राणी लक्ष्मीबाई
१८५७ च्या स्वातंत्र्य उठावातील वीरांगना, झाशीची राणी From Wikipedia, the free encyclopedia
विरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, ज्यांना झांशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, (नोव्हेंबर १९, १८३५ - जून १७, १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झांशी राज्याच्या राणी होत्या. इ.स. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढणाऱ्या त्या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्यामुळे आणि नेतृत्वामुळे त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून भारतीय जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.[१][२]
![]() | या लेखाला मुखपृष्ठ सदर लेख होण्यासाठी मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन येथे त्याला नोंदवण्यात आले आहे. मुखपृष्ठावरील सदर लेख हे विकिपीडियावरील सर्वोत्कृष्ट लेख असतात व त्यांच्यातील परिपूर्णता विकीपीडियावरील इतर सदस्यांकडून तपासली जाते व मगच ते विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर झळकतात. आपणही या लेखासंबंधी प्रतिक्रिया देऊ व सुधारणा सुचवू शकता. कृपया या लेखावर येथे प्रतिक्रिया द्या. |
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
स्वातंत्र्यलक्ष्मी बुंदेलखंड सम्राज्ञी अखंड सौभाग्यवती श्रीमंत राजमाता झांशी विरांगना श्री महाराज्ञी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर | |
---|---|
![]() मर्दानी झांशीची राणी विरांगणा लक्ष्मीबाई | |
टोपणनाव: | मनिकर्णिका, मनू, बाईसाहेब, छबिली |
जन्म: | नोव्हेंबर १९, १८३५ काशी, भारत |
मृत्यू: | १७ जून, १८५८ (वय २२) ग्वालियर, मध्य प्रदेश, भारत |
चळवळ: | १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध |
प्रमुख स्मारके: | ग्वाल्हेर |
धर्म: | हिंदू |
वडील: | मोरोपंत तांबे |
आई: | भागिरथीबाई तांबे |
पती: | श्रीमंत गंगाधरराव नेवाळकर |
अपत्ये: | दामोदरराव नेवाळकर (दत्तक पुत्र) उर्फ आनंदराव नेवाळकर |
बिरुदावली
१० जून १८५७ रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांशीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नऊवारी साडी, खांद्यावर शेला, किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगरखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची.
झांशी राजदरबार बिरुदावली (इ.स. १८५७-५८):
- सावधान
- तांबे वीरकन्या
- नेवाळकर राजलक्ष्मी
- बुंदेलखंड धराधरीश्वरी
- राजराजेश्वरी
- सिंहासनाधीश्वरी
- अखंड लक्ष्मी अलंकृत
- न्यायालंकारमंडित
- शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
- राजनितीधुरंधर
- झांशी की महारानी
- अखंड सौभाग्यवती
- वज्रचुडेमंडित
- श्रीमंत राजमाता
- विरांगणा
- श्री रानी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर जू देवी
की जय हो! जय हो!
बालपण
महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. साताऱ्याच्या धावडशी येथील ब्रह्मेंद्र स्वामींनी तांबे कुटुंबाला सेवेत रुजू करून घेतले होते. नंतर काही कुटुंबे दक्षिणेकडे गेली आणि कोट, कोलधे, खेडकुळी या भागात राहिली. तर काही पुणे, काशी, बिठूर आणि झांशी येथे वास्तव्यास राहिले. आज त्यांचे काही वंशज नागपूर आणि साताऱ्यात आहेत.[३][४]
राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागिरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे १९ नोव्हेंबर १८३५ रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट (रत्नागिरी) येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इ.स. १८१८ नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंशपरंपरागत ताब्यात घेऊन "महाराजा" ही पदवी धारण केली.[३][४]
कार्य
राणी लक्ष्मीबाई धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांना अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत होते आणि त्या घोडेस्वारीतही निपुण होत्या. युद्धशास्त्रातही त्यांनी प्रावीण्य मिळविले होते. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा प्रकार शोधून काढला होता. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या.[५][६][४]
१९ मे १८४२ रोजी त्यांचा विवाह झांशी संस्थानाचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र, दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते, त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.[७][६]
महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो तीन महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. २१ नोव्हेंबर १८५३ रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले.[८][६]
झांशी संस्थान खालसा
ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झांशी संस्थान खालसा करणार नाही, असे राणी लक्ष्मीबाईंना झांशी आणि ब्रिटिशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे वाटत होते. त्यासाठी त्या स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय आणि बेकायदेशीरपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी लिहिले, "झांशी संस्थान खालसा केले, तर संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी, हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल विश्वास वाटेल का?" अशा प्रकारे त्यांनी कंपनीला आव्हान दिले.[९]
