Remove ads
मराठी लेखक ,स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक From Wikipedia, the free encyclopedia
साने गुरुजी: (जन्म : २४ डिसेंबर १८९९; - ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
पांडुरंग सदाशिव साने | |
---|---|
जन्म नाव | पांडुरंग |
जन्म |
२४ डिसेंबर १८९९ पालगड, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | ११ जून, १९५० (वय ५०) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.[१]
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला.
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी 'मैला वाहणे' व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली.
साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली.
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. त्यातील ही एक कविता:
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो||ध्रु||
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला.सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हणले गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित गीता प्रवचने सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या 'कुरल' नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे 'दुःखी' या नावाने मराठीत अनुवादन केले. डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत 'मानवजातीचा इतिहास' असे भाषांतर केले. 'करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे 'मोरी गाय' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर 'मोलकरीण' नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला. गुरुजींनी लिहिलेली 'खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे' ही कविता :-
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांनाना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, दादा गुजर, ना.ग. गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, रा.ग. जाधव,राजा मंगळवेढेकर, वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्व
स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजातून विषमता दूर करण्याच्या शक्यतांबद्दल साने यांचा अधिकाधिक भ्रमनिरास झाला. शिवाय महात्मा गांधींच्या हत्येचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाला. या शोकांतिकेवर त्याची प्रतिक्रिया होती 21 दिवस उपोषण करणे.[8] देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक कारणांमुळे साने गुरुजी खूप अस्वस्थ होते. त्यांनी 11 जून 1950 रोजी झोपेच्या गोळ्यांचे अतिसेवन करून आत्महत्या केली.
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही येथील वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती[ संदर्भ हवा ]. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीकच्या वडघर मुद्रे या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमिटरीज (सामुदायिक शयनगृहे) आणि कॅम्पिंग ग्राउंड्ज बांधण्यात आली होती. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमिटरींची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, वर्षारंग, प्रेरणा प्रबोधन शिबिर मालिका, मित्रमेळावा, अभिव्यक्ती शिबिर, राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरे, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
या संस्थेने (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम हाती घेतले होते. या दुसऱ्या टप्प्यात 'साने गुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली होती.. साने गुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. साने गुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे साने गुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद कॉंप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे. साने गुरुजींचे आंतरभारतीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ही संस्था झटत आहे.
पुण्यातही दांडेकर पुलाजवळ दत्तवाडीत साने गुरुजींचे स्मारक आहे. हे पुण्यातील उत्कृष्ट सभागृहांपैकी एक आहे. प्रायोगिक रंगभूमीच्या विविध विषयांवरील नाटकांच्या सादरीकरणासाठी या स्मारकाजवळ बॅ.नाथ पै रंगमंच या छोट्या नाट्यगृहाची उभारणी करण्यात आली.
साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णैजवळच्या आपल्या मूळ गावी-पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात.
साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले. त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे.
२०१२ सालचे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन माणगावला याच संस्थेत झाले. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले[२]. कादंबऱ्या, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांची एकूण ७३ पुस्तके वरदा प्रकाशनाने ३६ खंडांत पुनःप्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम या गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रितीने वर्णन केले आहेत. कुमारांच्यासाठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली, प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले, माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली. त्यांची ’श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने गाजली.
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.