From Wikipedia, the free encyclopedia
कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
महालक्ष्मीचे हे मंदिर चालुक्य राजांनी इ.स.सातव्या शतकात बांधले गेले. हे तीर्थस्थान मातृक क्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते. कोल्हापूरनिवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता ॥ मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम् ॥ तुळजापूर तृतीयं स्यात् सप्तशृंग तथैवच ॥ या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर वणी गडावरची सप्तशृंगी देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते.
पद्म पुराण, स्कंद पुराण, मार्कंडेय पुराण, देवी भागवत इत्यादी प्राचीन ग्रंथांत महालक्ष्मीचा उल्लेख आहे. काशी क्षेत्रात शिवाचे वास्तव्य आहे परंतु करवीरात शिव व महालक्ष्मी दोघांचेही वास्तव्य आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे भक्ती आणि मुक्ती मिळते असा भोळ्या भक्ताचा भाव आहे. ऐतिहासिक शिलालेख, ताम्रपट अशा विविध पुराव्यांवरून या मंदिराच्या नोंदी नवव्या शतकापासून सापडतात (शके ७९३, इ.स. ८७१) ठाणे जिल्ह्यात सापडलेला ताम्रपट तसेच गोमंतक प्रदेशात फोंडा येथे सापडलेल्या ताम्रपटात कदंब वंशीय राजा पहिला षष्ठ याने कोल्हापुरात येऊन श्री महालक्ष्मीची उपासना केल्याचा उल्लेख आहे. हा काळ शके ९६० व इ.स. १०३८ असा आहे. या स्थानावर सत्ता असणारा व महालक्ष्मीवर श्रद्धा असणारा राजा म्हणजे शिलाहार राजवंश होय आपल्या राज्यावर महालक्ष्मीचा वरदहस्त आहे असा अभिमान बाळगणाऱ्या या राजाचा प्रभाव करवीरक्षेत्रावर शके ९८० (इ.स. १०५८) पासून शके १११३ (इ.स. ११९१) इतका प्रदीर्घ होता. याच वंशातील पहिला राजा मारसिंह यांचा ताम्रपट मिरज येथे आहे यात शिलाहार नृपती ने स्वतःच्या राजवंशाचा उल्लेख करताना "श्री महालक्ष्मी लब्ध वरप्रसादादि "असा उल्लेख केला आहे. मारसिंह,बल्लाळ,गंडरादित्य विजयादित्य व व्दितीय भोज या सर्वच शिलाहार वंशीय राजवंशातील शिलालेख व ताम्रपट करवीरच्या महालक्ष्मीचा साक्षात श्रद्धा भाव आढळून येतो. देवगिरीच्या यादव वंशातील राजा सिंघन देव याने ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार राजवंशाची सत्ता हस्तगत केली. इ.स. १२१३ला हा सर्व प्रदेश यादवाच्या सत्तेखाली आला जरी सत्ता बदलली तरी यादव वंशानेही महालक्ष्मीवर अपार श्रद्धा दाखवली होती खिद्रापूरच्या अमृतेश्वराला भरभरून दान देत असतानाच कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मीला ही आपल्या सेवका तर्फे तोरण बांधले अनेक जेष्ठ अभ्यासकांच्या मते हे तोरण म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरासमोरील महाद्वार होय. याची नोंद असणारा शिलालेख महाद्वाराच्या शेजारीच असणाऱ्या जोशीरावांचा गणपती अर्थात उजव्या सोंडेचा गारेचा गणपतीच्या मंदिरातील खांबावर आजही पाहायला मिळतो या प्रकारे अनेक शिलालेख व ताम्रपटावरून मंदिराची प्राचीनता ८ व्या ते ९ व्या शतका पर्यंत नक्कीच घेऊन जाते हे स्पष्ट होते. आत्ताचे मंदिर हे तारका कृती असून या मध्ये प्रामुख्याने मुख्य मंदिर महाकाली, महासरस्वती, गणेश मंडप व शेवटी गरुड मंडप अशा क्रमाने बांधकाम झाले असे जाणकारचे मत आहे मुख्य मंदिराच्या गर्भगृहात उंच दगडी चबुतऱ्या वर दहा खांब असणाऱ्या लाकडी मेघडंबरीत साक्षात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात जगदंबेची मूर्ती स्थित आहे.
मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यातील प्राधानिक रहस्यात तिचे वर्णन खालील प्रमाणे केले आहे मातृलिंग गदा खेट पानपात्र विभ्रती ॥ नागलिंगच योनि बिभ्रती नृप मुर्धनी ॥ त्याच प्रमाणे नित्य कर्म संग्रहात तिचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. धृत्वा श्री मातुः लिंगं तदुपरीच गदा खेटकं पानपात्रम ॥ नागलिंगच योनी शिरसी धृतवती राजते हेमवर्णा ॥ अर्थात महालक्ष्मी ही त्रिगुणी परमेश्वरी व मुळ आदिमाया भगवती पराशक्ती आहे. ती तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती आहे. ह्या तिघींनी मिळून त्रिदेव-देवी आणि सर्व देवतांची निर्मिती केली.
मुळ प्रकृती - महालक्ष्मी तमोगुणी - महाकाली सत्वगुणी - महासरस्वती
त्रिदेवांची निर्मिती :
चतुर्भुज महाकाली - शंकर, सरस्वती चतुर्भुज महालक्ष्मी - ब्रम्हा, लक्ष्मी चतुर्भुज महासरस्वती - विष्णू, गौरी
महालक्ष्मी ने अनेक अवतार घेऊन असुराचां वध केला. महिषासुरमर्दिनी बनून महिषासुराचा तर करवीरची जगदंबा कोल्हासुरमर्दिनी बनून कोलासुराचा वध केला आणि दुर्गा बनून दुर्गमासुराचा वध केला.
महालक्ष्मी मूर्ती उंची २ फुट ९ इंच इतकी आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून वरच्या उजव्या हातात उभी गदा व डाव्या हातात खेटक (ढाल) आहे. खालच्या दोन हाता पैकी डाव्या हातात पानपात्र व उजव्या हातात मातुलुंग (म्हाळुंग) आहे. श्रींच्या मस्तकावर साडेतीन वेटोळ्याचा नाग असून त्याचा फणा समोर आहे या फण्याच्या मागे लिंग व योनी ही प्रकृती तत्त्व व पुरुष तत्त्व यांची यांची प्रतीके आहेत मूर्तीच्या पाठीमागे सिंह उभा आहे. इ.स. १०९ मध्ये कर्णदेव राजा कोकणातून आला त्या वेळी अरण्यातील झाडे झुडपे तोडून ही मूर्ती उजेडात आणली असे म्हणले जाते आठव्या शतकात मंदिर भूकंपाने खचले. राजा गंडरदित्य याने मंदिराचा विस्तार केला. त्याने महाकाली मंदिर तर ११७८ ते १२०९ या काळात राजा जयसिंग व राजा सिंघण देव यांच्या कारकिर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वर मंदिर बांधल्याचे म्हणले जाते. ज्याप्रमाणे श्री यंत्राच्या १६ काटकोनातील मध्यभागी सर्वोच्च बिंदू स्थान असते त्याच प्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचा प्रदक्षिणेचा मार्ग हा श्री यंत्रा प्रमाणे १६ काटकोनात विभागाला आहे या मार्गाच्या मध्य भागी म्हणजेच सर्वोच्च बिंदू स्थानावर तिची मूर्ती उभी आहे संपूर्ण भारतातील अशी रचना असणारे उत्कृष्ट शिल्प वैभव व हेमाड पंथी असे एकमेव दोन मजली मंदिर असावे महालक्ष्मी मूर्तीच्या बरोबर वरच्या मजल्यावर दगडी शिवलिंग आहे. यालाच मातुः लिंग असे म्हणतात महालक्ष्मीच्या मस्तकावर याचे स्थान असून मातृरूपातील हे शिवलिंग असलेने याला अपवादात्मक पूर्ण प्रदक्षिणा घातली तरी चालते. महालक्ष्मीच्या प्रदक्षिणामार्गाप्रमाणे वरच्या मजल्या वरील या शिवलिंगालाही प्रदक्षिणा मार्ग आहे. त्यास वायू विजनासाठी दगडी झरोके व खिडक्या आहेत.
