एक मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य From Wikipedia, the free encyclopedia
गीतरामायण (इंग्रजी: The Ramayana in Songs) हा मराठी भाषेतील ५६ गीतमालेचा काव्यसंग्रह आहे, जो भारतीय हिंदू महाकाव्य असलेल्या रामायणातील घटनांचे कालक्रमानुसार वर्णन करतो. भारतात दूरदर्शन सुरू होण्याच्या चार वर्षांपूर्वी, १९५५-५६ मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्राद्वारे ते प्रसारित केले गेले. ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले गीतरामायण हे मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य आहे. गीतरामायण हे गीत, संगीत आणि गायन यासाठी खूप गाजले. १९५६ या वर्षी माडगुळकरांचे गीतरामायण पुस्तक रुपाने भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.
गीतरामायण हे "मराठी प्रकाश संगीताचा मैलाचा दगड" आणि रामायणाची "सर्वात लोकप्रिय" मराठी आवृत्ती मानली जाते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या गीतरामायणास भरीव लोकप्रतिसाद मिळाला.[1]
इ.स.१९५४च्या काळात पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लाड नावाचे स्टेशन डायरेक्टर होते. त्यांना समाजप्रबोधन असलेला मनोरंजनात्मक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित करावयचा होता. त्यांचे अगदी जवळचे मित्र गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) यांना सीताकांत लाडांनी आपली कल्पना सुचवली. गदिमांनाही कल्पना भावली आणि वाल्मिकींच्या ‘रामायणा’वरून गीतरामायणाची निर्मिती झाली. [1] गदिमांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांच्या म्हणण्यानुसार इ.स. १९३६ साली रामकृष्ण दत्तात्रेय पराडकर यांच्या घरी मोरोपंतांच्या 'एकशे आठ रामायणे' ह्या ग्रंथाचे वाचन केले तेव्हापासून रामायणावर काही लेखन व्हावे अशी गदिमांची मनीषा होती.[2]
गीत रामायणातील गीतांची रचना छंदवृत्तांमध्ये केली गेली. गीतांत अनेक शब्दालंकार आणि अर्थालंकार सुयोग्य वापर असल्याने गीतरामायण हे एक सुश्राव्य काव्य झाले आहे गीतरामायण ही एक गीतांची शृंखला आहे. बऱ्याच गीतांचा शेवट पुढील प्रसंगाशी किंवा गाण्याशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ अकारण जीवन हे वाटले- उदास का तू आवर वेडे नयनातील पाणी; इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातांनी- दशरथा घे हे पायसदान.[3] . गीतरामायणात मादकतेसहित अन्य सर्व मानवी प्रवृत्तींचे आणि भावनांचे दर्शन होते. गीतरामायणात बालगीत आहे, आणि आज्ञा, मागणी, आर्जव, हट्ट, स्त्री-हट्ट, दुराग्रह, हाव, संताप, समर्पण, काळजी, संशय, सूड, कर्तव्यभाव, मित्रभाव, कानउघाडणी, विजयोत्सव आहेत, आणि भक्तिभावही आहे. ग.दि. माडगूळकरांनी विविधांगी रसांनी परिपूर्ण अशा स्वरूपात गीतरामायण घडविले आहे.[3]
'निमंत्रिला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली', 'भावास्तव मी वधिले भावा', 'तुझ्या कृपेची शिल्प सत्कृती माझी मज ये पुन्हा आकृती' या पदात शाब्दिक समृद्धी; 'हीरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो', 'मोत्यांचा चूर नभी भरून राहिला' अशा शब्दरचनांतून कल्पनारम्यता; 'फुलापरी ते ओठ उमलती', 'ये अश्रूंचा पट डोळ्यावर' अशा रचनांतून चित्रमयता, तर "तव अधराची लालस कांती पिऊ वाटते मज एकांती" (कोण तू कुठला राजकुमार) या कडव्यातून सौम्य शृंगाररसाचे दर्शन कवी करवतो, असे अमित करमरकर म्हणतात [3]
माडगूळकरांनी श्रीराम कथेचा भाग एकेका रामायणी व्यक्तीच्या तोंडून गीतातून प्रकट केला आहे. या कथाभागात एकूण २७ व्यक्ती येतात. सर्वाधिक दहा गीते ही श्रीराम या चरित्र नायकाच्या तोंडी आहेत, त्या खालोखाल सीतेची आठ, कौसल्या व लव-कुश प्रत्येकी तीन, दशरथ, विश्वामित्र, लक्ष्मण, सुमंत, भरत, शूर्पणखा व हनुमंत यांच्या तोंडी प्रत्येकी दोन तर निवेदक, यज्ञपुरुष, अयोध्येतील स्त्रिया, आश्रमीय, अहिल्या आणि इतर सर्वजण यांच्या तोंडी प्रत्येकी एक गीत घातलेले आहे.
