From Wikipedia, the free encyclopedia
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात. दिवाळीअंक हे मराठी वाङ्मयीन संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण अंग आहे. दिवाळी सणाच्या सुमारास निघणाऱ्या विशेष अथवा वार्षिक नियतकालिकांना दिवाळी अंक असे म्हणतात.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मनोरंजन हा सन १९०९ साली छापला गेलेला मराठीतला प्रथम दिवाळी अंक होता.[1] सन २००९ मध्ये दिवाळी अंकांचे शतक पूर्ण झाले आहे. दिवाळीचा फराळ, फटाके, मिठाया या समवेतच दिवाळी अंक ही सुशिक्षित व साहित्यप्रेमी घरांसाठी एक आवश्यक घटक आहे. पूर्वीच्या दिवाळी अंकांत मनोरंजनासमवेतच परंपरा, संस्कृती याची माहिती असे. काळानुरूप त्यात बदल झाला आहे.
महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात.
अनेक मराठी वृत्तपत्रेही वाचकांसाठी दिवाळी अंक काढत आहेत.त्यासोबतच आरोग्य, खेळ यांसारख्या अनेक विषयांना वाहिलेले दिवाळी अंकदेखील छापण्यात येतात. या सोबतच ऑडियो व्हिज्युअल दिवाळी अंकही निघत आहेत.
कवियत्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या मते "एके काळी वाचकांनाही झिंग यावी अशा अंकांची निर्मिती होत असे. अनेक लेखक आपले उत्कृष्ट लेखन दिवाळी अंकासाठी राखून ठेवायचे. दिवाळी अंकांनी वाचकांना वाङ्मयीन दृष्टी दिली. वाचक अभिरुचीवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी दिवाळी अंकांनी समर्थपणे पेलली आहे. त्यामुळेच दिवाळीचा सण केवळ चार दिवसांपुरताच मर्यादित न राहता कालविस्तार करून तो चार महिन्यांचा झाला. लेखक नसलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना लिहिते करण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे." चंद्रहास जोशींच्या मते "दिवाळी अंकाची एक ठराविक चाकोरी निर्माण झालेली असली, तरी काही विशिष्ट क्षेत्र निवडून वाचकांना विचारप्रवण करण्याची योजकंताही त्यांतून दिसून येते. विशेषतः काही दिवाळी अंकांतून महत्त्वपूर्ण परिसंवादांचे पद्धशीर संयोजन केले जाते व त्यामुळे त्यांची उपयुक्तता कायम स्वरूपाची ठरते."[2]
१९०५ साली श्री. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या 'मित्रोदय' या मासिकाने दिवाळी विशेष अंक काढला होता. 'नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ' असा उल्लेख या मासिकावर होता. पूर्णपणे वाङ्मयाला प्राधान्य देणारा हा अंक होता. २४ पानांच्या या अंकात कादंबरी, चरित्र, वैचारिक निबंध असा मजकूर होता. १६ पानं मराठीत आणि ८ पानं इंग्रजीत होती.रुढार्थानं हा दिवाळी अंक नसला तरी, वा. गो. आपटे ह्यांच्या संपादनाखाली प्रकशित आनंद मासिकाच्या १९०७ आणि १९०८ च्या ऑक्टोबर अंकातून दिवाळी निमीत्त विशेष लेख प्रसिद्ध झाले होते.[3] दिवाळी अंक या उद्देशास वाहून घेतलेल्या पहिल्या दिवाळी अंकाचा मान काशिनाथ रघुनाथ मित्र(२ नोव्हेंबर १८७१ - २३ जून १९२०[4]) यांनी संपादित केलेल्य १९०९ साली प्रकाशित 'मनोरंजन' दिवाळी अंकास जातो.
आरंभ मासिकाचा पहिला दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रकाशित झाला. हा दिवाळी अंक पूर्णपणे ऑनलाईन आणि डिजिटल असून मासिक फक्त अँड्रॉइड ऍप्प द्वारे प्रकाशित होते. [5] याचे संपादक आहेत अभिषेक ठमके.[6]
(या विभागात प्रस्तावित स्पर्धांची माहिती मुळीच देऊ नये.झालेल्या स्पर्धांत पुरस्कृत दिवाळी अंकांच्या/लेखांच्या/लेखकांच्या संदर्भाने केवळ ससंदर्भ परिच्छेद लेखन करावे.पुरस्कृत दिवाळी अंकांची यादी स्पर्धा आणि पुरस्कार प्राप्त दिवाळी अंकांची यादी येथे जोडावी.)
इ.स. १८८५ मध्ये सुरू झालेल्या आणि का.र. मित्र हे संपादक आणि मालक असलेल्या ’मनोरंजन’ मासिकाने मराठीतला पहिला दिवाळी अंक काढला होता.
हल्ली मराठी नियतकालिकांच्या सृष्टीत प्रतिवर्षी दिवाळी अंकांची पर्वणी असते. लेखक, प्रकाशक, संपादक व वाचक, सर्वांचाच उत्साह तेव्हा जणू शिगेला पोचतो; ललित वाङ्मयाच्या अनेक शाखांमधील प्रतिवर्षाच्या स्थितिगतीचे स्वरूप एकदम लक्षात येण्याला वाव मिळतो. ह्या योजनेला ‘मनोरंजन’ने चालना दिली.
‘मनोरंजन’ने आपल्या १९०१ च्या नोव्हेंबरच्या अंकात दिवाळीसंबंधी काही खास लेख घालून आणि अधिक कविता व गोष्टी देऊन दिवाळीनिमित्त आपला पहिला थोडा मोठा अंक काढलेला आढळतो.
असे असले तरी खऱ्या अर्थाने ‘मनोरंजन’ने १९०९ मध्ये मराठी नियतकालिकांच्या सृष्टीतील खरा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध केला. बालकवींची ‘आनंदी आनंद गडे’ चंद्रशेखर यांची ‘कवितारति’ ह्या प्रसिद्ध कविता, वि.सी. गुर्जर ह्यांचे ‘वधूंची अदलाबदल’ हे प्रसिद्ध प्रहसन आणि महाराष्ट्रातील तत्कालिन प्रसिद्ध लेखक, प्रकाशक, वकील, मुत्सद्दी, नट इत्यादींची छायाचित्रे ही ह्या अंकाची काही वैशिष्ट्ये होती.
पुुढील वर्षीच्या म्हणजे १९१० च्या ’मनोरंजन’च्या दिवाळी अंकातील ‘महाराष्ट्राला चिरस्मरणीय' अशा जवळजवळ एकशे-पंधरा ‘विभूतीं’ची दुर्मीळ छायाचित्रे व त्रोटक चरित्रे आणि ‘वधुवरांच्या लग्नाची वयोमर्यादा’ या विषयावरील विद्वानांचा परिसंवाद, हे दोन विशेष लक्षणीय गोष्टी होत्या.
‘मनोरंजन’ने १९१४ साली दिवाळी अंकाबरोबर खास ललित साहित्याला वाहिलेला ‘वसंत’ अंक काढायला सुरुवात केली. ‘मनोरंजन’ने आपल्या पहिल्या ‘वसंत’ अंकात प्रथमच आपल्या सर्व लेखक-लेखिकांची छायाचित्रे दिली होती.
‘मनोरंजन’चा १९११ सालचा अंक ‘दिल्ली दरबार विशेषांक’ होता. त्या अंकात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा ‘आमचे बैठे खेळ’ हा प्रसिद्ध विनोदी लेख व विठ्ठल सीताराम गुर्जर यांची ‘हरवलेली आंगठी’ ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती. ‘आमचे महाराष्ट्रीय राजपुरुष’ ही सचित्र चरित्रमाला हे सदर अंकाचे विशेष आकर्षण होते.
ह्या 'खास' अंकांच्या क्षेत्रातील ‘मनोरंजन’ची वाङ्मयाच्या व समाजेतिहासाच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी म्हणजे त्याने प्रसिद्ध केलेले व्यक्तिविशेषांक : १९१६ साली काढलेला गोपाळ गणेश आगरकर खास अंक, १९१८ साली काढलेला महर्षी धोंडो केशव कर्वे ज्युबिली खास अंक व १९१९ साली काढलेला हरी नारायण आपटे खास अंक. हे खास अंक पुढे ‘रत्नाकर’, ‘प्रतिभा’, ‘पारिजात’, ‘ज्योत्स्ना’ यांच्या काळात प्रसिद्ध झालेल्या तशा प्रकारच्या अनेक अभ्यसनीय खास अंकांचे अग्रदूत ठरले. त्यातील लेखन मोठ्या आस्थेने जमवलेले व संपादित केलेले आहे. त्यातील बहुमोल लेखांबरोबर त्यातील दुर्मीळ छायाचित्रे व त्यात गोपाळ गणेश आगरकर व हरी नारायण आपटे ह्यांच्या हस्ताक्षरांचे नमुने दिले होते. ‘मनोरंजन’ने व्यक्तिविशेषांकाप्रमाणेच राजकारण, समाजकारण, धर्मकारण, वाङ्मय ह्यांपैकी कोणत्याही क्षेत्रातील एखादी व्यक्ती दिवंगत होताच त्या व्यक्तीच्या निधनाची वार्ता एका अंकात देऊन त्याच्या पुढील अंकात तिच्या कार्याची यथार्थ कल्पना देणारा सचित्र लेख देण्यात कधीच कसूर केली नाही.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले, दाजी आबाजी खरे ह्यांच्यापासून ते थेट केशवसुत, राम गणेश गडकरी, बालकवी, रेव्हरंड टिळक ह्या वाङ्मयसेवकांपर्यंत सर्वांवर ‘मनोरंजन’मध्ये मृत्युलेख लिहिले गेले आहेत व ते सगळे मृत्युलेख वाचनीय आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.