लहान बीज असलेले तृण धान्य From Wikipedia, the free encyclopedia
भरड धान्य किंवा कदन्न (IPAc-en: ˈmɪlɪts; उच्चार:मिलेट्स)[1] हा लहान-बीज असलेल्या तृण वर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट आहे, जो जगभरात जनावरांचा चारा आणि मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. साधारणतः भरड धान्ये ही आकाराने बारीक, गोलाकार तसेच खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला विशेष प्रकारची शुद्धता किंवा कोणतीही विशेष प्रक्रिया करण्याची गरजच नाही. सामान्यतः भरड धान्य किंवा मिलेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुतेक प्रजाती Paniceae या जमातीच्या आहेत, परंतु काही इतर विविध जमातीच्या देखील आहेत.[2]
भरड धान्यास श्रीअन्न देखील म्हणले जाते. पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ वापरून या धण्यावरील साल/साळ किंवा कवच भरडून काढले जात असे. त्या नंतर याचे गरजेनुसार जात्यावर दळून पीठ देखील केले जात असे. यामुळे या धान्याला भरड धान्य असे म्हणले जात असे. देश स्तरावरील बहुतेक शेतकरी खाण्यासाठी ही धान्ये विशेष करून पिकवत असे.[3] ज्वारी आणि बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्ये असून त्यांना ‘ग्रेटर मिलेट’ म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊनटौप ही सर्व ‘मायनर मिलेट’ किंवा ‘बारीक धान्ये’ म्हणून ओळखली जातात. तर राजगिरा आणि बकव्हीट (कुट्टू) यांना 'स्यूडो मिलेट्स' किंवा 'छद्म भरड धान्य' असे म्हणतात.[4][5]
भरड धान्य ही आशिया आणि आफ्रिकेच्या अर्ध- उष्ण कटिबंधातील; विशेषतः भारत, माली, नायजेरिया आणि नायजर मधील महत्त्वाची पिके आहेत. ज्यात विकसनशील देशांचा जागतिक उत्पादनाच्या ९७% वाटा आहे. [6] कोरड्या, उच्च-तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्याची उत्पादकता आणि वाढीसाठीचा छोटा हंगाम यामुळे हे पीक फायदेशीर आहे.
जगाच्या अनेक भागांमध्ये भरड धान्य हे स्थानिक पीक आहे.[7] ज्वारी आणि बाजरी ही भारत आणि आफ्रिकेच्या काही भागातील महत्त्वाची पिके असून, सर्वात मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात.[8] त्याव्यतिरिक्त नाचणी, वरी आणि राळे याही भरड धान्याच्या काही महत्त्वाच्या प्रजाती आहेत.
भरड धान्ये सुमारे ७,००० वर्षांपासून मनुष्य प्राण्याच्या आहारातील एक मुख्य धान्य असावे आणि संभाव्यतः बहु-पिक शेती आणि स्थिर शेती सोसायटीच्या वाढीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.[9]
सामान्यतः, भरड धान्य हे तृणवर्गीय कुटुंबातील लहान-दाणेदार, वार्षिक, उबदार हवामानातील तृणधान्ये असतात. ते दुष्काळ, रोग आणि इतर अत्यंत विपरीत परिस्थितीला उत्तम सहनशील असतात. याशिवाय इतर प्रमुख तृणधान्यांइतकेच यात पोषक घटक असतात.[10]
भारतातून संयुक्त अरब अमिराती, नेपाळ, सौदी अरेबिया, लिबिया, ओमान, इजिप्त, ट्युनिशिया, येमेन, यु.के. आणि अमेरिका या प्रमुख देशांमध्ये भरड धान्ये निर्यात होतात. यात बाजरी, नाचणी, कांगणी, राळे, वरी, राजगिरा ज्वारी आणि कुट्टू (बकव्हीट) हे भारतामधून निर्यात होणाऱ्या भरड धान्यांचे विविध प्रकार आहेत.तर इंडोनेशिया, बेल्जियम, जपान, जर्मनी, मेक्सिको, इटली, यू.एस.ए., युनायटेड किंग्डम, ब्राझील आणि नेदरलँड्स हे प्रमुख देश इतर विविध देशातून भरड धान्ये आयात करतात.
