मधुकर पिचड
मराठी राजकारणी From Wikipedia, the free encyclopedia
मधुकर काशिनाथराव पिचड (१ जून, १९४१ - ६ डिसेंबर, २०२४) हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते.[१][२] त्यांनी १९८० ते २००९ पर्यंत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. मार्च १९९५ ते जुलै १९९९ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते.[३][४]

पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून केली. त्यानंतर ते १९९९ पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य होते. २०१९ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वैभव पिचड यांच्यासह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.[५][६] तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (महाराष्ट्र प्रदेश) अध्यक्षपद देखील भूषवले होते.[७]
पिचड यांनी १९६१ मध्ये अमृतसागर सहकारी दूध संघ, अकोलेची स्थापना केली होती.[८] ते अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. १९९३ मध्ये स्थापन झालेला हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना होता.[९]
प्रारंभिक आयुष्य आणि कारकिर्द
पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी राजूर, अहमदनगर जिल्ह्यात महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे वडील काशिनाथ पिचड हे शिक्षक, तर आई कमलबाई ह्या घरगृहिणी होत्या.[१०][३]
फर्ग्युसन कॉलेज पुणे येथून त्यांनी बीए एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इथेचत्यांनी विद्यार्थी दशेत राजकारणात प्रवेश केला.[३]
१९७२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यापासून पिचड यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच १९७२ मध्ये पंचायत समिती अकोले तालुका अध्यक्ष म्हणून निवडून येऊन १९८० पर्यंत काम केले.
पिचड यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले.[११]
भूषवलेली पदे
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (I) चे उमेदवार म्हणून १९८० च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि १९८५ पर्यंत काम केले.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९८५ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि १९९० पर्यंत काम केले.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९९० च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि १९९५ पर्यंत त्यांनी काम केले.
- २५ जून १९९१ रोजी आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकन झाले आणि सुधाकरराव नाईक मंत्रालयात ३ नोव्हेंबर १९९२ पर्यंत काम केले.[१२]
- ६ मार्च १९९३ रोजी आदिवासी विकास मंत्रालय, दुग्धविकास मंत्रालय, प्रवास विकास मंत्रालय आणि पशु, संवर्धन आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकित आणि चौथ्या पवार मंत्रालयात १४ मार्च १९९५ पर्यंत काम केले.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून १९९५ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि २००० पर्यंत काम केले.
- २७ ऑक्टोबर १९९९ रोजी तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकन झाले आणि १६ जानेवारी २००३ पर्यंत पहिले देशमुख मंत्रालयात काम केले.
- १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग पाचव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि २००४ पर्यंत काम केले.
- २००४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग सहाव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि २००९ पर्यंत काम केले.
- २००९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग सातव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि २०१४ पर्यंत काम केले.
- ११ जून २०१३ रोजी आदिवासी विकास मंत्रालय, आदिवासी विकास मंत्रालय, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून नामांकित आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्रालयात २६ सप्टेंबर २०१४ पर्यंत काम केले.[१३]
संदर्भ
Wikiwand - on
Seamless Wikipedia browsing. On steroids.