Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
कॉरल समुद्राची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यान कॉरल समुद्रात लढली गेलेली आरमारी लढाई होती.
दिनांक | मे ४-मे ८, इ.स. १९४२ |
---|---|
स्थान | कॉरल समुद्र |
परिणती | जपानचा विजय, पण दोस्त राष्ट्रांचा व्यूहात्मक विजय, जपानचे आक्रमण थोपवून धरले गेले |
युद्धमान पक्ष | |
---|---|
अमेरिकेची संयुक्त संस्थाने | जपान |
सेनापती | |
फ्रँक जॅक फ्लेचर जॉन ग्रेगोरी क्रेस थॉमस सी. किंकेड ऑब्रे फिच जॉर्ज ब्रेट |
शीगेयोशी इनोऊ ताकेओ तकागी कियोहिदे शिमा अरितोमो गोतो चुइची हारा |
सैन्यबळ | |
१ विमानवाहू नौका, ९ क्रुझर, १३ विनाशिका, २ तेलनौका, १ समुद्रीविमानसेवक नौका, १२८ विमाने[१] | २ मोठ्या विमानवाहू नौका, १ छोटी विमानवाहू नौका, ९ क्रुझर, १५ विनाशिका, ५ माइनस्वीपर, २ माइनलेयर, २ पाणबुडी पाठलाग करणाऱ्या नौका, ३ गनबोट, १ तेलनौका, १ समुद्रीविमानसेवक नौका, १२ सैनिकवाहू नौका, १२७ विमाने.[२] |
बळी आणि नुकसान | |
१ विमानवाहू नौका बुडवली, १ विनाशिका, १ तेलनौका, १ विमानवाहू नौकेचे नुकसान, ६९ विमाने.[३] ६५६ सैनिक/खलाशी[४] |
१ छोटी विमानवाहू नौका, ५ युद्धनौका, १ मोठ्या विमानवाहू नौका, १ विनाशिका, १ सैनिकवाहू नौकांचे नुकसान, ९२ विमाने.[५] ९६६ सैनिक/खलाशी[६] |
मे ४-८, इ.स. १९४२ दरम्यान झालेली ही लढाई जपानी आरमार व अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या आरमारांत लढली गेली. दोन्हीपक्षांकडून विमानवाहू नौकांचा वापर झालेली ही पहिलीच लढाई होती. तसेच या लढाई दरम्यान दोन्हीकडील नौकांनी शत्रूच्या नौका दृष्टिआड असताना त्यांच्यावर मारा केला.
आपल्या साम्राज्याची दक्षिण प्रशांत महासागरातील बचावात्मक आघाडी पक्की करण्यासाठी जपानी आरमाराने न्यू गिनीचे पोर्ट मोरेस्बी तसेच सोलोमन द्वीपांतील तुलागीवर हल्ला चढवून बळकावण्याचा घाट घातला होता. ऑपरेशन मो या नावाने शीगेयोशी इनोऊच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोहीमेत जपानी आरमारातील मोठ्या नौका सहभागी झाल्या. यात तीन विमानवाहू नौका व त्यांवरील विमानांचाही समावेश होता. अमेरिकेला या मोहीमेची खबर पकडलेल्या बिनतारी संदेशांतून कळली व जपानी आरमाराचे पारिपत्य करण्यासाठी त्यांनी फ्रँक जॅक फ्लेचरच्या नेतृत्वाखाली आपले दोन टास्क फोर्स तसेच एक ऑस्ट्रेलियन-अमेरिकन क्रुझर फोर्स धाडले.
मे ३ आणि मे ४ दरम्यान हल्ला करून जपानी सैन्याने तुलागीवर ताबा मिळवला. या दरम्यान अमेरिकेच्या यु.एस.एस. यॉर्कटाउन या नौकेवरील विमानांनी त्यांची अनेक छोटी जहाजे बुडवली. यामुळे जपान्यांना तेथील परिसरात असलेल्या अमेरिकेचा बळाचा अंदाज आला व त्यांनी आपल्याही विमानवाहू नौका रणांगणात उतरवल्या. मे ७पासून दोन्हीकडील विमानवाहू नौकांवरील विमानांनी एकमेकांवर हल्ले सुरू केले. यात पहिल्याच दिवशी जपानचे शोहो हे छोटे विमानवाहू जहाज बुडले तर अमेरिकेने एक विनाशिका गमावली आणि एक तेलपूरक नौकेचे मोठे नुकसान झाले. या नौकेला नंतर जलसमाधी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी जपानची शोकाकु ही विवानौकेला मोठे नुकसान पोचले तर अमेरिकेने आपली बुडत चाललेली यु.एस.एस. लेक्झिंग्टन या विवानौकेला जलसमाधी दिली. असे दोन्हीकडील आरमारांचे अतोनात नुकसान झाल्याने दोघांनी माघार घेतली व कॉरल समुद्रातून काढता पाय घेतला. विवानौकांवरील विमानांचे रक्षाकवच नाहीसे झाल्याने अॅडमिरल इनोउने पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणाऱ्या जपानी सैन्याला परत बोलावून घेतले व ही चढाई त्याने पुढे ढकलली.
गमावलेल्या नौका व सैनिक पाहता या लढाईत जपानचा जय झाला असला तरी व्यूहात्मक दृष्ट्या हा दोस्त राष्ट्रांसाठी विजयच ठरला. तोपर्यंतच्या जपानच्या बेधडक आगेकूचला येथे पहिली खीळ बसली. या लढाईत जखमी झालेल्या शोकाकु आणि आपली बहुसंख्य विमाने गमावलेली झुइकाकु या विवानौका यानंतर महिन्याभरात घडलेल्या मिडवेच्या लढाईत भाग घेऊ शकल्या नाहीत व त्यामुळे जपानचे दोस्त राष्ट्रांविरुद्धचे तोपर्यंत वरचढ असलेले पारडे तेथे समतोल झाले. तत्कारणी अमेरिकेच्या आरमाराला मिडवेच्या लढाईत विजय मिळवणे सोपे झाले. याचा फायदा घेत दोस्त राष्ट्रांनी दोन महिन्यांत ग्वादालकॅनाल आणि न्यू गिनीवर हल्ला केला. कॉरल समुद्रातील पीछेहाटीमुळे जपानला दोस्त राष्ट्रांच्या या आक्रमक हालचालीविरुद्ध जोरदार पावले उचलता आली नाहीत आणि येथून त्यांची पूर्ण दक्षिण प्रशांत महासागरातील रणांगणात पीछेहाट सुरू झाली.
डिसेंबर ६, इ.स. १९४१ रोजी जपानने विमानवाहू नौकांवरील विमानांद्वारे अमेरिकेच्या हवाई बेटांतील पर्ल हार्बर स्थित पॅसिफिक आरमारावर हल्ला केला. यात पॅसिफिक आरमाराच्या बहुतांश युद्धनौका नष्ट पावल्या किंवा दुरुस्तीपलीकडील अवस्थेत गेल्या. जपानचा बेत या युद्धघोषणेसह अमेरिकन आरमार नामशेष करण्याचा होता. पर्ल हार्बरवरील हल्ल्याच्याच सुमारास जपानने मलायावरही हल्ला केला. यात प्रशांत महासागर व हिंदी महासागरातील नैसर्गिक संपत्तीची लुट करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा करून घेण्याचा जपानचा आराखडा होता. नोव्हेंबर १, इ.स. १९४१ रोजी जारी करण्यात आलेल्या जपानच्या शाही आरमाराच्या गुप्त आदेश क्र. एक अनुसार या हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्यांना डच ईस्ट इंडीज आणि फिलिपाईन्समधून हाकलून देण्याचा होता. यामुळे जपानला आर्थिक व नैसर्गिक संपत्तीसाठी स्वावलंबी होणे शक्य होते.[७]
हे उद्दीष्ट गाठण्यासाठी जपानने मलायासह फिलिपाईन्स, थायलंड, सिंगापूर, डच ईस्ट इंडीज, वेक आयलंड, न्यू ब्रिटन, गिल्बर्ट द्वीपसमूह आणि गुआम वर हल्ला करून तेथे ठाण मांडले. जपानचा बेत ही सर्व ठिकाणे आपल्या साम्राज्याच्या सीमा करून शत्रूला तेथ थोपवून धरण्याचा होता. यामुळे जपानच्या द्वीपसमूहाला संरक्षण तर मिळणार होतेच पण या सीमांच्या आतील प्रदेशांतील नैसर्गिक व मानवी संपत्तीचा युद्धासाठी पूरेपूर उपयोग करून घेण्यास त्यांना कोणाचाही मज्जाव उरणार नव्हता.[८] सीमावर्ती भागातच लढल्याने जे काही नुकसान झाले असते ते तेथील (परक्या) भूप्रदेशाचेच झाले असते.
१९४१मध्ये युद्ध सुरू झाल्याझाल्या जपानच्या उच्च आरमारी अधिकाऱ्यांनी उत्तर ऑस्ट्रेलियावर हल्ला करून तेथे तळ उभारण्याचा सल्ला दिला होता. यामुळे ऑस्ट्रेलिया वर इतर दोस्त राष्ट्रांकडून प्रशांत महासागरातील जपानी आरमाराला असलेला धोका टळला असता. जपानच्या भूसैन्याच्या उच्चाधिकाऱ्यांनी सैन्यबळ तसेच नौकाबळ नसल्याचे कारण सांगून हा सल्ला धुडकावून लावला. त्यानंतर जपानच्या शाही आरमाराच्या चौथ्या तांड्याच्या कमांडर व्हाइस अॅडमिरल शिगेयोशी इनोउ याने सोलोमन द्वीपसमूहातील तुलागी आणि न्यू गिनीतील पोर्ट मोरेस्बी काबीज करण्याचा बेत पुढे केला. ही दोन ठिकाणे हातात आल्यावर उत्तर ऑस्ट्रेलियातील सगळी ठिकाणे जपानी बॉम्बफेकी विमानांच्या पल्ल्यात आली असती. इनोउच्या मते या दोन ठिकाणांवरील वर्चस्वामुळे न्यू ब्रिटनमधील रबौल येथे असलेला जपानचा मोठा तळ सुरक्षित झाला असता. जपानी आरमार आणि भूसैन्याच्या अधिकाऱ्यांनी इनोउचा बेत मान्य केला आणि त्यात काही सुधारणा केल्या. त्यानुसार ही ठिकाणे नुसती काबीज करणेच नव्हे तर तेथे तळ उभारून न्यू कॅलिडोनिया, फिजी आणि सामोआ घेणे अभिप्रेत होते. असे झाल्यावर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेमधील रसद तुटली असती व ऑस्ट्रेलियातून जपानला असलेला धोका टळला असता.[९]
एप्रिल १९४२मध्ये जपानी आरमार आणि सैन्याने ऑपरेशन मो नावाने मोहीम आखली. यानुसार पोर्ट मोरेस्बीवर समुद्रातून चढाई करून मे १०पर्यंत शहराचा ताबा मिळवला जाणार होता. याआधी मे २-३ च्या रात्री तुलागीवर वर्चस्व मिळविले जाणार होते. तुलागी हातात आल्यावर तेथे समुद्री विमानांचा तळ उभारून पुढील कारवायांना मदत केली जाणार होती. ऑपरेशन मो संपल्यावर ऑपरेशन आरवाय या मोहिमेंतर्गत मोमधील लढाऊ नौका घेउन नौरू आणि बनाबा द्वीपे बळकावण्यात येणार होती. या दोन्ही द्वीपांतील फॉस्फेटचा साठा मे १५पर्यंत हातात येणे अपेक्षित होते. या दोन्ही मोहिमा संपल्यावर त्यातील सैन्यबळ घेउन ऑपरेशन एफएस ही मोहीमही आखण्यात आली होती. यासगळ्या दरम्यान विमानांचे रक्षाकवच असावे यासाठी इनोउने मुख्य आरमाराकडे विमानवाहू नौकांसाठी मागणी पाठवली. इनोउला ऑस्ट्रेलियातील टाउन्सव्हिल आणि कूकटाउन येथील दोस्त राष्ट्रांच्या लढाऊ विमानांची भीती होती. या दोन्ही तळांविरुद्ध इनोउच्या विमानांचा पल्ला कमी पडत होता व विवानौकांवरील विमानांमुळे इनोउला त्यांसमोर बचावात्मक धोरण आखता आले असते.[१०]