भारत सरकार द्वारा निर्मित भारतीय भरड धान्ये संशोधन संस्था (ICAR-IIMR) ही राजेंद्रनगर (हैदराबाद, तेलंगणा, भारत) येथे ज्वारी आणि इतर भरड धान्यावरील मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन करणारी एक कृषी संशोधन संस्था आहे. ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत कार्यरत आहे.[11] भरड धान्याचे प्रजनन, सुधारणा, पॅथॉलॉजी आणि मूल्यवर्धन यावर ही संस्था कृषी संशोधन करते. या संस्थेची स्थापना १९५८ मध्ये प्रथम कापूस, तेलबिया आणि भरड धान्य (PIRCOM) वरील गहन संशोधन प्रकल्पांतर्गत करण्यात आली. २०१४ मध्ये ही संस्था 'भा कृ स प - भा भ धा सं सं' म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आली आहे.[12]
भरड धान्य किंवा मिलेट्स हे कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत येणारे पौष्टिक पीक आहेत. भारतात हे मोठ्या प्रमाणात पिकते आणि निर्यात होते. भरड धान्याच्या जगातील एकूण उत्पादनापैकी ४०% पेक्षा जास्त भरड धान्य हे भारतात पिकवले जाते. याला फारशी निगा राखण्याची गरज नाही, यावर रोग कमी पडतात. तसेच याची खते आणि पाण्याची गरज देखील कमी असते. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले जावे यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिलेल्या प्रस्तावाला ७२ देशांनी पाठींबा दिल्यानंतर युनायटेड नेशन ने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारतीय भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने १६ आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शने तसेच खरेदीदार-विक्रेता भेटींच्या माध्यमातून निर्यातदार, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा सहभाग वाढविण्याची विविध योजना आखल्या आहेत.[13][14] भरड धान्ये ही पौष्टिक तृणधान्य (न्यूट्री-सिरियल्स)’ म्हणून देखील ओळखली जातात. तसेच ही पचायला देखील हलकी असतात. भरड धान्य नियमित पेरल्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून मातीचा पोत बऱ्यापैकी सुधारतो. ही धान्ये पाळीव तसेच मुक्त पशु-पक्ष्यांचे आवडते खाद्य असून या कारणाने जैवविविधता वाढते.[15]
भरड धान्याच्या विविध प्रजातींचा एकमेकांशी जवळचा संबंध असेलच असे नाही. हे सर्व Poaceae (गवत वर्गीय तृणधान्य) कुटुंबाचे सदस्य आहेत परंतु ते वेगवेगळ्या जमाती किंवा अगदी उपकुटुंबातील असू शकतात.[8]
