Remove ads
मराठी लिहिण्यासाठी वापरली जाणारी एक ऐतिहासिक लिपी From Wikipedia, the free encyclopedia
मोडी लिपी ही मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे, जी महाराष्ट्र राज्यात बोलली जाणारी प्राथमिक भाषा आहे. त्याच्या उत्पत्तीसंदर्भात अनेक सिद्धांत आहेत.
२१व्या शतकातील मराठी लोकांचे असे विचार व मत आले आहे की जर मराठी भाषेची मूळ असलेली मोडी लिपी पुन्हा वापरात आणली गेली तर मराठी भाषेचा प्रभाव वाढेल. पण या विषयावर आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने कोणतेही पाऊले उचलले नाही. भविष्यकाळात या विषयावर ठोस पाऊले उचलले जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बाळबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली.
मोडी लिपी हात न उचलता लिहिली जाते, त्यामुळे वेगाने लिहिणे सोपे जाते. मोडीत अनेक शब्दांची लघुरुपे वापरून कमीतकमी ओळीत सारांश लिहिला जातो. मोडीतली अक्षरांची वळणे गोलाकार असतात, त्यांमध्ये देवनागरीच्या विपरीत, काना खालून वर जातो. यामुळे पुढचे अक्षर चटकन लिहिता येते. तसेच प्रत्येक अक्षराची सुरुवात आणि शेवट डोक्यावरच्या रेषेवर होते. मोडी लिपीत चिटणीसी, महादजीपंती, बिवलकरी, रानडी अशी वळणे प्रसिद्ध आहेत. पुढे घोसदार वळण येऊन त्याचा भारतातल्या इतर भागातही प्रसार झाला असे मानले जाते. असंख्य मराठी ऐतिहासिक कागदपत्रे मोडी लिपीत असून इतिहास संशोधनाकरिता मोडी जाणकारांची कमतरता भासते.
मोडी लिपीच्या उगमाबद्दल अनेक मते व मतभेद आहेत. इतिहासाचार्य वि.का.राजवाडे व डॉ.भांडारकरांच्या मते हेमाडपंताने ही लिपी श्रीलंकेतून आणली, परंतु चांदोरकरांच्या मते मोडी लिपी अशोककालातील मौर्यी (ब्राह्मी) चाच एक प्रगत प्रकार आहे. वाकणकर आणि वालावलकरांच्या मते मोडी लिपी ही ब्राह्मी लिपीचाच एक प्रकार असून हात न उचलता लिहिण्याच्या तिच्या वैशिष्ट्यामुळे इतर लिपींपेक्षा वेगळी झाली आहे. मोडी लिपी श्रीलंकेतून आणली गेली असावी अथवा मौर्यी लिपीवरून विकसित झाली असावी हे म्हणणे वाकणकर आणि वालावलकर यांना मान्य नाही. [पहा: Typography Of Devanagari, १९६१, मुद्रकः महाराष्ट्र सरकार.]
मोडी लिपी महाराष्ट्रात कमीत कमी ९०० वर्षे वापरात आहे. सर्वांत जुना उपलब्ध मोडी लेख इ.स. ११८९ मधील आहे. ते पत्र पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या संग्रहात आहे. मोडी लिपी अल्पप्रमाणात का होईना, १९५० पर्यंत लिखाणात प्रचलित होती. शेवटच्या २-३ शतकात मोडी लिपीत अनेक फेरबदल झालेले आहेत. साधारण इ.स. १७०० च्या सुमारास चिटणिसी आणि वळणे ही पूर्णपणे प्रगत झाली व यानंतर त्यात फारसे बदल दिसून येत नाहीत. ऐतिहासिक कागदपत्रांतील मोडी लिपी क्लिष्ट आणि वाचण्यास कठीण असते.
