कवी, साहित्यिक, तत्त्वज्ञ From Wikipedia, the free encyclopedia
रवींद्रनाथ टागोर (बंगाली: রবীন্দ্রনাথ ঠাকুর उच्चार: रोबीन्द्रनाथ ठाकूर) (मे ७, १८६१ - ऑगस्ट ७, १९४१), ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाजसुधारक होते.[2][3] १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य व संगीतात आमूलाग्र बदल घडून आला.
रवींद्रनाथ टागोर | |
---|---|
जन्म नाव | रवींद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर |
टोपणनाव | गुरूदेव |
जन्म |
मे ७, १८६१ कोलकाता, भारत |
मृत्यू |
७ ऑगस्ट, १९४१ (वय ८०) कोलकाता, भारत |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य, संगीत, तत्त्वज्ञान, नाटक |
भाषा | बंगाली |
साहित्य प्रकार | कविता, नाटक |
प्रसिद्ध साहित्यकृती | जन गण मन, गीतांजली |
प्रभावित | द.रा. बेंद्रे, पु.ल. देशपांडे |
वडील | देवेंद्रनाथ टागोर |
आई | सरला देवी |
पत्नी | |
पुरस्कार | साहित्यातील नोबेल पारितोषिक (१९१३)[1] |
स्वाक्षरी |
अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते, ज्याचे वर्णन "अगदी संवेदनशील, ताजे आणि सुंदर" कविता असे केले जाते. ते १९१३ मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार बनले.[4] टागोरांच्या काव्यात्मक गाण्यांकडे आध्यात्मिक आणि पारंपारिक म्हणून पाहिले गेले; तथापि, त्यांचे "सुंदर गद्य आणि जादुई कविता" बंगालबाहेर फारसे ज्ञात नाहीत.[5]
बंगाली साहित्यावर रवीन्द्रनाथांचा एवढा प्रभाव लक्षात आहे की, बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते. त्यांना कधीकधी "बंगालचा बार्ड" म्हणून संबोधले जाते.[6] तसेच ते अत्यंत प्रतिष्ठित रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य होते.
कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी वयाच्या ८व्या वर्षी पहिली कविता लिहिली.[7] वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. १८७७ पर्यंत त्यांनी त्यांच्या खऱ्या नावाने लघुकथा आणि नाटके प्रकाशित केली. एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला.[8][9]
शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते. पारंपरिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.
रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रगीतही त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन तयार झाले.[10]
कोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनाव रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथ टागोर (१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० - १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत.ε[›][11] ११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान , कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.[12][13]
१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले.[14] याच काळात त्यांनी संध्या-संगीत(१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा "भिकारिणी" व सुप्रसिद्ध कविता "निर्झरेर स्वप्नभंग" आदी रचना लिहिल्या.[15][16]
बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज येथे प्रवेश घेतला परंतु १८८० मध्ये कोणत्याही पदवीशिवाय ते बंगालला परतले. ९-नोव्हेंबर-१८८३ रोजी त्यांनी मृणालिनी-देवी(जन्मनाव भावतारिणी १८७३-१९००) यांच्याशी विवाह केला. या विवाहापासून त्यांना पाच अपत्ये (पैकी दोघांचा बालमृत्यू) झाली.[17] १८९० साली रवींद्रनाथांनी सध्याच्या बांग्लादेशातील सियाल्दा येथील टागोर घराण्याची मालमत्ता सांभाळण्यास सुरुवात केली. त्यांची पत्नी व मुले १८९८ साली येथे त्यांच्या सोबत आली. या काळात ते जमीनदार बाबू या नावाने ओळखले जात होते.[18] हा काळ रवींद्रनाथांचा "साधना काळ" म्हणून ओळखला जातो. त्यांनी नंतर गल्पगुच्छ (मराठी अर्थ: कथा-गुच्छ) नावाचा ८४ कथा असलेले तीन खंडी पुस्तक प्रकाशित केले.[15] आवेग व विरोधाभासयुक्त असे ग्रामीण बंगालचे सुरेख चित्र यात रवींद्रनाथांनी रेखाटले आहे.[15][19]
१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता . या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली.[20] रवीन्द्रनाथांच्या पत्नीचा व दोन मुलांचा मृत्यू येथेच झाला. वडिलांचे देहावसान १९-जाने-१९०५ला घडले व वारसदार म्हणून रवींद्रनाथांन नियमित मासिक उत्त्पन्न मिळू लागले. याशिवाय त्यांना त्रिपुराच्या महाराजांकडून आर्थिक साहाय्य, कौंटुबिक दागदागिने व पुरी,ओडिशा येथील बंगला विकून काही प्राप्ती झाली.[21] या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. याशिवाय कवितांचा free verse या नावाने अनुवाद करणेही सुरू होते. १४-नोव्हे.-१९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवीन्द्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवीन्द्रनाथांनीच केले होते.[22] १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने "सर" ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.
१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरूल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवीन्द्रनाथांनी पुढे "श्री-निकेतन" असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.[23] ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकाऱ्यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले.[24][25] १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केरळच्या गुरुवायुर मंदिरात दलितांना प्रवेश देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.[26]
जीवनाच्या शेवटच्या दशकात रवींद्रनाथ पूर्णपणे जनसन्मुख होते. त्यांची लोकप्रियता विशेषतः बंगालमध्ये शिखरावर होती. १५-जानेवारी-१९३४ रोजी बिहारमध्ये झालेल्या भूकंपाची, महात्मा गांधींनी "दलित अत्याचाराचा परमेश्वराने घेतला सूड" अशी संभावना केली. या वक्तव्याचा रवींद्रनाथांनी निषेध केला.[27] बंगालच्या आर्थिक व सामाजिक अवनतीबाबत व कोलकत्यातील भयावह दारिद्ऱ्यबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या दारिद्र्यावर केलेल्या मुक्तछंदातील १०० ओळींच्या कवितेचा प्रभाव सत्यजित रे यांच्या अपुर संसार ( अपूचे जग) या चित्रपटावरही पडलेला दिसतो.[28][29] पुनश्च (१९३२), शेष सप्तक (१९३५), पत्रपुत (१९३६) आदी गद्यपद्यांचा(prose-prose) समावेश असलेले स्वतःच्या लिखाणाचे १५ खंड संपादित केले. याशिवाय 'चित्रांगदा', श्यामा (१९३९), चंडालिका (१९३८) सारख्या नृत्य-नाटिकांवर विविध प्रयोग केले.[30] याशिवाय दुई बोन (दोन बहिणी) (१९३३), मलंच (१९३४), and चार अध्याय (१९३४)आदी कादंबऱ्या लिहिल्या. अखेरच्या काळात विज्ञानात रवींद्रनाथांनी विशेष रस घेतला. यातूनच त्यांच्या विश्वपरिचय या निबंधसंग्रहाची निर्मिती झाली. जीवशास्त्र, भौतिकी व खगोलशास्त्राचा त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रभाव त्यांच्या कवितेवरही जाणवतो. त्यांच्या कवितेतून झळकणारा निसर्गवाद(naturalism) हा त्यांना वैज्ञानिक नियमांप्रती त्यांना असलेला आदर अधिरेखित करतो. विज्ञानाची प्रगती त्यांनी आपल्या विविध रचनांमधून मांडली आहे जसे से (तो) (१९३७),तीन संगी (१९४०), गल्पस्वल्प (१९४१).[31]
रवींद्रनाथांच्या आयुष्यातील शेवटची चार वर्षे प्रदीर्घ व्याधी व आजारपणांनी व्यापली. १९३७ साली शुद्ध हरपून ते बराच काळ कोमात होते. पुन्हा १९४० सालचा कोमा जीवघेणा ठरला. या शेवटच्या काळात लिहिलेल्या काव्यरचना रवींद्रनाथांच्या काव्यरचनांत सर्वश्रेष्ठ मानण्यात येतात. त्यांचे मृत्युविषयक चिंतन या रचनांतून प्रकटते.[32][33] ७-ऑगस्ट-१९४१ रोजी रवींद्रनाथांचा कोलकात्याच्या त्यांच्या वडिलोपार्जित जोरशंका ठाकूर बाडी येथे मृत्यु झाला.[34]
रवींद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत.