मातृमंडलपीठस्था मातृमंडलपूजिता
श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर वर मातृलिंगाचे स्थान आहे. याचा अर्थ श्री महालक्ष्मी ची मूर्ती व मातृलिंग एका रेषेत आहेत. तांदूळाची रास, सुपारी, शिवलिंग यावर कोणतीही देवता आवाहीत करता येते. या नियमाला धरून करवीरात स्त्री देवतांची देखील लिंग रूपाने पूजा होते.(उदा. सावित्रीश्वर गायत्रीश्वर देवहुतीश्वर). या प्रमाणे साक्षात जगदंबे च म्हणजे आईचं लिंग रूप ते मातृलिंग. यामुळे च शिवलिंगाला असलेल्या सोमसुत्री प्रदक्षिणेचा नियम मातृलिंगाला नाही. (तीथे पूर्ण प्रदक्षिणा केली जाते)
मातृलिंग स्थापनेचे कारण :
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रम्ह आदिशक्ती आहे. ती ना शिवपत्नी ना विष्णूपत्नी. ती साक्षात त्रिदेव-देवी व सर्व देवतांची आई आहे. त्यामुळे ती ना पुरुष ना स्त्री ना नपुंसक असून तीला लिंगत्रयातीत म्हणले जाते. त्यामुळे जे भक्त साधनेच्या अशा पातळीवर पोहोचले आहेत की जिथे मूर्ती अलंकार यांचे त्यांना काही देणे घेणे नाही. परंतु या सिद्ध स्थानाची उर्जा आकर्षित करते अशा उपासकांना उपासनेने स्थान म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचनेप्रमाणे तीन खोल्या (शेजघर, भांडारघर, स्नान घर ) व बाहेरून स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग अशी रचना असणारे हे स्थान निर्माण करण्यात आले असावे.
हिंदू कथांनुसार दैवतांना पुजण्याचे पाच प्रमुख मार्ग आहेत. 1) शक्ती 2) शिव 3) सूर्य 4) विष्णू 5) गणपती प्रत्येक मार्गाच्या त्याच्या स्वतःच्या सर्वोच्च देवता आहेत. 1. शक्ती : देव शक्ती उपासना 2. शिव: उपासना देव शिव, 3. सूर्यः देव रवि, 4. वैष्णव: उपासना देव विष्णू आणि 5. गणपती : देव गणेश. यापैकी, दीर्घ काळापासून शक्ती पूजा एक जाते. शक्ति देवी महालक्ष्मी असा याचा अर्थ आहे.
कोल्हापूरची देवी महालक्ष्मी ही बोलीभाषेत आई अंबाबाई म्हणून ओळखली जाते. अंबा म्हणजे माता आणि बाई हे आदरातिथ्य. अर्थात जगाची माता अंबाबाई. योग शास्त्र मते, यात् मानवी शरीरातिल् त्यात 'सात' चक्रे आणि विश्व समाविष्टीत आहे. 'मूलाधारचक्र' त्याची देवी महालक्ष्मी आहे.
श्री दुर्गा सप्तशती नुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) ही साक्षात प्रधान प्रकृती. तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती असे तिचे स्वरूप. त्रिदेवांची निर्मिती करताना महालक्ष्मीने स्व:तत्वातून ब्रम्हा व लक्ष्मी प्रकट केले. हीच लक्ष्मी महासरस्वती पुत्र विष्णूंची अर्धांगिनी होय. लक्ष्मी विष्णूंच्या अनेक अवतारात सोबत असे. राम अवतारात सिता, कृष्ण अवतारात रूक्मिणी आणि बालाजी अवतारात पद्मावती.
भृगू ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ मारली. आपल्या स्थानाचा अपमान केला तरी पतींनी ऋषींना शासन केले नाही. ह्या रागाने श्री लक्ष्मी देवी आपल्या माहेरी करवीर नगरी आपल्या आई महालक्ष्मीकडे आली. आणि इथेच राहिली. कडक तपश्चर्या केल्याने विष्णूंना श्री लक्ष्मी पुन्हा प्रसन्न झाली. आणि म्हणूनच शारदीय नवरात्रीत दरवर्षी तिरूपती बालाजीवरून आई ह्या नात्याने करवीर महालक्ष्मीसाठी मानाचा सोन्याने मढलेला भरजरी शालू येतो. अनेकांना वाटते करवीरची महालक्ष्मी (अंबाबाई) ही बालाजीची पत्नी आहे. पण तसे नाही बालाजी हे महालक्ष्मी (अंबाबाई) चे जावई आहे. तर महालक्ष्मी ही लक्ष्मीची आई असल्याने बालाजी यांची सासूबाई आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.