Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
हा लेख भवानी देवीबद्दल आहे. छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीबद्दलचा लेख येथे आहे.
तुळजापूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान आहे. हे महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रात येथे मोठा उत्सव असतो व भक्तांची गर्दी असते. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे सांगितले जाते.
धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरमाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याखेरीज या मंदिराचा कळस दिसत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. देवीने महाराजांना दृष्टान्त देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. भोसले घराण्याची ही कुलदेवता आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार मराठा १५३ पाळीकर भोपे कुळाकडे आहेत.
कृतयुगाच्या वेळी 'कर्दम' ऋषींची पत्नी 'अनुभूती' हिच्याबद्दल 'कुंकुर' नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली. तिच्या पातिव्रत्याच्या भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वती ही धावून आली. तिने दैत्याचा नाश केला. त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून, तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती.
या देवीला छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी कुलस्वामिनी मानतात. तर भगवान श्रीराम हे हिचा वरदायिनी असा उल्लेख करतात. भक्ती आणि शक्तीचा अविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव आश्विन महिन्यात शुद्ध प्रतिपदेपासून कोजागिरीपर्यंत चालतो.
तुळजाभवानीच्या देवळाच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा १४ नोव्हेंबर इ.स. १३९८चा शिलालेख उपलब्ध आहे. तुळजाभवानीचे मंदिर हे सोळाशे वर्षांपूर्वीचे असल्याचे मानले जाते. भवानीची मूर्ती मंदिरात असली, तरीही तुळजाभवानीची प्रतिकृती असणारी मूर्ती धाकटे तुळजापूर येथेही आहे.
तुळजापूर हे धाराशिव या जिल्ह्याच्या ठिकाणापासून २२ किमी तर सोलापूर या जिल्हा केंद्रापासून ४४ किमी अंतरावर आहे.
मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजुबाजूला प्रशस्त ओवऱ्या आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे, असे म्हणतात. देवीच्या मंदिरासमोर भवानीशंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून अष्टभुजा आहे. तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र व राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचे हे रौद्र रूप तरीही विलोभनीय आहे.
तुळजाभवानीची मूर्ती चल असून, ती वर्षातून तीन वेळेस सिंहासनावरून हलवली जाते.
या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशादर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी अशी ही तुळजाभवानी आहे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी हे मराठा पाळीकर भोपे कुळातील आहेत. १६ सहायक मुख्य पुजारी व्यतिरिक्त, १५३ मुख्य पुजारी आहेत जे यात्रेकरूंना सेवा देतात, यात्रेकरू साड्या, साडी ब्लाउज पीस (मराठी भाषेत खन), बांगड्या, नारळ, सिंदूर, हळद, यांसह पूजा ओटी देवीच्या पूजेला आलेल्या भक्तांना निवास, भोजन, विधी अर्पण करून यात्रेकरूंसाठी यजमान म्हणून काम करणाऱ्या विशिष्ट पुजारी कुटुंबाशी सामान्यतः दीर्घकाळचे नाते असते. कुलधर्म कुलाचार पूजा, पूजेचे साहित्य, फुलांच्या माळा आणि नैवेद्य प्रसाद (देवतेसाठी विधी अन्न), प्रसाद शाकाहारी असू शकतो किंवा काही वेळा बळी दिलेल्या बकऱ्याचे मांस असू शकते.
महाराष्ट्रातील इतर मंदिरातील ब्राह्मण किंवा गुरव पुजाऱ्यांप्रमाणे, तुळजाभवानी मातेचे मुख्य पूजारी हे मराठा आहेत. श्री तुळजाभवानी मातेला प्रत्यक्ष स्पर्श हा १५३ पाळीकर भोपी, १६ आने भोपी पूजारी आणि सोनेरी पानेरी मठाचे महंत यांच्या व्यतिरिक्त कोणाला नाही.
श्री तुळजाभवानी देवीचे पूजारी हे दोन प्रकारचे एक १५३ मुख्य पाळीकर भोपी व १६ आने भोपी, यामध्ये पाळीकर हे आलेल्या भक्तांची वंश परंपरागत सेवा सुविधा करतात त्यांच्या सर्व कुलधर्म कुलाचार पूजा करतात व देवीची सेवा करतात, त्यामध्ये भक्तांचा नैवेद्य दाखवतात, कुंकू लावतात, नवस-सायास फेडतात, कुळकुलाचाराची पूजा करतात, राहण्याची जेवणाची त्यांची संपूर्ण व्यवस्था करतात. तर भोपी हे देवीची पाळीपाळीने पूजा करतात.
तुळजाभवानी मंदिरात ब्राम्हण, गुरव, वानी समाजाचे पण पूजारी आहेत ते आपापल्या लोकांची सेवा करतात.
श्री तुळजाभवानी देवीचे १५३ मुख्य पाळीकर भोपी मध्ये साळुंके, भोसले, गंगणे, रोचकरी, अमृतराव, क्षीरसागर, करडे, झाडपिडे, टोले,पेंदे, भांजी, इंगळे, पांढरे, कदम, शिंदे, पांढरे, हंगरगेकर, मगर, लोंढे, खपले, साठे, गायकवाड इ. येतात व १६ आने भोपी पूजारी मध्ये मलबा, सॉजी, पाटील, उदाजी, दिनोबा, परमेश्वर, कदम हे येतात. देवीचे सर्व पूजारी हे स्थानिक व वंशपरंपरागत वडिलोपार्जित पूजारी आहेत. या सर्व पूजारी वर्गाच्या पूर्वजांच्या नोंदी मंदिर संस्थान (पूर्वीचे हैद्राबाद निजाम संस्थान) कडे आहेत, या पूजारी व्यतिरिक्त इतर कोणालाही मंदिरात पूजा करण्याचा हक्क अधिकार नाही.
देवीची साडेतीन शक्तिपीठे :
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.