Remove ads
भारतातील किल्ला From Wikipedia, the free encyclopedia
साल्हेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
साल्हेर-मुल्हेर या जोडीतला हा साल्हेरचा किल्ला असून सह्याद्री पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांच्या बाबतीत अतिशय संपन्न आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ५७ गिरिदुर्ग आहेत. या गिरिदुर्गामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेरचा किल्ला येतो.
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागामध्ये बागलाण हा प्रांत आहे. तो सध्या सटाणा या तालुक्यामध्ये समाविष्ट झालेला आहे. नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त किल्ले सटाणा तालुक्यातच आहेत.
साल्हेर | |
साल्हेरचा किल्ला | |
गुणक | 20.72°N 73.94°E |
नाव | साल्हेर |
उंची | १५६७ मीटर |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | मध्यम |
ठिकाण | नाशिक, महाराष्ट्र |
जवळचे गाव | वाघांबे,साल्हेरवाडी |
डोंगररांग | सेलबारी-डोलबारी(बागलाण) |
सध्याची अवस्था | व्यवस्थित |
स्थापना | अज्ञात |
साल्हेरचा किल्ला सटाण्याच्या पश्चिमेला आहे. डांगसौंदाणे-ततानी मार्गे ४० कि.मी. व ताहाराबाद -मुल्हेर-वाघांबे मार्गे ५६ किमी अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे दोन गाडीमार्ग आहेत. ततानी मार्गे प्रवास चांगला होतो. थोडा घाटमार्ग आहे परंतु निसर्गरम्य आहे. वाघांबे मार्गे रस्ता अतिशय सुंदर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी साल्हेर गावातून वन विभागाची पावती आवश्यक आहे.किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना सकाळी 6 वा ते संध्याकाळी 6 वा या वेळेत परवानगी आहे तसेच किल्ल्यावर मुक्काम करण्यास बंदी असून मुक्काम करायचा असल्यास वन विभागाची पुर्व परवानगी व पावती आवश्यक आहे.
सह्याद्रीच्या मुख्यरांगेला लागूनच साल्हेरचा हा प्रचंड किल्ला उभा ठाकलेला आहे. समुद्रसपाटीपासून १५६७ मीटरची उंची लाभलेला साल्हेर हा भौगोलिकदृष्टय़ा मोक्याच्या ठिकाणी आहे. कोकणातून काही घाटरस्ते या परिसरामध्ये चढतात. यातील सहा घाटांवर येथून लक्ष ठेवता येते म्हणून सहाहेर, साल्हेर असे याचे नाव पडले अशा लोककथा या परिसरामध्ये प्रचलित आहेत.
भगवान परशुराम यांनी अनेक वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच अशा ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर त्यांनी बाण मारून अरबी समुद्राचे पाणी मागे ढकलले. पहिल्यांदी त्यांचे स्थान प्रचितगडाजवळील चाकदेव पर्वतावर होते पण तिथून त्याचा बाणाचा नेम लागत नसावा म्हणून त्यांनी साल्हेर हे स्थान निवडले. विष्णूच्या सहाव्या अवतार परशुरामाने जग जिंकून ते दान म्हणून दिले आणि स्वतःला जागा करण्यासाठी बाण मारून कोंकण भूप्रदेश तयार केला. असे तेथील गावकऱ्यांकडून कळते.