सुधीर फडके (उर्फ, बाबूजी) यांनी भारतीय रागांवर आधारित संगीत देऊन स्वतः गीतरामायणाचे 'प्रथम गायन' केले. प्रभाकर जोग यांच्या वाद्यवृंदाने साथ दिली.[4]मनसा नारायण यांच्या मतानुसार, मनाला भावविभोर करणारे संगीत व हृदयामध्ये भक्तीचा ओलावा करणारे शब्दसामर्थ्य, यांमुळे जनमानसाला गीतरामायणाने जणू नादावून सोडले होते. एकप्रकारे सुसंस्कार करणाऱ्या गीतरामायणाने तो काळ जिंकला होता.[1]
मायबोली संकेतस्थळावरील एक लेखक, श्री गजानन यांच्या मतानुसार, गीतरामायणातील आधारभूत रागांची संख्या छत्तीस आहे. त्यातल्या मिश्र काफी चार, मिश्र जोगिया चार, राग भैरवी चार, भीमपलास, मिश्र मांड, मिश्र पिलू, पुरिया धनाश्री, शंकरा, केदार व मारु बिहाग प्रत्येकी दोन, अशा या २६ रचना सोडल्या तर उर्वरित ३० स्वररचना या २६ रागांत एकेक व दोन लोकगीतांवर आधारित आणि दोन स्वतंत्रपणे निर्मित आहेत.
२६ रागांत भूप, मिश्र देशकार, देस, बिभास, बिहाग, मिश्र भैरव, मिश्र बहार, मधुवंती, तोडी, मिश्र खमाज, जोगकंस, राग अडाणा, यमन कल्याण, मिश्र हिंडोल, शुद्ध सारंग, वृंदावनी सारंग, मुलतानी, तिलंग, मालकंस, सारंग, हिंडोल, मिश्र आसावरी, यमनी बिलावल, शुद्ध कल्याण व मिश्र पहाडी यांचा समावेश आहे.
अमित करमरकर यांच्या मतानुसार, सुधीर फडक्यांना या गीतांच्या संवर्धनासाठी पुढे अनेक वर्षे मिळाली आहेत. त्यामुळे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मूळ गाण्यांपेक्षा फडक्यांच्या आवाजातील ध्वनिमुद्रित झालेली (१९६५ आणि १९७९) गीते कितीतरी सरस आहेत. निव्वळ सांगीतिक मूल्यांचा विचार करता गीत रामायणातील स्वररचना अत्युच्च दर्जाच्या नाहीत. परंतु त्या काळजाला अशाप्रकारे भिडतात की त्या-त्या प्रसंगासाठी, तो-तो भावार्थ व्यक्त करण्यासाठी त्या केवळ आदर्शच वाटतात. जर ही पदे लिहिताना गदिमा "माध्यम" झाले असतील तर ह्या पदांचे सादरीकरण करताना सुधीर फडके त्या-त्या व्यक्तिरेखा जगले आहेत. सुधीर फडके यांनी ती पदे, ते विचार, ते प्रसंग फक्त रसिकांपर्यंत पोचवले आहेत. मला गाण्यातील किती येते, किती कळते हे घुसडण्याचा अट्टहास केलेला नाही. 'गदिमांचे 'पायसदान' फडक्यांनी अगस्ती ऋषींच्या बाणात रूपांतरित केले आहे. त्यात सेवाभाव आहे, स्वत्वला दिलेली तिलांजली आहे.' [3]
आपल्या रसग्रहण लेखात अमित करमरकर पुढे म्हणतात, गीतरामायणातील रचना अगदी साध्या आहेत असे नाही. 'शुद्ध सारंग'मधील 'धन्य मी शबरी श्रीरामा' गाऊन बघा. या कडव्यामधील स्वरलगाव आणि कणस्वर फक्त बाबूजीच घेऊ जाणोत. तसेच 'चला राघवा चला'. गदिमांनी त्यात ’ज्या शब्दांनी एका वाक्याची अखेर करायची त्याच शब्दांनी दुसऱ्या वाक्याची सुरुवात' असा प्रयोग केला आहे. पण ते कानांना खटकत नाही. कारण ते ओढून-ताणून केलेले नाही. सहज स्फुरले आहे. [3]
गीतरामायणातील गीते डॉ. वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, राम फाटक, लता मंगेशकर यांनी गायिली आहेत. त्याशिवाय ललिता फडके, मंदाकिनी पांडे, प्रमोदिनी देसाई, बबन नावडीकर, जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर इत्यादींनीही गीतरामायणातील गीते गायिली आहेत.[1]
