From Wikipedia, the free encyclopedia
डाॅ.आनंद नाडकर्णी (जन्म- इ.स. १९५८) हे एक मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी १९८० साली एम.बी.बी.एस आणि १९८४ साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी या पदव्या मिळवल्या. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध 'चळवळ' उभारण्यासाठी एक संस्था स्थापन करायची कल्पना डॉ. नाडकर्णी यांच्या मनात मनोविकारशास्त्राचे शिक्षण घेताना आली, आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवलीही. त्यानुसार, २३ मार्च १९९० रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची औपचारिक स्थापना झाली.
तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढ्यापुरतेच ठाण्यातील या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाट्य, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्प्कतेने वापर केला जातो.
आज नाडकर्णींच्या ह्या संस्थेमध्ये साठ मनोविकारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक, पंचवीस आधार सदस्य आणि विविध सेवाभावी प्रकल्पांवर काम करणारे तीनशे प्रशिक्षित स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेचा स्वतःचा मनोआरोग्य प्रशिक्षण विभाग आहे. स्वतंत्र माध्यम विभाग, औद्योगिक प्रशिक्षण विभाग, क्रीडा मानसशास्त्र विभाग, संशोधन विभाग असे विविध गट कार्यरत आहेत. शिवाय एकाच वेळी अनेक वयोगटांसाठी अनेक सेवा, उपक्रम, प्रकल्प यांचे एक जाळे विणलेले आहे. कोणत्याही सरकारी किंवा परदेशी मदतीशिवाय ही संस्था काम करते, आणि तरीही संस्थेचं सेवाशुल्क नाममात्र आहे. डॉ. शुभा थत्ते, डॉ. अनुराधा सोवनी या मानसशास्त्रज्ञांबरोबरच विविध क्षेत्रातल्या अनेकांनी या संस्थेच्या वाटचालीत मोलाची साथ दिली आहे. साचा:Fact
डॉ.आनंद नाडकर्णी हे पुणे येथील 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे'ही संस्थापक सदस्य आहेत.
डाॅ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या 'गद्धेपंचविशी' आणि 'विषादयोग' या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नाडकर्णी यांनी 'रंग माझा वेगळा' व 'असेच आम्ही सारे' ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या 'मयसभा' या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. ‘मिफ्ता’च्या नाट्य विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथासंकल्पना असलेल्या ’गेट वेल सून’ या नाटकाची त्यावर्षीच्या १० सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती. .
वयम् आणि Institute For Psychological Health(IPH) चे कार्यकारी विश्वस्त डाॅ.आनंद नाडकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने 'बहुरंगी बहर'[1] ही स्पर्धा इयत्ता सातवी ते नववीच्या मुलांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.