रवींद्रनाथ अनुवादित तुकारामांचे अभंग.
कारवार येथील सृष्टिसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली [35] छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्य ही त्यांनी रचले आहे. रवींद्रनाथांचा नेता व क्रांतिकारक या रूपांत भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्तीमुळे त्यांच्यावर महाराष्टात टीका झाली होती. रवीन्द्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रविंद्रनाथ ्मूळ बंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे हे बंगाली भाषा शिकले. मराठी व कानडी भाषेत लेखन केलेले व कानडी भाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा. बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रवीद्रनाथांचा प्रभाव आहे.
गीतांजलीचे इंग्रजी भाषांतर रवींद्रनाथांनीच केले होते. याशिवाय तिचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले. मराठीतले पहिला गद्य अनुवाद हरि नारायण फडके यांनी केला होता. अमरावतीचे डॉक्टर राम म्हैसाळकर (जन्म : २९ मे, १९२९) यांनी रवींद्रनाथांच्या गीतंजलीसकट एकूण चार पुस्तकांचा ‘रवींद्र गीतांजली...’ नावाचा गद्यानुवाद केला आहे. ह्या अनुवादल मसापचे उत्कृष्ट भावानुवादाचे स.ह. मोडक पारितोषिक मिळाले होते.
याव्यतिरिक्त सौ. ज्योती कुलकर्णी यांनी ‘गीतांजली रविंद्रनाथांच्या - माझ्या मराठीत’ नावाचे पद्यमय भाषांतर केले आहे. (२००८)
संगीत,साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.
रवींद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशा बहुविध साहित्याची निर्मिती केली. यमकप्रचुरता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतर रवींद्रनाथांची लघुकथा ही प्रमुख रचना मानली जाते. रवींद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार समजले जातात. सामान्य माणसांचे जीवन हे त्यांच्या कथांचे बीज आहे.
१५-१६ व्या शतकातील वैष्णव रचनांचा रवींद्रनाथांवर प्रभाव होता. भारतीय परंपरेतील 'ऋषी' संकल्पनेचाही रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव दिसून येतो. गावोगावी गीत गात फिरणाऱ्या फकिरांसारख्या 'बाऊल' कलाकारांची ग्रामीण बंगालमध्ये परंपरा आहे. बाऊल स्वतःस कोणत्याही एका धर्माचे मानत नाहीत. त्यांच्या गीतांत हिंदू, मुस्लिम अशा दोन्ही धर्माची शिकवण दिसून येते. रवींद्रनाथांनी या परंपरेस बुद्धिजीवी वर्तुळात पूर्वी नसलेली प्रतिष्ठा दिली. त्यांच्या बाऊल परंपरेच्या अभ्यासाने त्यांच्या स्वतःच्या काव्यकृतीस नवा आयाम मिळाला.[36][37] 'मनेर मानुष' (मनातील माणूस) आणि 'जीवन देवता' ही दोन रूपके टागोरांच्या कवितेत बऱ्याचदा दिसतात.[38][39]
गीतांजलीतील (গীতাঞ্জলি) चौथ्या कवितेचे (titleः प्रार्थना) मराठी भाषांतर
|
|
|
|
|
|
|
प्रार्थना
विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर
ही माझी प्रार्थना नाही;
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये
एवढीच माझी इच्छा|
दुःखतापाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचे
तू सांत्वन करावेस अशी माझी अपेक्षा नाही.
दुःखावर जय मिळवता यावा
एवढीच माझी इच्छा|
जगात माझे नुकसान झाले
केवळ फसवणूक वाट्याला आली;
तर माझे मन खंबीर व्हावे
एवढीच माझी इच्छा|
माझे तारण तू करावेस वा मला तारावेस ही माझी प्रार्थना नाही.
तरून जाण्याचे सामर्थ्य माझ्यात असावे
एवढीच माझी इच्छा|
माझे ओझे हलके करून
तू माझे सांत्वन केले नाहीस तरी माझी तक्रार नाही
ते ओझे वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी
एवढीच माझी इच्छा|
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन
मी तुझा चेहरा ओळखावा
दुःखांच्या रात्री जेव्हा, सारे जग फसवणूक करील,
तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका मात्र निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा|
रवींद्रनाथांनी 'चतुरंग', 'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता), 'चार अध्याय', 'नौका डुबी', 'घरे बाईरे' या सारख्या ४ लघुकांदबऱ्या व ८ मोठ्या कादंबऱ्या लिहिल्या. 'चतुरंग' ही सचिश नावाच्या परस्परविरोधी संकल्पनांत अडकलेल्या पात्राची कहाणी आहे. धार्मिक गूढतेतून आयुष्याचा अर्थ शोधणाऱ्या कथानायकाचा अंती होणारा भ्रमनिरास टागोरांनी या कादंबरीतून मांडला आहे.
गोरा कांदबरीतील मुख्य पात्र पारंपरिक हिंदू सनातनी मताचे समर्थक आहे. ह्या गौरवर्णीय पात्र व इतर पात्रातील संवादातून ही कांदबरी उलगडत जाते. सनातनी गोराच्या विचारामुळे त्याचे सनातनी वडील प्रभावित होत नाहीत. धर्मांधता ही श्रद्धेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या उग्र प्रकृतीने बनते असे टागोर या कादंबरीतून सांगतात.
'शेषेर कबिता' (शेवटच्या कविता) ही कवितेने नटलेली कादंबरी. यात 'रवींद्रनाथ ठाकूर' हे स्वतःचेच नाव सांगणाऱ्या 'प्रसिद्ध कवी'वर टागोर त्रयस्थपणे टीका करतात. 'चार अध्याय' ही रवींद्रनाथांची शेवटची कांदंबरी. 'राष्ट्रभक्ती' म्हणजे काय?, राष्ट्र कसे बनते?, केवळ घोषणाबाजी, कठोर शिस्त यातून खरे स्वातंत्र्य शक्य आहे काय? अशा प्रश्नांचा धांडोळा ही कादंबरी घेते.
रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या बालपणापासूनच्या आठवणी त्यांव्या ’जीवनस्मृती’ या पुस्तकात आहेत. पुस्तकाचा मराठी अनुवाद नीलिमा भावे यांनी केला आहे.
रवींद्रनाथांनी रचलेल्या व चाल दिलेल्या जवळपास २२३० गीतांना एकत्रितपणे रवींद्रसंगीत (बंगाली :রবীন্দ্র সংগীত}} असे संबोधले जाते. गगनेर खाले रबि चन्द्र दीपक ज्बले हे रवींद्रनाथांनी रचलेले पहिले व हे नूतन देखा दिक आरो बारो हे शेवटचे गीत मानण्यात येते. भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते असलेल्या जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना मूलतः रवींद्रसंगीताचा हिस्सा आहेत. सांगीतिकदृष्ट्या अभिजात भारतीय संगीत, बंगाली लोकसंगीत व अभिजात पाश्चात्त्य संगीत ह्या रवींद्रसंगीताच्या प्रेरणा मानल्या जातात. अभिजात भारतीय संगीतातील ठुमरी शैलीचा रवींद्रसंगीतावर मुख्य प्रभाव आहे. ही गीते रवींद्रनाथांच्या स्वतःचे तत्त्वचिंतन दाखवत असली तरी त्यांवर वैष्णव व उपनिषदीय तत्त्वज्ञानाचीही झलकही दिसते. रवींद्रसंगीतातील गीते ही विविध रागांमध्ये बांधण्यात आली असून रागाचा व गीताचा भाव यात सुसंगती असते.[40] अनेक गीतांमध्ये विविध रागांना एकत्र बांधून नवसृजन केलेले दिसते. अभिजात भारतीय संगीतातून प्रेरणा घेतलेल्या रवींद्रसंगीत हे नंतर अनेक अभिजात भारतीय संगीताच्या गायकवादकांचे प्रेरणास्रोत ठरले. रवींद्रसंगीताने प्रभावित गायक-वादकात विलायत खान (सतार), अमजद अली खान (सरोद]) आदींचा समावेश आहे.
