Remove ads
मोरोपंत, मराठी कवी From Wikipedia, the free encyclopedia
मोरेश्वर रामचंद्र पराडकर तथा मोरोपंत, मयूर पंडित (जन्म : पन्हाळगड इ.स. १७२९; - बारामती, चैत्री पौर्णिमा, १५ एप्रिल १७९४), हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १७२९ | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | एप्रिल १५, इ.स. १७९४ | ||
मातृभाषा | |||
|
पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे होय. मोरोपंतांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नोकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली. मोरोपंतांनी त्यांच्या चार गुरूंचा उल्लेख आपल्या 'गंगावकिली' या काव्यात केला आहे. ते म्हणतात, 'गुरू माझे श्रीराम, श्रीमत्केशव, गणेश, हरि, चवघे'. हरी म्हणजे पंतांचे मौजीबंधन करणारे त्यांचे सौंदळचे कुलोपाध्याय हरभट वरेकर. [१] श्रीराम म्हणजे वडील रामजीपंत. गोळवलकर घराण्यातील केशव पाध्ये व गणेश पाध्ये हे दोघे बंधू अशा चार गुरूंचा उल्लेख मोरोपंतांनी केलेला आहे. [१]
पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.
मोरोपंतांची काव्यरचना विपुल असून तिचे कालक्रमानुसार पाच खंड पडतात. काव्यरचनेला प्रारंभ त्यांनी वयाच्या बाविसाव्या-तेविसाव्या वर्षी केला असे मानल्यास पहिली दहा वर्षे (सुमारे१७५० ते १७६०) त्यांनी उमेदवारीत घालवली असे म्हणता येईल. विविध वृत्तांमध्ये रचिलेले 'कुशलवोपाख्यान' हे त्यांचे पहिले काव्य. त्याशिवाय या प्रारंभीच्या कालखंडात त्यांनी शिवलीलांचे वर्णन करणारा ब्रम्होत्तर खंड आर्यावृत्तात लिहिला आणि भागवताच्या दशम स्कंधाच्या आधारे आर्यागीतावृत्तात कृष्णविजय लिहिण्यास सुरुवात केली. याच काळात प्रल्हादविजय या ग्रंथाची रचनाही त्याच वृत्तात केली. यापुढील पाच वर्षांचा काळ (१७६१ ते १७६५) त्यांच्या श्लोकबद्ध रचनेचा कालखंड होय. पूर्वी आर्यागीतिवृत्तात आरंभिलेला कृष्णविजय हा काव्यग्रंथ त्यांनी या काळात श्लोकबद्ध रचनेने पुढे चालविला. त्यापुढील तिसरा कालखंड १७६६ ते १७७२ पर्यंतचा सहा वर्षांचा असून या काळातील रचनेचा मुख्य विशेष म्हणजे आर्यावृत्ताचे पूर्णपणे प्रस्थापित झालेले प्राबल्य होय. कृष्णविजयाची समाप्ती या कालखंडात झाली. त्याशिवाय सीतागीत, सावित्रीगीत आणि रुक्मिणीगीत ही तीन ओवीबद्ध काव्ये याच काळात लिहिली गेली. मंत्ररामायण, आर्याकेकावली, संशयरत्नावली, नामसुधाचषक इत्यादी ईशस्तोत्रे व काही भागवती स्तोत्रेही याच काळातील होत. यापुढील दहा वर्षांचा (१७३३ ते १७८३) कालखंड मोरोपंतांच्या काव्यजीवनात अत्यंत महत्त्वाचा असून त्याला महाभारतरचनेचा कालखंड म्हणता येईल. आतापर्यंत घटवून चांगले तयार केलेले आर्यावृत्त त्यांनी महाभारताच्या रचनेसाठी योजिले व महाराष्ट्राच्या हाती आपले मराठी आर्याभारत दिले. या दहा वर्षांत त्यांनी त्याशिवाय विशेष काही लिहिले नाही. त्यांच्या काव्यरचनेचा अखेरचा कालखंड म्हणजे महाभारताच्या समाप्तीपासून ते त्यांच्या निधनापर्यंतचा काळ. या अखेरच्या सुमारे बारा वर्षांत मंत्रभागवत, हरिवंश, संकिर्ण रामायणे आणि मुख्य म्हणजे श्लोककेकावली हे त्यांचे अखेरचे काव्य असावे असे त्यातील, ‘कृतान्तकटकामलध्वजजरा दिसो लागली’ या उद्गारांवरून वाटते.
मोरोपंत हे मोठे रामभक्त होते आणि त्या भक्तीपोटी त्यांनी अष्टोत्तरशत म्हणजे १०८ रामायणे विविध छंद आणि वृत्त वापरून लिहिलेली आणि प्रत्येक रामायणाचे काहीतरी वैशिष्ट्य होते. मराठी वाङ्मयाचे जुन्या काळातील एक प्रसिद्ध अभ्यासक रामचंद्र दत्तात्रेय पराडकर ह्यांनी ही रामायणे त्यांच्याजवळ असलेल्या मोरोपंतांच्या कागदपत्रांचा वापर करून १९१६ साली दोन भागांमध्ये प्रसिद्ध केली. ही सर्व रामायणे प्रत्येकी काहीशे श्लोकांची आहेत, यद्यपि एकदोन आकाराने त्याहून बरीच मोठी आहेत. त्याचप्रमाणे १८९० च्या दशकामध्ये छापलेल्या काव्येतिहाससंग्रहामध्ये ५ भागांत ह्यातील पुष्कळशी रामायणे तत्पूर्वीच छापली गेली होती.[२]
मोरोपंतांनी गझलाही लिहिल्या आहेत. त्या प्रकाराला ते गज्जल म्हणत.