भरड धान्याचे अनेक प्रकार असून अंदाजे सोळा प्रमुख प्रकारची भरड धान्ये ही भारतात पिकवली आणि निर्यात केली जातात. ज्यात ज्वारी(सोर्घम), बाजरी(पर्ल मिलेट), नाचणी किंवा नागली (फिंगर मिलेट), कांगणी किंवा राळे (फॉक्स टेल मिलेट/ मायनर मिलेट), भगर किंवा वरी किंवा वरई (बार्नयार्ड मिलेट), चेना/पुनर्वा (प्रोसो मिलेट), कोद्रा (कोदा/कोदो मिलेट), सावा/साणवा/झांगोरा (लिटल मिलेट), कुटकी (कोराळे/पॅनिकम मिलेट), बकव्हीट/कुट्टू (टू स्युडो मिलेट), राजगिरा (अमेरॅन्थस) आणि ब्राऊन टॉप मिलेट आदी भरड धान्यांचा समावेश आहे.[16][17]
भरड धान्य ही अत्यंत पौष्टिक, फायटोकेमिकल्स युक्त, ग्लूटेन मुक्त, बहुतांश आम्ल (ॲसिड) निर्माण न करणारी आणि ॲलर्जीविरहित असतात. खासकरून ग्लूटेन असहिष्णु असलेल्या लोकांसाठी भरड धान्य ही उपकारक ठरतात. त्यात भरपूर आहेत व ग्लुटेन नाही. मिलेटमुळे ॲलर्जी होत नाही, असे निरीक्षण आहे. भरड धान्याचे सेवन केल्यास रक्तातील शर्करा ट्रायग्लिसराइड्स आणि सी-रिॲक्टिव्ह प्रोटीनचे प्रमाणात घट होते, ज्यामुळे हृदयविकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग टळतात. ही धान्य तंतुमय (फायबर युक्त) असतात. आहारातील तंतूमध्ये पाणी शोषून घेऊन फुग्ण्याची क्षमता असते, ज्यामुळे अन्न आतड्यात हळू हळू पुढे सरकते. यामुळे पचनाचा कालावधी वाढतो. पर्यायाने आतड्याची दाहकता कमी होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते. ही धान्ये आपल्या पचनसंस्थेतील उपयुक्त जिवाणूंसाठी प्रोबायोटिक खाद्य म्हणून कार्य करतात. ही धान्ये आपल्या मोठ्या आतड्यात ओलावा निर्माण करतात. यामुळे बद्धकोष्ठता होण्यापासून आपली सुटका होते. ही धान्ये नियासिन कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करतात. हे पदार्थ खाल्यास आपल्या शरीरातील अन्नाचा ट्रान्झिट टाइम वा पचनाचा काळ वाढवण्यात मदत होते. तसेच यातील शर्करा हळूहळू प्रसारित होते, ज्यामुळे यात साखर असूनदेखील मधुमेहाचा त्रास होत नाही. यामुळे टाईप टू प्रकारच्या मधुमेहात भरड धान्य खाणे आरोग्यास लाभदायक ठरते.[5] याशिवाय त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट आहेत. इतर क्षार व जीवनसत्त्वेसुद्धा मुबलक आहेत. म्हणून भरड धान्ये पचायला हलकी आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही फारच उत्तम.[19]
भरड धान्यात पोषक तत्व आणि आहारातील फायबर जास्त असतात. ते प्रथिने, सूक्ष्म पोषकतत्व आणि फायटोकेमिकल्सचा चांगला स्रोत म्हणून काम करतात. भरड धान्यात ७-१२% प्रथिने, २-५% मेद, ६५-७५% कर्बोदके आणि १५-२०% आहारातील फायबर असतात. तृणधान्यातील प्रथिनांप्रमाणेच, भरड धान्याचे प्रथिने हे लाइसिनचे अल्प स्रोत आहेत, परंतु ते लाइसिन - समृद्ध भाज्या (शेंगायुक्त) आणि मांसाहारी प्रथिने यांच्याशी उत्तम प्रकारे पूरक आहेत जे उच्च जैविक मूल्यांचे पौष्टिकदृष्ट्या संतुलित