Remove ads
ग्रीस देशाची राजधानी From Wikipedia, the free encyclopedia
अथेन्स (ग्रीक: Αθήνα) ही दक्षिण युरोपाच्या ग्रीस देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ३,४०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेले अथेन्स हे जगातील अतिप्राचीन शहरांपैकी एक आहे. इ.स. पूर्व पाचव्या व चौथ्या शतकांदरम्यान शास्त्रीय कला, शिक्षण, तत्त्वज्ञान इत्यादींचे माहेरघर असलेल्या अथेन्स येथेच आधुनिक लोकशाहीची रुजवात झाले असे मानले जाते. सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल इत्यादी सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ व गणितज्ञ ह्याच काळात अथेन्समध्ये कार्यरत होते.[१][२] उज्वल इतिहासाच्या खुणा अथेन्समध्ये आजही जागोजागी आढळतात. युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले अॅक्रोपोलिस तसेच पार्थेनॉन ह्या अथेन्समधील सर्वाधिक प्रसिद्ध वास्तू आहेत.
अथेन्स Αθήνα |
|
ग्रीस देशाची राजधानी | |
गुणक: 37°58′N 23°43′E |
|
देश | ग्रीस |
क्षेत्रफळ | ३८.९६ चौ. किमी (१५.०४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७७८ फूट (२३७ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ६,५५,७८० |
- घनता | १६,८३० /चौ. किमी (४३,६०० /चौ. मैल) |
- महानगर | ३७,३७,५५० |
प्रमाणवेळ | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ |
http://www.cityofathens.gr |
आधुनिक काळातील ग्रीसची राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक राजधानी असलेले अथेन्स हे एक जागतिक शहर आहे. २०११ साली अथेन्सची लोकसंख्या सुमारे ६.५५ लाख[३] तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १६.८३ लाख इतकी आहे. एका सर्व्हेक्षणानुसार २००८ साली अथेन्स जगातील ३२व्या क्रमांकाचे श्रीमंत[४] व २५व्या क्रमांकाचे सर्वात महागडे शहर होते.[५]
अथेन्सचे नाव अथेना नावाच्या देवीवरून पडले असे मानले जाते. ह्यामागील सर्वमान्य दंतकथा अशी की अथेना व पोसायडन ह्या दोघांनी ह्या शहराला आपले नाव देण्यात यावे अशी विनंती केली व त्यांच्यात ह्यासाठी स्पर्धा सुरू झाली. पोसायडनने आपल्या त्रिशूलाने जमिनीवर आघात करून एक खाऱ्या पाण्याचा झरा निर्माण केला तर अथेनाने शांती व समृद्धीचे प्रतिक असलेले ऑलिव्हचे झाड निर्माण केले. अथेन्सच्या नागरिकांनी ऑलिव्हचे झाड स्वीकारले व शहराला अथेनाचे नाव दिले गेले.
अथेन्समधील सर्वात पाहिल्या मानवी वास्तव्याच्या खुणा इ.स. पूर्व ११व्या ते सातच्या सहस्रकादरम्यानच्या काळात सापडल्या आहेत.[६] तसेच अथेन्समध्ये गेली किमान ७,००० वर्षे सलग मानवी वस्ती राहिली आहे असे मानले जाते. इ.स. पूर्व १४०० दरम्यान अथेन्स हे कांस्य युगातील प्रागैतिहासिक ग्रीक संस्कृतीमधील महत्त्वाचे स्थान होते. अॅक्रोपोलिस हे त्या काळी एक किल्ला म्हणून वापरले जात असे. इ.स. पूर्व ९०० च्या आसपास लोह युगादरम्यान अथेन्स हे एक मोठे व्यापार केंद्र व एक सुबत्त शहर होते. ग्रीसमधील अथेन्सचे मध्यवर्ती तसेच समुद्राजवळील स्थान तसेच अॅक्रोपोलिसवरील ताबा ही अथेन्सच्या महत्त्वाची प्रमुख कारणे मानली जातात.
इ.स. पूर्व पाचव्या शतकात अथेन्समध्ये लोकशाहीची स्थापना व येथील सुवर्णकाळाची सुरुवात झाली. ह्या काळात प्राचीन ग्रीसमधील अथेन्स हे सर्वात मोठे सत्ताकेंद्र बनले तसेच पश्चिमात्य संस्कृती व समाजाची पाळेमुळे रोवली गेली. तत्ववेत्ता सॉक्रेटिस, शास्त्रज्ञ हिपोक्रेटस, इतिहासकार हिरोडोटस तसेच लेखक त्रिकुट एशिलस, सॉफोक्लीस व युरिपिडस ह्या प्रसिद्ध व्यक्ती ह्याच काळात अथेन्समध्ये वास्तव्यास होत्या. ह्या काळात अथेन्समध्ये वास्तूशास्त्राचे नवे पर्व आरंभ झाले ज्यादरम्यान अॅक्रोपोलिस, पार्थेनॉन व इतर अनेक इमारती बांधण्यात आल्या. ह्या काळातील सत्तास्पर्धेचे रूपांतर पेलोपोनेशियन युद्धात झाल्या ज्यामध्ये स्पार्टा साम्राज्याने अथेन्सला पराभूत केले.