पुण्याच्या आकाशवाणी, केंद्राचे तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन झाले.[4] १ एप्रिल १९५५ या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत ‘स्वयें श्री रामप्रभू ऐकती’ आकाशवाणी, पुणे ने प्रसारित केले. गीतरामायणात एकूण ५६ गीते आहेत. गीत रामायणातील गीतांचे प्रसारण १९५५ सालच्या रामनवमीला सुरू होऊन १९५६ सालच्या रामनवमीपर्यंत, म्हणजे १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या काळात झाले.[1]
बाबूजींनी स्वतः त्यांच्या आयुष्यात गीतरामायणाचे जवळजवळ १८०० प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी देशात तसेच परदेशांत केले.[1]
१ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत आकाशवाणीने प्रसारित केलेल्या गीतरामायण कार्यक्रमात निवेदन पुरुषोत्तम जोशी यांचे होते. प्रसारित गीते आणि त्यात सहभागी झालेल्या गायक-गायिकांची नावे:[5]
क्र. | गीत | राग | ताल | मूळ गायक/गायिका | गायक पात्र | प्रसारण दिनांक | गायन कालावधी (मिनिट.सेकंद) | संदर्भ |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | "कुश लव रामायण गाती" | भूपाळी | भजनी | सुधीर फडके | निवेदक | १ एप्रिल १९५५ | १०:११ | |
२ | "शरयू-तीरावरी अयोध्या" | मिश्र देशकार | भजनी | प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे | कुश आणि लव | ८ एप्रिल १९५५ | ९:४१ | |
३ | "उगा का काळीज माझे उले" | मिश्र काफी | केहरवा | ललिता फडके | कौसल्या | १५ एप्रिल १९५५ | ९:१५ | |
४ | उदास का तू? | देस | भजनी | बबनराव नावडीकर | दशरथ | २२ एप्रिल १९५५ | ८:२३ | |
५ | दशरथा, घे हे पायसदान | भीमपलास | भजनी | सुधीर फडके | अग्नी | २९ एप्रिल १९५५ | ७:११ | |
६ | राम जन्मला ग सखे | मिश्र मांड | जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर (आणि समूह) | समूहगान | ६ मे १९५५ | १०.२२ | ||
७ | सावळा गं रामचंद्र | मिश्र पिलू | ललिता फडके | |||||
८ | ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा | बसंत | राम फाटक | |||||
९ | मार ही त्राटिका रामचंद्रा | राग? | राम फाटक | |||||
१० | चला राघवा चला | बिभास | चंद्रकांत गोखले | |||||
११ | आज मी शापमुक्त जाहले | राग? | मालती पांडे | |||||
१२ | स्वयंवर झाले सीतेचे | राग? | सुधीर फडके | |||||
१४ | मोडु नको वचनास | राग? | कुमुदिनी पेडणेकर | |||||
१५ | नको रे जाऊ रामराया | राग? | ललिता फडके | |||||
१६ | रामावीण राज्य पदी कोण बैसतो | राग? | सुरेश हळदणकर | |||||
१७ | जेथे राघव तेथे सीता | राग? | माणिक वर्मा | |||||
१८ | थांब सुमंता, थांबवि रे रथ | राग? | समूहगान | |||||
१९ | जय गंगे, जय भागिरथी | राग? | समूहगान | |||||
२० | या इथे लक्ष्मणा बांध कुटी | राग? | सुधीर फडके | |||||
२१ | बोलले इतुके मज श्रीराम | राग? | गजानन वाटवे | |||||
२२ | दाटला चोहीकडे अंधार | राग? | सुधीर फडके | |||||
२३ | माता न तू वैरिणी | राग? | वसंतराव देशपांडे | |||||
२४ | चापबाण घ्या करी | राग? | सुरेश हळदणकर | |||||
२५ | दैवजात दुःखे भरता | राग? | सुधीर फडके | |||||
२६ | तात गेले, माय गेली, भरत आता पोरका | राग? | वसंतराव देशपांडे | |||||
२७ | कोण तूं कुठला राजकुमार? | राग? | मालती पांडे | |||||
२८ | सूड घे त्याचा लंकापती | यमन | योगिनी जोगळेकर | |||||
२९ | तोडिता फुले मी | राग? | माणिक वर्मा | |||||
