वाचा कालखंड होता. त्याचप्रमाणे
५ इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता. याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती क्षत्रपांची होती.
६ इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.
सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले. नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता. यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. ७ इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते. ८ इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे. सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता. सतराव्या शतकात हा भाग मोगल राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले. ९ इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे.. १० इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.[१]
सातवाहन राजवंश १) सिमुक राजवंश. २) कृष्ण राजवंश. ३) सातकर्णी १ राजवंश. ४) वेदश्री राजवंश. ५) शक्तीश्री राजवंश. ६) पूर्णोत्संग राजवंश. ७) स्कन्द्स्भि राजवंश. ८) २रा सातकर्ण राजवंश. ९) लंबोदर राजवंश. १०) आपीलक राजवंश. ११) मेघस्वाती राजवंश. १२) स्वाती राजवंश. १३) स्कन्द्स्वति राजवंश. १४) मृगेंद्र राजवंश. १५) कुंतल राजवंश. १६) स्वतीवर्ण राजवंश. १७) प्रथम पुलोमावी राजवंश. १८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश. १९) हाल राजवंश. २०) मंतलका राजवंश. २१) पुरिंद्रसेन राजवंश. २२) सुंदर सातकर्णी राजवंश. २३) चकोर राजवंश. २४) शिवस्वाती राजवंश. २५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश. २६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश. २७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश. २८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश. २९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश. ३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश. ३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश. ३२) तृतीय पुलोमावी राजवंश. [२]
यादव काळ पुढील प्रमाणे:-
तैलप तिसरा ह्या शेवटच्या चालुक्य राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे.
इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर ही राजधानी होती.
सिन्नर- सिंदीनगर,सेउनुर,श्रीनगर, या नावानी ओळख होती.१२ व्या शतकापर्यंत यादवांची राजधानी होती.
इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८,च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.
अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.
खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता.
इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.
अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.[१][३]
मुस्लिम कालखंड पुढील प्रमाणे:-
इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.
इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.
इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले.
इ.स.१३६६मध्ये बागलाण प्रांताचा प्रमुख गोविंददेवाने महमद शहा बहामनी विरुद्ध मराठ्यांचे बंड घडवून आणले.
इ.स.१६०९मध्ये नाशिक प्रदेश मिया राजू ह्यांच्या नियंत्रणाखाली आला.
इ.स.१६३२पर्यंत मोगलांनी दख्खन, वऱ्हाड, खानदेश या प्रांतांसह नाशिकमध्ये मोगल साम्राज्याचा पाया पक्का केला.
इ.स.१६८२पर्यंत मोगलांनी बरेच विजय मिळवले.
शहजादा महमद आझम या अनुभवी सरदाराची नेमणूक बहादूरगड आणि गुलशनाबाद (नाशिक) येथेकेली.
इ.स.१६८८मध्ये मतबर खान नावाच्या बलाढ्य सरदाराची नेमणूक झाली.
इ.स.१६९६मध्ये मराठ्यांनी नाशिकच्या काही भागात अंमल बजावला.
इ.स.१७०७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाचे मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.यामध्ये झुल्फिकार खान, ममार खान, मतबर खान आदी अधिकारी नाशिक-खानदेशवर नियुक्त होते.
शाहूंच्या सुटकेनंतर स्थिरस्थावर झाल्यावर शाहूंचे पेशवे बाळाजी विश्वनाथांनी दिल्ली करारात मोगलांकडून दख्खनची चौथाई सरदेशमुखी मिळवली. त्यात तत्कालीन नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही समावेश होता.
बागलाण गलना भागात दाभाड्यांची पकड होती. इ.स.१७३१ च्या काळात पहिल्या बाजीरावचे नाशिक, पेठ, या भागांवर वर्चस्व होते.[४][५]
मराठा कालखंड पुढील प्रमाणे:-
इ.स.१७४७पर्यंत म्हणजेच औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत हा भाग मोगलांच्या ताब्यात होता.
इ.स.१७४७नंतर नाशिकवर मराठ्यांचा पूर्ण अंमल झाला.
सरदार नारोशंकर राजे बहादर ह्यांनी रामेश्वर मंदिर बांधून नारोशंकराची घंटा बांधली.
१७३८ साली कपालेश्वर मंदिर बांधले.
सरदार चंद्रचूड यांनी १७५६मध्ये सुंदरनारायण मंदिर बांधले.
काळाराम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम १७९० साली सरदार आडेकरांनी पूर्ण केले.
