Remove ads
हिंदू धर्मातील विष्णूचा एक अवतार From Wikipedia, the free encyclopedia
कृष्ण[१] (/ˈkrɪʃnə/; संस्कृत : कृष्ण , IAST: Kṛṣṇa [ˈkr̩ʂɳɐ]) हा हिंदू धर्मातील एक देव आहे. विष्णूचा आठवा अवतार आणि वैष्णव पंथामधील सर्वोच्च देवता म्हणून त्याची पूजा केली जाते. कृष्ण हा संरक्षण, करुणा, माया आणि प्रेमाचा देव असून [२] [३] तो भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय मानला जातो. [४] हिंदू लोक कृष्णाचा जन्मदिवस दरवर्षी कृष्ण जन्माष्टमीला चंद्रसौर हिंदू दिनदर्शिकेनुसार साजरा करतात, जो ऑगस्टच्या उत्तरार्धात किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला येतो. [५] [६]
श्री कृष्ण | |
सिंगापूरच्या श्री मारिमान मंदिरामधील कृष्णाची प्रतिमा | |
कन्नड | ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ. |
निवासस्थान | द्वारिका गुजरात,गोलोक, वृंदावन, गोकुळ ,मथुरा, वैकुंठ. |
शस्त्र | सुदर्शन चक्र |
वडील | वसुदेव |
आई | देवकी (जन्मदात्री), यशोदा (पालन पोषण) |
पत्नी | राधा रुक्मिणी, सत्यभामा, जांबवंती, सत्या, लक्ष्मणा, कालिन्दी, भद्रा, मित्रविन्दा. ..(एकूण १६१०८) |
अपत्ये | ८०. |
अन्य नावे/ नामांतरे | वासुदेव, वासुदेवनंदन, गोपाल, नंदलाल, माखनचोर, शाम, मुरारी, पार्थसारथी, मोहन, किशन, गोविंदा, हरी |
या देवतेचे अवतार | विठ्ठल |
या अवताराची मुख्य देवता | विष्णू |
मंत्र | ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः |
नामोल्लेख | महाभारत, भगवद्गीता. |
तीर्थक्षेत्रे | मथुरा, वृंदावन, द्वारिका |
कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो.
कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना सामान्यतः कृष्णलीला असे शीर्षक दिले जाते. तो महाभारत, भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यांमधील एक मध्यवर्ती पात्र आहे आणि अनेक हिंदू तात्विक, धर्मशास्त्रीय आणि पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. [७] विविध दृष्टीकोनातून त्याला चित्रित करतात: एक दैवी मूल, एक खोडकर, एक आदर्श प्रेमी, एक दैवी नायक आणि सर्वोच्च वैश्विक अस्तित्त्व म्हणून. [८] त्याची प्रतिमा अनेक दंतकथा प्रतिबिंबित करते आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात दाखवते, जसे की लोणी खाणारे तान्हे बाळ, बासरी वाजवणारा तरुण मुलगा, राधासोबतचा किंवा स्त्री भक्तांनी वेढलेला तरुण; किंवा अर्जुनाला सल्ला देणारा सारथी. [९]
कृष्णाचे नाव आणि समानार्थी शब्द इ.स.पूर्व १ ल्या शतकातील साहित्य आणि पंथात सापडतात. [१०] कृष्णधर्मासारख्या काही उप-परंपरेत, कृष्णाची स्वयं भगवान (सर्वोच्च देव) म्हणून पूजा केली जाते. या उप-परंपरा मध्ययुगीन काळातील भक्ती चळवळीच्या संदर्भात उद्भवल्या. [११] [१२] कृष्ण-संबंधित साहित्याने भरतनाट्यम, कथकली, कुचीपुडी, ओडिसी आणि मणिपुरी नृत्य यांसारख्या असंख्य कलाकृतींना प्रेरणा दिली आहे. [१३] [१४] तो संपूर्ण हिंदू धर्मात पूजला जाणारा देव आहे, परंतु तो विशेषतः उत्तर प्रदेशातील वृंदावन, [१५] द्वारका आणि गुजरातमधील जुनागढ ; ओडिशातील जगन्नाथ, पश्चिम बंगालमधील मायापूर ; [११] [१६] [१७] महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठलाच्या रूपात, राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी म्हणून, [११] [१८] कर्नाटकातील उडुपी कृष्णा, [१३] तमिळनाडूमध्ये पार्थसारथी आणि केरळमधील अरनमुला येथील गुरुवायूरमध्ये गुरुवायूरप्पन म्हणून प्रसिद्ध आहे. [१९]
१९६० पासून मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाच्या (ISKCON) च्या कार्यामुळे कृष्णाची उपासना पाश्चात्य जग आणि आफ्रिकेतही पसरली आहे. [२०]
'श्रावण महिन्याच्या कृष्ण[२१] पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला.त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो.[२२]महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.