मोडी लिपी पेशवाईकाळात अत्यंत उत्कर्षावस्थेत होती असे मानले जाते. पेशवे यांच्या दप्तरातील कागदपत्रे, दस्तऐवज पाहिले असता त्या उत्कर्षाची कल्पना येते. सुबक अक्षर, दोन ओळीतील समान अंतर, काटेकोर शुद्धलेखन हे या लेखनाचे वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांचा काळ ते उत्तर पेशवाई ह्या काळांतील मोडीवाचनातून मराठी भाषेतील स्थित्यंतरे लक्षात येतात व मराठी भाषेचा प्रवास अभ्यासता येतो.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या मताप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहिली जाण्याच्या काळात मोडी संकल्पना महाराष्ट्रात येत होती. याच काळात पहिले मुस्लिम आक्रमण भारतात होत होते. लिखाणाकरिता कागदाचा वापर हा मुस्लिमांनी भारतात सुरू केला असावा कारण कागज हा फ़ार्सी शब्द असून कागज या अर्थाचा संस्कृत शब्द अस्तित्वात नाही. इतिहासाचार्य राजवाडे ज्ञानेश्वरीतील खाली नमूद केलेल्या ओव्यांचा आधार देतात. देवनागरी अक्षरे आडव्या, उभ्या आणि टोकदार रेषांचा अवलंब करते त्यामुळे लिखाणाच्या हस्तलिखित प्रति बनवताना वेग कमी होतो. तर शिकस्त प्रमाणे गोलाकार व एकमेकांना जोडली जाणारी वळणे वापरून वापरली जाणारी मोडी हस्तलिखिताचा वेळ वाचवत होती. विराम चिन्हांचा वापर इंग्रजी भाषाशी ओळख झाल्यानंतरच भारतीय लिपींत सुरू झाला.
मराठी लेखनाबद्दल ज्ञानेश्वरांनी खालील ओळीत उल्लेख केला आहे.
१] हे बहु असो पंडीतु , धरुणु बालकाचा हातु,
वोळी लेहे वेगवंतु, आपणाची॥(ज्ञानेश्वरी अध्याय १३,ओवी क्र.३०७)
२] सुखाची लिपी पुसिली॥ (ज्ञानेश्वरी अध्याय ३,ओवी क्र.३४६)
३] दोषांचीं लिहिलीं फाडीं॥(ज्ञानेश्वरी अध्याय ४,ओवी क्र.५२)
४] आखरे पुसलियाना पुसे, अर्थ जैसा॥(ज्ञानेश्वरी अध्याय ८,ओवी क्र.१७४)
मोडी लिपीचे चार कालखंडांत वर्गीकरण केले गेले आहे - यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आंग्लकालीन. यादवकालीन मोडी लिपी लिखाणात अक्षरे एकमेकांच्या अगदीच जवळ आणि उभी काढली गेली. तीच, शिवकालीन शैलीय किंचित उजवीकडे झुकलेली दिसतात. मोडी लिपीला तिरकस वळण, अधिक वर्तुळाकार आणि सुटसुटीत अक्षरे लिहिण्याचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणीस बाळाजी आवजी यांनी सुरू केला. तोपर्यंत मोडी लिपी ही टाकाने लिहिली जात असे. असाच प्रयत्न पुढे चालू ठेवून पेशवेकालीन शैलीत मोडी अगदीच रेखीव, गोलाकार, तिरकस आणि सुटसुटीत लिहिली जाऊ लागली. पेशवेकाळातील लिखाण बोरूने होत असे. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज राजवटीत फाऊंटन पेनचा वापर सुरू झाला. बोरूने जी प्रत्येक अक्षराला जाडी-रुंदी आणि टोक येत असे ते या फाऊंटन पेनच्या वापरात शक्य नसल्याने मोडी लिपी अगदीच गुंतागुंतीची आणि किचकट दिसू लागली. फाऊंटन पेनचा एकच फायदा होता तो म्हणजे त्यात शाई बराच वेळ टिकून राही. म्हणून सध्याचे मोडी लेखक फाऊंटन पेनच्या कॅलिग्राफीच्या निब्सचा वापर करतात आणि लिखाणात काही प्रमाणात पेशवेकालीन मोडी लिपीचे सौंदर्य आणण्याचा प्रयत्न करतात.
अलीकडे, कर्नाटकात ९व्या शतकातील काही आढलेले शिलालेख हे मोडी लिपीत असून त्यांत असलेली लिपी, ही मोडी लिपी शिकस्तामधून निर्माण झाली या मताचे खंडण करतात. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. यावरून स्पष्ट होते की मोडी लिपीची संकल्पना ही शिकस्तामधून आली नव्हती. कारण, महादेवराव, रामदेवराव किंवा हरपालदेवराव यादवांच्या कारकिर्दीत मराठी लोकांचा श्रीलंकेशी संपर्क आला नव्हता. मात्र मोडी लिपीचे नागरी, गुर्जरी(म्हणजे महाजनी) आणि बंगाली लिप्यांशी साधर्म्य आहे.
चिटणीसी, महादजीपंती, रानडी.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.