१७४८ मध्ये निजाम-उल-मुक्त आसफ जहा वारल्यानंतर त्यांचा मुलगा नासीर युंग सत्तेवर आला.
व बाजीराव यांच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाले.
तरीही निजाम व मराठ्यांचे वाद होताच. इ.स.१७५१ मध्ये नसीर यांगचा खून झाल्यावर निजामाचा तिसरा पुत्र गादीवर आला. त्याने फ्रेंचांच्या मदतीने औरंगबादवरून मराठ्यांवर चाल केली.
परंतु मराठ्यांनी त्याला इ.स.१७५२ च्या शांतता करारान्वये परतून लावले. ह्या करारानुसार गोदावरी व तापी नदीमधील खानदेशचा पूर्ण भाग मराठ्यांचा सत्तेत आला.
पहिल्या निजामाच्या मृत्यूनंतर पेशव्यांनी १७५१ मध्ये नासिक हे नाव पुन्हा सुरू केले.
इ.स.१७६०-६१ मधील सलाबात जंगच्या पराभवानंतर नासिक हे पेशवाईतील प्रमुख ठिकाण बनले.
इ.स.१७६१ नानासाहेबाच्या मृत्यूनंतर माधवराव पेशवे पदावर आले.
इ.स.१७६३ विनायकरावाने पेशवे प्रदेशातील नाशिक, जुन्नर, संगमनेर शहरांची लयलूट केली.
यानंतर पेशव्यांनी बालाजी सखाराम यांना बागलांचा सरसुभेदार नेमले.
इ.स.१८१८ पर्यंत हा भाग पेशव्यांचा हाती होता. पण १८१८ मध्ये थोमस हिस्लॉपच्या ब्रिटिश सैन्याने कोपरगाव घेतले. चांदवडच्या उत्तरेकडील भाग जिंकला. ७ मार्च १८१८ खानदेशातील
थाळनेर, चांदवड किल्ला जिंकून १८१८ मार्च अखेर होळकरांच्या नाशिकवर पूर्ण ताबा मिळवला.[४][६]
ब्रिटिश कालखंड पुढील प्रमाणे:-
ब्रिटिशांनी मध्ये मराठ्यांच्या राज्य मिळवले.
१८५७ मध्ये नाशिक महत्तवाचे ठिकाण बनले. ब्रिटिश सरकारविरोधात दक्षिण सरकारविरोधात दक्षिण नाशिकच्या व उत्तर अहमदनगरच्याभिल्लांनी भाग घेतला. ते जवळ जवळ ७ हजार लोक होते. यात मागोजी नाईक हा महत्त्वाचा होता. त्याने सर्व भिल्लांना एकत्र केले होते.
ह्याने नाशिकमधील बंडाचे जनकत्व घेतले. भिल्लांच्या मदतीने ब्रिटिशाविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवला.
आपल्या पन्नास टोळ्यांना त्याने आपल्या बंडात समावेश करून घेतले. त्याच्या बंदोबस्तासाठी लेफ्टनंट हेनरी, टी.थॅचर, एल.टेलर हे अधिकारी आले. हल्ल्यापूर्वी संगमनेर व सिन्नरच्या मामलेदारांनी मागोजीला शरण येण्याचा प्रस्ताव ठेवला. व त्याने तो ठुकरावला. १८५७ साली बंडातील लोक नाशिक जिल्ह्यातल्या २४ गावांत छोट्या जहागिरीत शिरले. यावेळी ब्रिटिशधार्जिणे राजे भगवंतराव व त्याच्या माणसांस फासावर लटकावले. भोगोजी नाईक हे आणखी एक बंडखोर नेते होते. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कॅखप्टन नटरलरने वर्षभर प्रयत्न केले. पण जमले नाही. भोगोजी नाईक हे ब्रिटिशांशी सिन्नर, येवला या भागांत लढले.
भोगोजी नाईकचा पराभव करून त्यास मारण्यास सटर ह्या इंग्रज सेनानीला यश मिळाले. त्यानंतर १८६० पर्यंत शांतता होती.
इ.स.१८६० मध्ये नाशिकला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळाला.
इ.स.१८६१ मध्ये ॲंग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलची स्थापना झाली.
इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नगरपरिषदेचा दर्जा मिळाला.
इ.स.१८६४ मध्ये नाशिकला नाशिक वृत्त नावाचे वर्तमानपत्र चालू झाले.
इ.स.१८७७ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांचे नाशिकमध्ये आगमन झाले.