याच सुमारास जपानच्या मुख्य आरमाराचा मुख्याधिकारी अॅडमिरल इसोरोकु यामामोतोने वेगळीच मोही आखली होती. पर्ल हार्बरवरील हल्ल्यात बचावलेल्या अमेरिकेच्या विमानवाहू नौकांना मिडवे अटॉलजवळ खेचून आणायचे आणि एकाच निर्णायक लढाईत त्यांचा धुव्वा उडवायचा बेत रचलेला होता. त्याआधी यामामोतोने आपल्या अधिकारातील दोन मोठ्या विवानौका, एक छोटी विवानौका, एक क्रुझर विभाग आणि दोन विनाशिका विभाग इनोउकडे धाडल्या आणि इनोउला ऑपरेशन मोचा मुख्याधिकारी नेमले.[११]
इकडे अमेरिकेच्या आरमारी हेरखात्याने अनेक वर्षांपूर्वीच जपानी गुप्त संदेशांचे कोडे सोडवलेले होते. मार्च १९४२ च्या सुमारास अमेरिकेने पकडलेल्या जपानी गुप्तसंदेशांपैकी जेएन-२५बी या प्रणालीनुसार गुप्त केले गेलेले १५% संदेश त्यांना उकलता येत होते.[१२] याच सुमारास अमेरिकेला ऑपरेशन मोची कुणकुण लागली. एप्रिल ५ला जपानी आरमाराचा एक विवानौका आणि इतर मोठ्या लढाऊ जहाजांना इनोउच्या हाताखाली दिले जाउन तो असेल तेथे जाण्याचा हुकुम अमेरिकेच्या हाती लागला. एप्रिल १३ रोजी ब्रिटिश हेरखात्याने इनोउला शोकाकु, झुइकाकु आणि पाचव्या विवाविभागाच्या इतर नौकांचे आधिपत्य देत असल्याचा संदेश पकडला. या संदेशात या नौका फॉर्मोसाकडून ट्रुक मार्गे इनोउकडे येत असल्याचे कळवलेले होते. ब्रिटिश हेरखात्याने हा संदेश व जपानी आरमार पोर्ट मोरेस्बीवर हल्ला करणार असल्याचा इशारा अमेरिकेस दिला.[१३]
दोस्त राष्ट्रांनी आपल्या पुढील मोहीमांसाठी पोर्ट मोरेस्बी येथे तळ उभारणे सुरू केले होते व त्यामुळे त्याचा बचाव करणे महत्त्वाचे होते. हे संदेश मिळाल्यावर पॅसिफिक रणांगणात दोस्त राष्ट्रांच्या सरसेनापतीपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या चेस्टर निमित्झ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी निष्कर्ष काढला की पोर्ट मोरेस्बीवर जपानचा हल्ला होणे अटळ होते तसेच पुढे सामोआ आणि फिजीतील सुवा येथे असलेल्या दोस्त तळांवरही जपानी हल्ले होण्याची शक्यता होती. दरम्यान एप्रिल २७पर्यंत अमेरिकेला ऑपरेशन मो आणि ऑपरेशन आरवाय अंतर्गत जवळजवळ सगळे जपानी मनसूबे कळलेले होते.[१४]
एप्रिल २९ला या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेउन निमित्झने आपल्या अधिकारातील चारही विवानौका कॉरल समुद्रात धाडल्या. पैकी टास्क फोर्स १७ या तांड्यात यु.एस.एस. यॉर्कटाउन, तीन क्रुझर आणि चार विनाशिका तसेच दोन तेलपूरक जहाजे आणि इतर दोन विनाशिका होत्या. हा तांडा एप्रिल २७लाच टोंगाटाबूहून कॉरल समुद्राकडे निघालेला होता. याचे नेतृत्व रियर अॅडमिरल फ्रँक जॅक फ्लेचरकडे होते. टास्क फोर्स ११ चे नेतृत्व रियर अॅडमिरल ऑब्रे फिचकडे होते व त्या विवानौका यु.एस.एस. लेक्झिंग्टन, दोन क्रुझर आणि पाच विनाशिका होत्या. हा तांडा फिजी आणि न्यू कॅलिडोनियाच्या मध्ये स्थित होता. व्हाइस अॅडमिरल विल्यम एफ. हाल्सीच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स १६ हा तांडा डूलिटल झडप घालून पर्ल हार्बरला नुकताच परतला होता आणि लढाई सुरू होईपर्यंत कॉरल समुद्रात पोचणे अशक्य होते. यात यु.एस.एस. एंटरप्राइझ आणि यु.एस.एस. हॉर्नेट या दोन विवानौका तसेच इतर जहाजे होती. हाल्सी कॉरल समुद्रात येईपर्यंत निमित्झने फ्लेचरला या आरमारी बलाचे अधिकार दिले.[१५] खरेपाहता कॉरल समुद्र हा डग्लस मॅकआर्थरच्या आधिपत्यात होता पण निमित्झने फ्लेचर आणि हाल्सीला आदेश दिला की कॉरल समुद्रात असेपर्यंत या दोघांनी थेट निमित्झशीच संपर्क ठेवावा. मॅकआर्थरला या लढाईतून बाजूलाच ठेवण्यात आले.[१६]
जपानने पर्ल हार्बरला परत येत असलेल्या टास्क फोर्स १६ आणि मुख्यालयातील संदेश पकडले व त्यावरून त्यांची अशी समजूत झाली की अमेरिकेच्या एक वगळता सगळ्या विवानौका कॉरल समुद्राजवळ नसून मध्य प्रशांत महासागरात कुठेतरी होत्या. उरलेली एक विवानौका नेमकी कोठे आहे हे ठाऊक नसले तरी तिच्याकडून कॉरल समुद्रात लगेचच प्रतिकार होईल अशी अपेक्षा जपान्यांना नव्हती.[१७]
एप्रिलअखेर जपान्यांनी आपल्या दोन पाणबुड्या आर.ओ. ३३ आणि आर.ओ.-३४ कॉरल समुद्रात पाठवून टेहळणी केली होती. याचा रोख रॉसेल द्वीप, डेबॉइन बंदर, लुईझिएड द्वीपसमूह, जोमार्ड खाडी आणि पोर्ट मोरेस्बीच्या पूर्वेस होता. दोस्त आरमारातील एकही जहाज न दिसता या पाणबुड्या एप्रिल २३ आणि २४ रोजी रबौलला परतल्या.[१८]
पोर्ट मोरेस्बीवर चढाई करण्यासाठी जपानने रियर अॅडमिरल कोसो अबेच्या नेतृत्वाखाली ११ सैनिकवाहू नौकांतून ५,००० सैनिक तयार केले. याशिवाय समुद्रातून जमिनीवर चढाई करण्यात पटाईत असे ५०० सैनिकही त्यांच्या बरोबर दिले होते. या नौकांना सोबत म्हणून एक हलकी क्रुझर आणि सहा विनाशिका घेउन रियर अॅडमिरल सादामिची काजिओकाचे दल होते. अबेच्या तांड्याने मे ४ रोजी प्रयाण केले तर काजिओकाचा तांडा पुढील दिवशी त्यांना येउन मिळाला. रबौल ते पोर्ट मोरेस्बी हा ८४० समुद्री मैलांचा प्रवास सरासरी ताशी ८ नॉटच्या गतीने कापत हा तांडा जोमार्ड खाडी, लुईझिएड द्वीपसमूह मार्गे न्यू गिनीच्या दक्षिण टोकाला वळसा घालून मे १०पर्यंत पोर्ट मोरेस्बीला पोचणे अपेक्षित होते.[१९]
पोर्ट मोरेस्बीमध्ये दोस्त राष्ट्रांची ५,३३३ माणसे पण त्यातील फक्त अर्धिअधिक सैनिक होते आणि तेही प्रशिक्षणात कमकुवतच होते. त्यांच्याकडील युद्धसामग्रीही तुटपुजी होती.[२१]
इकडे तुलागीवर हल्ला करण्यासाठी रियर अॅडमिरल कियोहिदे शिमा दोन सुरूंगपेरक नौका, सहा सुरूंग झाडणाऱ्या नौका, दोन विनाशिका, दोन पाणबुडीविरोधी नौका आणि एका सैनिकवाहू नौकेतून ४०० पटाईत सैनिक घेउन निघाला. यांना सोबतीला रियर अॅडमिरल अरितोमो गोतोच्या नेतृत्वाखाली एक छोटी विमानवाहू नौका शोहो, चार मोठ्या क्रुझर आणि एक विनाशिका होत्या. याशिवाय रियर अॅडमिरल कुनिनोरी मरुमो दोन छोट्या क्रुझर, समुद्री विमानांची देखभाल करणारे कामिकावा मारू हे जहाज आणि तीन लढाऊ होड्या घेउन समुद्रात लांबवरून रक्षण देत होता. मे ३-४ च्या सुमारास तुलागी हातात आल्यावर मरुमो पोर्ट मोरेस्बीवर हल्ला करणाऱ्या तांड्याला रक्षण देण्यासाठी रवाना होणार होता.[२२] याच सुमारास इनोउ आपली क्रुझर कशिमा घेउन रबौलहून ट्रुकला दाखल झाला.[२३]
गोतो आपला तांडा घेउन एप्रिल २८ रोजी सॉलोमन द्वीपातील बोगनव्हिल द्वीप आणि चॉइस्यूल द्वीपांच्या मधून न्यू जॉर्जिया द्वीपाजवळ येउन बसला. मरुमोचा तांडा न्यू आयर्लंड द्वीपातून एप्रिल २९ला तुलागीकडे निघाला. शिमाचा तांडा पुढच्या दिवशी रबौलहून निघाला[२४]
व्हाइस अॅडमिरल ताकेओ ताकागी आपल्या क्रुझर म्योकोसह विवानौका झुइकाकु आणि शोकाकु, अजून एक मोठी क्रुझर आणि सहा विनाशिका ट्रुकहून मे १ रोजी निघाला. झुइकाकुवरील रियर अॅडमिरल चुइची हारा या तांड्यातील विमानांचे नेतृत्व करीत होता. सॉलोमन द्वीपांच्या पूर्व बाजूने ग्वादालकॅनालच्या दक्षिणेस कॉरल समुद्रात येण्याचा मार्ग धरून येणारी ही विमाने चढाई करणाऱ्या सैन्याला हवाई रक्षण देणार होती. याशिवाय पोर्ट मोरेस्बीतील दोस्त विमानतळ, तेथील विमाने नष्ट करणे तसेच कॉरल समुद्रात येणारी इतर विमाने टिपणे हे त्यांना दिलेले काम होते.[२५]
ताकागी आपल्या विमानवाहू नौका घेउन येताना वाटेत आपल्या विमानांपैकी नऊ ए६एम झीरो लढाऊ विमाने रबौलला उतरवून येणार होता. रबौलपासून २४० समुद्री मैलांवरून त्याने ही विमाने पाठवलीहे पण ऐनवेळी आलेल्या वादळात विवानौकेवरून निघालेल्या या विमानांना दोनदा तसेच परत यावे लागले. इतकेच नव्हे तर यातील एक विमान समुद्रार्पणही करावे लागले. यामागे अधिक वेळ न घालवता आपले वेळापत्रक राखण्यासाठी ताकागीने विमाने न उतरवण्याचा निर्णय घेतला व आपला तांडा पुढे सॉलोमन द्वीपांकडे हाकारला. येथे त्याला इंधन मिळणार होते.[२६]
आपले आरमार कॉरल समुद्रात पोचेपर्यंत वाटेत दोस्त आरमार आडवे आले तर त्याचा सुगावा लागण्यासाठी जपान्यांनी आपल्या आय-२२, आय-२४, आय-२८ आणि आय-२९ या पाणबुड्या पुढे पाठवलेल्या होत्या. या पाणबुड्या ग्वादालकॅनालच्या नैऋत्येस ४- समुद्री मैल रांग लावून पाळत ठेवीत बसलेल्या होत्या. फ्लेचरच्या सुदैवाने त्याचा तांडा या पाणबुड्या येण्यापूर्वीच तेथून कॉरल समुद्रात पसार झालेल्या होत्या त्यामुळे जपान्यांना फ्लेचर कॉरल समुद्रात पोचल्याचा अंदाज नव्हता. आय-२१ ही पाणबुडी नूमेआजवळ दोस्तांचा वास घेत फिरत होती तेव्हा ती यु.एस.एस. यॉर्कटाउनवरील विमानांच्या नजरेस पडली व त्यांनी या पाणबुडीवर हल्ला चढवला. आय-२१ने तेथून पळ काढला पण त्यातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आले नाही की हल्ला करणारी विमाने विवानौकेवरील होती व याचा अर्थ ही विवानौकाही जवळपासच होती. मे ५च्या सुमारास आरओ-३३ आणि आरओ-३४ या दोन पाणबुड्या पोर्ट मोरेस्बीजवळ पोचल्या व तेथील बंदराजवळ दबा धरून बसल्या या दोन्ही पाणबुड्यांना दोस्तांची एकही लढाऊ नौका दिसली नाही.[२७]
मे १ च्या सकाळी टास्क फोर्स १७ आणि टास्क फोर्स११ची न्यू कॅलिडोनियाच्या वायव्येस ३०० समुद्री मैलावर गाठ पडली.[२८] फ्लेचरने त्यांना लगेचच इंधन भरून घेउन तयार होण्यास फर्मावले. टास्क फोर्स ११ यु.एस.एस. टिप्परकनू तर टास्क फोर्स १७ यु.एस.एस. नियोशोकडून इंधन भरावयास लागले. १७ दुसऱ्या दिवशी तयार होता पण ११ला अजून दोन तरी दिवस लागणार होते. फ्लेचर टॅफी १७ला घेउन लुईझियेड्सकडे निघाला आणि टॅफी ११ला सिडनीहून निघालेल्या टास्क फोर्स ४४शी सूत जमविण्यास सांगितले. टॅफी ११ चे इंधन भरून झाल्यावर टिप्परकनू एफाटेकडे रवाना झाले. टॅफी ४४मध्ये रियर अॅडमिरल जॉन ग्रेगरी क्रेसच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने अशा दोन्ही देशांच्या लढाऊ नौका होत्या व त्या डग्लस मॅकआर्थरच्या आधिपत्याखाली होत्या. या तांड्यात एच.एम.ए.एस. ऑस्ट्रेलिया, एच.एम.ए.एस. होबार्ट आणि यु.एस.एस. शिकागो या क्रुझर आणि शिवाय तीन विनाशिका होत्या.[२९]
मे ३ च्या पहाटे अॅडमिरल शिमाचा तांडा तुलागीजवळ पोचला. जपानी सैनिकांनी लगेचच शहर ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याआधी येथे असलेल्या ऑस्ट्रेलियाचे कमांडो पथक आणि रॉयल ऑस्ट्रेलियन एर फोर्सच्या टेहळणी पथकांनी शिमा पोचण्याआधीच तुलागीतून काढता पाय घेतलेला होता. शहर ताब्यात येताच जपान्यांनी बंदराजवळ समुद्री विमानांचा तळ तसेच दळणवळण केंद्र उभारण्यास सुरुवात केली. यादरम्यान शोहो या विवानौकेवरील विमाने त्यांना संरक्षण देत होती. दोस्तांकडून काही प्रतिकार होत नाही असे पाहून ही विमाने दुपारी अॅडमिरल गोतोच्या तांड्याला अधिक संरक्षण देण्यास रवाना झाली. गोतो या सुमारास बोगनव्हिलला इंधन भरून घेउन पोर्ट मोरेस्बीवरील चढाईची तयारी करीत होता.[३०]
मे ३ला संध्याकाळी ५ वाजता जपानी सैन्य सॉलोमन द्वीपांतून तुलागीकडे चालून जात असल्याचे फ्लेचरला कळवण्यात आले. यावेळी टास्क फोर्स ११ चे इंधन भरून झालेले होते व जपान्यांना आडवे जाण्यास हा तांडा तयार होता. फ्लेचरच्या जहाजापासून अवघ्या ६० समुद्री मैलांवर असूनही ही तयारी फ्लेचरला कळली नाही कारण त्याच्याच हुकुमानुसार दोस्तांच्या नौकांमधील रेडियोसंकेत बंद करण्यात आलेले होते. इकडे टास्क फोर्स १७ दुसऱ्या दिवशी तुलागीवर हल्ला करण्यासाठी ग्वादालकॅनालकडे वाटचाल करू लागला.[३१] २७ नॉटच्या गतीने मजल कापत हा तांडा मे ४च्या सकाळी ग्वादालकॅनालच्या दक्षिणेस १०० समुद्री मैलावर पोचला व येथून ६० विमाने तीन लाटांमध्ये तुलागीत ठाण मांडलेल्या जपान्यांवर हल्ला करण्यास सरसावली. पैकी यॉर्कटाउनवरच्या विमानांनी किकुझुकी या विनाशिकेवर कडाडून हल्ला चढवला व तिच्यासोबत तीन माइनस्वीपर्सना समुद्रतळाशी धाडले. याशिवाय त्यांनी चार इतर जहाजे व चार समुद्री विमानांनाही नुकसान पोचवले. जपान्यांनी अमेरिकेचे एक डाइव्ह बॉम्बर[मराठी शब्द सुचवा] व दोन लढाऊ विमाने तोडून पाडली. दिवसभर हल्ले चढवून टास्क फोर्स १७ संध्याकाळी पुन्हा दक्षिणेकडे पसार झाला. इकडे जपान्यांनी आपला समुद्री विमानांचा तळ उभारण्याचे काम सुरूच ठेवले व दोन दिवसांत तेथून टेहळणीसाठी विमाने पाठवण्यास सुरुवातही केली.[३२]
इकडे अॅडमिरल ताकागीचा तांडा तुलागीच्या उत्तरेस ३५० समुद्री मैलावर रसद घेत होता. तुलागीवरील हल्ल्याची खबर मिळताच ताकागीने रसद चढवणे थांबवले व आपला तांडा घेउन तो निघाला. सॉलोमन द्वीपांच्या पूर्वेस अमेरिकन सैन्य दबा धरून बसल्याचा अंदाज बांधून त्याने तेथे आपली टेहळणी विमाने पाठवली पण ती रिकाम्या हातानेच परतली.[३३]
मे ५ला सकाळी सव्वाआठच्या सुमारास टॅफी १७, टॅफी ११ आणि टॅफी ४४ ठरल्याप्रमाणे ग्वादालकॅनालच्या दक्षिणेस ३२० समुद्री मैलावर एकमेकांस भेटले. त्याच सुमारास यॉर्कटाउनवरील चार एफ४एफ वाइल्डकॅट विमानांना जपानच्या २५व्या तरंगत्या वायुदलाचे टेहळणी विमान दिसले व ते त्यांनी तोडून पाडले. जपानी वैमानिकाला हा तांडा व त्यातील विमाने दिसल्याचा संदेश पाठवता आला नाही पण ते विमान परतले नाही तेव्हा जपानी सेनापतींना कळून चुकले की अमेरिकन विमानवाहूनौका आता परिसरात पोचलेल्या आहेत.[३४] इकडे पर्ल हार्बरस्थित अमेरिकन मुख्यालयाकडून फ्लेचरला संदेश आला की त्यांच्या मते जपानी सैन्य पोर्ट मोरेस्बीवर मे १०ला आक्रमण करणार आहे आणि त्या वेळी जपानी विवानौका आसपासच असतील. हे कळल्यावर फ्लेचरने टॅफी १७ला पुन्हा एकदा नियोशोकडून रसद घेउन तयार राहण्यास फर्मावले. ६ मेपर्यंत तयारी करून ७ मेला लढाईला तोंड फोडायचा फ्लेचरचा बेत होता.[३५]
दरम्यान ताकागी आपल्या विवानौका घेउन सॉलोमन द्वीपांना उजवी घालून सान क्रिस्टोबल द्वीपाशी पश्चिमेकडे वळला आणि मे ६ च्या पहाटे ग्वादालकॅनाल आणि रेनेल द्वीपांच्या मधून आपला तांडा त्याने कॉरल समुद्रात घातला. तुलागीपासून १८० समुद्री मैलावर ठाण मांडून त्याने सगळ्या जहाजांना इंधन व रसद घेण्याचा हुकुम दिला. ताकागीलाही ७ मेलाच लढाई सुरू होईल असा अंदाज होता.[३६] इकडे फ्लेचरने टास्क फोर्स ११ आणि टास्क फोर्स ४४ला आपल्या टास्क फोर्स १७मध्ये विलीन करून घेतले. त्याच्या मते जपानी विवानौका अजूनही बोगनव्हिलच्या उत्तरेसच होत्या त्यामुळे त्याने आपला रसदपुरवठा चालूच ठेवला. आसपास टेहळणीसाठी पाठवलेल्या विमानांनाही ताकागीचा तांडा दिसला नाही कारण ताकागी त्यांच्या नजरेच्या टप्प्याच्या अगदी थोडा बाहेर उभा होता.[३७]
६ मेला सकाळी तुलागीतून निघालेल्या एका कावानिशी प्रकारच्या समुद्री विमानाला फ्लेचरचा तांडा दिसला व त्याने ही बातमी टाकोटाक मुख्यालयाला कळवली. पाउण तासात हा संदेश ताकागीला मिळाला. त्या दोघांतील ३०० समुद्री मैलाचे अंतर ताकागीच्या विमानांच्या पल्ल्यात जेमतेम बसत होते आणि त्याच्या युद्धनौका अजून इंधन व रसद चढवीत असल्याने अचानक चाल करून जाणे ताकागीला शक्य नव्हते. टेहळ्याच्या बातमीनुसार फ्लेचर दक्षिणेस म्हणजे ताकागीपासून लांबलांब चाललेला होता अणि शिवाय त्या भागात वादळी हवामान होते. या सगळ्यांचा विचार करून ताकागी व त्याच्या अधिकाऱ्यांनी एकदम सगळा तांडा घेउन चाल करण्याच्या ऐवजी दोन विमानवाहू नौका आणि दोन विनाशिकांना फ्लेचरवर चाल करून जाण्याचा आदेश दिला. साधारण पुढील पहाटे फ्लेचरशी गाठ होईल या गतीने या नौका निघाल्या आणि ताकागीच्या इतर नौकांनी रसद चढवणे चालू ठेवले.[३८]
अॅडमिरल गोतो चाल करून येत असल्याचे कळल्यावर ऑस्ट्रेलियास्थित अमेरिकन बोईंग बी-१७ विमानांनी लगेच पोर्ट मोरेस्बीकडे प्रयाण केले व तेथून गोतोवर हल्ला चढवण्याचा निष्फळ प्रयत्न केले.[३९] डग्लस मॅकआर्थरच्या मुख्यालयातून या हल्ल्यांचे व जपानी आक्रमकांचा ठावठिकाणा सांगणारे संदेश फ्लेचरला पाठवण्यात आले. त्याच वेळी फ्लेचरच्या तांड्यातील विमानांनी एक जपानी जपानी विवानौका (शोहो) त्याच्यापासून वायव्येस ४२५ समुद्रीमैलांवर असल्याचेही कळवले. आता फ्लेचरची खात्री पटली की जपानी सैन्य विमानवाहू नौकांसह मोठा हल्ला करणार आहे.[४०]
संध्याकाळी सहाच्या सुमारास फ्लेचरच्या टास्क फोर्स १७ने आपली इंधनभरती संपवली व तेलपूरक जहाज नियोशो व विनाशिका यु.एस.एस. सिम्स या दोन नौका दक्षिणेकडे निघाल्या. टास्क फोर्स १७ वायव्येस अॅडमिरल गोतो व हाराच्या तांड्याकडे रॉसेल द्वीपाच्या बाजूस निघाला. गोतो तिकडून नैऋत्येस फ्लेचरला गाठायला निघाला. आठ वाजायच्या सुमारास दोन्ही तांडे एकमेकांपासून फक्त ७० समुद्री मैलांवर होते पण दोघांनाही याची कल्पना नव्हती. आठ वाजता अॅडमिरल हारा दिशा बदलून ताकागीच्या ताज्या दमाच्या तांड्याशी संधान बांधण्यासाठी उलट फिरला.[४१]
मे ६-७ च्या मधल्या रात्री जपानी नौका कामिकावा मारूने पोर्ट मोरेस्बीजवळ समुद्री विमानांचा तळ उभारणे पूर्ण केले व त्यानंतर तिच्याबरोबरच्या इतर नौका दांत्रेकास्तू द्वीपांजवळ अॅडमिरल अबेच्या तांड्याला सुरक्षाकवच म्हणून ठाण मांडून बसल्या.[४२]
मे १७ च्या पहाटे साडेसहा वाजता टॅफी १७ रॉसेल द्वीपाच्या दक्षिणेस ११५ समैलावर होता. याच सुमारास फ्लेचरने क्रेसच्या हाताखाली क्रुझर आणि विनाशिकांचा एक तांडा टास्क फोर्स १७.३ या नावाने दिला आणि त्याला जोमार्डच्या खाडीकडे पिटाळले. फ्लेचरच्या विवा नौका जपान्यांच्या मागावर असल्याने या तांड्याला विमानांचे संरक्षण नव्हतेच पण आता क्रुझर आणि विनाशिका दूर गेल्यामुळे फ्लेचरच्या स्वतःच्या नौकांवरील जपानी विमानांचा धोका वाढला. जपान्यांना पोर्ट मोरेस्बीपर्यंत इतर मार्गांनी पोचण्यापासू परावृत्त करण्यासाठी फ्लेचरला असे करणे भागच होते.[४३]
