जयपूर
राजस्थानची राजधानी From Wikipedia, the free encyclopedia
राजस्थानची राजधानी From Wikipedia, the free encyclopedia
जयपूर शहर ही राजस्थानची राजधानी आहे. जयपूरला 'गुलाबी शहर' म्हणूनही ओळखले जाते. जयपूर पूर्वीच्या संस्थानाचेही राजधानीचे ठिकाण होते. या शहराची स्थापना इ.स. १७२८ मध्ये दुसऱ्या महाराजा जयसिंह यांनी केली. येथील लोकसंख्या इ.स. २००३ मध्ये जवळजवळ २७ लाख होती. जगभरातील 167 जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामाविष्ट झालेले जयपूर हे देशातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे ठिकाण आहे. राजा सवाई जयसिंग यांनी वाढती लोकसंख्या आणि पाण्याचे दुर्भिक्ष यावर मात करण्यासाठी सन १७२७मध्ये आपली राजधानी आमेरहून जयपूर येथे आणली. वास्तुविशारद विद्याधर भट्टाचार्य यांनी रचना केलेले हे शहर नगर नियोजन आणि मध्ययुगीन वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून ओळखले जाते. गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या रंगामागेही एक कथा आहे. प्रिन्स अल्बर्टच्या स्वागतासाठी राजा सवाई रामसिंग दुसरे यांनी शहरातील सर्व वास्तू टेराकोटा गुलाबी रंगात रंगवून घेतल्या होत्या. भेटीनंतर ही रंग कायम ठेवण्यासाठी कोणत्याही इमारतीला अन्य रंग देणे अनधिकृत ठरवणारा कायदा करण्याचा सल्ला राणीने राजाला दिला. हा नियम आणि त्यामुळे जयपूरचे गुलाबी शहर हे बिरूदही आज कायम राहिलेले आहे. जयपूरमध्ये अनेक प्रेक्षणीय वास्तू स्थळे आहेत. अमर किल्ला हा जयपूरमधील सरोवराच्या काठी उभ्या असलेल्या या किल्ल्यावर मुघल वास्तुकलेचा प्रभाव आहे किल्ल्याचे बांधकाम लाल वालुकाश्म आणि संगमरवरात करण्यात आलेले आहे. येथील शीश महल अतिशय सुंदर आणि देखणा विभाग आहे. सध्या त्याच्या जतनाची आणि संवर्धनाची प्रक्रिया सुरू आहे. जयपूरला एक नवी ओळख मिळालेली आहे. ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे शहर म्हणून संपूर्ण जगभरातून पर्यटक या शहराला भेट देतात.
?जयपूर राजस्थान • भारत | |
— राजधानी — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
२००.४ चौ. किमी • ४३१ मी |
जिल्हा | जयपूर |
लोकसंख्या • घनता |
३३,२४,३१९ (२००५) • १६,५८८/किमी२ |
महापौर | अशोक परनामी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • UN/LOCODE • आरटीओ कोड |
• 302 0xx • +१४१ • INJAI • RJ-14 |
संकेतस्थळ: जयपूर महानगरपालिका संकेतस्थळ | |
जयपूर शहर येथील महाल आणि जुन्या घरांसाठी वापरलेल्या गुलाबी दगडांसाठी प्रसिद्ध आहे. पूर्ण शहर सहा भागांत १११ फुटी रस्त्यांनी विभागले आहे. जगभरातील लोक जयपूरला आधुनिक शहरी योजनाकार सर्वात नियोजित आणि व्यवस्थित शहरांमध्ये गणतात. एकोणविसाव्या शतकात जयपूर शहराचा विस्तार सुरू झाला. त्यावेळी त्याची लोकसंख्या १,६०,००० होती. येथील मुख्य उद्योग धातुकाम, संगमरमर, वस्त्र-छपाई इत्यादी आहेत.
