From Wikipedia, the free encyclopedia
ज्योत्स्ना भोळे (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) (मे ११ १९१४ - ऑगस्ट ५, २००१) या मराठी गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. केशवराव भोळे यांनी इ.स.१९३३साली ’नाट्यमन्वंतर’ नावाची नाट्यसंस्था काढली. आंधळ्याची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची(बिंबाची) भूमिका केली होती. त्या नाटकात नाटककार श्री.वि.वर्तक यांच्या पत्नी सौ पद्मावती वर्तक, म.रा. रानडे, पार्श्वनाथ आळतेकर, के. नारायण काळे, ल.भ. केळकर, माधवराव प्रभू, नामजोशी, हर्डीकर यांनीही भूमिका केल्या होत्या. या नाटकाचे त्या काळात शंभराच्यावर प्रयोग झाले. बहुसंख्य प्रयोग पुणे-मुंबईत होते. ’आंधळ्यांची शाळा’ हे नाटक जगप्रसिद्ध नाटककार इब्सेन याचा साडू असलेल्या ब्यर्सन याने लिहिलेल्या ’ग्वॉन्टलेट’ या नाटकाचे मराठी भाषांतर होते. ज्योत्स्नाबाई त्या नाटकाच्या वेळी फक्त १८ वर्षांच्या होत्या.
कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता. त्यामुळे त्यांनी गायलेली नाटकांतली गाणी अजरामर झाली.
ज्योत्स्ना भोळे यांचे संगीतकलानिधि मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे भैरवी रागातील गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.
पुणे शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या मालकीच्या सभागृहाला ज्योत्स्ना भोळे यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत.
पुण्यातील सृजन फाऊंडेशन ही संस्था २००९ सालापासून दरवर्षी दोन दिवसांसाठी ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव नावाचा निःशुल्क कार्यक्रम आयोजित करते. नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताचे येथे सादरीकरण होते, आणि संगीत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात शिष्यवृत्ती जाहीर होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.