इ.स.१८७७ मध्ये नाशिकच्या सार्वजनिक जीवनात न्यायमूर्ती रानडे यांचे आगमन
इ.स.१८९९ मध्ये सावरकरांनी गुप्तपणे नाशकात राष्ट्रभक्त समूह नावाची समाजाची स्थापना झाली.
मित्रमेळा नावाची संघटना नाशिकचे नाव झळकावू लागली.
१. वीर सावरकर इंग्लंडला गेले.त्यांनी मित्रमेळाचा कारभार तेथून सांभाळला.
२. टिळकांनी ३१ मे १९०७ साली सरकारच्या रिस्ते सर्क्युलरला विरोध करण्यासाठी नाशकात सभा घेतली.
३. मित्रमेळात औरंगाबादच्या अनंत कान्हेरेचा समावेश झाला.
४. २१ डिसेंबर १९०९ रोजी जुलमी जिल्हाधिकारी जॅक्सनला गोळ्या घातल्या.
५. जॅक्सन खून प्रकरणात कृष्ण गोपाळ कर्वे, नारायण जोशी, गणेश जोशी यांची चौकशी झाली.
६. २९ मार्च १९१० रोजी कान्हेरे, कर्वे, देशपांडे यांना फाशी देण्यात आली. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान फार मोठे होते..
७. सावरकरांना तुरुंगात डांबण्यात आले.
८. २५ फेब्रुवारी १९६६ साली ८३ व्या भारताच्या या महापुत्राने योगसमाधी घेतली.
९. बाबासाहेब अंबेडकरांचे नाशिक मधील योगदान महत्त्वाचे होते.
१०. बाबासाहेब अंबेडकरांनी काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळून दिला. हा सत्याग्रह देशभर गाजला.
[४][७]
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इ.स. १९०९ साली अनंत कान्हेऱ्यांनी नाशिकचा ब्रिटिश कलेक्टर जॅक्सन याचा वध इथल्याच विजयानंद रंगमंदिरात केला होता. अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली येथे - इ.स.१८५७ ते इ.स.१९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत मंदिर संस्थेमार्फत इमारतीची स्थापना केली गेली किंवा आहे. येथे स्वातंत्र्य देवतेची मूर्ती आहे.तसेच येथे हुतात्मा कान्हेरे कक्ष आणि दुसऱ्या जागीर हुतात्मा कर्वे कक्ष व हुतात्मा देशपांडे कक्ष आहेत.याच इमारतीच्या आसपास ब्रिटिश कलेक्टर जॅक्सनचा वध कसा करायचा याचा आराखडा ठरवला गेला होता. भीमराव रामजी आंबेडकर यांनी येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला होता. भारतीय चित्रपटाचा उगम नाशिकशी निगडित आहे.कारण भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांचे जन्मगांव आहे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर हे नाशकापासून जवळच आहे.फाळक्यांचा पहिला स्टुडियो नाशिकमध्ये सध्या असलेल्या महात्मा फुले मंडईजवळ होता.
नाशिकचे वर्णन "भारताची वाईन कॅपिटल" असे केले जाते, नाशिक भागात दरवर्षी दहा हजारापेक्षा जास्त टन द्राक्षांचे उत्पादन होते. सन् २०१३ मध्ये, संपूर्ण भारतातील ४६ वाईनरीजपैकी नाशिकमध्ये २२ वायनरी नाशिक येथे होत्या. द्राक्षशेतीमुळे नाशिक भारताचे वाइन कॅपिटल म्हणून उदयास आले आहे. आज सुमारे चाळीस छोट्या-मोठ्या वायनरी नाशिकमध्ये आहेत. या उद्योगाला आवश्यक असलेले टेस्टिंग, प्रोसेसिंग, बॉटलिंग, प्रनिंग, फर्मेंटेशन, गुणवत्ता तपासणी, ग्रेप क्रशिंग या सात क्षेत्रांत अतिरिक्त उद्योग येथे तयार होत आहेत. दर वर्षी येथे भरवल्या जात असलेल्या सुला फेस्ट या मद्य उत्सवाला मोठी गर्दी असते.
नाशिकमध्ये मंदिरांखेरीज काही संत-सत्पुरुषांचे मठ व गोसावी, बैरागी यांचे आखाडेही आहेत.
येथील कैलास मठाच्या वतीने श्री सरस्वती पुरस्कार दिला जातो.
नाशिक क्षेत्रात रामनवमीचा उत्सव, गंगा-गोदावरी महोत्सव, त्रिपुरी पौर्णिमेची दीपाराधना असे बरेच उत्सव असतात.