जयपूरमध्ये सिटी पॅलेस, जंतर मंतर, हवामहल, अंबर महाल, मुबारक महल, जलमहल, इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. जयपूर हे भारतातील सर्व सुंदर शहरांतले एक आहे. भारताच्या पर्यटनातील सुवर्ण त्रिकोणात (जयपूर-आग्रा-दिल्ली) जयपूर शहर मोडते. जयपूर शहराचे महाराजा दुसरे सवाई जयसिंह ह्यांनी सन १६९९ ते १७४४ पर्यंत राज्य केले, तेव्हा त्यांची राजधानी अंबर होती. अंबर हे शहर आजच्या जयपूरपासून ११ किलोमीटरवर आहे. जयपूरचा आमेर किल्ला प्रसिद्ध आहे. सरोवराकाठी उभ्या असलेल्या या किल्ल्यावर मुघल वास्तुकलेचा प्रभाव आहे. किल्ल्याचे बांधकाम लाल वालुकाश्म आणि संगमरवरात करण्यात आलेले आहे. येथील शीशमहल हा महत्त्वाचा विभाग आहे. या किल्ल्याचे जतन आणि संवर्धनाची प्रक्रिया सुरू आहे. येथील सुख निवासात पाण्याचे खुले कालवे बांधून त्या काळातही वातानुकूलनाची किमया साधण्यात आलेली होती. जयगड हा आमेर किल्ल्याच्या वरच्या बाजूला डोंगरावर असलेला किल्ला आहे. या किल्ल्यात खजिना दडवल्याचे सांगितले जात असे. आणिबाणीच्या काळात हा खजिना शोधण्यासाठी किल्ल्यात शोध मोहीमही राबविण्यात आली होती. मात्र हे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. खऱ्या अर्थाने जयगड या ठिकाणी तोफ निर्मिती केली जात असे. येथील जयवान ही त्या काळातील सर्वात मोठी कार्यक्षम आणि शक्तिशाली तोफ होती.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सवाई जयसिंग दुसऱ्यांनी उभारलेले जंतर-मंतर हे ठिकाण महत्त्वपूर्ण आहे. हे ठिकाण त्या काळातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची साक्ष देणारे आहे. अंतराळ विज्ञानाचा अभ्यास, काळ वेळेचे गणित, सूर्य-चंद्र आणि अन्य ग्रहांच्या हालचालींच्या नोंदी ठेवण्याच्या उद्देशाने त्यांनी देशभरात पाच ठिकाणी अशा रचना उभारल्या होत्या. त्यापैकीच ही एकमहत्त्वाची रचना आहे. जयपूर मधील हवामहल हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सवाई जयसिंग यांचे नातू सवाई प्रतापसिंग यांच्या काळात उभारण्यात आलेल्या या वास्तूची रचना लालचंद उस्ताद यांनी केली. या पाच मजली इमारतीत ९५३ झरोके आहेत. तिची रचना मधमाशांच्या पोळ्या प्रमाणे आहे. प्रत्येक झोक्यावर अप्रतिम नक्षीकाम करण्यात आलेले आहे. राजघराण्यातील स्त्रियांना बाहेरील घडामोडी पाहता याव्यात म्हणून झरोक्याची सोय करण्यात आलेली होती. त्यामुळे उत्तम वायुविजन होऊन आतील हवा थंड राहत असे. सिटी पॅलेस हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे सन १९४९पर्यंत जयपूरच्या महाराजांचे अधिकृत शासकीय केंद्र असलेल्या सिटी पॅलेसमध्ये आता महाराजा सवाई मानसिंग दुसरे यांचे संग्रहालय आहे. राजघराण्याचे वंशज आजही तेथे राहतात. जेव्हा राजा महालात असतो, तेव्हा महालावर त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ध्वज फडकत असतो. औरंगजेबाने राजा जयसिंग यांना सवाई म्हणजेच इतर समकालीन राज्यकर्त्यापेक्षा अधिक शक्तिशाली म्हणून गौरविले होते. त्याचे प्रतीक म्हणून त्याच्या पूर्ण ध्वजाच्या वरच्या भागात त्यापेक्षा लहान आकाराचा आणखी एक ध्वज फडकत असतो. येथील अनेक वास्तूंचे सौंदर्य काळाच्या ओघात काहीसे नष्ट झालेले आहे. युनेस्कोने जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये स्थान दिल्यामुळे त्याला नवी झळाळी मिळण्याच्या आणि पर्यटनाला आणखी चालना मिळण्याच्या आशा निर्माण झालेल्या आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.