यासुमारास फ्लेचरने यु.एस.एस. यॉर्कटाउनवरील १० एस.बी.डी. डॉंटलेस प्रकारच्या बॉम्बफेकी विमानांना आपल्या उत्तरेस टेहळणीसाठी पाठवले. ताकागी तेथे असल्यास त्याचे पारिपत्य करण्यासाठीची ही चाल होती. पण ताकागी तेथे नव्हताच. त्याचा तांडा फ्लेचरच्या पूर्वेस ३०० समैलांवर होता व त्यानेही फ्लेचरचा माग काढण्यासाठी आपली १२ नाकाजिमा बी५एन विमाने दक्षिणेकडे पाठवली. इकडे गोतोच्या किनुगासा आणि फुरुताका या दोन क्रुझरांवरून चार कावानिशी ई७के प्रकारची चार समुद्री विमाने लुईझिएड्सच्या आग्नेयेस निघाली. याशिवाय डेबॉइन द्वीपस्थित अनेक विमाने, तुलागीस्थित चार कावानिशी विमाने आणि रबौलस्थित तीन मित्सुबिशी जी४एम प्रकारची विमानेही फ्लेचरच्या आरमाराचा शोध घेत होती. एकदा शत्रूचा तांडा नजरेत आला की उरलेल्या विमानांना त्यांच्यावर सोडायचे असा दोन्ही पक्षांचा बेत होता.[४४]
साडेसातच्या सुमारास शोकाकुवरील एका विमानाला अमेरिकन तांडा ताकागीच्या दक्षिणेस १६३ समैलावर दिसला. पावणेआठ वाजता त्याने दुसऱ्या संदेशात एक विवानौका, एक क्रुझर आणि तीन विनाशिका तेथे असल्याचे कळवले. अजून एका विमानानेही अशीच बातमी दिल्यावर ताकागीला फ्लेचरचा ठावठिकाणा नक्की कळला.[४५] पण या नौका फ्लेचरच्या मुख्य तांड्याचा भाग नव्हत्याच. त्यापासून वेगळ्या निघालेल्या यु.एस.एस. नियोशो आणि यु.एस.एस. सिम्सला जपानी वैमानिकांनी चुकून विवानौका आणि क्रुझर समजण्याची घोडचूक केली. अॅडमिरल हाराने या नौका म्हणजेच फ्लेचरचा मुख्य तांडा असल्याचे समजून ताकागीच्या संमतीने आपली सगळी लढाऊ विमाने तिकडे सोडली. ठीक आठ वाजता १८ झीरो, ३६ ऐची डी३ए आणि २४ टॉरपेडोफेकी अशी एकूण ७८ विमाने शोकाकु आणि झुइकाकुवरून निघाली. सव्वाआठ पर्यंत ही सगळी ७८ विमाने फ्लेचरच्या शिकारीवर निघालेली होती. [४६]
सव्वाआठनंतर फुरुताकावरून निघालेल्या एका विमानाला फ्लेचरच्या विवा नौका दिसल्या. त्याने टाकोटाक ही खबर रबौलला कळवली. रबौलने ही माहिती ताकागीला दिली. साडेआठला किनुगासा प्रकारच्या समुद्री विमानाने याला पुष्टी दिली. साडेसातच्या बातमीनंतर ही बातमी आल्याने हारा आणि ताकागी संभ्रमात पडले की फ्लेचर नक्की होता कोठे? त्यांनी अमेरिकन आरमार द्विपक्षी हल्ला चढवण्याच्या बेतात असल्याची अटकळ लावली आणि त्यांनी सकाळी निघालेल्या विमानांच्या थव्याला दक्षिणेकडे जात राहण्याचे सांगितले परंतु आपला तांडा ईशान्येकडे वळवला. आता मुख्य जपानी प्रहारशक्ती दक्षिणेकडे दोन नौकांकडे चाललेली होती तर नाविक शक्ती ईशान्येकडे, जेथे फ्लेचरची जवळजवळ सगळी शक्ती एकवटलेली होती.[४७]
सव्वाआठलाच यॉर्कटाउनवरील वैमानिक जॉन एल. नील्सनला जपानी आरमाराचे सुरक्षा कवच असलेला गोतोचा तांडा दिसला. नील्सननेही जपानी वैमानिकांप्रमाणे चुकीचा अंदाज बांधला व दोन विमानवाहू नौका व चार जड क्रुझर टॅफी १७च्या वायव्येस २२५ समुद्री मैलांवर असल्याचे कळवले.[४८] फ्लेचरने हाच मुख्य जपानी तांडा असल्याचे ठरवून आपली सगळी वमाने त्या दिशेला पिटाळण्याचा हुकुम सोडला. सव्वा दहापर्यंत ९३ विमाने जपान्यांच्या शिकारीला निघाली. यात १८ एफ४एफ वाइल्डकॅट, ५३ एसबीडी डाइव्ह बॉम्बर आणि २२ टीबीडी डेव्हास्टेटर टॉरपेडोफेकी विमाने होती. ही विमाने निघाल्यावर पाचच मिनिटात नील्सन यॉर्कटाउनवर उतरला व आपण पाठवलेल्या संदशातील चूक त्याला कळून आली. नील्सनला शोहो आणि त्याबरोबरच्या नौकापाहून त्या दोन क्रुझर आणि चार विनाशिका असल्याचे वाटले होते पण त्याने संदेश पाठवताना तिसराच पाठवला होता. शेवटची विमाने निघत असतानाच फ्लेचरला अमेरिकेच्या पायदळाच्या तीन बी-१७ विमानांकडून[४९] एक विवानौका, दहा सैनिकवाहू नौका आणि इतर १६ लढाऊ नौका दिसल्याचे कळले. हा तांडा म्हणजे नील्सनने पाहिलेल्या नौका अधिक पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणाऱ्या नौका असा समूह होता. आता फ्लेचरची खात्री पटली की हाच मुख्य जपानी तांडा आहे आणि त्याने सगळ्या विमानांना त्यावर चाल करून जाण्यास फर्मावले.[५०]
सव्वानऊ वाजता जपानी विमानांनी नियोशो आणि सिम्सला गाठले आणि तथाकथित विवानौकांचाही ते शोध घेऊ लागले. अकरापर्यंत काहीही हाती न लागल्यावर त्यांना कळून चुकले की आपली दिशाभूल झालेली आहे. ताकागीच्या हेही लक्षात आले आहे की अमेरिकन आरमार आता त्याच्या आणि पोर्ट मोरेस्बीवर हल्ला करणाऱ्या तांड्याच्या मध्ये घुसलेले होते. यावेळी जर अमेरिकनांनी या तांड्यावर हल्ला केला असता तर त्याचे रक्षण करण्यासाठी पुरेसा समुद्री फौजफाटा आसपासही नव्हता. ताकागीने आपल्या विमानांना नियोशो आणि सिम्सचा फडशा पाडून लगेचच आपापल्या विवानौकांवर परतण्यास सांगितले. सव्वाअकराच्या सुमारास ३६ विमानांनी या दोन नौकांवर हल्ला केला तर इतर विमाने आपापल्या नौकांकडे परतली.[५१]
छत्तीसपैकी चार विमानांनी सिम्सवर हल्ला चढवला तर ३२ विमाने नियोशोच्या मागे लागली. तीन बॉम्बनी सिम्सचा वेध घेतला व या विनाशिकेचे दोन तुकडे होऊन ती बघताबघता बुडाली. तीवरील १९२ पैकी १७८ सैनिक व खलाशी तिच्याबरोबर समुद्रतळी गेले. नियोशोला सात बॉम्ब लागले आणि एक जपानी विमानही तीवर कोसळले. जबरदस्त नुकसान झालेली व इंजिने बंद पडलेली नियोशोसुद्धा बुडू लागली. बुडण्याआधी तिने फ्लेचरला आपल्यावर हल्ला झाल्याची बातमी दिली पण कोणत्या प्रकारे हल्ला झाला याची बातमी फ्लेचरला नीट कळली नाही. तसेच आपण कोठी आहोत याचे गुणकही चुकीचे पाठवले गेले.[५२]
इकडे पावणेअकरा वाजता जपानी विमानांनी शोहोला मिसिमा द्वीपाच्या ईशान्येस पाहिले व त्यांनी हल्ल्याची तयारी सुरू केली. शोहोवरील सहा झीरो आणि दोन मित्सुबिशी ए५एम प्रकारची विमाने आसपास गस्त घालत होती तर इतर विमाने नियोशो आणि सिम्सचे पारिपत्य करण्यासाठी तयारीत म्हणून खालच्या डेकवर[मराठी शब्द सुचवा] होती. याशिवाय गोतोच्या आधिपत्याखालील क्रुझराही शोहोच्या चारही बाजूंनी ३-५ किमीचे अंतर राखून चाललेल्या होत्या.[५३]
यु.एस.एस. लेक्झिंग्टनवरील विमानांनी कमांडर विल्यम बी. ऑल्टच्या नेतृत्वाखाली शोहोवर पहिला हल्ला चढवला आणि १,००० पाउंडचे दोन बॉम्ब आणि पाच टॉरपेडो शोहोवर टाकण्यात यश मिळवले. शोहोवर लागलेल्या आगीने ही विवानौका बंद पडली आणि त्यानंतर लगेचच यु.एस.एस. यॉर्कटाउनवरील विमानांनी तिच्यावर हल्ला चढवला आणि अजून अकरा १,००० पाउंडचे बॉम्ब शोहोवर चढवले. इतक्या हल्ल्यांनी विच्छिन्न झालेली शोहो साडेअकराच्या सुमारास बुडाली. ताकागीने आपला तांडा उत्तरेकडे फिरवला आणि साझानामी या विनाशिकेला सुमद्रातील जगल्या-वाचल्यांना उचलण्यासाठी पाठवले. शोहोवरील ८३४पैकी ६३१ सैनिक व खलाशी मृत्यू पावले. अमेरिकन विमानांपैकी लेक्झिंग्टनवरील दोन एसबीडी विमाने आणि यॉर्कटाउनवरील एक विमान नष्ट झाले. शोहोवरील सगळी १८ विमाने नष्ट झाली परंतु त्यांपैकी तीन विमाने डेबॉइनपर्यंत कशीबशी पोचली व त्यातील वैमानिक बचावले. सव्वाबारा वाजता लेक्झिंग्टनवरील स्क्वॉड्रन कमांडर रॉबर्ट ई. डिक्सनने टॅफी १७ला संदेश पाठवला - स्क्रॅच वन फ्लॅट टॉप! साइन्ड बॉब. (एका विवानौकेच्या नावावर काट मारा. -- बॉब). [५४]
अमेरिकेची विमाने हल्ला करून दुपारी दीड पर्यंत आपापल्या विमानवाहू नौकांवर उतरली. पाउण तासातच डागडुजी करून घेउन, नवीन दारुगोळा भरून घेउन ही विमाने पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणाऱ्या तांड्यावर हल्ला चढवण्यास तयार होती. परंतु अॅडमिरल फ्लेचरने त्यांना रोखून धरले. त्याला वाटत होते की ऑपरेशन मो अंतर्गत चारेक जपानी विवानौका आसपास असतील व त्यांचा नेमका ठावठिकाणा लागल्याशिवाय डावपेच बांधणे धोक्याचे होते. त्यांना शोधण्यासाठी सगळी दुपार तरी गेली असती आणि त्यानंतर विमानांनिशी हल्ला करणे सुज्ञपणाचे नव्हते. असे असता फ्लेचरने त्यावेळी आलेल्या दाट ढगांच्या खाली दडी मारून बसणे शहाणपणाचे ठरवून आपल्या विमानांना पुढच्या दिवसापर्यंत थांबवून धरले. त्याने टास्क फोर्स १७ला आग्नेयेस जाण्यास सांगितले.[५५]
इकडे इनोऊला शोहो बुडाल्याचे समजल्यावर त्याने पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणाऱ्या तांड्याला तात्पुरते उत्तरेकडे माघार घेण्यास सांगितले व टॅफी १७ च्या पूर्वेस असलेल्या ताकागीला फ्लेचरवर चालून जाण्यास फर्मावले. उत्तरेकडे जाणाऱ्या पोर्ट मोरेस्बीवर तांड्यावर अमेरिकन सैन्यदलाच्या बी १७ बॉम्बफेकी विमानांनी हल्ला चढवला पण त्यात काही नुकसान झाले नाही. याचवेळी अॅडमिरल गोतो आणि अॅडमिरल काजिओका हे दोघे आपापला तांडा सावरायला लागले. रॉसेल द्वीपाच्या दक्षिणेस रात्रीत अमेरिकन नौका दिसल्या तर त्यांच्यावर अंधारातही हल्ला करण्याचा त्यांचा बेत होता.[५६]
