वक्ता, पत्रकार, नाटककार, संपादक (काळ), From Wikipedia, the free encyclopedia
शिवराम महादेव परांजपे ( महाड, २७ जून, इ.स. १८६४ - २७ सप्टेंबर, इ.स. १९२९) हे मराठी पत्रकार, निबंधकार, लेखक होते.[1] तत्कालीन ब्रिटिश भारतातील ब्रिटिश शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध 'काळ' या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.[ संदर्भ हवा ]
शिवराम महादेव परांजपे | |
---|---|
जन्म |
जून २७, इ.स. १८६४ महाड, महाराष्ट्र |
मृत्यू |
सप्टेंबर २७, इ.स. १९२९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | पत्रकारिता, साहित्य |
प्रसिद्ध कामे | काळ, मराठ्यांच्या लढायांचा इतिहास |
शिवराम महादेव परांजपे यांचा जन्म महाराष्ट्रात महाड येथे झाला. त्यांचे शिक्षण महाड, रत्नागिरी व पुणे या ठिकाणी झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत त्यांना संस्कृत भाषेसाठी जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीचे ते पहिले मानकरी होत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयात संस्कृत शिकवले.
इ.स. १८९८ साली त्यांनी ‘काळ’ हे वृत्तपत्र सुरू केले. २५ मार्च रोजी याचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 'काळ'ने लोकप्रियतेच्या बाबतीत थोड्याच अवधीत ‘केसरी’लाही मागे टाकले असे म्हणले जाते. त्यांनी आपल्या पत्राची जाहिरात ‘धार्मिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि वाङ्मयीन विषयांची निष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र’ अशा शब्दांमध्ये केली होती. ते ‘काळकर्ते’ परांजपे म्हणून ओळखले जात असत. त्यांच्या लिखाणात देशाभिमान, पांडित्य व रसिकता यांचे मिश्रण होते. वक्रोक्ती व व्याजोक्ती ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात. ‘वक्रोक्ती’ हा नवा अलंकार त्यांनी मराठी भाषेला दिला. विष्णुशास्त्री चिपळूणकर शिवरामपंतांना शिक्षक म्हणून लाभले होते. त्यांचा शिवरामपंतांवरील प्रभाव लेखनातून ठळकपणे जाणवतो.
‘काळ’ वृत्तपत्राची सुरुवात करण्यापूर्वी शिवरामपंतांनी काही काळ लोकमान्य टिळक यांच्या समवेत सार्वजनिक कार्य केले. ते प्रभावी वक्ते होते. आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्य या मूल्यांचा प्रचार केला. इ.स. १९०८ साली त्यांना ‘काळ’मधील लिखाणासाठी भारतातील इंग्रज सरकारने अटक केली आणि त्यांना एकोणीस महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. इ.स. १९०९ पर्यंत ‘काळ’ चालू होता. त्यानंतर मात्र ब्रिटिश सरकारने मागणी केलेल्या सुमारे दहा हजार रुपयांच्या जात-मुचलक्याची (जामिनाची) पूर्तता करणे शक्य न झाल्याने ‘काळ’ बंद पडला. पुढे इ.स. १९२० साली शि.म.परांजपे यांनी ‘स्वराज्य’ हे साप्ताहिक काढले.
पुढे इ.स. १९२२ मध्ये त्यांनी मुळशी सत्याग्रहात भाग घेतला. वृत्तपत्रीय लेखनाबरोबरच त्यांनी ग्रंथलेखनही केले. ‘विंध्याचल’, ‘संगीत कादंबरी’, ‘मराठ्यांच्या लढ्याच्या इतिहास’, ‘रामायणाविषयी काही विचार’ अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली. इ.स. १९२१ मध्ये बेळगाव येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. परांजपे यांच्या ‘काळ’ या वृत्तपत्राने स्वातंत्र्यपूर्व काळात ‘केसरी’च्या बरोबरीने प्रेरक भूमिका बजावली, तसेच त्यांच्या लेखनाने पत्रकारिता व मराठी साहित्यातही मौल्यवान भर घातली.
‘प्रणयिनीचा मनोभंग’ हे ठाकूरसिंगांच्या चित्राचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील सर्जनशील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना मानले जाते. नागानंद, अभिज्ञानशाकुंतल, मृच्छकटिक ह्या संस्कृत नाटकांवरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधनपर लेखही उल्लेखनीय आहेत.
शि.म.परांजपे हे कथालेखकही होते. आम्रवृक्ष’, ‘एक कारखाना’, ‘प्रभाकरपंतांचे विचार’ या त्यांच्या कथा प्रसिद्ध आहेत. रत्नाकर मासिकातून त्यांचे लेखन प्रकाशित होत असे. वि. का. राजवाडे यांच्या भाषांतर मासिकाच्या कामात त्यांचा सहभाग होता.[ संदर्भ हवा ]
नाव | साहित्यप्रकार | प्रकाशन | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|---|
अर्थसंग्रह | पूर्वमीमांसा विषयक | १९०४ | |
काळातील निबंध (अनेक खंड) | निबंधसंग्रह | ||
गोविंदाची गोष्ट | कादंबरी | १९९८ | |
तर्कमापा | तत्त्वज्ञानविषयक | ||
तर्कसंग्रहदीपिका | तत्त्वज्ञानविषयक | ||
पहिला पांडव | नाटक | १९३१ | |
प्रतिमा | मूळ संस्कृतवरून संपादित | ||
प्रसन्नराघव | मूळ संस्कृतवरून संपादित | ||
भामिनीविलास | मूळ संस्कृतवरून संपादित | ||
भीमराव | नाटक | ||
मराठ्यांच्या लढायांचा इतिहास | इतिहास | १९२८ | |
मानाजीराव | रूपांतरित नाटक, मूळ शेक्सपियरचे मॅकबेथ | १९९८ | |
रामदेवराव | नाटक | १९०६ | |
रामायणाविषयी काही विचार | संशोधनात्मक | ||
रूसोचे अर्थनीतिशास्त्र (अपूर्ण) | वैचारिक | ||
विंध्याचल | कादंबरी | १९२४ | |
संगीत कादंबरी | नाटक | १८९७ | |
साहि्त्यसंग्रह - भाग १, २, ३ | वैचारिक लेखांचा संग्रह | १९२२, १९२५, १९४६ | |
स्वातंत्र्यसूत्रे | वैचारिक | ||
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.