From Wikipedia, the free encyclopedia
होमिओपॅथी ही एक ॲलोपॅथीला पर्यायी असणारी औषधोपचार पद्धती आहे असा समज असून, तिची सुरुवात, १७९० साली डॉ. सामुएल हानेमान ह्या जर्मन वैद्याने केली. "समानाला समान बरे करते" (लॅटिन: Similia Similibus Curenture), या मूलभूत तत्त्वावर होमिओपॅथी आधारलेली आहे. म्हणजे लोखंडाने लोखंड कापावे, काट्याने काटा काढावा किंवा विषाने विष उतरवावे हे ते तत्त्व आहे. त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला समचिकित्सा असेही म्हंटले जाते. समचिकित्सेच्या नियमानुसार, निरोगी माणसाने एखाद्या रासायनिक किंवा जैविक पदार्थाचे सेवन केल्यामुळे त्याच्या शरीरात विशिष्ट आजाराची लक्षणे उद्भवत असतील, तर होमिओपॅथीनुसार त्या आजारावर (किंवा तत्सम लक्षणे असलेल्या आजारावर) औषध म्हणून तोच पदार्थ सूक्ष्म प्रमाणात दिला जातो.
या लेखात सत्यापनासाठी अतिरिक्त संदर्भ किंवा स्त्रोतांची आवश्यकता आहे. कृपया विश्वसनीय संदर्भ जोडून हा लेख सुधारण्यात मदत करा. स्रोतहीन सामग्रीला आव्हान दिले जाऊ शकते आणि काढले सुद्धा जाऊ शकते. |
होमिओपॅथी या शब्दाची फोड पुढील प्रमाणे होते. होमिओस म्हणजे सारखे आणि पॅथॉस म्हणजे रोग अथवा रोगलक्षणे. जे रोग अन्य औषधोपचारपद्धतीला दाद देत नाहीत ते रोग बरे करण्याचा दावा होमिओपॅथीमध्ये केला जातो. उदा० संधिवात, सांधेदुखी, मधुमेह इत्यादी.
होमिओपॅथीमध्ये सर्व आजारांसाठी वापरले जाणारे समचिकित्सेचे तत्त्व आधुनिक विज्ञानाच्या कोणत्याही कसोटीवर उतरू शकलेले नाही आणि आधुनिक भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या आणि जीवशास्त्राच्या मान्यताप्राप्त तत्त्वांशी हे तत्त्व सुसंगत नाही. समचिकित्सा तत्त्वावर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये (ॲलोपथीमध्ये) काही रोगप्रतिबंधक लसी तसेच प्रतिजैवके तयार केली जातात, परंतु ती नेहमीच लागू पडतात असे नाही. (उदा. एड्सचे विषाणू वापरून एड्सची रोगप्रतिबंधक लस तयार करता येत नाही.) आणि रोगप्रतिबंधक लसी अनेक वैज्ञानिक चाचण्या वापरून तपासल्या जातात. होमिओपॅथीमध्ये तसे होत नाही, त्यामुळे होमिओपॅथी हे एक छद्म विज्ञान मानले जाते आणि होमिओपॅथी औषधोपचारामुळे रोग्यावर दिसणारे परिणाम हे अन्य कारणाने होतात असे ॲलोपॅथिस्ट मानतात.[1][2][3][4][5][6][7]
होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्याप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला. होमिओपॅथीमध्ये मूळ औषध जसेच्या तसे न देता ते सौम्य करण्यासाठी पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये त्याचे वारंवार विरलन करून दिले जाते. जितके जास्त विरल तेवढे औषध जास्त प्रभावी (पोटेन्ट) अशी होमिओपॅथीमध्ये समजूत आहे. हे विरलन जवळपास नेहमीच इतके प्रचंड असते की मूळच्या औषधाचा एक रेणूदेखील शेवटी तयार झालेल्या औषधात शिल्लक नसतो. "कोणत्याही पदार्थाचे रासायनिक व भौतिक गुणधर्म कायम ठेवून त्याचे एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विभाजन करता येत नाही" हे आधुनिक विज्ञानात आजकाल सर्वमान्य असलेले तत्त्व हानेमानच्या कालखंडामध्ये पूर्णतः मान्य झालेले नव्हते, त्यामुळे औषधी पदार्थाचे अनंतपटीने विरलन करणे शक्य आहे अशी हानेमानची समजूत असणे शक्य आहे. परंतु भौतिकशास्त्राच्या मूलभूत कसोट्यांवर होमिओपॅथीची ही समजूतदेखील अवैज्ञानिक म्हणून गणली जाते.[8]
सामुएल हानेमान यांनी त्याकाळातील सर्व वैद्यक ग्रंथ वाचून पाहिले. पण त्यात त्यांच्या मनास समाधानकारक योग्य तत्त्व आणि रीत दिसली नाही त्यामुळे त्या जुन्या विषारी औषधी प्रक्रियेवरचा त्यांचा विश्वास नाहीसा झाला आणि ते नवीन तत्त्वाच्या शोधास लागले. डॉक्टर कल्लेनच्या (औषधीगुणदर्शन) 'मटिरिआ मेडिका'चे जर्मन भाषांतर करीत असताना सिंकोना झाडाच्या सालीच्या गुणधर्माबद्दल त्यांनी लिहीलेले सामुएल हानेमानच्या लक्षात आले. कल्लेनने तिथे असे लिहिलेले आहे की ‘सिकोनाच्या सालीने हिमज्वर बरा होतो खरा, पण चांगल्या प्रकृतीच्या, ज्वर नसलेल्या माणसाने सिंकोनाची साल फार खाल्ल्यास त्यास हिमज्वरासारखा ताप येतो'. हे पाहुन सामुएल हानेमान यांनी ह्याचा अनुभव घेऊन मनाची खात्री करून घेण्याचे ठरविले. आणि सिंकोनाची साल खाऊन स्वतःवरच अनुभव घेतला. तेंंव्हा त्यास हिमज्वर सारखा ताप आलाच. इतक्यानेही पूर्ण खात्री न होता त्यांनी मागाहून आणखी स्वतःवर आपल्यावर आणि तसेच त्यांच्या मित्रवर्गावर त्याचा अनुभव घेऊन खात्री झाल्यावर ॲकोनिटम्, बेल्लाडोना, नक्सव्होमिका, आर्सेनिकम्, मयुरी, सल्फर इत्यादी द्रव्यांचाही असाच अनुभव घेऊन तीच औषधे सूक्ष्म प्रमाणांत रोग्यास देऊन चांगला गुण आलेला पाहून मनाची खात्री करून १७९० साली होमिओपथिक तत्त्वाची प्रसिद्धी केली.
हिपोक्रटीज (Hippocrates) याने साधारणत: ख्रिस्तपूर्व ४०० मध्ये वेडेपणाच्या झटक्यावर उपचार म्हणून मॅन्ड्रेक या विषारी वनस्पतीच्या मूळाचा छोटासा अंश रूग्णाला दिल्याचा उल्लेख आहे. जास्त प्रमाणात घेतल्यास निरोगी माणसाला यामुळे वेडाचे झटके येतात हे त्याला माहीत होते. त्यामुळे होमिओपॅथीची सुरुवात हिपोक्रटीज (Hippocrates) याने केली असण्याची शक्यता आहे असे होमिओपॅथीच्या समर्थकांचे मत आहे.[9] सोळाव्या शतकात पॅरासेलस याने असे घोषित केले की "ज्यामुळे माणसाला आजार होतो तीच गोष्ट माणसाला बरे करते".[10] सामुएल हानेमान याने अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात होमिओपॅथी हे नाव दिले आणि होमिओपॅथीची तत्त्वे निश्चित केली.
होमिओपॅथी वैद्यकपद्धती प्रमाणे असलेली तिची मूलतत्त्वे प्राणिमात्राचे शरीर रोगग्रस्त झाल्यावेळी त्या रोगाच्या लक्षणासांरखी लक्षणे उत्पन्न करणारे द्रव्य (फार सूक्ष्म प्रमाणाने) देऊन त्या रोगाचे उपशमन करण्याच्या चिकित्सापद्धतीस जर्मनीतील डॉक्टर हानेमान यांनी होमिओस म्हणजे (Homoios) सम, या ग्रीक शब्दावरून होमिओपाथी असे नाव दिले आहे. ते म्हणतात-"पक्षघात झाल्या वेळी स्ट्रिक्निन् देणे; पोटशूलवर कोलोसिंथ देणे, ओकारी येत असता ॲन्टिमनी देणे व दमा झाल्यावेळी इपेकाकुन्हा देणे. समलक्षण चिकित्सानुसार म्हणजे होमिओपाथिक तत्त्वावर आहे. कारण निरोगी माणसात ही औषधे त्या रोग्यांच्या लक्षणासारखी लक्षणे उत्पन्न करतात. तसेच तहान लागत असताना मिठाचे अणु देणे, उचकी किंवा जळजळवर मिर्ची सूक्ष्म प्रमाणात देणे. सर्दीमुळे किंवा इन्फ्लुएन्झामुळे डोळ्यातून अश्रु व नाकातून पातळ स्त्राव येत असल्यास कांद्यापासून तयार केलेला काढ़ा देणे, पित्तप्रकोपामुळे आंबट ढेकर येत असता किंवा तोंडांत आंबट किंवा कडवट चव वाटत असल्यास लिंबाचे सरबत घेणे ही होमिओपाथिक तत्त्वावरच आहे".
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकोणिसाव्या शतकात प्रचलित वैद्यकशास्त्र हे शरिरातील काही रक्त काढून टाकून शरीर शुद्ध करण्यासारख्या भयानक पद्धती वापरत असे. त्याचप्रमाणे त्यांमधील औषधे अनेकविध गोष्टींची मिश्रणे असत. उदाहरणार्थ, व्हेनिस ट्रिॲकल या औषधामध्ये अफू, लाख आणि घोणस सापाचे मांस अशा ६४ विविध गोष्टी असत.[11] [12] अशा उपचारांमुळे काही वेळा रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी जास्तच बिघडत असे आणि बऱ्याचदा यामध्ये रुग्ण दगावत असे.[13][14] हानेमनने अशा पूर्वापार चालत आलेल्या [15] प्रथांचा विरोध केला आणि त्यांना अतार्किक म्हणून संबोधले.[16] याऐवजी त्याने सर्व रोगांवर एकच औषध कमी प्रमाणात दिले जावे असा सल्ला दिला. रोगांमागे भौतिक कारणांप्रमाणेच आत्मिक कारणे असतात असा त्याचा यामागे विश्वास होता.[17]
होमिओपॅथी ही उपचार पद्धती मनोरचनेवर काम करते अशी समजूत आहे. त्यामुळे होमिओपॅथीचे औषध देताना रोग्याचे व्यक्तिमत्त्व, आवडीनिवडी, सवयी आणि एकूण आरोग्य विचारात घेऊन उपचार केले जातात. प्रत्येक औषधाला स्वतंत्र अस्तित्त्व, रूपरंग व स्वभाव आहे आणि ते आपल्याशी सहरूप असलेल्या व्यक्तीला बरे करू शकते हे होमिओपॅथीचे मूळ सूत्र आहे. अर्थात, एकाच आजारासाठी दोन व्यक्तींना दोन तऱ्हेची वेगळी औषधे दिली जाऊ शकतात. म्हणजेच शारीरिक आजार बरा करण्यासाठी होमिओपॅथी मानसिक आरोग्य दुरुस्त करून मग शरीरावर काम करते असे मानले जाते. फार लहान मात्रेत असलेल्या होमिओपॅथीच्या औषधांत रोगनिवारणाची सुप्त शक्ती असते असे समजले जाते. एका रोग्यासाठी निवडावयाचे औषध रोगाच्या नावावर अवलंबून नसते तर ते रोग्याच्या संपूर्ण शरीरात होणाऱ्या बदलांवर अवलंबून असते; यासच सारखेपणाचा कायदा असे म्हणतात.
होमिओपॅथिक मटेरिया मेडिका या विषयामध्ये होमिओपॅथिक औषधांची माहिती असते. होमिओपॅथीच्या नियमानुसार निरोगी माणसांवर औषधाचा वापर करून मिळवलेले लक्षणे होमिओपॅथिक मटेरियामेडिका मध्ये नोंदविलेल्या असतात . रुग्णांच्या लक्षणानुसार समचिकित्सेच्या नियमावर होमिओ मटेरिया मेडिकाच्या साहाय्याने औषधे दिली जातात.
होमिओपॅथीचे औषध किती पट विरल आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या औषधाची पोटेन्सी म्हणजे परिणामकारकता म्हणतात. ही परिणामकारकता X, D, C, किंवा M या परिमाणांमध्ये मोजतात. या परिमाणांचे अर्थ खालील प्रमाणे आहेत
या परिमाणांच्या रूपांतरणाची सूत्रे खालील प्रमाणे आहेत, १C = २X = २D १M = १०००C
कोणत्याही मूलद्रव्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्म दाखवणारा लहानात लहान एकक रेणू हा असतो. रेणूंचा आकार हा परिमित असल्यामुळे, मूलद्रव्याचे गुणधर्म कायम ठेवून त्याचे ॲव्होगॅड्रो संख्येनुसार एका विशिष्ट मर्यादेपलीकडे विरलन करता येत नाही.
मानवाला आत्तापर्यंत तयार करता आलेले सर्वात शुद्ध पाणी, आय.एस.ओ. ३६९६ या नामांकनाने ओळखले जाते. या पाण्यामध्ये असणाऱ्या अशुद्धतेचे प्रमाण एकास दहा अब्ज म्हणजेच साधारण ४C एवढे असते.
होमिओपॅथीच्या ३०सी, २००सी यासारख्या औषधांपुढील क्षमतेच्या औषधात मूळ घटक सापडत नाही. त्यामुळे कुठल्याही वैज्ञानिक कसोटीत ही औषधपद्धती कधीही सप्रमाण सिद्ध होऊ शकत नाही. होमिओपॅथीसुद्धा रासायनिक प्रयोगांद्वारे आपल्या औषधांमध्ये मूळ औषधी घटकांच्या अस्तित्त्वाचा अंश असल्याचे सिद्ध करू शकलेली नाही, यामुळे ही औषधे ‘प्लॅसिबो इफेक्ट’ (औषधी तत्त्व नसलेल्या औषधांचा परिणाम) करणारी औषधे आहेत, असा यावर आक्षेप घेतला जातो. होमिओपॅथिक औषधांचे जे सकारात्मक परिणाम झालेले दिसतात ते काही होमिओपॅथिक उपचारांमुळे नसून इतर कारणांमुळे आहेत जसे की नैसर्गिकरित्या आजार बरा होणे आणि मध्यभागाकडे जाण्याची प्रवृत्ती (रिग्रेशन टूवर्डस मीन) (एक संख्याशास्त्रीय संकल्पना).[18][19][20]
होमिओपॅथीच्या विरलन पद्धतीवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना उत्तरे देण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न आत्तापर्यंत झालेले आहेत. असे काही प्रयोग -
अमेरिकेत विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.
युरोपात -
स्वित्झर्लँड वगळता = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे.
स्वित्झर्लँड = विक्रीपूर्व पडताळणीची शिथील अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मर्यादित प्रमाणावर मान्यता आहे.
रशिया =
आशिया
भारत = विक्रीपूर्व पडताळणीची अट नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता आहे, विमासंरक्षणाबाबत एकच नियम नाही.
इतर देश =
ऑस्ट्रेलिया = विक्रीपूर्व पडताळणीची अट, विमासंरक्षण नाही, वैद्यकशास्त्र म्हणून मान्यता नाही.
होमिओपॅथी उपचार पद्धतीवर प्रतिसाद नावाचा मराठी चित्रपट निघाला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.