दुपारी पाउण वाजता एका जपानी विमानाला अॅडमिरल क्रेसचा ताफा डेबॉइनच्या दक्षिणेकडे ७८ समुद्री मैलांवर दिसला. सव्वा वाजता रबौलच्या एका विमानालाही हा ताफा दिसला पण त्याने ही माहिती पुरवताना क्रेस डेबॉइनच्या नैऋत्येस ११५ समैलांवर असून त्याच्या ताफ्यात दोन विवानौकाही असल्याचे (चुकीचे) कळवले. ताकागी अजूनही नियोशोवर हल्ला करण्यास गेलेल्या विमानांच्या परतण्याची वाट पहात होता पण ही माहिती मिळताच त्याने दीड वाजता आपल्या विवानौका पश्चिमेस वळवल्या व तीन वाजता इनोऊला कळवले की अमेरिकन विवानौका त्याच्यापासून चारेकशे समैल लांबवर असून त्या दिवशी हल्ला करणे शक्य नव्हते.[५७]
इनोऊने रबौलमधून निघालेल्या विमानांच्या दोन थव्यांना क्रेसच्या ताफ्याकडे वळवले. पहिल्या थव्यात १२ टॉरपेडोफेकी विमाने तर दुसऱ्या थव्यात १९ मित्सुबिशी जी३एम प्रकारची बॉम्बफेकी विमाने होती. दोन्ही थव्यांनी अडीचच्या सुमारास क्रेसवर कडाडून हल्ला चढवला आणि कॅलिफोर्निया प्रकारची युद्धनौका बुडवल्याचे तर अजून एक युद्धनौका व क्रुझरला जायबंदी केल्याचे इनोऊला कळवले. खरे म्हणजे क्रेसच्या सगळ्या नौका सुरक्षित होत्या इतकेच नव्हे तर त्यांनी चार टॉरपेडोफेकी विमानेही पाडलेली होती. या गोंधळात अमेरिकन सैन्याच्या तीन बी १७ विमानांनीही क्रेसवर बॉम्बफेक केली पण सुदैवाने त्यात काही हानी झाली नाही.[५८]
साडेतीन वाजता क्रेसने फ्लेचरला संदेश पाठवला की स्वतःची मोहीम पार पाडण्यासाठी त्याला विमानांकडून रक्षण मिळणे अत्यावश्यक होते आणि त्याने आपला तांडा पोर्ट मोरेस्बीपासून २२० समैलांवर नेउन ठेवला. असे केल्याने तो जपानी विमानांच्या कचाट्यातून लांब होता पण जोमार्डच्या खाडीतून किंवा चीनी सामुद्रधुनीतून लुईझिएड्सकडे येऊ पाहणाऱ्या जपानी नौकांनाही शह देणे त्याला शक्य होती. क्रेसच्या नौकांतील इंधन आता संपत आलेले होते आणि त्याला फ्लेचर कोठे/कसा असल्याची किंवा त्याचा पुढील बेत काय आहे याची कल्पना नव्हती.[५९]
इकडे तीनच्या सुमारास झुइकाकुला (चुकीचे) कळले की क्रेसचा तांडा आग्नेयेकडे पळ काढीत आहे. ताकागीने यावरून अंदाज बांधला की क्रेसने फ्लेचरच्या आसपास राहण्यासाठी दिशाबदल केली आहे. जर हे खरे असले तर रात्रीपर्यंत क्रेस व फ्लेचर दोन्ही ताकागीच्या विमानांच्या माऱ्यात आले असते. ताकागी आणि हारा यांनी नुसत्याच बॉम्बफेकी विमानांचा थवा तयार करण्यास फर्मावले व संध्याकाळनंतर हल्ला चढवण्याचा बेत आखला. लढाऊ विमानांची संगत नसताना व परत येईपर्यंत रात्र होणार असली तरीही हा असा अचानक हल्ला चढवून खळबळ माजवण्याचा ताकागीचा बेत होता.[६०]
अमेरिकन विवानौकांचा ठावठिकाणा पक्का करण्यासाठी हाराने सव्वातीन वाजता आठ टॉरपेडोफेकी विमानांना पश्चिमेस पिटाळले व त्यांना साधारण २०० समैलांपर्यंत टेहळणी करीतत राहण्यास सांगितले. याच सुमारास सिम्स आणि नियोशोचा फडशा पाडून आलेली बॉम्बफेकी विमाने झुइकाकुवर उतरली. या दमलेल्या वैमानिकांपैकी सहा वैमानिकांना लागोलाग या पुढील मोहीमेसाठी तयार राहण्यास आले. या आणि इतर अनुभवी सहा वैमानिकांनिशी बारा बॉम्बफेकी विमाने व १५ टॉरपेडोफेकी विमाने सव्वाचार वाजता पश्चिमेकडे निघाली. टेहळणीसाठी पाठवलेली आठ विमाने आपल्या नियोजित अंतरापर्यंत पोचली पण त्यांना क्रेस किंवा फ्लेचरचा मागमूसही लागला नाही.[६१]
पावणेसहाच्या सुमारास दाट ढगांच्या आडोश्याने वावरणाऱ्या टॅफी १७ला ही जपानी बॉम्बफेकी विमाने आपल्याकडे चाल करून येत असल्याचे दिसले. हे पाहत्या त्यांनी आपला मोर्चा आग्नेयेकडे वळवला आणि ११ वाइल्डकॅट विमाने यांचे पारिपत्य करण्यासाठी पाठवली. जेम्स एच. फ्लॅटली शामिल असलेल्या या थव्याने जपानी विमानांना अचानक गाठले आणि तीन वाइल्डकॅट गमावताना आठ टॉरपेडोफेकी तर एक बॉम्बफेकी विमाने पाडली.[६२]
अचानक झालेल्या या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याने जपानी विमाने इतस्ततः विखुरलेली पाहून जपानी सेनानायकांनी ताकागी आणि हाराशी मसलत करून हल्ला करण्याचा बेत रद्द केला. आपला दारुगोळा समुद्रार्पण करून त्यांनी आपापल्या विवानौकांकडे पळ काढला. साडेसहा वाजता सूर्यास्त झाल्याने ते काळोखातच प्रवास करीत होते. सातच्या सुमारास त्यांना खाली विवानौका दिसल्यावर त्यांवर उतरण्यासाठी ही जपानी विमाने घिरट्या घालू लागली पण या विवानौका म्हणजे क्रेसचा ताफा होता. विमानविरोधी तोफांच्या माऱ्यात जपानी विमानांना पळता भुई (समुद्र) थोडी झाली. हे ऐकून ताकागीने आपल्या विवानौकांवरील शोधझोत लावून विमानांना खुणावले. दहा वाजेपर्यंत बचावलेली अठरा विमाने ताकागीच्या ताफ्यात परत सहभागी झाली. या हालचालींदरम्यान आठच्या सुमारास ताकागी आणि क्रेसमध्ये जेमतेम १०० समुद्री मैलांचे अंतर उरलेले होते.[६३]
याआधी सव्वातीन वाजता नियोशोने टॅफी १७ला आपल्यावरील हल्ल्याची हकीगत कळवली होती व सव्वापाच वाजता आपण बुडत असल्याचे कळवले होते. शेवटच्या संदेशात नियोशोने आपले ठिकाण चुकीचे कळवले, त्यामुळे त्यावरील खलाशांना वाचवण्यात अडसर निर्माण झाला. फ्लेचरला हे ही कळून चुकले की आपल्याकडील एकमेव इंधनसाठा विनाश पावला आहे.[६४]
रात्र पडल्यावर विमानांच्या हालचाली मंदावल्यानंतर फ्लेचरने टॅफी १७ला पश्चिमेकडून सुरुवात करीत चक्राकार शोधमोहीम सुरू करण्यास सांगितले. क्रेस लुईझिएड्सच्या टप्प्यात होताच. इनोऊने ताकागीला पुढच्या दिवशी अमेरिकन तांड्यावर हल्ला करून त्याचा विनाश करण्याचा हुकुम दिला आणि पोर्ट मोरेस्बीवरील आक्रमण मे १२पर्यंत पुढे ढकलले. ताकागी आपला तांडा घेउन उत्तरेस १२० समैल गेला. सकाळी दक्षिण आणि पश्चिमेस शोध चालवून अमेरिकनांवर हल्ला चढवण्याचे तसेच पोर्ट मोरेस्बीवर चाल करून जाणाऱ्या नौकांना रक्षण देण्यासाठी ही त्याची चाल होती. गोतो आणि काजिओका आपले तांडे घेउन ताकागीच्या संगतीला येणार होते पण ते त्यांना शक्य झाले नाही.[६५]
दोन्ही पक्षांना कळून चुकले होते की सकाळी धुमश्चक्री होणार. त्यांनी रात्रभर आपल्या विमानांची डागडुजी करणे चालू ठेवले तर दिवसभराचे दमलेले वैमानिक काही तास का होईना झोपण्यास गेले.
या दिवशी घडलेल्या घटनांचे जपानी पृथक्करण युद्धापश्चात प्रसिद्ध झाले. हे वाचून अमेरिकेच्या व्हाइस अॅडमिरल एच.एस. डकवर्थने मे ७, इ.स. १९४२चे कॉरल समुद्राचे रणांगण म्हणजे जगाच्या इतिहासातील सगळ्यात जास्त गोंधळ असलेले रणांगण होते. अशी टिप्पणी केली.[६६] लढाई संपल्यावर अॅडमिरल हाराने अॅडमिरल यामामोतोच्या मदतनीसास सांगितले की या दिवशी जपान्यांचे इतके कमनशीब पाहून तो (हारा) इतका वैतागला की आपण खलाशीगिरी सोडून द्यावी असे त्याला वाटले.[६७]
मे ८ला पहाटे उजाडताना अॅडमिरल हारा रॉसेल द्वीपाच्या पूर्वेस १०० समुद्री मैलावर स्थित होता. सव्वा सहा वाजता त्याने सात टॉरपेडोफेकी विमाने आपल्या नैऋत्येपासून आग्नेयेपर्यंत २५० स.मैलांच्या परिघात टेहळणी साठी पाठवली. त्यांना संगतीला तुलागीतून तीन कावानिशी टाइप ९७ आणि रबौलमधून चार बॉम्बफेकी विमाने होती. सात वाजता हारा ईशान्येकडे निघाला आणि तेथे त्याला अॅडमिरल गोतोच्या तांड्यातील किनुगासा आणि फुरुताका या दोन क्रुझरा येउन मिळाल्या. यांचे काम आता मुख्या तांड्यापासून लांब राहून त्यावर चालून येणाऱ्या शत्रूला तेथेच थोपवणे हे होते. इकडे पोर्ट मोरेस्बीवर चालून जाणारा ताफा, अॅडमिरल गोतो आणि अॅडमिरल काजिओका वूडलार्क द्वीपाच्या पूर्वेस पूर्वनियोजित स्थळ गाठण्यासाठी निघाले. हारा आणि क्रेसच्या बळांतील लढाईचे पर्यवसान पाहून त्यांची पुढील चाल ठरणार होती. आदल्या दिवशी अमेरिकन नौका ज्या ढगांच्या आड लपतछपत फिरत होत्या ते ढग आता ईशान्येस सरकले होते आणि त्याचा फायदा जपान्यांना मिळाला. त्या परिसरातील दृष्टिपथ ३-१५ किमी इतका कमी झाला ज्याने अमेरिकन टेहळ्यांना जपानी जहाजे शोधणे कठीण झाले.[६८]
इकडे टॅफी १७ चे नेतृत्व अॅडमिरल क्रेसने रात्री अॅडमिरल ऑब्रे फिचकडे तात्पुरते दिलेले होते. पहाट होताना हा तांडा लुईझिएड्सच्या आग्नेयेस १८० स.मैलांवर होता. साडेसहा वाजता फिचने १८ विमाने २०० स.मैलांच्या परिघात चारही बाजूंना टेहळणीसाठी सोडली. आता अमेरिकनांना ढगांचा आश्रय नव्हता आणि २०-२२ किमी पर्यंतचा दृष्टिपथ मोकळा होता.[६९]
आठ वाजून वीस मिनिटांनी यु.एस.एस. लेक्झिंग्टनवरून निघालेल्या जोसेफ जी. स्मिथ या वैमानिकाला योगायोगाने ढगातील फटीतून जपानी तांडा दिसला आणि त्याने तसे टॅफी १७ला कळवले. दोनच मिनिटांत शोकाकुवरून निघालेल्या केंझो कान्नो या टेहळ्याला टॅफी १७ दिसला व त्याने ही बातमी हाराला कळवली. या क्षणी या दोन्ही सेना एकमेकांपासून २१० समुद्री मैलांवर होत्या व पहिला हल्ला चढवण्यासाठी विमाने तयार करून पाठवण्यासाठी दोघांचीही लगीनघाई सुरू झाली.[७०]