संमिश्र तयार करतात. तसेच काही भरड धान्ये ही फॉस्फरस आणि लोहाचा चांगला स्रोत आहेत. तसेच ही धान्य फायटेट्स, पॉलीफेनॉल्स, टॅनिन, अँथोसायनिन्स, फायटोस्टेरॉल आणि पिनाकोसॅनॉलसह अँटिऑक्सिडंट क्रियाकलापांमध्ये योगदान देतात. ज्यामुळे वृद्धत्व आणि चयापचयाच्या आजारात यांची भूमिका महत्त्वाची ठरते. सर्व प्रकारची भरड धान्ये ही उच्च अँटिऑक्सिडेंट ने परिपूर्ण असतात.[5]
तक्ता १[20]
घटक (प्रति 100 ग्रॅम (कच्चे धान्य)) |
गहू | तांदूळ | मका | ज्वारी | चेना | कोद्रा[21] |
---|---|---|---|---|---|---|
पाणी (g) | १३.१ | 12 | ७६ | ९.२ | ८.७ | |
ऊर्जा (kJ) | १३६८ | १५२७ | ३६० | १४१८ | १५८२ | १४६२ |
प्रथिने (ग्रॅ) | १२.६ | ७ | ३ | ११.३ | ११ | ९.९४ |
चरबी (ग्रॅ) | १.५ | १ | १ | ३.३ | ४.२ | ३.०३ |
कर्बोदके (ग्रॅ) | ७१.२ | ७९ | १९ | ७५ | ७३ | ६३.८२ |
फायबर (ग्रॅ) | १.२ | १ | ३ | ६.३ | ८.५ | ८.२ |
साखर (ग्रॅ) | ०.४ | >०.१ | ३ | १.९ | ||
लोह (मिग्रॅ) | ३.२ | ०.८ | ०.५ | ४.४ | ३ | ३.१७ |
मॅंगनीज (मिग्रॅ) | ३.९ | १.१ | ०.२ | <०.१ | १.६ | |
कॅल्शियम (मिग्रॅ) | २९ | २८ | २ | २८ | ८ | ३२.३३ |
मॅग्नेशियम (मिग्रॅ) | १२६ | २५ | ३७ | <१२० | ११४ | |
फॉस्फरस (मिग्रॅ) | २८८ | ११५ | ८९ | २८७ | २८५ | ३०० |
पोटॅशियम (मिग्रॅ) | ३६३ | ११५ | २७० | ३५० | १९५ | |
जस्त (मिग्रॅ) | २.६ | १.१ | ०.५ | <१ | १.७ | ३२.७ |
पॅन्टोथेनिक ऍसिड (मिग्रॅ) | ०.९ | १.० | ०.७ | <०.९ | ०.८ | |
जीवनसत्व ब६ (mg) | ०.३ | 0.2 | ०.१ | <०.३ | ०.४ | |
फोलेट (µg) | ३८ | ८ | ४२ | <२५ | ८५ | |
थायामिन (मिग्रॅ) | ०.३८ | ०.१ | 0.2 | 0.2 | ०.४ | ०.१५ |
रिबोफ्लेविन (मिग्रॅ) | ०.१ | >०.१ | ०.१ | ०.१ | ०.३ | २.० |
नियासिन (मिग्रॅ) | ५.५ | १.६ | १.८ | २.९ | ०.०९ |
तक्ता २[22]
पीक / पोषक | प्रथिने (ग्रॅ) | फायबर (ग्रॅ) | खनिजे (ग्रॅ) | लोह (मिग्रॅ) | कॅल्शियम (मिग्रॅ) |
---|---|---|---|---|---|
ज्वारी | १० | ४ | १.६ | २.६ | ५४ |
बाजरी | १०.६ | १.३ | २.३ | १६.९ | ३८ |
नाचणी | ७.३ | ३.६ | २.७ | ३.९ | ३४४ |
राळे | १२.३ | ८ | ३.३ | २.८ | ३१ |
चेना | १२.५ | २.२ | १.९ | ०.८ | १४ |
कोद्रा | ८.३ | ९ | २.६ | ०.५ | २७ |
सावा | ७.७ | ७.६ | १.५ | ९.३ | १७ |
भगर | ११.२ | १०.१ | ४.४ | १५.२ | ११ |
हिरवी कांग | ११.५ | १२.५ | ४.२ | ०.६५ | ०.०१ |
क्विन्वा | १४.१ | ७ | * | ४.६ | ४७ |
टेफ | १३ | ८ | ०.८५ | ७.६ | १८० |
फोनियो | ११ | ११.३ | ५.३१ | ८४.८ | १८ |
तांदूळ | ६.८ | ०.२ | ०.६ | ०.७ | १० |
गहू | ११.८ | १.२ | १.५ | ५.३ | ४१ |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.