मुख्य पान: साल्हेरचे युद्ध इ.सन १६७१-७२ मध्ये शिवाजी महाराजांनी साल्हेरचा दुर्ग जिंकला. त्यांच्याकडून तो परत जिंकून घेण्यासाठी मुघल फौजा चाल करून आल्या आणि त्यांनी साल्हेरच्या दुर्गाला वेढा घातला. तो फोडण्यासाठी शिवाजीराजांनी सूर्याजी काकडे मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर यांना पाठवले. इख्लासखान हा मुघल सेनेचा अधिपती होता. ‘एक तर्फेने लष्करांनी घोडी घातली. एक तर्फेने मावळे लोक शिरले आणि मारामारी केली. मोठे युद्ध जाहले. मोगलांची फौज लाखाच्या आसपास होती तर मराठी फौज त्यांच्या तुलनेने सुमारे पन्नास हजार इतकीच होती. मोगल, पठाण, रजपूत, तोफची, हत्ती, उंट, आराबा घालून युद्ध जाहले. युद्धात जिवंत सापडले ते सहा हजार घोडे राजांकडे गणतीस आले. सव्वाशे हत्ती सापडले. सहा हजार उंट सापडली. मालमत्ता, खजिना, जडजवाहीर, कापड अगणित बिछाइत हातास लागली. बावीस नामांकित वजीर धरिले. युद्धात खासा इख्लासखान याचा पाडाव झाला. हजार-दोन हजार सडे, सडे पळाले, असे युद्ध जाहले.’ या युद्धात शिवाजीराजांचे एक सहकारी पुरंदर तालुक्यातील पांगारे गावचे शिलेदार सूर्याजी काकडे हे छोट्या तोफेचा गोळा लागून पडले. महाराज म्हणाले, ' माझा सूर्याराऊ पडिला. तो जैसा भारतीचा कर्ण होता.' साल्हेरच्या युद्धाचा मोगलांच्या मनावर फार मोठा परिणाम झाला. तेव्हापासून ते शिवाजी महाराज अजिंक्य आहे असे मानू लागले.
साल्हेरवाडीतून गडावर जाणारा रस्ता साल्हेरच्या नैर्ऋत्येकडून गडाच्या पश्चिमेकडील माचीवर पोहोचतो. येथे उत्तराभिमुख दरवाजा असून ही माची तटबंदीने बंदिस्त केलेली आहे. माचीमधून पायवाटेने उत्तरेकडे चालत निघाल्यावर गडाच्या माथ्यावर जाणारी वाट लागते. ही वाट चार दरवाजे ओलांडून गडावर पोहोचते. साल्हेर किल्ल्याला साल्हेरवाडी कडून 6 व वाघांब्याकडून 4 दरवाजे आहेत साल्हेर गावाच्या बाजूने लांबलचक नव्याने बांधलेली भक्कम तटबंदी आहे
साल्हेरचा माथा हा चारही बाजूने उंच कातळकड्यांनी वेढलेला असल्यामुळे तटबंदीची फारशी आवश्यकता नव्हती. माथ्यावरच्या पठारावर एक उंच टेकडी आहे. ही टेकडी म्हणजे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे. याच्या माथ्यावर जाण्यासाठी सोपा मार्ग आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. गंगासागर तलावाशेजारी गंगा -यमुना टाके आहे. ह्यांचे पाणी व गंगोत्री -यमनोत्रीच्या उगमाचे पाणी सारखे आहे असे डॉ. रघुराज महाराज ह्यांनी शोधले होते. साल्हेघरांची जोतीही या भागात पहायला मिळतात. टेकडीच्या वाटेवर गुहा आहेत.
गडाच्या पायथ्याला साल्हेर निवासिनी गडकलिका देवीचे सुंदर मंदिर आहे . तसेच गृहस्वरूप अमृताभवानी व सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे. गडाच्या माथ्यावर गुहेत दत्त व हनुमान मंदिर आहे. तसेच माथ्यावर मंदिर रेणुका देवीचे असून ही परशुरामाची माता आहे. ह्या देवीला अक्षगंगा सुद्धा म्हणतात . या माथ्यावरूनच बाण मारून परशुरामाने कोकणची निर्मिती केली. माथ्यावरील दोन खळगे म्हणजे परशुरामाची उमटलेली पावले असून येथून मारलेल्या बाणामुळे समोरील डोंगराला छिद्र पडले. अशी कथा येथे ऐकवली जाते.
