मराठी गीतकार आणि महाराष्ट्र वाल्मिकी From Wikipedia, the free encyclopedia
गजानन दिगंबर माडगूळकर(१ ऑक्टोबर १९१९ - १४ डिसेंबर १९७७) हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते होते. ते त्यांच्या नावाची आद्याक्षरे ग.दि.मा. या नावाने लोकप्रिय आहेत. गदिमांची सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीतरामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. गीतरामायण या त्यांच्या सर्वात उल्लेखनीय कलाकृतीमुळे त्यांना सध्याच्या काळातील आधुनिक वाल्मिकी देखील म्हणले जाते.[1]
गजानन दिगंबर माडगूळकर (गदिमा) | |
---|---|
जन्म नाव | गजानन दिगंबर माडगूळकर |
टोपणनाव | गदिमा |
जन्म |
१ ऑक्टोबर १९१९ शेटफळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
१४ डिसेंबर, १९७७ (वय ५८) पुणे, महाराष्ट्र, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, चित्रपट |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता, गीत, नाटक, पटकथा, कथा, कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | गीतरामायण |
वडील | दिगंबर बळवंत माडगुळकर |
आई | बनुताई दिगंबर माडगुळकर |
अपत्ये | ३ मुले आणि ४ मुली |
टीपा | ग. दि. माडगूळकर संकेतस्थळ |
गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत १५७ पटकथा आणि २००० गाणी लिहिली. त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटांसाठी कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. लिखाणासोबत त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला.[2]
भारत सरकारने १९६९ मध्ये गदिमांना पद्मश्री हा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.[3] १९५७ मध्ये गदिमांना संगीत नाटक अकादमीचा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार मिळाला.[4][5] २०१९ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले गेले. हा सोहळा साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध कार्यक्रम आणि उत्सव आयोजित केले होते.[6]
गदिमांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ ला सांगली जिल्ह्यातील शेटफळे या गावी झाला. माडगूळरांचे बालपण माडगुळे या गावी गेले. त्यांचे वडील औंध संस्थानात कारकून होते. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे झाले. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरिबीमुळे चरितार्थासाठी चित्रपट व्यवसायात आले. त्यांना लहानपणापासून लिहिण्याची, नकला करण्याची आवड होती.[7] मराठी कविताकार आणि कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर यांचे ते थोरले बंधू होते. त्यांचा विवाह कोल्हापूरच्या विद्या पाटणकर यांच्याशी झाला आणि त्यांना ३ मुले (श्रीधर, आनंद, शरतकुमार) आणि ४ मुली (वर्षा, कल्पलता, दीपा, शुभदा) झाल्या. गदिमांचे वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी निधन झाले.[6] गदिमांचे नातू 'सुमित्र श्रीधर माडगूळकर' हे गदिमांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत विविध माध्यमातून पोहचवत आहेत.
गदिमांनी दहावीत नापास झाल्यानंतर चित्रपटांसाठी काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी ब्रम्हचारी (१९३८), ब्रॅंडीची बाटली (१९३९) यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काही छोट्या भूमिका साकारल्या. १९४२ मध्ये आलेल्या नवहंस पिक्चर्सच्या भक्त दामाजी, पहिला पाळणा या चित्रपटांसाठी त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. १९४७ साली आलेल्या राजकमल पिक्चर्सच्या लोकशाहीर रामशेजी चित्रपटापासून त्यांना कथा, पटकथा, गीते यासाठी चांगलीच ओळख मिळाली, त्यात एक भूमिकाही त्यांनी केली आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर ह्यांचे लेखनिक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले. नवयुग चित्रपट लि. ह्या चित्रसंस्थेत के. नारायण काळे ह्यांच्या हाताखाली साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी माडगूळकरांना मिळाली, तेव्हा चित्रकथेची चित्रणप्रत कशी तयार करतात, हे त्यांना अगदी जवळून पहावयास मिळाले.
