Remove ads
मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटातील संगीतकार From Wikipedia, the free encyclopedia
स्नेहल भाटकर (पूर्ण नाव:वासुदेव गंगाराम भाटकर) (जुलै १७, १९१९; मुंबई - मे २९, २००७; मुंबई) हे मराठी चित्रपट, मराठी नाटके, हिंदी चित्रपटांतील नावाजलेले संगीतकार होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्नेहल भाटकर | |
---|---|
जन्म नाव | वासुदेव गंगाराम भाटकर |
टोपणनाव | स्नेहल भाटकर |
जन्म |
जुलै १७, १९१९ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू |
मे २९, २००७ मुंबई, महाराष्ट्र, भारत |
कार्यक्षेत्र | संगीत |
संगीत प्रकार | चित्रपटसंगीत, नाट्यसंगीत |
वडील | गंगाराम भाटकर |
अपत्ये | रमेश भाटकर, स्नेहलता |
स्नेहल भाटकर यांचे पूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. १७ जुलै इ.स. १९१९ रोजी प्रभादेवी येथील पालखीवाडीत त्यांचा जन्म झाला. या वाडीत नेहमी भजने होते. भाटकरबुवा नेहमी न चुकता ही भजने ऐकायला जात. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आईला शाळेत नोकरी करावी लागली. मात्र, त्यांच्या आईचा आवाज खूप गोड होता. आपल्याला गोड गळ्याचे वरदान आईकडूनच मिळाल्याचे भाटकर सांगत. श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी गाण्याचे धडे गिरवले. "विश्वंभर प्रासादिक भजन मंडळी'त प्रवेश करून ते खऱ्या अर्थाने भजनीबुवा झाले.
"एचएमव्ही' या कॅसेट कंपनीमधील प्रवेशामुळे भाटकरबुवांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने वळण मिळाले. १६ जून इ.स. १९३९ रोजी ते पेटीवादक म्हणून या कंपनीत रूजू झाले. येथे त्यांनी आपल्या प्रतिभेने संगीत दिग्दर्शक बनण्यापर्यंत मजल मारली.
बाबूराव पेंटर यांची निर्मिती असलेल्या "रुक्मिणी स्वयंवर' या चित्रपटाद्वारे भाटकरबुवांना संगीत दिग्दर्शक बनण्याची प्रथम संधी मिळाली. गमतीची गोष्ट म्हणजे या चित्रपटाला सुधीर फडके आणि भाटकरबुबा या जोडीने "वसुदेव-सुधीर' या नावाने संगीत दिले होते. या चित्रपटात ललिता फडके यांनी गायलेल्या "कुहू कुहू बोल ग, चंद्रमा मनात हसला ग', "धाडिला प्रीतीदूत माझा देईल का ग मान' या गाण्यांना भाटकरबुवांनी संगीत दिले होते.
"एचएमव्ही'तील नोकरीमुळे त्यांना टोपणनाव घेऊन चित्रपटांना संगीत द्यावे लागले. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. या नावातील "स्नेहल' हा शब्द घेऊन दिग्दर्शक केदार शर्मा यांनी भाटकरबुवांचे "स्नेहल भाटकर' असे बारसे केले. "हमारी याद आयेगी' चित्रपटामधील "कभी तनहाइयों में यूं हमारी याद आयेगी' हे भाटकरबुवांचे सर्वाधिक गाजलेले गीत. हे गाणे ध्वनिमुद्रित झाल्यानंतर केदार शर्मा यांनी मुबारक बेगमच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली होते तसेच भाटकरबुवांनाही बक्षीस दिले होते.
सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र हे भाटकरांचे निकटचे मित्र. त्यांनी "संगीता' या चित्रपटाला संगीत दिले होते. या चित्रपटातील एक कव्वाली महम्मद रफी आणि स्वतः सी. रामचंद्र गाणार होते. मात्र, काही कारणास्तव रफी प्रत्यक्ष ध्वनिमुद्रणाच्या वेळी येऊ शकले नव्हते. तेव्हा सी. रामचंद्र यांनी ही कव्वाली गाण्यासाठी भाटकरबुवांना आमंत्रित केले.
भाटकरबुवांच्या संगीताची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या साध्या, सोप्या आणि चटकन गुणगुणता येतील अशा चाली. गाण्याचे अंग नसलेल्या कलावंतांकडूनही भाटकरबुवांनी सुरेल गाणी गाऊन घेतली. पन्नालाल घोष यांच्या सुरेल बासरीवादनाचा त्यांनी आपल्या संगीतामध्ये छान उपयोग करून घेतला. मोठी लोकप्रियता मिळवूनही त्यांनी संगीताचे दुकान थाटले नाही. जे चित्रपट त्यांना मिळाले, त्या प्रत्येकात त्यांनी स्वतःचे प्रतिबिंब उमटवले. राज कपूरला सर्वप्रथम गाण्यासाठी उसना आवाज देण्याचे श्रेय भाटकरबुवांनाच जाते. "नीलकमल' हा राज कपूरचा नायक म्हणून पहिला चित्रपट. या चित्रपटातील राजकुमारीने गायलेल्या "जईयोना बिदेस मोरा जिया भर आयेगा' या गाण्याच्या दोन ओळी राज कपूरच्या तोंडी होत्या. या ओळी भाटकरांनी गायलेल्या आहेत. मधुबाला, गीता बाली, नूतन, तनुजा या नायिकांच्या पहिल्या चित्रपटांना त्यांनीच संगीत दिले होते. तसेच कमळाबाई मंगळूरकर, कमला कोटणीस, शोभना समर्थ, बेगम पारा, लीला चिटणीस, शुभा खोटे या नायिकांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा, आपल्या चित्रपटांच्या संगीताची जबाबदारी भाटकरबुवांवरच सोपवली होती. "विसावा विठ्ठल', "वारीयाने कुंडल हाले', "जववरी रे तववरी' ही त्यांची मराठी गीतेही खूप गाजली होती.
"नीलकमल', "सुहागरात', "हमारी बेटी', "गुनाह', "हमारी याद आयेगी', "प्यासे नैन', "छबिली' इत्यादी हिंदी चित्रपटांतील त्यांचे संगीत गाजले होते. "रुक्मिणी स्वयंवर', "नंदकिशोर', "चिमुकला पाहुणा', "मानला तर देव', "बहकलेला ब्रह्मचारी' यांसह अनेक मराठी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. "नंदनवन' (मो. ग. रांगणेकर), "राधामाई' (गो. नी. दांडेकर), "भूमिकन्या सीता' (मामा वरेरकर), "बुवा तेथे बाया' (आचार्य अत्रे) या नाटकांचेही त्यांनी संगीत दिग्दर्शन केले होते. "भाटकरबुवा' या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या या संगीतकाराने गेल्या पाच दशकांमध्ये गावोगावी भजनाचे असंख्य कार्यक्रम केले होते.
दिल्लीत भाटकर यांना "महाराष्ट्रभूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुरस्कार वितरणाच्या आदल्या दिवशी हॉटेलमध्ये पाय घसरल्याने त्यांना दुखापत झाली होती. तरीही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर या संगीतकाराने स्ट्रेचरवरून हा पुरस्कार स्वीकारला होता. त्या वेळी दिल्लीत मराठी रसिकांनी "स्टँडिंग ओव्हेशन' देऊन त्यांच्या कलेचा गौरव केला होता. या दुखापतीतून काही दिवसांतच ते बरेही झाले होते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.