समोर छिद्र पडलेला डोंगर म्हणजे कंडाणा किल्ला आहे. साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे आजुबाजुला असलेला विस्तीर्ण मुलुख न्याहाळणे आनंददायी ठरते. साल्हेरच्या माथ्यावरून अचला, अहिवंत मार्कींडय़ा, रावळा-जवळा, धोडप, कांचन, राजदेहेर , चौल्हेर, भिलाई, मुल्हेर, मोरा, रतनगड, पिसोळ, देरमाळ असे जवळजवळ २५ किल्ले दिसतात. तसेच जवळच्या सालोटा किल्ल्याचे तसेच टकारा सुळक्याचे दर्शन उत्तम होते. तसेच समोर नाखिंद्या व कोठ्या डोंगर लक्ष वेधतात.
गडाच्या पहिल्या टेकडीवर चंदन टाके आहे त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. त्यानंतर पहिल्या माचीवरील सूर्याजी टाके आहे. त्यातील पाणी सुद्धा पिण्यायोग्य आहे. गडाच्या उत्तर अंगाला असलेल्या पठारावर विस्तीर्ण आकाराचा तलाव आहे. याला गंगासागर तलाव असे म्हणतात. गंगासागर तलावातील पाणी पिण्यायोग्य नसून त्याच्या आजूबाजूला जोडून असलेल्या गंगा यमुना या दोन टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे. तसेच रेणुका मंदिरा शेजारील छोट्या डबक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. त्याला संजीवन टाके म्हणतात.
साल्हेर किल्ल्यावरील जंगलात बिबट्या आहेत. बिबट्याचे दर्शन काहीवेळा होते. तसेच माकडे व मोर खूप प्रमाणात आहे. मागील बाजूस घारी आहेत. ह्या किल्याच्या चारही बाजू पावसाळ्यात विविध प्रकारच्या पक्ष्यांनी भरलेल्या दिसून येतात.
"अहिराणी"/"ऐरणी" ही येथील स्थानिक बोली आहे. ती मराठी मिश्रित भाषा आहे. अहिराणी सारखी ही भाषा वाटत असली तरी या भागातील कोकणा समाज आदिवासी लोक 'आदिवासी कोकणा-कोंकणी भाषा' म्हणून तिला ओळखतात. तसेच इथले भिल्ल 'भिलाव' भाषा बोलतात.
सकाळी ८ वा. सटाणा येथून सटाणा -मानूर ही बस असते. संध्याकाळी ७ ते ७:३० पर्यंत एस . टी. बस वाघांबे गावात येते. तेथून पुढे ती साल्हेर गावात जाते आणि रात्री तिथेच मुक्काम करते. तीच बस परत सकाळी निघून वाघांबे गावात ८:३०ला येते. चिचली गावावरून साल्हेरला येणारी बस सकाळी ११ वाजता आणि ५:३०ला साल्हेर गावातून निघते. पूर्ण दिवसात येथे दोनच वेळा बस येते. बाकी खाजगी जीप गाड्या चालू असतात. कळवण तालुक्यातून थेट साल्हेरला ( 9.00am,1.00pm, 6.00pm) अशा एस.टी. बस सुविधा आहेत. नाशिकहुन कळवण डेपोची साल्हेर बस दुपारी ३ वा. असते. सटाणा -वाघांबा ही एसटी बस सटाणा येथून सकाळी 10 वा व 2 वाजता असते
राहण्याची व्यवस्था
साल्हेर गावात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकृत मान्यताप्राप्त साल्हेर फोर्ट कॅम्प कृषी पर्यटन केंद्र आणि महाराष्ट्र शासन वनविभागाचे गेस्ट हाऊस आहे. या दोन्ही ठिकाणी पूर्व नोंदणी करून मुक्कामाची व जेवणाची व्यवस्था केली जाते. तसेच साल्हेर गावात हॉटेल राजगड, हॉटेल कल्याणी, हॉटेल सह्याद्री इत्यादी घरगुती खानावळी आहेत. जेथे जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था होते. याशिवाय गडसेवक तर्फे गडप्रेमींची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवली जाते. त्यात राहण्याची, जेवणाची व वाटाडे यांची व्यवस्था केली जाते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.