हिंदू पौराणिक आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाला. त्यावरून देव व दानव यांच्यात युद्ध झाले होते. युद्धात अमृतकुंभातील चार थेंब जमिनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, त्या चार ठिकाणी कुंभमेळे भरतात. पहिला थेंब हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैन येथील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब नाशिक येथील गोदावरी नदीत व चौथा थेंब प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्यांच्या संगमावर पडला होता. अलाहाबाद, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक आज ही चार स्थळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून येथे कुंभमेळा भरतो.
नाशिक शहर एक महाकुंभच्या नावाने ओळखले जाते. हा जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे. हा कुंभ मेळा बारा वर्षांनी भरतो. कुंभ मेळा नाशिक मध्ये पंचवटी-रामकुंड येथे आणि त्र्यंबकेश्वरला कुशावर्त घाटावर भरतो. या कुंभ मेळ्यासाठी साधू, महंत, भाविक हे लाखोंच्या संख्येने गोदावरीच्या तीरी पवित्र स्नान करण्यासाठी उपस्थित असतात. २०१५ साली कुंभमेळा भरला होता. नंतरचा २०२७ साली भरेल.
पावसाळ्या व्यतिरिक्त नाशिकचे हवामान कोरडे असते. मे २३, इ.स. १९१६ रोजी आजवरचे सर्वाधिक कमाल तापमान हे ४६.७° से. नोंदले गेले आहे. जानेवारी ७, १९४५ रोजी सर्वांत कमी किमान तापमान हे ०.६° से. नोंदले गेले आहे. सरासरी पर्जन्यमान ७०० मि.मी. आहे. शहराचे उष्णकटिबंधीय स्थान आणि उच्च उंची एकत्रितपणे उष्णकटिबंधीय ओल्या आणि कोरड्या हवामानाची तुलनेने सौम्य आवृत्ती देते.
चांदवड तालुक्यातील हट्टी येथे असलेला हा किल्ला महाराष्ट्र मधील क्रमांक दोन मध्ये उंच किल्ला आहे. येथे जाण्यासाठी अनेक रस्ते असून तुम्ही नाशिक, चांदवड, देवळा, कळवणवरून येत असताना वेगवेगळ्या रस्त्यांनी येऊ शकतात. जर तुम्ही नाशिक वरून येत असेल तर तुम्हाला आधी वणी येथे यावे लागेल आणि तेथून पारेगाव वरून येऊन हट्टीला यावे लागेल. जर तुम्ही पिंपळगाव बसवंत वरून किंवा त्या चांदवड वरून येत असाल तर वडाळीभोई आणि धोडंबे वरून हट्टी असे यावे लागेल. धोडंबे वरून तुम्ही कानमंडाळे आणि पुढे कुंडाने असेही किल्ल्यावर जाऊ शकता.
नाशिकपासून जवळ असलेला नाशिक जिल्यातील तालुक्यातील गावात 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे आहे. सह्याद्री पर्वत रांग, धबधबे आणि पावसाळ्यातील हवामानच आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
सप्तशृंगी मंदिर देवी महिषासुरमर्दिनी या देवीला समर्पित आहे. हे महाराष्ट्रातील चार शक्ती पीठांपैकी एक आणि भारतातील ५२ शक्ती पीठांपैकी एक आहे.हे मंदिर डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे.
पंचवटी ह्याचे उल्लेख रामायणात केले आहे. पंचवटी शब्दशः म्हणजे "पाच वडाचे झाडे एक बाग". हे स्थळ गोदावरी नदीच्या पाठावर आहे . येथे तपोवन नावाची एक जागा आहे, जिथे लक्ष्मण (रामाचा लहान भाऊ) ने शुर्पणखा (रावणाची बहिण ) हिचे नाक कापले होते, असे म्हणले जाते आणि पंचवटी ह्याच ठिकाणी राम आणि सिता यांनी १४ वर्षाचा वनवास केला होता. येथे एक मोठी बाजारपेठ आहे आणि तेथे माल निर्यात केला जातो
सीताकुंड हिंदू पवित्र जागा आहे. भाविकांना या ठिकाणी त्यांच्या इच्छा पूर्ण करेल असा विश्वास आहे. रामायणातील मते रामाने नाशिकमध्ये त्याच्या मुक्काममध्ये या नदीत स्नान केले होते.