कृष्णाची आई देवकी आणि वडील वसुदेव हे देवकीचा भाऊ आणि मथुरेचा राजा कंस याच्या कैदेत होते. देवकीचा पुत्र तुझा वध करेल अशी आकाशवाणी ऐकून कंसाने देवकी आणि वसुदेवाला कैदेत ठेवले आणि तिची पहिली सात अपत्ये जन्मताक्षणी ठार केली. आठवे अपत्य जन्माला येताक्षणी वसुदेवाने त्याला आपला गोकुळातील मित्र नंद याच्या स्वाधीन केले.[२३]
कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" येते.[२४] कृष्ण हे नाव "केशवनामांत" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापरयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापरयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. -३२२८ ला झाला. कृष्णाच्या जीवनातील किस्से आणि कथांना सामान्यतः कृष्ण लीला असे म्हणले जाते. तो महाभारत, भागवत पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण आणि भगवद्गीता यांमधील एक मध्यवर्ती पात्र आहे. अनेक हिंदू तात्विक, धर्मशास्त्रीय आणि पौराणिक ग्रंथांमध्ये त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे.[२५] यामध्ये त्याला विविध दृष्टीकोनांतून चित्रित केले गेले आहे: एक दैवी मूल, एक खोडकर, एक आदर्श प्रेमी, एक दैवी नायक आणि वैश्विक सर्वोच्च अस्तित्त्व. [२६] कृष्णाची विविध रूपे अनेक दंतकथांमधून प्रतिबिंबित होतात आणि त्याला त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात दाखवतात, जसे की लोणी खाणारे तान्हे बाळ, बासरी वाजवणारा तरुण मुलगा, राधासोबतचा किंवा स्त्री भक्तांनी वेढलेला तरुण मुलगा किंवा अर्जुनाला सल्ले देणारा मित्र आणि सारथी. [२७]
कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. महाभारतात म्हणले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेसत्तवीस वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.
कृष्ण यादव कुळात जन्माला आला. तो वसुदेव व देवकी यांचा पुत्र. कंस हा त्याचा मामा.[२८] सुभद्रा आणि द्रौपदी या दोन्ही भगवान श्रीकृष्णाच्या बहिणी. पैकी सुभद्रा ही सख्खी, तर द्रौपदी ही मानलेली बहीण होती. बलराम त्याचा भाऊ आहे. कालिन्दी, जाम्बवती, भद्रा, मित्रविन्दा, रुक्मिणी, लक्ष्मणा, सत्यभामा, सत्या अशा श्रीकृष्णाला आठ बायका होत्या. शिवाय त्याने नरकासुराच्या (भौमासुराच्या) कैदेतील १६,१०० स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला.
