भारतीय राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - देहरादून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या.[१] त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या अध्यक्षा होत्या. या दोन्ही पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या.[२][३] त्या भारतातील नेहरू-गांधी या प्रतिष्ठित राजकीय कुटुंबातील सदस्य होत्या. त्यांचे भाऊ जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, त्यांची भाची इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांचे नातू राजीव गांधी हे भारताचे सहावे पंतप्रधान होते.[४]
सोव्हिएत युनियन, युनायटेड स्टेट्स आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहरूंचे दूत म्हणून काम केल्यानंतर पंडित यांना भारताचे सर्वात महत्त्वाच्या मुत्सद्दी म्हणून लंडनला पाठवण्यात आले.[५][६] तसेच भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या संविधान सभेचा भाग असलेल्या १५ महिलांमध्ये त्या एक होत्या.[७][८][९]
विजयालक्ष्मी पंडित | |
---|---|
जन्म |
विजयालक्ष्मी १८ ऑगस्ट १९०० अलाहाबाद |
मृत्यू |
१ डिसेंबर १९९० |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | राजकारणी |
पदवी हुद्दा | राज्यपाल |
कार्यकाळ | १९६२-१९६४ |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
धर्म | हिंदु |
जोडीदार | रणजीत सिताराम पंडित |
अपत्ये | नयनतारा सहगल |
वडील | मोतीलाल नेहरू |
आई | स्वरूप राणी |
नातेवाईक | जवाहरलाल नेहरू |
१८ ऑगस्ट १९०० साली स्वरूपकुमारी (विजयालक्ष्मी) यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांना एक बहीण व एक भाऊ होता. भावाचे नाव जवाहरलाल नेहरू व बहिणीचे कृष्णा नेहरू (हाथीसिंग) असे होते. स्वरूपराणींचा स्वभाव आज्ञाधारक व अतिशय सौम्य असा होता. त्या स्वाभिमानी आणि उत्साही होत्या.
पहिली पाच वर्षे स्वरूपकुमारी यांच्या वडिलांनी घरीच एक इंग्रज शासिका नेमलेल्या होत्या. त्या कडक शिस्तीच्या होत्या. स्वरूपकुमारी पाच वर्षांच्या असताना त्या इंग्लंड येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या, त्यांचे नाव ‘कु’ असे होते. स्वरूप यांचे प्राथमिक शिक्षण घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झर्लंड येथे गेल्या.
अलाहाबादमधील आनंद भवन हे मोतीलाल नेहरूंनी विकत घेतलेले घर होते. सन १९१९ साली ज्यावेळी महात्मा गांंधी तिथे येऊन राहिले तेव्हा त्या घरातच राहणाऱ्या विजयालक्ष्मी त्यानी पंडित अतिशय भारावून गेल्या. पुढे त्यांनी गांधीजींनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक आंदोलनात त्यांनी भाग घेतला. एका आंदोलनातुन सुटका झाल्यावर परत दुसऱ्या आंदोलनात भाग, असे अनेकदा झाले.
स्वरूपकुमारी (विजयालक्ष्मी) यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूपकुमारी यांची भेट काठेवाडचे मराठी भाषक बॅरिस्टर आणि विख्यात संस्कृत विद्वान रणजित सीताराम पंडित यांच्याशी झाली. ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी काश्मिरी लेखक कल्हण याच्या 'राजतरंगिणी' या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते. रणजित पंडित आणि स्वरूपकुमारी यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजित पंडित यांचा विवाह झाला. त्यानंतर स्वरूप नेहरू या ‘विजयालक्ष्मी पंडित’ झाल्या. असहकाराच्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल लखनौच्या तुरुंगात टाकलेल्या रणजित पंडित यांचे तुरुंगातच निधन झाले.
लेखिका नयनतारा सहगल या उभयतांच्या कन्या.
विजयालक्ष्मी पंडित या संसदपटू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पर्यंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. इ.स. १९६४मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या.
विजयालक्ष्मी पंडित या इंग्लंड, रशिया आणि माॅस्को येथे वेगवेगळ्या वेळी भारताच्या राजदूत होत्या.
विजयालक्ष्मी पंडित यांचा मृत्यू १ डिसेंबर १९९० रोजी झाला.
Seamless Wikipedia browsing. On steroids.