सव्वानऊ वाजता जपानी विमानांचा थवा लेफ्टनंट कमांडर काकुइची ताकाहाशीच्या नेतृत्वाखाली फ्लेचरच्या नौकांकडे निघाला. यात १८ लढाऊ, ३३ बॉम्बफेकी आणि १८ टॉरपेडोफेकी विमाने शामिल होती. अमेरिकन विवानौकांनी दोन वेगवेगळे थवे रचले. यॉर्कटाउनवरून सहा लढाऊ, २४ बॉम्बफेकी आणि नऊ टॉरपेडोफेकी विमाने सव्वानऊ वाजताच निघाली. दहा मिनिटांनी लेक्झिंग्टनवरची नऊ लढाऊ, १५ बॉम्बफेकी आणि बारा टॉरपेडोफेकी विमाने रवाना झाली. विमाने निघाल्यावर दोन्ही पक्षांच्या नौका सर्वशक्तिनिशी शत्रूकडे चाल करून निघाल्या. हल्ला करून परतणाऱ्या विमानांचा पल्ला कमी करणे हा त्यातील एक उद्देश होता.[७१]
यॉर्कटाउनवरील बॉम्बफेकी विमाने घेउन विल्यम ओ. बर्च १०:३२ला जपान्यांचा दृष्टिक्षेपात आला पण त्याच्याबरोबर निघालेली टॉरपेडोफेकी विमाने आपल्या मंदगतीने अजून आलेली नव्हती. यावेळी शोकाकु आणि झुइकाकु एकमेकांत एक किमी अंतर राखून चाललेल्या होत्या पण झुइकाकु अगदी समुद्रास टेकलेल्या दाट ढगांच्या आडोश्यात लपलेली होती. त्यांच्या रक्षाणासाठी १६ झीरो विमाने तयार होती. पंचवीस मिनिटे घिरट्या घातल्यावर सगळ्या अमेरिकन विमानांनी शोकाकुवर एकदम हल्ला चढवला. आडवीतिडवी वळणे घेत चाललेल्या या विवानौकेवर टॉरपेडोफेकी विमानांचे सगळे बार वाया गेले. पण बॉम्बफेकीतील दोन ४५० किग्रॅचे बॉम्ब शोकाकुवर टाकण्यात अमेरिकनांना यश आले. या स्फोटात शोकाकुचे फोरकॅसल[मराठी शब्द सुचवा] पार उद्ध्वस्त झाले आणि फ्लाइट डेक[मराठी शब्द सुचवा] आणि हॅंगर डेक[मराठी शब्द सुचवा]चेही मोठे नुकसान झाले.[७२]
हे वादळ घोंगावत असतानाच लेक्झिंग्टनवरून निघालेला थवा साडेअकरा वाजता जपानी विवानौकांजवळ येउन थडकला. त्यातील दोन बॉम्बफेकी विमानांनी शोकाकुवर अजून एक ४५० किलोचा बॉम्ब टाकण्यात यश मिळवले. इतर दोन विमानांनी झुइकाकुवर बॉम्ब फेकले पण दोन्ही वाया गेले. तोपर्यंत दोन्ही विवानौका ढगांच्या आड गेल्या आणि बाकीच्या अमेरिकन विमानांना त्या दिसल्या नाहीत. तशातही सोडलेले अकरा टॉरपेडोसुद्धा वाया गेले. यात तीन अमेरिकन वाइल्डकॅट विमानांना जपानी झीरो विमानांनी तोडून पाडले.[७३]
शोकाकुवरील स्फोटांमध्ये २२३ सैनिक व खलाशी मृत्यू पावले किंवा गंभीर जखमी झाले तसेच त्यावरील फ्लाइट डेकही निकामी झाला. याने शोकाकुवरील विमानांना उड्डाण घेणे अशक्य झाले. असे असता शोकाकुच्या कॅप्टन ताकात्सुगु जोजिमाने ताकागी आणि हाराकडे रणांगणातून माघार घेण्याची परवानगी मागितली. सव्वाबारा वाजता शोकाकुने आपल्याबरोबर दोन क्रुझरा घेउन ईशान्येकडे काढता पाय घेतला.[७४]
शोकाकु आणि झुइकाकुवर अमेरिकन विमानांचा हल्ला सुरू असतानाच १०:५५ वाजता जपानी विमानांचा थवा अमेरिकन तांड्यावर चालून आला. ही विमाने रडारक्षेपात आल्याआल्या लेक्झिंग्टनने नऊ वाइल्डकॅट विमानांना जपान्यांविरुद्ध सोडले. आक्रमक विमाने टॉरपेडोफेकी असल्याचे लक्षात आल्याने यातली सहा विमाने लेक्झिंग्टनपासून काही अंतरावर आक्रमकांचा प्रतिकार करण्यास फार उंच न जाता खालीच दबा धरून बसली होती. पण जपानी विमाने उंचावरून निघून गेली व पार लेक्झिंग्टनपर्यंत पोचली.[७५] आदल्या रात्री बरीच विमाने गमावल्यामुळे लेफ्टनंट कमांडर शिगेकाझु शिमाझाकीच्या नेतृत्वाखालील या जपानी धाडीत पाहिजे तितकी विमाने नव्हती. चौदा विमानांनी लेक्झिंग्टनवर हल्ला केला तर चार यॉर्कटाउन वर चालून गेली. यॉर्कटाउनच्या आसपास राहणाऱ्या विमानांनी चार जपानी विमाने पाडली तर चार अमेरिकन विमाने नष्ट झाली.[७६] सव्वा अकरा वाजता हा जपानी हल्ला सुरू झाला तेव्हा यॉर्कटाउन आणि लेक्झिंग्टन तीन किमी अंतर राखून होत्या. विमाने जवळ येताच त्यांच्यावरील विमानविरोधी तोफांनी मारा सुरू केला. यात चार जपानी विमाने पडली. यॉर्कटाउनवरील चारही विमानांचे हल्ले निष्फळ गेले. लेक्झिंग्टनवर चालून आलेल्या चौदा विमानांनी दोन फळ्या रचल्या व नौकेच्या दोन बाजूंनी एकदम हल्ला चढवला. यात दोन टॉरपेडोंचे फटके लेक्झिंग्टनला बसले. एका फटक्यात डावीकडील इंधनटाकी मोडली पण त्याचा स्फोट झाला नाही. परंतु खलाशांच्या नकळत या टाकीतून पेट्रोलची बाष्प गळायला लागली आणि आसपासच्या भागात पसरली. दुसरा टॉरपेडो डावीकडच्याच भागातील जलनलिकेला बसला व इंजिनांकडे जाणारे शीतक त्यामुळे कमी झाले. असे असता काही इंजिने गरम झाली व ती बंद करावी लागली. तरीही लेक्झिंग्टनला ताशी २४ नॉट (४० किमी) वेग कायम ठेवता आला.[७७]
उरलेली ३३ जपानी बॉम्बफेकी विमाने या तांड्याला वळसा घालून उलट बाजूने आली आणि टॉरपेडोफेकी विमानांच्या हल्ल्यानंतर ३-४ मिनिटांत त्यांनी १४,००० फुटांवरून बुड्या मारायला सुरुवात केली. ताकाहाशीच्या नेतृत्वाखाली १९ विमाने लेक्झिंग्टन वर तर तामोत्सु एमाच्या नेतृत्वाखाली उरलेली १४ विमाने यॉर्कटाउनवर चालून आली. यांच्या संगतीला असलेली झीरो विमाने अमेरिकन लढाऊ विमानांना थोपवून धरत होती. तरीही दोन वाइल्डकॅट विमानांना एमाच्या फॉर्मेशन[मराठी शब्द सुचवा]मध्ये गोंधळ घालण्यात यश आले. ताकाहाशीच्या थव्याने यॉर्कटाउनवर दोन बॉम्ब टाकून आगी लावल्या पण अमेरिकनांनी तासाभरात त्या विझवून टाकल्या. यॉर्कटाउनच्या फ्लाइटडेकच्या मध्यावर अजून एक चिलखतभेदी बॉम्ब पडला व चार डेकांच्या आरपार जात पाचव्या डेकवर त्याचा स्फोट झाला. यात ६६ अमेरिकन सैनिक व खलाशी ठार झाले तसेच विमानांचे भाग ठेवलेल्या गोदामाचीही नासधूस झाली. इतर बारा बॉम्ब जरी नौकेवर पडले नसले तरी आसपास पडून त्यांचे स्फोट झाले व यॉर्कटाउनचे जलरेषेच्या खाली नुकसान झाले.[७८]
दोन्ही विवानौकांवर जबरी हल्ले चढवून जपानी विमाने आपल्या तांड्याकडे परतायला लागली तेव्हा उरल्यासुरल्या अमेरिकन विमानांनी त्यांना गाठले व तेथे तुंबळ हवाईयुद्ध माजले. यात तीन अमेरिकन टॉरपेडोफेकी विमाने (ज्यांच्यात खरे म्हणजे मशीनगन सोडून इतर विमानांशी झुंजण्यासाठीची शस्त्रास्त्रे नव्हती) आणि तीन वाइल्डकॅट लढाऊ विमाने पडली तर तीन जपानी टॉरपेडोफेकी विमाने, एक बॉम्बफेकी विमान आणि एक लढाऊ विमान कामी आली. मध्याह्नापर्यंत दोन्ही बाजूंची विमाने आपला दारुगोळा शत्रूवर टाकून परत आपल्या गोटाकडे निघाली होती. वाटेत त्यांची एकमेकांशी गाठ पडली आणि पुन्हा एकदा मारामारी सुरू झाली. यात कान्नो आणि ताकाहाशी दोघांची विमाने पडून ते स्वतः मृत्यू पावले.[७९]
हल्ला करून आलेली ही विमाने आपापल्या विवानौकांवर पाउण ते अडीचच्या दरम्यान उतरली. यातील बरीचशी जायबंदी झालेली होती. आपल्या फ्लाइट डेकचे नुकसान झालेले असून सुद्धा लेक्झिंग्टन आणि यॉर्कटाउनवर बरीचशी विमाने सुखरूप उतरली पण त्यातील सात टॉरपेडोफेकी आणि एक वाइल्डकॅट विमान समुद्रात पडली. जपान्यांपैकी दोन झीरो लढाऊ विमाने, पाच बॉम्बफेकी आणि एक टॉरपेडोफेकी विमाने त्यांच्या विवानौकांवर उतरू शकली नाहीत. जपानी थव्यातील ६९ पैकी ४६ विमाने उतरली पण त्यातीलही तीन झीरो, चार बॉम्बफेकी आणि पाच टॉरपेडोफेकी विमाने गंभीररीत्या जायबंदी झालेली असल्यामुळे त्यांना समुद्रातच ढकलून देण्यात आले.[८०]
फ्लेचरने आपल्या हताहतांची गोळाबेरीज केली असता त्याच्या लक्षात आले की जपान्यांच्या एका विवानौकेचे (शोकाकु) मोठे नुकसान झाले असले तरी दुसरी विवानौका खंबीर होती. दोन्ही अमेरिकन विवानौका कुचकामी झाल्या होत्या तसेच त्यांवरील विमानांपैकी मोठा भाग नष्ट पावला होता किंवा पुढील काही तास/दिवस न वापरण्याजोगा झाला होती. नियोशो बुडल्यामुळे इंधनभरती करून घेणे शक्य नव्हते आणि असलेल्या इंधनाचा साठाही खाली गेलेला होता. त्यात भर म्हणून अडीचच्या सुमारास ऑब्रे फिचकडून फ्लेचरला दोन्ही जपानी विवानौका सुरक्षित असल्याची खबर आली. जपान्यांच्या पकडलेल्या संदेशातूनही हेच ध्वनित होत होते. असे असता बळाचे पारडे मोठ्या प्रमाणात जपान्यांकडे झुकलेले होते आणि पुन्हा झटापट झाल्यास अमेरिकनांची खैर नव्हती असे फ्लेचरला वाटले. एकंदर परिस्थिती पाहून त्याने रणांगणातून माघार घेणे हाच रास्त उपाय असल्याचे ठरवले व टॅफी १७ला लांब नेण्यास हुकुम सोडले. त्याने डग्लस मॅकआर्थरला शोकाकु आणि झुइकाकुचा ठावठिकाणा कळवला आणि त्यांवर जमिनीवरील बॉम्बफेकी विमानांसह हल्ला करण्यास सुचवले.[८१]
