मराठी भाषेच्या लिखाणात एकवाक्यता येण्यासाठी असलेले नियम From Wikipedia, the free encyclopedia
मराठी भाषकांचे राज्य म्हणून सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ वर्षी मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी महामंडळाकडून दूर करण्यात आल्या. अ. भा. मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमांना महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत ते पाळण्याचे ठरविले.
हे अठरा नियम पुढीलप्रमाणे आहेत -
तत्सम(मुळात संस्कृत असलेल्या) शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे.
पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत.
अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते.
काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये.
य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा.
नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
अनुस्वार वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी - व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे - अनुस्वार देऊ नयेत.
मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत.
व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.
सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त असेल (म्हणजेच मुळात संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर दीर्घान्तच लिहावे.
साधित शब्दांनाही हाच नियम लावावा.
विद्यार्थिमंडळ , गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.
मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा.
मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.
तत्सम(मुळात संस्कृत असलेल्या) अ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.
मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यत: ऱ्हस्व लिहावेत.
परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व, किंवा दीर्घ लिहावेत.
उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा.
अपवाद-दीर्घोपान्त्य तत्सम शब्द.
मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते.
शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई' च्या जागी 'य' आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात.
पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो.('श्या' होत नाही)
पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'जा' असल्यास उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही.)
तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प' चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते.
मधल्या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते.
ऊ-कारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.
धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात
पूर हा ग्रामवाचक कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा.
उदाहरणार्थ : दुडुदुडु, रुणुझुणु, लुटुलुटु.
एकारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे. ए-कारान्त करू नये.
लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते. त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ : 'असं केलं, मी म्हटलं, त्यांनी सांगितलं' अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले; मी म्हटले; त्यांनी सांगितले
केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णूशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मूळ लेखनानुसार छापावेत. त्यानंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन 'अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे.
रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.