एरबस ए३२० परिवार
From Wikipedia, the free encyclopedia
एरबस ए३२० हा एरबस ह्या कंपनीने उत्पादित केलेला मध्यम पल्ल्याच्या, मध्यम क्षमतेच्या प्रवासी जेट विमानांचा एक समूह आहे. साधारणपणे १५० प्रवासी ५,४०० किमी (२,९०० समुद्री मैल) वाहून नेण्याची क्षमता या विमानात आहे. ह्या विमानाचे उत्पादन व अंतिम जोडणी फ्रान्सच्या तुलूझ व जर्मनीच्या हांबुर्ग येथील कारखान्यांमध्ये करण्यात येते. ए३२० विमान समूहामध्ये ए३१८, ए३१९ व ए३२१ ह्या बनावटींची विमाने देखील तयार करण्यात येतात.
एरबस ए-३२० | |
---|---|
लुफ्तान्साच्या मालकीचे एरबस ए३२०-२११ विमान | |
प्रकार | छोट्या पल्ल्याचे मध्यम क्षमतेचे जेट विमान |
उत्पादक देश | फ्रान्स, जर्मनी, इटली |
उत्पादक | एरबस |
रचनाकार | एरबस |
पहिले उड्डाण | २२ फेब्रुवारी १९८७ |
समावेश | १८ एप्रिल १९८८ (एर फ्रान्स) |
सद्यस्थिती | प्रवासीवाहतूक सेवेत |
उत्पादित संख्या | ६,३३१ (नोव्हेंबर २०१४ चा आकडा) |
प्रति एककी किंमत | ए३१८: US$71.9 (€53) दशलक्ष[1] ए३१९: US$85.8 (€64) दशलक्ष[1] ए३२०: US$93.9 (€70) दशलक्ष [1] ए३२१: US$110.1 (€82) दशलक्ष[1] |
उपप्रकार | एरबस ए३१९ |
ए३२० समूहातील पहिले विमान मार्च १९८४ मध्ये बनवले गेले व एर फ्रान्सने हे विमान सर्वप्रथम मार्च १९८८ मध्ये वापरात आणले. आजच्या घडीला ए३२० समूहाची ७,५२१ विमाने जगभर वापरात आहेत तर ५,४७९ नव्या विमानांच्या पक्क्या ऑर्डरी एरबसला मिळाल्या आहेत. किफायती दरात प्रवासी विमानसेवा पुरवण्याचे लक्ष असणाऱ्या अनेक कंपन्यांसाठी ए३२० विमान आकर्षक ठरले आहे. आजच्या घडीला ए३२० समूहाची ३९४ विमाने आपल्या ताफ्यात बाळगणारी अमेरिकन एरलाइन्स ही ए३२० समूहाची जगातील सर्वाधिक वापरकर्ती कंपनी आहे. भारतीय विमानवाहतूक कंपनी इंडिगो आपल्या देशांतर्गत प्रवासी सेवेसाठी पूर्णपणे ए३२० रचनेची विमाने वापरते. बोइंग कंपनीचे ७३७ हे एरबस ए-३२० चे थेट स्पर्धक प्रकारचे विमान मानले जाते.
डिसेंबर २०१० मध्ये एरबसने ए३२० विमानाची ए३२०निओ (न्यू इंजिन ऑप्शन, New Engine Option) ही अद्ययावत शृंखला उद्धाटित केली. ए३२०निओ विमानांमध्ये नव्या व इंधनाची बचत करणाऱ्या इंजिनांचा वापर करण्यात आला असून ह्यामुळे १५ टक्के इंधनाची बचत होईल असा अंदाज एरबसने मांडला आहे. पहिले ए३२०निओ विमान २५ जानेवारी २०१६ रोजी लुफ्तान्साने वापरात आणले.