Remove ads

वस्तुतः, आधी भाषा व मग कोश ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. भाषेत वापरले जाणारे शब्दच कोशात दाखल होतात. तथापि, पारतंत्र्यामुळे भारतासारख्या काही देशांवर परभाषा लादली गेली. व मध्यंतरीच्या काळात देशी भाषा ज्ञानभाषा म्हणून विकसित होण्याची प्रक्रिया थंडावली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी हीच आपली आधुनिक जगातील ज्ञानभाषा झाली असल्याने आपणास आता भाषांतर–प्रक्रियेचा अवलंब करावा लागत आहे. ग्रामीण भागातील जनतेला ज्ञानाविज्ञानाची ओळख करून देण्यासाठी आपल्याला प्रादेशिक भाषांमधून ग्रंथनिर्मिती करावी लागणार आहे व त्यासाठी नवी शास्त्रीय परिभाषा घडवणे गरजेचे आहे. म्हणून या बाबतीत आधी परिभाषा कोश व मग देशी भाषेतील ग्रंथलेखन ही कृत्रिम प्रक्रिया अवलंबावी लागत आहे.

[१]

परिभाषा म्हणजे काय हे समजून घेणे गरजेचे आहे. परिभाषा म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये वापरावयाची भाषा. ही भाषा सामान्यत: व्यवहार भाषेपेक्षा वेगळी असते. परिभाषेमध्ये अर्थातील नेमकेपणा अपेक्षित असतो. हा नेमकेपणा ज्या शब्दांनी साधला जातो त्या शब्दांना ‘पारिभाषिक संज्ञा’ म्हणतात. विज्ञानात अशा शब्दांची ते वापरण्यापूर्वी व्याख्या दिलेली असते. त्यामुळे पारिभाषिक संज्ञेला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो.

परिभाषा निर्मितीच्या कामात निव्वळ विषयाचे ज्ञान असून चालत नाही. दर या ज्ञानाच्या जोडीला भाषिक समस्यांकडे पाहण्याची वैज्ञानिक दृष्टी आवश्यक असते व म्हणून व्याकरणशुद्ध परिभाषा घडविण्यासाठी एका भाषा संस्कृत तज्ञांची देखील या उपसमितीवर नेमणूक करण्यात येते. ज्याप्रमाणे आंधळ्यांच्या पाठीवर लंगडा बसला की लंगडा वाट दाखवितो व आंधळा त्याला पाठुंगळीस घेऊन वाटचाल करतो त्याप्रमाणे विषयतज्ज्ञभाषातज्ज्ञ हे दोघे एकमेकांच्या सहकार्याने परिभाषा निर्मितीचे काम करतात.

व्यवहारात संवाद साधताना आपण फारसे काटेकोर शब्द वापरत नाही. कधी-कधी एकाच शब्दाचे दोन-तीन अर्थ होऊ शकतात. अनेकार्थी असणे हा पारिभाषिक शब्दांमध्ये दोष असतो. पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे. तसेच पारिभाषिक शब्दांमध्ये स्पष्टार्थता हा गुण हवा. त्यात एकरूपता हवी. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत, म्हणजेच अशा शब्दांच्या निर्मितीमध्ये कमीत कमी अक्षरांचा वापर असावा. (उदा० crystallisation ‘स्फटिकीकरण’ ऐवजी ‘स्फटन’, magnetization ‘चुंबकीकरण’ ऐवजी ‘चुंबकन’ polarization ‘ध्रुवीकरण’ ऐवजी ‘ध्रुवण’) असे काही निकष व भाषा सल्लागार मंडळाने तयार केलेली निदेशक तत्त्वे यांच्या साहाय्याने व्हावे.

पारिभाषिक संज्ञामध्ये catalyst, enzyme, valency, nucleus, parabola ह्यांसारखे शुद्ध पारिभाषिक शब्द affinity, critical, function, set, neighbourhood ह्यांसारखे अर्धपारिभाषिक शब्द आणि या शब्दांचा परिभाषेत वापर होत असताना प्रयुक्त होणारे form, glass, map, machine, transfer ह्यांसारखे सामान्य शब्दसुद्धा अंतर्भूत होतात.

प्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्नपूर्वक करावे.परिभाषा निश्चित करताना कधी-कधी दुसऱ्या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. उदा० लिटर, मीटर, केबल, प्रोटॉन, न्यूट्रॉन इ० कधी दुसऱ्या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना मराठीची प्रत्यय प्रक्रिया लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इ० आंतरराष्टीय स्वरूपाच्या सर्व संज्ञा, मूलद्रव्ये, संयुगे वगैरेंची नावे त्यांच्या इंग्रजी स्वरूपातच जशीच्या तशी लिप्यंतरित केली जातात.

अशा रितीने सर्व तज्ज्ञांच्या सहमतीने तयार झालेले हे पारिभाषिक शब्द बोजड आहेत, कृत्रिम आहेत, सामान्यांना समजत नाहीत अशी या कोशांवर टीका होते. तथापि, मराठी परिभाषा तयार करताना सर्व भाषांची जननी असणाऱ्या संस्कृतची मदत घेणे अपरिहार्य ठरते. संस्कृतोद्भव शब्दांच्या व प्राकृत मराठी व्याकरणाच्या साहाय्याने परिभाषा निश्चित करावी लागते. म्हणून ती क्लिष्ट व दुर्बोध होत नाही. मराठी परिभाषेवर होणारा संस्कृतप्रचुर, क्लिष्ट व बोजडतेचा आरोप तितकासा खरा नाही. बहुदा नवीन प्रतिशब्द प्रथम अपरिचित वाटल्याने अपरिचयात्‌ अवज्ञा होते.

इंग्रजीमध्ये देखील ग्रीक-लॅटिन भाषेतून अनेक शब्द आले आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे haematology. Hem ह्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ रक्त यावरून हा शब्द तयार झाला आहे. इंग्रजीमध्ये blood science असे कोणी म्हणत नाही. Haemवरून haematoma, haematoxylin, haematuria, haemocytoblast असे अनेक शब्द तयार झाले आहेत. मराठी परिभाषा कोशांमधील अभियंता, अभियांत्रिकी ह्यांसारखे कित्येक शब्द आता लोकव्यवहारात आत्मसात झाले आहेत, रूढ झाले आहेत. नव्याने निर्माण केलेली परिभाषा लेखनात वारंवार वापरल्याने कालांतराने विकसित होते, रूढ होते. कायद्याची भाषा, शासन-व्यवहाची भाषा, विज्ञान व तंत्रज्ञानाची भाषा म्हणून मराठी समृद्ध करायची असेल तर विशिष्ट परिभाषा स्वीकारायलाच हवी . शास्त्रीय परिभाषा ही सतत विकसित व्हायला हवी . नवीन निर्मिती जुन्यापेक्षा सरस असणे हे भाषेच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.

Remove ads

येथे आपली मते नोंदवा

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads