भगवान शंकर यांच्या पूजनाचा आणि व्रताचा विशेष दिवस From Wikipedia, the free encyclopedia
महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे, जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान शिवाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. [1]हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो. [1] [2]हा सण शिव आणि पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो, [3] आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतो. [4] [5]
हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये "अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे" स्मरण आहे. या दिवशी शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना, उपवास, नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो. [2] भाविक रात्रभर जागरण करतात. ते एखाद्या शिवमंदिराला भेट देतात किंवा ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जातात. या सणाची उत्पत्ती ५ व्या शतकात झाली असे मानले जाते. [2]
काश्मीर शैव धर्मात, काश्मीर प्रदेशातील शिवभक्तांद्वारे या सणाला हर-रात्री किंवा हेरथ किंवा हेरथ म्हणतात. [6] [7]
संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे.[8] या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.[9]
महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात.[13]. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.[14] शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.[15]
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात.[16] प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात.[17]
शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतीही प्रचलित आहे. याला थंडाई असे म्हणले जाते.[18]
महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री दुकानांमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. बेलाची पाने, पांढरी फुले, हार यांचीही विक्री या दिवशी केला जाते.[19]
दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतले जाते.[20] शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.[13]
काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात. विशेष यात्रेचे आयोजन केले जाते.[21] पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.[22]
आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला भाविक दर्शनासाठी भेट देतात. यात्रेचे आयोजन करण्यात येते.[23]
ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात.[24]
उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात.[25] मध्य हिमालयात या दिवशी यात्रा भरते.[26]
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात.[27][28]
२०२४ साली रीवा येथून अयोध्या येथे महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने एक भव्य नगारा पाठविण्याचे नियोजन केले गेले आहे. उत्सवकाळात अशा प्रकारच्या विशेष उपक्रमांचे आयोजन हे महाशिवरात्र यात्रेचे वैशिष्ट्य मानले जाते.[29]
[31] -सांगली जिल्ह्यातील करगणी येथे लखमेश्र्वर उर्फ श्रीराम देवस्थान हे प्राचीन मंदिर आहे. करगणी येथे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.