Remove ads
श्रीकृष्ण जन्मोत्सव,प्रमुख हिंदू सण From Wikipedia, the free encyclopedia
कृष्ण जन्माष्टमी (अर्थ: कृष्णाच्या जन्माचा प्रसंग) ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात, हा वार्षिक हिंदू सण आहे.[१] श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.[२][३]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
स्मरणोत्सव | |||
स्थान | भारत, बांगलादेश, नेपाळ | ||
|
विष्णूचा आठवा अवतार असलेल्या कृष्णाचा जन्म हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेनुसार, श्रावण या महिन्यात; तर ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात हा सण येतो. [४]
हा हिंदू धर्मातील विशेषतः वैष्णव पंथातील एक महत्त्वाचा सण आहे. [५] भागवत पुराणानुसार कृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्य-नाटक (जसे की रस लीला किंवा कृष्णलीला), मध्यरात्री भक्तीगीत गायन, उपवास, पूजा,रात्री जागरण आणि पुढील दिवशी महोत्सव यांचा जन्माष्टमी उत्सवामध्ये समावेश होतो. [६] [७] कृष्ण जन्माष्टमीनंतर नंदोत्सव हा सण साजरा केला जातो. नंदाने जन्माच्या सन्मानार्थ लोकांना भेटवस्तू वितरित केल्या होत्या, त्याचा हा सण असतो. [८]
कृष्ण हा देवकी आणि वसुदेव यांचा पुत्र आहे. त्यांचा जन्मदिवस हिंदू लोक जन्माष्टमी म्हणून साजरा करतात. विशेषतः गौडीया वैष्णव परंपरेमध्ये कृष्णाला सर्वोच्च देव मानले जाते. हिंदू परंपरेनुसार भाद्रपद महिन्याच्या आठव्या दिवशी मध्यरात्री मथुरेत कृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. या दिवशी जन्माष्टमी साजरी केली जाते (ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये ऑगस्ट आणि ३ सप्टेंबरला हा दिवस येतो). [४] [९]
कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. तो असा काळ होता जेव्हा छळ मोठ्या प्रमाणावर होता, लोकांचे स्वातंत्र्य नाकारले गेले होते, सर्वत्र वाईट गोष्टी होत्या आणि राजा कंस या त्याच्या मामाकडून त्याच्या जीवाला धोका होता. [१०] जन्मानंतर लगेचच कृष्णाचे वडील वासुदेव अनकदुंदुभी यांनी त्याला यमुना ओलांडून मथुरेतून गोकुळात पालनपोषण करण्यासाठी नेले. वासुदेवाचा भाऊ नंद आणि वहिनी यशोदा हे कृष्णाचे पालक होते. कृष्णासोबतच त्याचा मोठा भाऊ म्हणून सर्प शेष बलरामदेखील अवतार घेऊन पृथ्वीवर आला होता, जो वासुदेवाची पहिली पत्नी रोहिणीचा मुलगा होता . ही आख्यायिका जन्माष्टमीला लोक उपवास करून, कृष्णप्रेमाची भक्तिगीते गाऊन आणि रात्री जागरण करून साजरी करतात. [११] कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर, कृष्णाच्या बाळाच्या रूपाला (बाळकृष्ण)आंघोळ घालण्यात येते, कपडे घातले जातात, नंतर पाळण्यामध्ये ठेवले जाते. त्यानंतर भक्त हे अन्न आणि मिठाई वाटून उपवास सोडतात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात आणि त्यांच्या घराकडे चालत जातात. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे. [११]
हा उत्सव भारतात सर्वत्र होतो.हा सण विशेषतः मथुरा आणि वृंदावन तसेच वैष्णव आणि गैर-सांप्रदायिक समुदाय आढळणाऱ्या मणिपूर, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथे साजरा केला जातो. याशिवाय भारतातील इतर सर्व राज्ये आणि उमरकोट, थारपारकर, मीरपूरखास आणि संपूर्ण सिंध पाकिस्तानमध्ये देखील हा उत्सव साजरा केला जातो. [४] [१२]
गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे.[१६]गुजराथमध्ये 'सातम' म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. रात्री बारा वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात.
मध्य प्रदेशात [१७]आणि उत्तरी भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात.वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो.[१८] याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.[१३]
अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर लता पल्लवानी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या,वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्रौ कथा, पुराण, नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात.[२०] अष्टमीच्या दिवशी उपवास करतात व देवालाही फराळाच्या जिन्नसांचा नैवेद्य दाखवितात. नवमीच्या दिवशी पंचोपचार[२१] करून उत्तरपूजा करून महानैवेद्य समर्पण करतात.[१८] पू जा झाल्यानंतरचे कृत्य अग्नी पुराणात सांगितले आहे. ते असे-' याप्रमाणे पूजा करून पुरुषसूक्ताने, विष्णूसूक्ताने व इतर स्तोत्रांनी स्तवन करावे.वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण-इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत ती रात्र घालवावी. गोकुळातील कृष्णजन्माच्या लीला श्रवण केल्यानंतर वैष्णवांनी परस्परांवर दही इ.चे सिंचन करावे. कारण 'गोपाळांनी दही, दूध, तूप, उदक, यांनी परस्परांवर सिंचन व लेपन केले'असे भागवतामध्ये वचन आहे, त्यावरून असा विधी प्राप्त होतो.[२२] कृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा प्रसाद दिला जातो.
उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.[२३]महाराष्ट्रात विशेषतः कोकणात या उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे आला । गोकुळात आनंद झाला ॥ असे गाणे गात अनके लहानथोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे. या दिवशी महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईत, उंच मडक्यात दही-दुधाने भरलेला हंडा ठेवून तेथपर्यंत मानवी मनोऱ्यावरून पोहचून तो हंडा फोडण्याचा ‘गोविंदा’ हा साहसी खेळ होतो.[२४] हा महाराष्ट्रातील एक वैष्णव नृत्योत्सव आहे. श्रीकृष्णाने व्रज मंडळात गाई चारताना आपण व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या खाद्य पदार्थांचा काला केला व सर्वांसह त्याचे भक्षण केले अशी कथा आहे. या कथेला अनुसरून गोकुळाष्टमीच्या दिवशी एका सजवलेल्या मडक्यात काला करून ते दोरीच्या सहाय्याने उंचावर बांधण्याची व मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. जास्तीत जास्त उंचीवर जाऊन हंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षीस दिले जाते. यावेळेस गाणी, नृत्य, विविध कार्यक्रम होतात व बघणाऱ्यांची जल्लोषासहित मोठी गर्दी जमलेली असते.
गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो.[२५] काला म्हणजे एकत्र मिळविणे.[२६]
पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी घालून केलेला एक खाद्यपदार्थ.[२७] हा कृष्णास फार प्रिय होता असे मानले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व वाटून खात असत असे मानले जाते.
[१८]
गोमंतकात याच काल्याला गवळणकाला म्हणतात. हा काला तिथल्या कलावंतिणी करतात. त्यात एका मुलीला कृष्णाचे सोंग देऊन कृष्णलीलेची गाणी म्हणतात. शेवटी कृष्णाकडून दहीहंडी फोडवितात. हा गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.[१८]
जन्माष्टमीच्या आधी, म्हणजे श्रावण वद्य षष्ठीला बलराम जयंती असते.[२८]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.