मात्र, हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार, १३ मार्च १८५४ रोजी झांशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्या वेळी स्वाभिमानी राणीने "मी माझी झांशी देणार नाही" असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.[१०]
झांशी खालसा झाल्यावर राणी लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहावे लागले. पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत त्यांना काही काळ शांत बसावे लागले.[११][१२]

नारी सेना: दुर्गा दल
इ.स. १८५३ मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली. या सेनेचे नाव "दुर्गा दल" असे होते. इ.स. १८५७-५८ च्या स्वातंत्र्ययुद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्त्वाची भूमिका बजावली.[१३]
नारी सेनेचे मुख्य सेनानी:
- राणी लक्ष्मीबाई - मुख्य अध्यक्ष
- झलकारीबाई कोळी - महिला सरसेनापती
- जुही देवी - महिला तोफ संचालक
- मोतीबाई - महिला तोफ संचालक व गुप्तचर
- काशीबाई कुनबी - महिला तोफ संचालक व तलवारबाज
- मुंदरबाई खातून सुल्तान - महिला तोफ संचालक, अश्वरोही, तलवारबाज आणि धनुष्यबाण वीर
- सुंदरबाई (सुंदर) - महिला तोफ संचालक व तलवारबाज
- मानवतीबाई हैहयवंशी - महिला सैनिक
- मालतीबाई लोधी - महिला सैनिक
- ललिताबाई बक्षी - महिला सैनिक
इ.स. १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध आणि हुतात्मा
इ.स. १८५७ चा उठाव संपूर्ण हिंदुस्थानात पसरला होता. त्याचप्रमाणे, ५ जून १८५७ रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे २२ जुलै १८५७ रोजी ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्त्वाची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा, मुन्सफ भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकुरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले.[१४][१५][१६]
परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करताना राणींनी प्रजेचा स्वाभिमान आणि निष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू आणि दयाळू असणाऱ्या राणीने थंडीत कुडकुडणाऱ्या हजार-दीड हजार गरिबांना आणि साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. त्यांनी गोवधबंदी लागू केली आणि किल्ल्यावर रंगपंचमीसारखे सण साजरे करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले. झांशीत मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले, जसे की रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इत्यादी. स्वतःही नाटकांचा आनंद घेत त्यांनी एक स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध राज्य घडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे राणी आणि प्रजेमधील नाते दृढ झाले.[१४]
दरम्यान, २१ मार्च १८५८ रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निःशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे ‘भारतात परकीय शासन नको’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याच वेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली.[१७][१८]
उत्तम सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानीशंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. "गौसखान" याने तर तोफेमधून असा मारा केला की, दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या नवव्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने-आण करण्याचे काम केले.[१८]
शेवटी, झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे, ती विहीर आणि दारुगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. ३१ मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.[१९][२०]
राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, "रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन." राणीचे डावे-उजवे हात असणारे "खुदाबक्ष आणि गौसखान" इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले, तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की, समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही, एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत ११ दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, "राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती."[२१][२२]
झांशीतील पराभवानंतर ३ एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन, दामोदररावाला पाठीशी बांधून, किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह ३०-३१ मे १८५८ रोजी ग्वाल्हेरला पोहोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. १६ जून १८५८ रोजी ग्वाल्हेरजवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. १७ जून १८५८ रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.[२३][२४]
वारसा
राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याने आणि नेतृत्वाने भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली. त्यांच्या नावाने अनेक स्मारके, शाळा, आणि रस्ते नावे ठेवण्यात आली आहेत. १९४३ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये स्थापन केलेल्या "रानी ऑफ झांशी रेजिमेंट" या आझाद हिंद फौजेच्या महिला सैन्यदलाला त्यांचे नाव देण्यात आले.[२५] राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर अनेक कविता, गाणी आणि साहित्य रचले गेले, ज्यामध्ये सुभद्रा कुमारी चौहान यांची "खूब लडी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी" ही कविता विशेष प्रसिद्ध आहे.[२६]
संदर्भ
हे सुद्धा पहा
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.