From Wikipedia, the free encyclopedia
हिंदू पौराणिक साहित्यानुसार अहल्या (मराठी लेखनभेद: अहिल्या) ही ब्रह्मदेवाची मानसकन्या व शरद्वत् गौतम ऋषीची पत्नी होती[1]. देवांचा राजा इंद्र याच्यासह हिने केलेल्या जारकर्म उघडकीस आल्यावर संतापलेल्या शरद्वत् गौतमाने हिला शाप दिल्याची घटना व पुढे रामाने सीताविवाहाला जाताना हिचा उद्धार केल्याची घटना, अशा हिच्या आयुष्यातील दोन प्रमुख प्रसंगांचे वर्णन वाल्मिकी रामायणात व अन्य पौराणिक साहित्यात आढळते. शरद्वत् गौतमाने दिलेला शाप, ही पातिव्रत्याच्या निष्ठेस जागून भोगत राहिली, म्हणून ही शुद्धचरित मानल्या जाणाऱ्या पंचकन्यांपैकी एक मानली जाते. मात्र त्यासोबतच हिच्या हातून घडलेल्या पापकर्मामुळे पुरुषकेंद्रित दृष्टिकोनाच्या कथासंभारातून हिचे चित्रण पतिता म्हणून केले गेल्याचे आढळते[ संदर्भ हवा ]
अहल्या | |
राजा रविवर्माकृत अहल्या (१८४८ - १९०६) | |
मराठी | अहल्या |
निवासस्थान | गौतम ऋषींचा आश्रम |
पती | गौतम ऋषी |
ब्रह्मदेवाने विश्वातील सर्वांत सुंदर स्त्री म्हणून अहल्येची घडणा केली. तिचा विवाह तिच्यापेक्षा वयाने बरेच मोठे असलेल्या गौतम ऋषींसोबत करून देण्यात आला. सर्वात जुन्या कथेनुसार इंद्र गौतम ऋषींचे रूप घेऊन अहल्येसमोर येतो. तिला हे कळूनही ती इंद्राच्या या कृत्याचा विरोध करत नाही. नंतरच्या कथांमध्ये अनेकदा तिला या दोषातून मुक्त केले गेले व ती इंद्राच्या कपटाला बळी पडली असे मांडण्यात आले. मात्र सर्व कथांनुसार तिला गौतम ऋषी शाप देतात. या शापाचे स्वरूपही ग्रंथांमध्ये वेगवेगळे आहे मात्र सर्वांनुसार राम अहल्येच्या उद्धारास कारणीभूत ठरतो. काही कथांनुसार अहल्येने शापाचे प्रायश्चित्त म्हणून अज्ञातवास स्विकारला व रामाचे आदरातिथ्य करून तिचा हा अज्ञातवास संपला. यानंतर प्रचलित झालेल्या कथांमध्ये असे मांडण्यात आले की ऋषींच्या शापामुळे ती दगड बनली व नंतर रामाचा पाय लागून तिचा उद्धार झाला.
तिची कथा प्राचीन धर्मग्रंथापासून ते आधुनिक साहित्य व कविता तसेच नाट्य व नृत्यांमधून अनेकदा मांडण्यात आली आहे. प्राचीन कथा रामावर केंद्रित असून सद्यःकालीन कथेत अहल्येला केंद्रस्थानी ठेवतात. काही कथांमध्ये तिच्या मुलांचाही उल्लेख केला गेला आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.