इ.स. पूर्व ३३८मध्ये मॅसेडोनच्या दुसऱ्या फिलिपने इतर ग्रीक शहर-सत्तांचा पराभव केला व अथेन्सचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले. अलेक्झांडर द ग्रेटच्या कारकीर्दीत अथेन्स सुबत्त परंतु परतंत्र शहर होते. इ.स. पूर्व ८० च्या सुमारास अथेन्स रोमन साम्राज्याच्या ताब्यात आले व येथील अनेक वास्तू उध्वस्त केल्या गेल्या. रोमनांच्या ५०० वर्षांच्या सत्तेदरम्यान अथेन्स एक महत्त्वाचे शैक्षणिक व तत्त्वज्ञान केंद्र होते. अथेन्समधील ख्रिश्चन धर्म ह्याच काळात वाढीस लागला. इ.स. ५२९मध्ये अथेन्सवर बायझेंटाईन साम्राज्याने कब्जा मिळवला व येथपासून अथेन्सचे महत्त्व कमी होउ लागले. येथील अनेक मौल्यवान वस्तू कॉन्स्टेन्टिनोपलला हलवण्यात आल्या. अकराव्या व बाराव्या शतकामध्ये अथेन्सचे महत्त्व पुन्हा वाढले व व्हेनिसमधून अनेक लोक येथे दाखल झाले. ह्या काळात अथेन्सच्या वेगवान प्रगतीचे अनेक पुरावे आढळतात. १२०४ ते १४२८ सालांदरम्यान बोर्गान्य, कातालोनिया व फ्लोरेन्स ह्या तीन लॅटिन साम्राज्यांनी साली अथेन्सवर सत्ता गाजवली.
अखेर इ.स. १४५८ साली ओस्मानी साम्राज्याने अथेन्सवर कब्जा केला. दुसरा मेहमेद अथेन्समध्ये शिरत असताना येथील येथील वास्तूशास्त्राने मोहित झाला व त्याने अथेन्समध्ये लुटालुट व जाळपोळ करण्यावर बंदी आणली. ओस्मानांनी पार्थेनॉनचा वापर मशीद म्हणून करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ३७५ वर्षांच्या राजवटीत अथेन्सचे अतोनात नुकसान झाले व येथील लोकसंख्या झपाट्याने कमी झाली. १८३३ साली अखेरीस ग्रीक स्वातंत्र्यलढ्याला यश मिळाले व ओस्मानांनी अथेन्स सोडले. नव्या ग्रीस देशाची अथेन्स राजधानी नियुक्त केली गेली. ह्या काळापर्यंत अथेन्समधील अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या व शहर जवळजवळ संपूर्णपणे निर्मनुष्य व बकाल झाले होते. ग्रीसची राजधानी बनल्यानंतर मात्र अथेन्सचा वेगाने विकास झाला व येथील लोकसंख्या पुन्हा वाढीस लागली. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात अथेन्समध्ये अनेक उत्कृष्ट इमारती बांधण्यात आल्या. इ.स. १८९६ साली अथेन्समध्ये नव्या युगातील पहिली ऑलिंपिक स्पर्धा भरवली गेली.
दुसऱ्या महायुद्धानंतर अथेन्समधील लोकसंख्येचा स्फोट झाला व पायाभुत सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. १९९० च्या दशकात अनेक नवे प्रकल्प सुरू करण्यात आले तसेच प्रदुषण कमी करण्यासाठी पावले उचलली गेली. इ.स. २००४ साली अथेन्सने पुन्हा ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन केले.
अथेन्स शहर ग्रीसच्या आग्नेय भागातील अॅटिका खोऱ्यात एजियन समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे.
अथेन्सचे हवामान दमट स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे रूक्ष व कडक असतात.