मुक्तिधाम मंदिर नाशिक रोड आहे. क्लिष्ट आर्किटेक्चर हे मंदिर पांढरा संगमरवरी बाहेर बांधण्यात आले. महान भारतीय धार्मिक मजकूर असणे असा , 12 ज्योतिर्लिंगांपैकी आणि हिंदू बाजूंना अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत.
ते काळाराम मंदिर रामाला समर्पित आहे. हे काळाराम मंदिराचे अर्थ "काळा रामा" आहे.
महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. ते मुंबई, पुणे शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे.
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवऱ्हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत.हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड,महिंद्र अन्ड महिंद्र,मायको, क्रॉंप्टन ग्रीव्ह्ज्,गरवारे,एबीबी,सीमेन्स, व्ही.आय.पी,ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अन्ड टुब्रो,सॅमसोनाइट,सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन,अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात आहे.शहराजवळ एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.तसेच नाशिक रोड येथे'इंडियन करन्सी प्रेस' हा नोटांचा छापखाना किंवा छाप कारखाना आहे, तसेच'इंडिया सिक्युरिटी प्रेस'आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई नाशिक येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन,योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी वाईन प्रसिद्ध आहेत.
प्राथमिक व विशेष शिक्षण:-
नाशिक महानगरपालिका अनेक शाळा चालवत आहे. परंतु पालकांचा कल खाजगी शाळेत घालण्याकडे जास्त असतो. नाशिक मधील सर्व शाळा या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय बोर्ड (पुणे बोर्ड/दिल्ली बोर्ड) या संस्थांशी मोठ्या प्रमाणात संलग्न आहेत. तसेच पुणे शालान्त परीक्षा बोर्डाचे (SSC / HSC) उपविभागीय कार्यालय नाशिक येथे आहे.
नाशिक मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आहे आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ ही विद्यापीठे देखील आहेत.
नाशिक मधली महत्त्वाची महाविद्यालये पुढीलप्रमाणे :-
3. अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर आहे.
4. अभिनव भारत मंदिर, तिळभांडेश्वर गल्ली - इ.स. १८५७ ते इ.स १९४७ पर्यंतच्या भारतीय स्वातंत्र्य हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या इमारतीची स्थापना केली आहे.
5. आगर टाकळी, समर्थ रामदासांनी स्थापलेला मारूती आहे.; समर्थांचे १२ वर्षे वास्तव्य
6. इच्छामणी गणपती मंदिर आहे. (उपनगर )
7. एकमुखी दत्तमंदिर. गंगाघाट, पंचवटी आहे.
8. कपालेश्वर मंदिर आहे. - नंदी नसलेले शिवमंदिर. (गंगाघाट, पंचवटी येथे)
9. कळसूबाई शिखर हे देवीचे स्थान व महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ५२ कि. मी. अंतरावर आहे.
10. कालिका मंदिर आहे., नाशिकचे ग्रामदैवत आहे.
11. काळाराम मंदिर आहे.- काळ्या पाषाणात बनवलेले रामाचे प्राचीन मंदिर आहे.
12. खंडोबाची टेकडी हे नाशिकपासून जवळच देवळाली कॅंपपाशी आहे.
13. गंगाघाट आहे. पंचवटी आहे.
14. चामर लेणी सुमारे १२०० वर्ष जुनीं लेणी आहेत.
15. त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे स्थळ नाशिकपासून २७ कि. मी. अंतरावर आहे.
16. नवश्या गणपती मंदिर आहे.
17. नाशिकपासून जवळच त्र्यंबकेश्वराजवळ नाणी संशोधन केंद्र आहे.
18. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य आहे.
19. नारोशंकर यांची घंटा : ही घंटा पेशवेकालीन आहे, व महानगरपालिकेचे बोधचिन्ह आहे. (गंगाघाट, पंचवटी येथे)
20 निवृत्तीनाथ महाराजची समाधी : ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आहे. हे स्थळ त्र्यंबकेश्वरच्या जवळ आहे.
21. पांडवलेणी - सुमारे १२०० वर्षांची जुनी लेणी नाशिक शहरात आहेत.
22. फाळके स्मारक - दादासाहेब फाळके यांचे स्मारक पांडवलेण्यांजवळ आहे.
23. बाल येशू चर्च.
24. भक्तिधाम आहे.(पेठ नाका)
25. मुक्तिधाम आहे.(नाशिक रोड)
26. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ चांदीचा गणपती आहे.
27. राम कुंड - गोदावरी नदीतील एक कुंड, कुंभमेळ्याच्या पर्वात येथे एक स्नान केल्याने पापे नाहीशी होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
28. रामशेज किल्ला आहे.