त्यांनी लिहिलेल्या आणि विशेष गाजलेल्या चित्रपटांत वंदे मातरम् (१९४८), पुढचे पाऊल (१९५०), बाळा जो जो रे (१९५१), लाखाची गोष्ट (१९५२), देवबाप्पा (१९५३), गुळाचा गणपती (१९५३), पेडगावचे शहाणे (१९५२), ऊनपाऊस (१९५४), मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), जगाच्या पाठीवर (१९६०), प्रपंच (१९६१), सुवासिनी (१९६१), संथ वाहते कृष्णामाई (१९६७), मुंबईचा जावई (१९७०) ह्यांचा समावेश होतो. गीतकार, कथासंवादकार आणि अभिनेते म्हणून तब्बल १५० पेक्षा जास्त मराठी चित्रपटांसाठी त्यांनी काम केले, त्यांनी २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे यांचे चित्रपट त्याकाळी मराठी रसिकांमध्ये खूप गाजले. माडगूळकर हे उत्तम चरित्र अभिनेतेही होते. पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, वऱ्हाडी आणि वाजंत्री (१९७३) ह्या चित्रपटांत त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरलेल्या आहेत. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी लिहिलेली गीते चैत्रबन (१९६२) ह्या नावाने संग्रहित आहेत, तसेच त्यांनी लिहिलेल्या काही मराठी चित्रपटांच्या कथाही तीन चित्रकथा (१९६३) या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या आहेत.
गदिमांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांसाठीही लेखन केले. यामध्ये व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘गुंज उठी शहनाई’, ‘आदमी सडक का’, ‘तुफान और दिया’ यासारख्या हिंदी चित्रपटांचा समावेश होतो. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’, तर राजेश खन्नाचा ‘अवतार’ व अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदिमांचीच होती.
युद्धाच्या सावल्या (प्रयोग, १९४४) ह्या नावाचे एक नाटक त्यांनी लिहिले होते तथापि ते फारसे यशस्वी झाले नाही. जोगिया (१९५६) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकांमध्ये, काव्यसंग्रह - चार संगीतिका (१९५६), काव्यकथा (१९६२), गीत रामायण (१९५७), गीत गोपाल (१९६७), गीत सौभद्र (१९६८). कथासंग्रह–कृष्णाची करंगळी (१९६२), तुपाचा नंदादीप (१९६६), चंदनी उदबत्ती (१९६७). कादंबरी–आकाशाची फळे (१९६०), आत्मचरित्रपर–मंतरलेले दिवस (१९६२) आणि वाटेवरल्या सावल्या (१९८१).[7]
गदिमांचे गीत रामायण हे फार गाजले, १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत पुणे आकाशवाणीने तो प्रसारित केला. गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. त्यांना ‘महाराष्ट्र वाल्मिकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.[7][5]
गदिमा भावकवीही आहेत. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्य या दोन्हींचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या लावण्या व चित्रपट गीतेही प्रसिद्ध आहेत. उत्तम समरगीते आणि बालगीतेही त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेली बालगीते आणि भक्तीगीते आजही फार लोकप्रिय आहेत. शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकडआरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.[8] पेशवाईवर त्यांनी गंगाकाठी नावाने काव्यकथा लिहिली आहे. गदिमांनी अथर्वशिर्षाच मराठीत भाषांतर केले.[8]
ग दि माडगूळकर यांनी 'भूमिकन्या सीता' (१९५८) या नाटकातील पदेसुद्धा लिहिली होती. 'मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणीवाणी', 'मानसी राजहंस पोहतो', 'सुखद या सौख्याहुनी वनवास ' ही त्यातील प्रसिद्ध गाणी आहेत. त्यांचे संगीत स्नेहल भाटकर यांनी दिले होते, आणि गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी ती गायिली होती.[9]
गदिमा स्वातंत्राच्या चळवळीत देखील अग्रभागी होते. याच काळात त्यांची यशवंतराव चव्हाण यांच्याशी चांगली ओळख झाली. त्या वेळी त्यांनी जे काही काव्य रचलं, ते टोपणनावाने म्हणजे ‘शाहीर बोऱ्या भगवान’ या नावाने केलं आहे. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये गदिमांची राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून करण्यात आली होती.[5][8]
बालगीते -
भक्तीगीते -
देशभक्तीपर गीते -
चित्रपटगीते -
त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत.[10][5]
ग.दि. माडगूळकरांच्या काव्याचे रसग्रहण करणारी अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही:-
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.