वयाच्या ६० च्या वर्षी रवींद्रनाथांनी चित्रे काढण्यास सुरुवात केली. द. फ्रान्स मधील कलाकारांच्या प्रेरणेवरून त्यांच्या चित्रांची पॅरिस मधील पहिल्या प्रदर्शनासह युरोपभर अनेक प्रदर्शने झाली.[41] आयुष्याच्या या काळात रवींद्रनाथांना रंगांधळेपणाचा त्रास सुरू झाला होता. सौन्दर्यदृष्टी व रंगछटांमध्ये रवींद्रनाथांच्या चित्रशैलीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. रवींद्रनाथांनी रचनेत वेगवेगळ्या शैलींचे अनुसरण केले. यात उत्तर आयर्लॅडमधील मलनगान कारागिरीपासून कॅनडाच्या हैदा कोरीवकाम प्रकारापर्यंतच्या चित्र व शिल्पकलेतील शैली येतात.[42] आपल्या कृतींची हस्तलिखितेही अनेकदा रवींद्रनाथांनी कलाकारीने सजवली आहेत.
वयाच्या विसाव्या रवींद्रनाथांनी 'वाल्मिकी प्रतिभा' नावाचे पहिले नृत्य-नाट्य लिहिले. यात भजनांच्या स्वरूपात असलेले पारंपरिक बंगाली कीर्तन व युरोपीय गीत-शैलींचा संमिश्र वापर केला आहे. ऐहिक सुखोपभोगांपासून पारमार्थिकाकडे हा विषय डाकघर नावाच्या नाटकात रवींद्रनाथांनी हाताळला आहे. 'अभिनयापेक्षा भावनांवर भर' असे रवींद्रनाथ स्वतःच्या नाटकांचे वर्णन करतात. 'चंडालिका', 'विसर्जन', चित्रांगदा', 'राजा', 'मायार खेला' ही रवींद्रनाथांची इतर नाटके. नाटकांसोबत टागोरांच्या 'नृत्य-नाटिका' विशेष प्रसिद्ध आहेत. मणिपुरी शैलीच्या अभिजात नृत्य शैलींचा टागोरांनी वापर केला आहे.
'गल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पना व बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. 'काबुलीवाला' या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशी असलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.
इस्रायलमधील सार पब्लिशिंग हाऊस या प्रकाशनसंस्थेने रविंद्रनाथांच्या कथांचा हिब्रू भाषेतील अनुवाद 'एप' या नावाने इ.स. २००६ साली प्रकाशित केलेला आहे.
चरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालीन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही 'सामाजिक अनारोग्य' त्यांना मोठा शत्रू वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणाऱ्या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारीरिक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्च पदवी परत केली. टागोरांनी रचलेली 'एकला चलो रे' व 'चित्त जेथा भयशून्य' ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणा गीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वाद मिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
रवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकूर बाडी गावी रवींद्रनाथांच्या पुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो.[43][44] रवींद्रनाथांमुळे प्रभावित व्यक्तींत अमर्त्य सेन, ॲंन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी, पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.
गोरा (१९१०)
घरे बाईरे (१९१६)
चतुरंग (१९१६)
चार अध्याय (१९३४)
चोखेर बाली (१९०२)
गोरा (१९१०)
जोगाजोग (१९३०)
मुक्तधारा (१९१६)
राज ऋषि (१९१६)
राजा आर रानी (१९१६)
शेषेर कबिता (१९२९)
काबुलीवाला
दृष्टिदान
क्षुधित पाषाण
चंडालिका (१९३८)
चित्रांगदा (१९३६)
मालिनी (१८९५)
श्यामा (१९३८)
बिसर्जना (१८९०)
बैकुण्ठेर खाता (१८९७)
राजा ओ रानी (१८८९)
गीतांजली (१९१०)
जन्मदिने (१९४१)
नैबेद्य (१९०१)
पत्रपूत (१९३६)
पूरबी (१९२५)
पुनश्च (१९३२)
शेष सप्तक (१९३५)
श्यामली (१९३६)
सोनार तारी (१८९३)
रवींद्रनाथांच्या अनेक कादंबऱ्या आणि लघुकथांवर बंगाली आणि हिंदी चित्रपट निघाले आहेत. उदा० परिणीता, काबुलीवाला वगैरे वगैर.
आमी चिनी चिनी गो तोमारे ओ गो बिदेशिनी | Archived 2014-07-23 at the Wayback Machine.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.