श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.[२९]
ब्रह्मवैवर्तपुराण या ग्रंथात राधा ही कृष्णाची परमप्रिया आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत, असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचेच स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुषरूप आहे', असेही म्हणले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. राधेचे कृष्णावर मनापासून प्रेम होते. ब्रह्मा वैवर्त पुराण आणि गर्ग संहिता नमूद करतात की कृष्णाने वृंदावनाजवळील भांडिरवन जंगलात भगवान ब्रह्माच्या उपस्थितीत गुप्तपणे राधाशी लग्न केले होते.
कृष्णाला फुलामध्ये पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला ही त्याच्या आवडीची आहे.[३०] प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे चार पांढरेशुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. कृष्ण हा उत्तम (रथाचा) सारथी होता.
शंखासुर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांचजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला.[३१] त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले.
कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्याला त्याचा पिता नंद याने दिली होती.
महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली.[३२] यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे.[३३]
त्यासाठी लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, गीतारहस्य हा कर्मयोगाची महती सांगणारा ग्रंथ लिहिला.
गीतेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि प्रत्येक लेखकाने गीतेवर वेगवेगळ्या अंगांनी भाष्ये लिहिली आहेत. टिळकांनी गीतेचा कर्मयोग असा अर्थ लावला आहे.[३४]
महाभारतात कृष्णाच्या मृत्यूचे वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णाचा मृत्यू इ.स.पू. ५५२५ या वर्षी झाला.
कृष्णाचे नाव आणि समानार्थी शब्द हे इ.स.पूर्व १ ल्या शतकातील साहित्य आणि पंथापासून सापडते. [३५] काही उप-परंपरांमध्ये कृष्णाची स्वयं भगवान (सर्वोच्च देव) म्हणून उपासना केली जाते आणि काहीवेळा याला कृष्णवाद म्हणले जाते. या उप-परंपरा मध्ययुगीन काळातील भक्ती चळवळीपासून सुरू झाल्या. [११] [३६] कृष्णाशी संबंधित साहित्याने भरतनाट्यम, कथकली, कुचीपुडी, ओडिसी आणि मणिपुरी नृत्य यासारख्या असंख्य कलाकृतींना प्रेरणा दिली आहे. [१३] [३७]
कृष्ण हा सर्व हिंदू लोकांद्वारे मानला जाणारा देव आहे, परंतु तो काही ठिकाणी विशेषतः पूज्य आहे; यामध्ये पुढील स्थळांचा समावेश होतो: उत्तर प्रदेशातील वृंदावन आणि द्वारका;[१५] गुजरातमधील जुनागढ ; ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ, पश्चिम बंगालमधील मायापूर ; [११] [१६] [३८] महाराष्ट्रातील विठोबाच्या रूपात पंढरपूर येथे, राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी, [११] [३९] कर्नाटकातील उडुपी कृष्णा, [१३] तमिळनाडूमधील पार्थसारथी, केरळमधील अरनमुला आणि पार्थसारथी, केरळच्याच गुरुवायूरमध्ये गुरुवायूरप्पन म्हणून. [४०]
भागवत पुराणाने कृष्णाला विष्णूस्वरूप मानले आहे.महाभारत काळात जो कृष्ण यादवांचा नेता आणि पांडवांचा हितकर्ता अशा मानवी रूपगुणांत दिसला, तोच पुढे मानवांचा उपास्यदेव बनला. कृष्ण हा यादवांच्या सात्वत कुळात जन्मला होता, त्यांनीच त्याला उपास्य दैवत मानले.
कृष्ण हे ऋग्वेदाच्या आठव्या मंडलातील ७४ व्या सूक्ताचा कर्ता असलेल्या एका ऋषीचे नावही होते. त्यानुसार इतिहास काळात अनेक कृष्ण झाले असावेत असा कयास आहे. अध्यात्मात कृष्णाची २४ नावे आहेत.
कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :
श्रीकृष्ण हा उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम भारतातील तमाम नागरिकांचा आवडता 'देव' असल्याने त्याच्यावर अनेक कथा-कादंबऱ्या चित्रपट-नाटके लिहिली गेली. त्यांपैकी काही :-
(अपूर्ण)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.