अडीच वाजताच अॅडमिरल हाराने ताकागीला कळवले की शोकाकु आणि झुइकाकुवर मिळून फक्त २४ झीरो लढाऊ विमाने, आठ बॉम्बफेकी तर चार टॉरपेडोफेकी विमानेच वापरण्याजोगी उरलेली होती. ताकागीलाही इंधनसाठ्याची काळजी लागलेली होती. त्याच्या क्रुझरा अर्ध्या तर काही विनाशिका एक पंचमांश इंधनसाठ्यावर आलेल्या होत्या. तीन वाजता ताकागीने इनोऊला कळवले की जपान्यांनी दोन्ही अमेरिकन विवानौका बुडवल्या होत्या पण जपानी शक्ती कमी झाल्यामुळे पोर्ट मोरेस्बीवरील आक्रमणास वायुसुरक्षाकवच पाठवणे अशक्य होते. इनोऊच्या टेहळ्यांना अॅडमिरल क्रेसचा तांडा जवळपासच असल्याचे दिसले होते म्हणून त्याने या आक्रमकदलाला रबौलला परत बोलावून घेतले व ऑपरेशन मो जुलै ३पर्यंत पुढे ढकलली. ताकागीला त्याने सॉलोमन द्वीपसमूहाच्या ईशान्येस जाउन ऑपरेशन आरवायची तयारी करण्यास सांगितले. याबरहुकुम झुइकाकु आणि संगतीच्या नौका रबौलकडे निघाल्या तर शोकाकु जपानकडे निघाली.[८२]
दुपारपर्यंत लेक्झिंग्टनवर लागलेली आग विझवण्यात अमेरिकनांना यश आलेले होते आणि ही विवानौका परत पूर्वस्थितीत येऊ लागलेली होती. साधारण पाउण वाजता जेथे टॉरपेडोच्या फटक्यामुळे पेट्रोलबाष्पगळती झालेली होती तेथील विद्युतमोटरींतून ठिणग्या पडून भडका उडाला. या स्फोटात २५ खलाशी ठार झाले आणि आगीचा मोठा डोंब उसळला. पावणेतीन वाजता अजून एक मोठा स्फोट झाला तर अडीच वाजता तिसरा. पावणेचार वाजता अग्निशमकांनी ही आग आटोक्यात येणारी नसल्याचे कप्तानाला कळवले. कॅप्टन फ्रेडरिक सी. शेर्मनने पाच वाजता नौका सोडून देण्याचा हुकुम दिला. कॅप्टन शेर्मन तसेच ऑब्रे फिच यांच्यासह उरलेल्या सगळ्या खलाशी, सैनिकांना वाचवण्यात आले. संध्याकाळी सव्वासात वाजता यु.एस.एस. फेल्प्सने लेक्झिंग्टनवर पाच टॉरपेडो मारले. ही महाकाय विवानौका ४० मिनिटांत १४,०० फूट खोल पाण्यात बुडाली. तिच्यावर असलेल्या २,९५१ खलाश्यांपैकी २१६ आणि ३६ विमानांनाही जलसमाधी मिळाली. लेक्झिंग्टन बुडाल्यावर लगेच फेल्प्स आणि संगतीच्या नौकांनी तडक यॉर्कटाउनला गाठले आणि उरलासुरला टॅफी १७ नैऋत्येकडे चालता झाला. संध्याकाळी डग्लस मॅकआर्थरने फ्लेचरला कळवले की त्याच्या बॉम्बफेकी विमानांनी जपान्यांना गाठून हल्ला केला होता व जपानी तांडा वायव्येकडे पळत सुटलेला होता.[८३]
उशीरा संध्याकाळी क्रेसने आपल्या तांड्यातील इंधनसाठा संपत आलेली एच.ए.एम.एस होबार्ट आणि इंजिनात बिघाड झालेली यु.एस.एस. वॉक यांना वेगळे काढून टाउन्सव्हिलकडे रवाना केले. क्रेसला असे कळले की जपानी तांडा परत फ्लेचरच्या मागावर लागलेला आहे. त्याला अजून माहिती नव्हते की फ्लेचर आपल्या नौका घेउन लांब गेलेला होता म्हणून त्याने आपण असलेल्याच ठिकाणी राहून स्वतःला शत्रु आणि फ्लेचर तसेच पोर्ट मोरेस्बी यांच्या मध्ये ठेवणे पसंत केले.[८४]
मे ९ रोजी टॅफी १७ने पूर्व दिशा धरली व न्यू कॅलिडोनियाच्या दक्षिणेचा रस्ता धरून हा तांडा कॉरल समुद्राच्या बाहेर पडला. अॅडमिरल निमित्झने फ्लेचरला टोंगाटाबु येथे यॉर्कटाउनमध्ये इंधन भरून घेउन टाकोटाक पर्ल हार्बरला येण्यास फर्मावले. त्याच दिवशी अमेरिकन सैन्याच्या बॉम्बफेकी विमानांनी डेबॉइन वर हल्ला केला. इकडे क्रेसला टॅफी १७ च्या हालचालींबद्दल दोन दिवस काही कळले नसल्याने त्याने अंदाज बांधला की टॅफी १७ कॉरल समुद्रातून बाहेर पडलेला आहे. जपानी तांड्यांचीही काही हालचाल नसल्याचे पाहून मे १०च्या पहाटे एक वाजता क्रेस आपला तांडा घेउन ऑस्ट्रेलियाकडे निघाला आणि ११ तारखेस टाउन्सव्हिलजवळ व्हिटसंडे द्वीपांत येउन पोचला.[८५]
मे ८ला रात्री १० वाजताच इसोरोकु यामामोतोने शिगेयोशी इनोउला शत्रूचा विनाश करून पोर्ट मोरेस्बी काबीज करण्याचा हुकुम दिला होता. तरीही इनोउने पोर्ट मोरेस्बीवरील चढाई थांबवली पण ताकागी आणि गोतोला अमेरिकनांचा पाठलाग करण्यास फर्मावले. तोपर्यंत ताकागीच्या जहाजातील इंधन पार तळाला गेलेले होते. मे ९चा पूर्ण दिवस ताकागीने आपल्या तेलपूरक जहाज तोहो मारुमधून इंधन भरून घेण्यात घालवला आणि रात्रीच्या सुमारास गोतोच्या संगतीने आग्नेयेकडे निघाला. तेथून नैऋत्येकडे वळत तो परत कॉरल समुद्रात आला. डेबॉइनस्थित विमानांनीही टॅफी १७चा शोध घेण्यास सुरुवात केली होती. मे १०ला दुपारपर्यंत शत्रु न दिसल्यावर ताकागीने होरा मांडला की टॅफी १७ने रणांगणातून पळ काढलेला होता. नंतर तो रबौलकडे परत निघाला. यामामोतोने ताकागीला पाठिंबा दिला आणि झुइकाकुला जपानला परत बोलावून घेतले.[८६] मे ११च्या दुपारी अमेरिकन आरमाराच्या पी.बी.वाय. कॅटेलिनाला भरकटत चाललेली नियोशो दिसली. मदतीसाठीच्या हाकेला अमेरिकन विनाशिका यु.एस.एस. हेनलीने उत्तर दिले आणि नियोशोवरील १०९ तसेच सिम्सवरील १४ खलाशी व सैनिकांना वाचवले. त्यानंतर संध्याकाळी नियोशोला जलसमाधी देण्यात आली.[८७]
१० मे रोजी पोर्ट मोरेस्बीवर ऑपरेशन आरवाय ही मोहीम सुरू झाली. १२ मे रोजी अमेरिकेच्या यु.एस.एस. एस-४२ या पाणबुडीने या मोहीमेची ध्वजनौका ओकिनोशिमा बुडवल्यावर सैनिकांना उतरवणे मे १७पर्यंत स्थगित केले गेले. दरम्यान विल्यम एफ. हाल्सी, जुनियरचा टास्क फोर्स १६ एफाटेजवळ पोचला आणि मे १३ला त्याने उत्तरेकडे दिशा बदलून नौरू आणि ओशन आयलंडची वाट धरली. तेथून येऊ पाहणाऱ्या जपानी तांड्यांना शह देण्याचा त्याचा मनसूबा होता. चेस्टर निमित्झला कुणकुण लागलेली होती की जपानचा मोठा आरमारी जमाव मिडवे द्वीपावर चालून येणार आहे. त्याने हाल्सीला कळवले की तो (हाल्सी) नक्की कोठे आहे हे जपान्यांना मुद्दामहून कळू द्यायचे आणि मग पुढे न जाता तडक पर्ल हार्बर गाठायचे. मे १५ला सकाळी सव्वादहा वाजता तुलागीहून निघालेल्या टेहळ्यांनी टॅफी १६ला सोलोमन द्वीपसमूहाच्या पूर्वेस ४४५ स.मैलांवर टिपले. लगेच हाल्सीने पर्ल हार्बरची दिशा धरली. ही झुकांडी बरोबर कामी आली. पोर्ट मोरेस्बीवरील आक्रमकांवर विमानवाहू नौकांसह अमेरिकन चालून येत असल्याचे पाहून इनोउने लगेच ती मोहीम रद्द केली आणि आपल्या नौका परत रबौल आणि ट्रुकला परत बोलावून घेतल्या. टॅफी १६ एफाटेला इंधन भरून घेउन २९ मेला पर्ल हार्बरला पोचला. यॉर्कटाउन आणि तिच्या संगतीच्या नौका पुढच्या दिवशी तेथे आल्या.[८८]
मे १७ला शोकाकु कुरे येथे पोचली. लढाईत झालेल्या नुकसानामुळे वाटेत लागलेल्या वादळात ही जवळजवळ बुडण्यास आली होती. झुइकाकु ट्रुकमार्गे मे २१ रोजी कुरेला पोचली. अमेरिकनांना या दोन्ही विवानौकांचा जपानला परतायचा मार्ग कळलेला असल्याने त्यांच्या आठ पाणबुड्या वाटेत दबा धरून बसलेल्या होत्या पण या सगळ्यांना हूल देत शोकाकु आणि झुइकाकु जपानला सुखरूप पोचल्या. शोकाकु दुरुस्त करून तीवर दुसरी विमाने बसवण्यास दोन-तीन महिने लागण्याचा अंदाज होता. या दोन्ही जायबंदी विवानौकांना मिडवेच्या लढाईत भाग घ्यायला जाणे अशक्यच झाले. या नौका जुलै १४ला दुरुस्त होऊन परत युद्धात शामिल झाल्या. ऑपरेशन मोमध्ये शामिल असलेल्या पाणबुड्यांना ती आठवड्यांनी सिडनीवर हल्ला करून दोस्तांची रसद कापण्याचे काम सोपवले गेले. तेथे जात असताना आय-२८ या पाणबुडीला अमेरिकेच्या यु.एस.एस. टॉटोग या पाणबुडीने तीवरील सर्व खलाशांसह बुडवले.[८९]
या लढाईत पहिल्यांदाच दोन्ही पक्षाच्या युद्धनौका एकमेकांच्या दृष्टिआड राहून झुंजल्या. त्यांनी एकमेकांवर थेट हल्लेही चढवले नाहीत. त्याऐवजी दोन्ही पक्षांच्या विमानांनी तोफांची जागा घेतली. विवानौका विरुद्ध विवानौका असलेली ही पहिलीच लढाई होती आणि सगळ्यांच सेनापतींचा हा पहिलाच अनुभव होता. कसे डावपेच घालावे किंवा काय व्यूह रचावे याची काहीच ऐतिहासिक नोंद नव्हती. असे असता दोन्ही पक्षांनी अनेक चुका केल्या. लढाईचा वेग युद्धनौकांच्या वेगाने (साधारण ४० नॉट) मर्यादित न राहता विमानांच्या वेगाने (३००+ नॉट) झाला पण संदेशवहनाची साधने अजूनही जुनीपुराणीच होती. त्यामुळे निर्णय घेण्यासाठी मिळणारा वेळ अनेकपटींनी कमी झाला. पूर्वीच्या लढायांमध्ये सदृश परिस्थितींमध्ये उचललेली पावले या लढाईत कुचकामी ठरली नव्हे तर काही अंशी अंगाशीही आली.[९०] भराभर निर्णय घेउन अमलात आणणे हे जरुरी झाले आणि या बाबतीत जपान्यांची गैरसोय झाली कारण अॅडमिरल इनोउ प्रत्यक्ष रणांगणावर नसून लांब रबौलमध्ये बसला होता व तेथून नौका हलविणे किंवा पुढील चाल ठरवणे त्याला अवघड होते. रणांगणात असलेले जपानी सेनापतींकडूनही एकमेकांना माहिती पुरविण्यात कुचराई झाल्याचे आढळून येते. याउलट दोस्तांचे सेनापती फ्लेचर, क्रेस, फिच, इ. आपापल्या विवानौकांवरून स्वतः लढत होते.[९१]