३० | याचका थांबू नको दारात | राग? | माणिक वर्मा | |||||
३१ | कोठे सीता जनकनंदिनी | राग? | सुधीर फडके | |||||
३२ | ही तिच्या वेणींतील फुले | राग? | सुधीर फडके | |||||
३३ | पळविली रावणें सीता | राग? | राम फाटक | |||||
३४ | धन्य मी शबरी श्रीराम! | राग? | मालती पांडे | |||||
३५ | सन्मीत्र राघवाचा सुग्रीव आज झाला | राग? | व्ही. एल्. इनामदार | |||||
३६ | वालीवध ना, खलनिर्दालन | राग? | सुधीर फडके | |||||
३७ | असा हा एकच श्री हनुमान | राग? | वसंतराव देशपांडे | |||||
३८ | हीच ती रामांची स्वामीनी | राग? | व्ही. एल्. इनामदार | |||||
३९ | नको करुंस वल्गना | राग? | माणिक वर्मा | |||||
४० | मज सांग अवस्था दूता, रघुनाथांची | राग? | माणिक वर्मा | |||||
४१ | पेटवी लंका हनुमंत | राग? | प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे | |||||
४२ | सेतू बांधा रे सागरी | राग? | समूहगान | |||||
४३ | रघुवरा बोलता का नाही? | राग? | माणिक वर्मा | |||||
४४ | सुग्रीवा हे साहस असले | राग? | सुधीर फडके | |||||
४५ | रावणास सांग अंगदा | राग? | सुधीर फडके | |||||
४६ | नभा भेदूनी नाद चालले | राग? | प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे | |||||
४७ | लंकेवर काळ कठीण आज पातला | राग? | व्ही. एल्. इनामदार | |||||
४८ | आज का निष्फळ होती बाण | राग? | सुधीर फडके | |||||
४९ | भूवरी रावण वध झाला | राग? | समूहगान | |||||
५० | किती य्त्ने मी पुन्हां पाहिली | राग? | सुधीर फडके | |||||
५१ | लोकसाक्ष शुद्धी झाली | राग? | सुधीर फडके | |||||
५२ | त्रिवार जयजयकार रामा | राग | समूहगान | |||||
५३ | प्रभो, मज एकच वर द्यावा | राग | राम फाटक | |||||
५४ | डोहाळे पुरवा रघुकुलतिलका माझे | राग? | माणिक वर्मा | |||||
५५ | मज सांग लक्ष्मणा, जाऊ कुठे? | जोगिया | लता मंगेशकर | |||||
५६ | गा बाळांनो, श्री रामायण | राग? | सुधीर फडके | १९ एप्रिल १९५६ |
गीतरामायणाच्य्या पहिल्या पुस्तिकेचे प्रकाशन पुणे आकाशवाणीने केले.[ संदर्भ हवा ] विद्याताई माडगूळकर (गदिमांच्या पत्नी) यांनी त्यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या आत्मचरित्रात विद्याताईंनी गीत रामायण घडतानाच्या काही आठवणींची दखल घेतली आहे.[1] गीत रामायणाची निर्मितीचा वेध 'गीत रामायणाचे रामायण' नावाचा ग्रंथ घेतो. त्याचे लेखन आनंद माडगूळकर यांनी केले.[6] .अजरामर 'गीत रामायण शब्द-स्वर-स्मृती मधुकोष' हा ग्रंथ अरुण गोडबोले यांनी लिहिला आहे.[4]
आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्य दृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली. त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्य सृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्वयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे. गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबर माडगूळकरांचे नाव देखील. -- कविवर्य बा. भ. बोरकर[ संदर्भ हवा ]
आजपर्यंत गीतरामायणाचे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी, तेलुगु, मल्याळी, संस्कृत व कोकणी भाषेत अनुवाद झाले आहे. ब्रेल लिपी मध्ये पण ह्याचे अनुवाद प्रकाशीत झाले आहे.[1]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.