अथेन्स साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
सरासरी कमाल °से (°फॅ) | 12.5 (54.5) |
13.5 (56.3) |
15.7 (60.3) |
20.2 (68.4) |
26.0 (78.8) |
31.1 (88) |
33.5 (92.3) |
33.2 (91.8) |
29.2 (84.6) |
23.3 (73.9) |
18.1 (64.6) |
14.1 (57.4) |
22.5 (72.5) |
दैनंदिन °से (°फॅ) | 8.9 (48) |
9.5 (49.1) |
11.2 (52.2) |
14.9 (58.8) |
20.0 (68) |
24.7 (76.5) |
27.2 (81) |
27.0 (80.6) |
23.3 (73.9) |
18.4 (65.1) |
14.0 (57.2) |
10.5 (50.9) |
17.4 (63.3) |
सरासरी किमान °से (°फॅ) | 5.2 (41.4) |
5.4 (41.7) |
6.7 (44.1) |
9.6 (49.3) |
13.9 (57) |
18.2 (64.8) |
20.8 (69.4) |
20.7 (69.3) |
17.3 (63.1) |
13.4 (56.1) |
9.8 (49.6) |
6.8 (44.2) |
12.3 (54.1) |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 56.9 (2.24) |
46.7 (1.839) |
40.7 (1.602) |
30.8 (1.213) |
22.7 (0.894) |
10.6 (0.417) |
5.8 (0.228) |
6.0 (0.236) |
13.9 (0.547) |
52.6 (2.071) |
58.3 (2.295) |
69.1 (2.72) |
414.1 (16.303) |
सरासरी पर्जन्य दिवस | 12.6 | 10.4 | 10.2 | 8.1 | 6.2 | 3.7 | 1.9 | 1.7 | 3.3 | 7.2 | 9.7 | 12.1 | 87.1 |
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास | 130.2 | 139.2 | 182.9 | 231.0 | 291.4 | 336.0 | 362.7 | 341.0 | 276.0 | 207.7 | 153.0 | 127.1 | २,७७८.२ |
स्रोत: World Meteorological Organization (संयुक्त राष्ट्रे),[७] Hong Kong Observatory[८] for data of sunshine hours |
३९ वर्ग किमी क्षेत्रफळाची व ६,५५,७८० लोकसंख्येची अथेन्स महापालिका ७ जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे. हे जिल्हे केवळ सरकारी उपयोगाकरिता वापरले जातात. अथेन्स महानगर क्षेत्रात ३५ महापालिकांचा समावेश होतो.
अथेन्सचे वास्तूशास्त्र कोणत्या एका विशिष्ट शैलीचे नसुन येथे ग्रीको-रोमन, पारंपारिक व नव्या रचनेच्या वास्तू आढळतात. अथेन्स अकॅडमी, ग्रीस संसद भवन, अथेन्स विद्यापीठ, झेपियोन इत्यादी येथील ऐतिहासिक इमारती पारंपारिक शैलीच्या आहेत. विसाव्या शतकात वेगाने वाढ होत असताना अथेन्समध्ये आधुनिक रचनेच्या इमारती बांधल्या गेल्या.
अथेन्समध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक वाहतूक सेवा उपलब्ध आहेत. ३०० बसमार्ग, २ मेट्रो रेल्वेचे मार्ग, ट्राम व उपनगरी रेल्वे इत्यादींमुळे येथील नागरी वाहतूक सुलभ आहे.
हेलेनिक रेल्वे संस्थेचे अथेन्स हे सर्वात मोठे केंद्र आहे. येथून ग्रीसमधील व युरोपातील अनेक मोठ्या शहरांसाठी रेल्वेगाड्या सुटतात. अथेन्स आंतराष्ट्रीय विमानतळ हा येथील सर्वात मोठा विमानतळ आहे. एजियन एरलाइन्स ह्या ग्रीसमधील प्रमुख विमानकंपनीचे मुख्यालय येथेच आहे.
अथेन्सला क्रीडा इतिहासात मानाचे स्थान आहे. आधुनिक युगातील सर्वात पहिली ऑलिंपिक स्पर्धा अथेन्समध्ये इ.स. १८९६ साली भरवली गेली. २००४ साली अथेन्सने दुसऱ्यांदा ऑलिंपिकचे आयोजन केले. ह्यासाठी १९८२ साली बांधल्या गेलेल्या ऑलिंपिक मैदानाची मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली. तसेच ग्रीसमधील ह्या सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये युएफा चॅंपियन्स लीगच्या १९९४ व २००७ सालचे अंतिम सामने खेळवले गेले.
फुटबॉल हा येथील लोकप्रिय खेळ आहे. ओलिंपिकॉस एफ.सी., पानाथिनाइकॉस एफ.सी. व ए.इ.के. अथेन्स एफ.सी. हे येथील तीन सर्वात यशस्वी व लोकप्रिय फुटबॉल क्लब आहेत.
अथेन्सचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.