जपानी विवानौकांवरील वैमानिक व खलाशांना अमेरिकन वैमानिक व खलाशांपेक्षा युद्धानुभव जास्त होता. यामुळे विमानांच्या संख्येत जरी दोघेही तुल्यबळ असले तरी जपानी विमाने जास्त घातक ठरली. मे ८च्या हल्ल्यात जपानी विमाने वरचढ ठरली पण त्यांचे ९० वैमानिक ठार झाले तर अमेरिकेचे ३५. जपानी वैमानिकांनी यापूर्वी अनेक लढायांत भाग घेतला होता व त्यांचे युद्धप्राविण्य त्यांच्याबरोबरच संपले. जपानी वैमानिकांमध्ये जास्त अनुभवी वैमानिकांनाच शक्यतो युद्धात धाडण्याची रीत होती, ज्यामुळे नवीन किंवा लहान वयाच्या वैमानिकांना युद्धानुभव क्वचितच मिळत असे. हे अनुभवी वैमानिक कॉरल समुद्रात मृत्यू पावल्यावर त्यांची जागा घेण्यासाठी त्यांच्याइतके तयार वैमानिक जपान्यांकडे उरले नाहीत. हे त्यांना उरलेल्या युद्धभर नडले.[९२]
अमेरिकन आरमार जरी सुरुवातीस कमी पडले असले तरी त्यांनी लढाई सुरू असतानाच धडे घेतले व आपल्या डावपेचांमध्ये आवश्यक ते भराभर बदल केले. यात विवानौका हाकारणे, त्यांवरील यंत्रसामग्री हाताळणे, लढाऊ विमानांची हल्ला करण्याची पद्धत, हल्ला करतानाचे संदेश आवागमन, टॉरपेडोफेकी अशा आक्रमक तर विमानविरोधी तोफांसारख्या बचावात्मक डावपेचांचा समावेश होता. हे धडे त्यांनी लढाईच्या दुसऱ्या दिवशीच नव्हे तर तद्नंतरच्या पूर्ण युद्धात गिरवले. अमेरिकनांची रडारयंत्रणा जपान्यापेक्षा किंचित सरस होती पण या लढाईत त्याचा फारसा फरक पडला नाही. तरीही येथील चुका सुधारून नंतरच्या युद्धात रडारचा जास्त चांगला उपयोग कसा करावा हे त्यांनी येथे शिकून घेतले. लेक्झिंग्टन गमावल्यावर लढाऊ नौकांमधील इंधन कसे जतन करावे व हल्ल्यांमधील नुकसान कमीत कमी कसे होऊ द्यावे यासाठी त्यांनी अनेक प्रणाली अमलात आणल्या.[९३] या लढाईत अमेरिकन आरमार आणि दोस्त राष्ट्रांच्या जमिनीवरील वायुसेनेतील संयोजन अगदीच सुमार होते पण याची नोंद घेउन हळूहळू ते सुधारण्यात आले.[९४]
या लढाईनंतरच्या मिडवे, पूर्व सोलोमन, सांता क्रुझ द्वीपे आणि फिलिपाइन्सच्या समुद्रातील लढाईत पुन्हा एकदा अमेरिका आणि जपानच्या विमानवाहू नौकांची एकमेकांशी गाठ पडणार होती. यातील प्रत्येक लढाई प्रशांत महासागरातील युद्धाची परिणती ठरण्यात व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाची होती. कॉरल समुद्राच्या लढाईत मिळालेले धडे दोन्ही पक्षांनी या लढायांत राबवले.[९५]
लढाई संपल्यावर दोन्ही पक्षांनी आपलाच जय झाल्याचे जाहीर केले. गमावलेल्या नौका व सैनिक पाहता लढाईत जपानची सरशी झाली होती. त्यांनी अमेरिकेची एक मोठी विमानवाहू नौका, एक तेलपूरक नौका आणि एक विनाशिका बुडवली तर स्वतःची एक छोटी विमानवाहू नौका, एक विनाशिका आणि काही छोट्या लढाऊ नौका गमावल्या. प्रशांत महासागरात अमेरिकेकडे त्यावेळी फक्त चार विवानौका होत्या आणि त्यातील एक, यु.एस.एस. लेक्झिंग्टन, बुडवण्यात जपानला यश आले.[९६] जपानने आपल्या जनतेस लढाईचा अहवाल सांगताना तिखटमीठ पेरून आपली झाल्यापेक्षा जास्त सरशी झाल्याचे सांगितले.[९७]
या लढाईत जपानने पारडे जरी जड झाले असले तरी व्यूहात्मकदृष्ट्या दोस्त राष्ट्रांचीही सरशी झाली. या लढाईमुळे पोर्ट मोरेस्बीवरील जपानी चढाई पुढे पडली. त्याने दोस्तांच्या रसदपुरवठ्यावरचा धोका टळला. लेक्झिंग्टन बुडली आणि यॉर्कटाउनने माघार घेतल्यामुळे जपानी नौकांना कॉरल समुद्रात मोकळे रान मिळाले परंतु त्यांच्या पुढच्या मोहीमा लांबणीवर पडल्या.[९८]
जपानने सुरू केलेली मोहीम अर्धवट टाकून परत फिरल्याचा हा पहिलाच प्रसंग होता. आधीच्या मोहीमांत सडकून मार खाल्लेल्या दोस्त राष्ट्रांचे मनोबल यामुळे उंचावले. पोर्ट मोरेस्बीतील तुटपुंज्या शिबंदीला जपानी आक्रमण थोपवून धरणे शक्यच नव्हते पण आक्रमण न झाल्यामुळे दोस्तांची झाकली मूठ शाबूत राहिली आणि तेथून त्यांनी पुढील हालचाली सुरू ठेवल्या. जपानप्रमाणेच दोस्तांनीही आपली बाजूच जिंकल्याचे आपल्या जनतेस सांगितले.[९९][१००]
या लढाईचा दोन्ही बाजूंच्या डावपेचांवर मोठा परिणाम झाला. जर दोस्तांना न्यू गिनीतून पळ काढावा लागला असता तर त्यानंतरच्या तेथील मोहीमा झाल्या त्याहून अधिक कठीण झाल्या असत्या.[१०१] जपानी सेनापतींना ही लढाई तात्पुरतीच हार वाटली. जपानी जनतेचा समज कायम झाला की अमेरिकेचे आरमार अगदीच कमकुवत आहे आणि जपानी आरमार कधीही त्याचा नाश करण्यास समर्थ आहे.[१०२]
यामामोतोने मिडवेच्या लढाईत शोकाकु आणि झुइकाकु वापरण्याचा बेत केला होता पण या लढाईत जायबंदी झाल्यामुळे मिडवेतील जपानी बळ कमी झाले. जपानी सैनिकांना पाठबळ देण्यासाठी वापरण्यात येणार होती ती विमानवाहू नौका, शोहो, बुडल्यामुळे तोही बेत अडचणीत आला. जपान्यांचा समज झाला होता की त्यांनी लेक्झिंग्टनबरोबरच यु.एस.एस. यॉर्कटाउन सुद्धा बुडवली होती आणि एंटरप्राइझ आणि हॉर्नेट या दोनच विवानौका अमेरिकेकडे शिल्लक होत्या. असे असले तरी नौकांवरील एकूण विमाने अधिक ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनीतील विमाने धरता त्यांची संख्या जपान्यांना उपलब्ध असलेल्या विमानांपेक्षा अधिकच होती. हकीगत म्हणजे दोन नाही तर तीन अमेरिकन विवानौका धडधाकट होत्या कारण यॉर्कटाउनने लढाईनंतर तडक पर्ल हार्बर गाठले आणि तेथील अमेरिकन तळावर २७-३०मे या चार दिवसांत तिची डागडुजी करून परत लढाईत येण्यास ती तयार होती. मिडवेच्या लढाईत यॉर्कटाउनने दोन जपानी विवानौका बुडवल्या इतकेच नव्हे तर उरलेल्या दोन विवानौकांपुढे ती ढाल म्हणून उभी राहिली.[१०३]
इकडे अमेरिकन यॉर्कटाउनची दुरुस्ती करण्यासाठी जीवतोड प्रयत्न करीत असताना जपानला मात्र झुइकाकु किंवा शोकाकुला दुरुस्त करण्याची काहीही घाई दिसत नव्हती. जहाजे दुरुस्त करणे तर दूरच, जायबंदी शोकाकुवरील विमाने आणि वैमानिकांनी इतर विवानौकांवर पाठवण्याचाही प्रयत्न जपान्यांनी केला नाही. शोकाकुचे फ्लाइट डेक उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यावरून विमाने उडणे तर शक्य नव्हतेच पण ती दुरुस्त होण्यासाठीही जपान्यांनी तीन महिने लावले. परिणामी मिडवेच्या लढाईत या नौका तसेच त्यावरील विमाने आणि वैमानिकही लढू शकले नाही.[१०४]
अनेक इतिहासकारांच्या मते यामामोतोने कॉरल समुद्रात दोस्तांशी झुंजण्यातच घोडचूक केली. जर त्याला एकाच लढाईत युद्धाचा सोक्षमोक्ष लावायचा होता तर त्याने कॉरल समुद्रात आपल्या विवानौका इरेस लावणे उचित नव्हते. कॉरल समुद्रात थोडे मोहरे लावल्यामुळे मिडवेत त्याला पूर्ण शक्तिनिशी लढता आले नाही. तसे न केले तर त्याने कॉरल समुद्रात तरी आपली सगळी शक्ती पणाला लावायला हवी होती. दोन्ही लढाया अर्धवट शक्तिनिशी लढल्यामुळे दोन्ही ठिकाणी त्याचा जय निश्चित नव्हता. इतकेच नव्हे तर मिडवेच्या लढाईचा परिणाम आता जपानी सैन्याचे कॉरल समुद्रात किती नुकसान होते त्यावर अवलंबून होते.[१०५]
कॉरल समुद्रातील लढाई संपल्यावर अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन सेनापतींना फारसा काही हर्ष झाला नाही. त्यांच्या मते ही लढाई म्हणजे ऑस्ट्रेलियावर जपानच्या आक्रमणाची नांदीच होती आणि जरी कॉरल समुद्रात जपानने पाउल मागे घेतले असले तरी ते पुन्हा नव्या जोमानिशी पोर्ट मोरेस्बी आणि नंतर ऑस्ट्रेलियावर चालून येणार होते. मे १९४२ च्या अखेरी डग्लस मॅकआर्थरने ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांशी भेट घेउन निराशाजनक अहवाल दिला. मॅकआर्थरच्या मते प्रशांत महासागरातील युद्धातील प्रत्येक लढाईत अपयश आले असून जपानी आरमाराच्या साहाय्याने जपानी सैन्य कधीही ऑस्ट्रेलियावर चालून येण्याची शक्यता कायम होती.[१०६]
मिडवेच्या लढाईत अनेक विमानवाहू नौका गमावल्याने जपानने पोर्ट मोरेस्बीवर आरमारी चढाई करण्याचा बेत अजून पुढे ढकलला आणि त्यांनी २१ जुलैला आपले सैन्य बुना आणि गोना येथे उतरवून कोकोदा मार्गाने पोर्ट मोरेस्बीकडे सरकवले. तोपर्यंत दोस्तांनी ऑस्ट्रेलियातून शिबंदी आणून बळकट केली होती. त्यामुळे जपानची खुश्की मार्गाची आगेकूच मंदावून शेवटी थांबली. सप्टेंबरमध्ये जपान्यांनी चढवलेल्या हल्ल्याला मिल्ने बेच्या लढाईत परतवून लावला आणि पोर्ट मोरेस्बीवरील संकट टळले.[१०७]
याआधी कॉरल समुद्रात आणि मिडवे येथे मिळालेल्या जोमानिशी दोस्तांनी तुलागी आणि ग्वादालकॅनाल वर लक्ष केंद्रित केले.[१०८] ऑगस्ट ७, १९४२ रोजी ११,००० अमेरिकन मरीन सैनिक तुलागीवर तर अजून ३,००० मरीन आसपासच्या बेटांवर चालून गेले.[१०९] आता तुलागीतील जपानी शिबंदी अगदीच तोकडी झालेली होती. तुलागी आणि गावुतु-तानांबोगोच्या लढाईत तेथील एकूण एक जपानी सैनिक मारला गेला. ग्वादालकॅनालवर चालून गेलेल्या सैन्याने तेथील जपान्यांनी बांधलेला होनियारा आंतरराष्ट्रीय विमानतळ काबीज केला.[११०] येथून ग्वादालकॅनाल आणि सोलोमन द्वीपांच्या लढाईला तोंड फुटले. पुढचे संपूर्ण वर्ष दोन्ही पक्ष समद्रात आणि जमिनीवर झुंजत राहिले. यात जपान्यांची परिस्थिती हळूहळू कमकुवत झाली आणि शेवटी जपानला दक्षिण प्रशांतातून पळ काढावा लागला.[१११]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.