29. विल्होळी जैन मंदिर आहे.
30. वेद मंदिर - वेद अध्यापन व आधुनिक वास्तुशिल्प कलेचा नमुना आहे.
31. सप्तशृंगीदेवी साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ. हे स्थळ नाशिकपासून ५२ कि.मी. अंतरावर आहे.
32. सातपूरनजीक चुंचाळे गावात प्रसिद्ध दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे.
33. सिन्नर येथे गारगोटी नावाचे स्फटिकांचे प्रदर्शन आहे.
34. सीता गुंफा - राम, सीता यांची वनवासातील वास्तव्याची जागा आहे.
35. सीता गुंफा - राममंदिराच्या उत्तरेला भूगर्भात एक गुंफा आहे. निरुंद अशा सात पायऱ्या उतरून खाली गेल्यावाऱ तिथे राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. तेथून दक्षिणेस कोनाड्यासारखा एक मार्ग असून त्याच्या पायऱ्यांवरून सरपटत खाली उतरावे लागते. तिथे आणखी एक छोटी गुहा असून त्या गुहेत शिवलिंग आहे. असे सांगतात की, रावणानी सीतेचे अपहरण करून लंकेत नेले ते सीतेचे मायावी रूप होते आणि खरी सीता ह्या गुहेत राहिली होती.
36. गंगापुर धरण-नाशिकपासुन जवळच गोदावरी नदीवर मातीचे धरण असुन संपूर्ण नाशिक शहराला पिण्याचे व शेतीसाठी पाणी पुरवठा होतो.
37. सोमेश्वरचा धबधबा गंगापूर गावाच्या जवळ आहे असेच धबधब्यालगतच तिरुपतीसारखेच एक बालाजी मंदिर आहे.
38. सोमेश्वर येथे प्रसिद्ध प्राचीन शिवमंदिर आहे.
सध्या नाशिकमध्ये ४ आकाशवाणी केंद्रे आहेत.
विष्णू दिगंबर पळुसकर ह्या युगपुरुषाचा अवतार शास्त्रीय संगीतासाठी खूप मौल्यवान ठरला."गांधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्येचे फळ होय.[९] विष्णू दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते. "गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी, थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली. १९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वास्तू आजही अस्तित्वात आहे [१०].विष्णू दिगंबर पळुसकर ह्यांना जरी बालपणी अंधत्व येऊनही संगीताला "संगीत प्रेस"च्या नावाने डोळे दिले.[१०] पंडित विष्णू दिगंबर पलुसकरांचे निधन ऑगस्ट १९३१ मध्ये झाले. त्यानंतर त्यांचा सांगीतिक वारसा आणि सर्वार्थाने सांभाळला तो त्यांचे पुत्र व पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांनी.
मातोश्री गंगाबाई पलुसकर :
गंगाबाईंचे कार्य समजोद्धारक सावित्रीबाई फुलेंच्या तोडीचे होते. सावित्रीबाईंनी स्त्रियांत शैक्षणिक साक्षरता आणली, तर गंगाबाईंनी संगीत साक्षरता रुजवली. स्त्रीला अत्यंत हीन दर्जाच्या वागणुकीच्या त्या जमान्यात असे दिव्य करणे साधी गोष्ट नव्हती. नाशिकच्या बोहरपट्टीतून जातांना डावीकडे पाहिल्या मजल्यावर आपल्याला एक बोर्ड दिसतो."गांधर्व महाविद्यालय" त्यावर पुढे लिहिलेले आहे की "येथे कुलीन स्त्रियांना व मुलींना गायन-वादनाचे शिक्षण दिले जाईल". याची स्थापना १९३१ सालच्या ललित पंचमीस झाली. १९३१ ते १९८२ पर्यंत सतत ५० वर्ष बाईंनी संगीत शिक्षणाची गंगा नाशिकमध्ये प्रवाहित ठेवली. संगीत सावित्री म्हणून त्यांचा उल्लेख अशाकरिता आवर्जून करावासा वाटतो की संगीत क्षेत्रात महिला वर्गने आज जी प्ररागती साधली आहे त्याचे पाहिले श्रेय मातोश्रींनाच जाते.[११]
गोविंदराव पलुसकर:
पं. डी.व्ही. पलुसकरांनंतर (दत्तात्रेय विष्णू पलुसकर) नाशिकमध्ये संगीताची परंपरा चालवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित गोविंदराव पलुसकर होय. शब्द कळायच्या त्या वयात पंडितजींना तालाची समाज होती. अगदी लहानपणपासूनच त्यांच्या कानावर संगीतचे शुद्ध संस्कार होऊ लागले. ज्या पलुस्करांच्या संगीत कस्तुरीचा सुगंध लुटण्यासाठी अवघे संगीत जग आसुसलेले असे, त्या पलुसकर कस्तुरीचा मदहोष करणारा सुगंध पंडितजींना क्षणोक्षणी मनमुरद उपभोगता येऊ लागला, तो त्यांचे या काका पं .डी.व्ही पलुसकर यांच्यामुळे. बालाजी संस्थानच्या स्पर्धेत गोविंदरावांना प्रथम बक्षिस मिळाले [१२]
पलुसकर परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणून पं. गोविंदरावांकडे बघितले जाते. विशेषतः महराष्ट्राबाहेरही पलुसकर परंपरेची ओळख करून देण्याचे अत्यंत महत्त्वाचे असे कार्य त्यांनी केले आहे. सुमारे ३५ वर्षे त्यांनी केवळ महराष्ट्राबाहेर संगीत अध्यापनाचे कार्यच केले नाही, तर आदर्श शिक्षक म्हणून बहुमानही मिळविला. [१३]
आकाशवाणी औरंगाबाद, जळगाव, कटक, जयपूर, लखनौ, पिलानी ह्या केंद्रांवरून गोविंदराव शास्त्रीय गायन करीत. संगीत विशारद नंतर त्यांनी १९५७ साली संगीत अलंकर केले. दरम्यान कटकला असतानाच त्यांच्या "मैफलीचे संगीत" या प्रबंधाला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाने मान्यता देऊन त्यांना 'डॉक्टरेट' (संगीतचार्य) बहाल केली. .त्यानंतर १९८९ पासून नाशिकला तावून-सुलाखून निघालेले हे रत्न पुन्हा लाभले आणि पुन्हा एका पलुसकरांच्या स्वरमाधुर्याची कस्तुरी रसिकांना बेहोष करणारा आनंद देऊ लागली. मुळातच शोधक वृत्ती अंगी असल्याने संगीताच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मधुकरवृत्तीने बरेच काही मिळवले. उत्तर प्रदेशातील लोकसंगीताचे संस्कारही त्यांनी ठुमरी, होरी, कजरी या गीत प्रकारांसाठी नजाकतीने हेरले.[१२] संगीत साक्षरतेचे आद्य महर्षी पंडित विष्णू दिगंबर पलुसकर अशा घरंदाज परंपरेचे पाईक म्हणून गोविंदरावांनी फार मोठे कार्य केले. पंडित विष्णू दिगंबर पळुसकर, पंडित चिंतामणराव पळुसकर (पंडित गोविंदरावांचे वडील), .गंगाबाई पळुसकर (मातोश्री), पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर व पंडित गोविंदराव पलु्सकर अशी ही परंपरेची सुवर्ण मालिका आहे.[१३]
"महामहोपाध्याय" हा अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचा सर्वोच्च पदवीचा सन्मान आहे. अभिजात संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या विद्वान व बहु आयामी गायक, शिक्षक आणि कलावंत यांना अखिल भारतीय पातळीवर हा बहुमान तीन वर्षातून एकदा दिला जातो. या आधी पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगळ, हिराबाई बडोदेकर ,पंडित वि. रा. आठवले आदी विद्वज्जनांना हा बहुमान मिळाला आहे.२००८ चे ह्या पुरस्काराचे मानकरी नाशिकचे पंडित गोविंदराव पलुसकर यांच्या मागे पंडित विष्णू दिगंबर पळुसकर यांची परंपरा तर आहेच; पण संगीत शिक्षणाच्या अखिल भारतीय प्रणालीमध्ये त्यांनी आयुष्यभर जे योगदान दिले ते संगीताच्या प्रचार आणि प्रसाराचा घनिष्ट प्रवास अधोरेखित करणारे आहे.[१४]
नृत्याकलेचाही नाशिकमध्ये विकास होत गेला. नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात नृत्यक्षेत्रात प्रथम पंडित हैदर शेख (कथक) यांचा उल्लेख आढळतो. त्यानंतर सौ. रेखा नाडगौडा (कथक), सौ. संजीवनी कुलकर्णी (कथक), सौ. विद्या देशपांडे (कथक), सौ. माला रॉबिन्स( भरतनाट्यम). इत्यादी अनेकांनी नृत्यकला विकसित व्हावी म्हणून वर्ग सुरू केले.[१५]