मोरोपंतांच्या गज्जलेचा नमुना :-
रसने न राघवाच्या । थोडी यशांत गोडी ॥
निंदा स्तुती जनांच्या । वार्ता वधू-धनाच्या ।
खोट्या व्यथा मनाच्या । कांही न यांत जोडी ॥
या गज्जलेच्या पहिल्या शब्दावरून ह्या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.
आर्या वृत्तातील प्रचंड काव्यरचनेबद्दल ते प्रसिद्ध होते. त्याबद्दलचा एक श्लोक प्रसिद्ध आहे. ओवी ज्ञानेशाची, अभंगवाणी तुकयाची, सुश्लोक वामनाचा, आर्या मयूरपंतांची !!
मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत. एकदा ते सरदार घोरपडे यांच्याकडे पुराण सांगायला गेले. कार्यक्रमाला अतिशय रंग चढला. श्रोते अगदी बेभान होऊन पुराण श्रवणात रंगून गेले. पुराण कथनाचा कार्यक्रम संपायच्या बेताला आला असतां, ‘या विद्वान बुवांना बिदागी म्हणून द्यायचे तरी काय ?’ हा विचार सरदार घोरपडे यांच्या मनात येऊन ते त्यांच्याजवळ बसलेल्या खाजगी कारभाऱ्यांच्या कानात त्यासंबंधी कुजबुजू लागले.
ही गोष्ट मोरोपंताच्या लक्षात येताच मनातल्यामनात तत्क्षणी रचलेल्या आर्येत ते घोरपड्यांना उद्देशून म्हणाले,
ही आर्या कानी पडताच श्रोतृवृंदात हास्याची खसखस पिकली. घोरपड्यांनी मोरोपंताच्या या समयसूचकतेबद्दल त्यांच्यावर प्रसन्न होऊन, त्याच क्षणी आपल्या गळ्यातला कंठा काढून तो त्यांच्या गळ्यात घातला.
मोरोपंतांच्या लहानपणी त्यांना रेवडीकरबुवांच्या कीर्तनाला जायला एकदा मना केले होते, त्यावेळी बाल-मोरोपंतांनी आर्येतच आपली तक्रार मांडली :
(अपूर्ण यादी)
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हणले जाते. समग्र महाभारत त्यांनी आर्या वृत्तात रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.
मोरोपंतांनी गझल (त्यांचा शब्द - गज्जल) हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा हाताळला असे मानले जाते. मोरोपंत, माणिकप्रभु यांच्यापासून सुरू झालेला हा काव्यप्रकार माधव ज्यूलियन यांनी मराठीत चिरप्रस्थापित केला.
रसने न राघवाच्या| थोडी यशांत गोडी||
निंदा स्तुती जनांच्या |वार्ता वधू-धनाच्या |
खोट्या व्यथा मनाच्या | कांही न यांत जोडी||
या गझलेतल्या पहिल्या श्ब्दावरून या वृत्ताला ‘रसना’ हे नाव मिळाले.
मोरोपंतांच्या कवितेचा प्रसार त्यांच्या काळात विठोबादादा चातुर्मासे, शाहीर रामजोशी वगैरेंनी पुष्कळ केला. त्यानंतरही हरिदासांनी व कीर्तनकारांनी त्यांची कविता लोकप्रिय केली. परंतु त्यांच्या कवितेविषयी टीकाकारांत मतैक्य नाही. त्यांच्या काव्यातील यमकजन्य क्लिष्टतादी दोषांची चर्चा आजवर पुष्कळ झाली आहे. परंतु विशेषतः त्यांच्या केकावलीवर न्या. रानडे यांच्यासारख्यांनी आक्षेप घेतल्यामुळे मोरोपंतांची कविता हा एक वादविषय होऊन राहिला. त्याचे संपूर्ण दर्शन व मोरोपंतांचे प्रभावी समर्थन विष्णूशास्त्री चिपळूणकरच्या निबंधमालेतील ‘मोरोपंतांची कविता’ या प्रदीर्घ लेखात होते. त्यानंतरही ल.रा. पांगारकर आणि श्री.ना. बनहट्टी यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहून मोरोपंती कवितेचे रसिकावलोकन पुष्कळ केले. पण शेवटी ‘मोरोपंतांनी आपल्या वाक्कन्यकेला नानाविध अलंकारांनी नटवून सजवून आपल्या रसिक वाचकांबरोबर तिचे सालंकृत कन्यादानच करून दिले आहे’, हा महाराष्ट्रसारस्वतकार भावे यांचाच अभिप्राय योग्य वाटतो. मोरोपंतांच्या सुसंस्कृत व समृद्ध काव्यरचनेमुळे मराठी भाषा श्रीमंत झाली यात संशय नाही.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.