नाशिकमध्ये आणि नाशिकजवळ अनेक लक्षणीय ठिकाणे मोठ्या प्रमाणात आहेत. गारगोटी संग्रहालय हे नाशिकपासून ३२ किमी (२० मैल) सिन्नर येथे स्थित आहे खूप सुंदर आहे. तेथे स्फटिकांचा (सूक्ष्म सच्छिद्र स्फटिकासारखे पदार्थ ) संग्रह देखील आहे. नाणी संग्रहालयाची स्थापना १९८० मध्ये केली गेली आहे.या संग्रहालयात भारतीय चलन प्रणालीशी निगडीत बाबींचा संग्रह आहे. नाशिकपासून सुमारे ३० किमी (१९ मैल) दुगरवाडी धबधबा आहे. नाशिक हे एक पवित्र शहर मानले जाते. नाशिकमध्ये १२ वर्षांनी कुंभमेळा होतो. श्री काळाराम मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तश्रुंगी गड,गोन्डेश्वर मंदिर, श्री सुंदर नारायण मंदिर, मुक्तीधाम , भक्ती धाम, श्री कपालेश्वर महादेव मंदिर , श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री वेद मंदिर आणि दुतोंड्या मारुती मंदिर ही काही पवित्र मंदिरे आहेत. तोफखाना विभाग केंद्र, नांदूर मध्यमेश्वर, धम्मगिरी, सापुतारा, भंडारदरा, कळसूबाई शिखर, चांभार लेणी, रामकुंड, सीता गुंफा , पांडवलेणी, गोदावरी घाट, दादासाहेब फाळके स्मारक, वीर सावरकर स्मारक, दूधसागर धबधबा, येशू देवस्थान, योग विद्या धाम,त्त्र्यंबकेश्वर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, अंजनेरी, दिंडोरी, रीन व्हॅली रिसॉर्ट आणि शुभम वॉटर पार्क जागतिक श्री स्वामी समर्थ केंद्र ही अजून काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. नाशिक "भारतातील वाइन कॅपिटल" म्हणून ओळखले जाते. सुला वाईन, सोमा वाईन ह्या काही वाईनरी आहेत .
सुनील खांडबहाले (भारतीय राजभाषा डिजिटल शब्दकोशकार)[१६][१७]
परिणीता दांडेकर (असोशिएट कोऑर्डीनेटर-'साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम्स, रिव्हर अँड पीपल.’)
साप्ताहिक दिव्यसार्थी, गावकरी वृत्तपत्र, देशदूत वृत्तपत्र, दिव्य मराठी वृत्तपत्र, पुढारी वृत्तपत्र, सकाळ वृत्तपत्र (वृत्तपत्र), लोकमत वृत्तपत्र, महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र, लोकसत्ता वृत्तपत्र, दैनिक भास्कर वृत्तपत्र, नवभारत टाइम्स वृत्तपत्र, इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र, द टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्र, द इकॉनॉमिक टाइम्स वृत्तपत्र, अशी विविध वर्तमानपत्रे नाशिकमध्ये मिळतात. गावकरी हे खास नाशिकमध्ये जन्माला आलेले वृत्तपत्र आहे.
सध्या नाशिकमधून चार एफ.एम. नभोवाणी केंद्रांचे प्रसारण होते आहे. रेडियो मिर्ची ९८.३ मेगाहर्ट्झ, रेड एफएम ९३.५, आकाशवाणी १०१.४, रेडिओ विश्वास ९०.८ मेगाहर्ट्झ. इ.
प्रत्येक तालुक्याला आपली स्वतंत्र अशी ओळख आहे, इतिहास आहे, परंपरा आहेत. नाशिकमध्ये एकूण १५ तालुके आहेत,त्यांची नावे पुढीलप्रमाणे:-
१) नाशिक
२) मालेगाव
३) दिंडोरी
४) कळवण
५) चांदवड
६) सुरगाणा
७) इगतपुरी
८) सिन्नर
९) देवळा
११) नांदगाव
१२) येवला
१३) निफाड
१४) पेठ
१५) त्र्यंबकेश्वर
शहरातून वाहणाऱ्या गोदावरी आणि तिच्या उपनद्यांना येऊन मिळणारे अनेक नाले आहेत. त्यातील काहींचे प्रवाह आसपासच्या पावसाळी, भुयारी गटार योजनेच्या वाहिन्यांमध्ये जोडलेले आहेत. औद्योगिक क्षेत्रात सांडपाण्यासाठी गटारींचे जाळे आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा केंद्राचा विषय प्रदीर्घ काळापासून रखडलेला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.