बैसाखी

एक महत्त्वाचा सण From Wikipedia, the free encyclopedia

बैसाखी

वैशाखी किंवा बैसाखी भारतातील पंजाब येथील साजरा करणारा एक रब्बी हंगामाचा सण आहे.[१] हा सण शेतात कापणी करण्यावेळी साजरा केला जाते.[२] हा सण १३ किंवा १४ एप्रिलला साजरा केला जातो.वैशाखी किंवा बैसाखी हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक आणि धार्मिक सण आहे.[१] या दिवशी शीख संप्रदायाचे नवीन वर्षही सुरू होते. इ.स. १६९९ मध्ये गुरू गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणूनही ओळखला जातो.[३] हिंदू धर्मात तसेच शीख धर्मात वसंत ऋतूतील कापणीच्या हंगामाचा दिवस म्हणूनही या दिवसाचे महत्त्व आहे. हिंदूंमध्ये वैशाखीला सौर कालगणनेनुसार नव्या वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.[४],[५]

Thumb
मेळा
Thumb
प्रसिद्ध भांगडा नृत्य

ऐतिहासिक महत्त्व

शीख संप्रदायाच्या इतिहासात या दिवसाचे औचित्यपूर्ण स्थान आहे.[३] भारतीय उपखंडातील तसेच विशेषतः पंजाब प्रांतातील लोक याला विशेष मानतात. मोगल सम्राट औरंगजेब याने शीखांचे गुरू तेग बहादूर यांचा छळ केला कारण त्यांनी मुसलमान धर्माचा स्वीकार केला नाही. त्यानंतर सुरू झालेल्या गुरू परंपरा समजून घेण्यासाठी याचे महत्त्व आहे. या विशिष्ट घटनेचे पडसाद उमटून त्याची परिणती म्हणून शिखांच्या दहाव्या गुरूंचे सत्तारूढ होणे आणि ऐतिहासिक खालसा पंथाची स्थापना होणे हे ही वैशाखीच्या दिवसाचे महत्त्व म्हणून ओळखले जाते. ब्रिटिश वसाहतवादाचा परिणाम म्हणून घडलेल्या “जालियनवाला बाग हत्याकांड” हा दिवसही वैशाखीचा आहे.[६]

Thumb
वैशाखीचा उत्सव युनायटेड किंग्डम येथे

धार्मिक व सामाजिक महत्त्व

वैशाखीच्या दिवशी गुरुद्वारांचे सुशोभन केले जाते. कीर्तन,जत्रा यांचे आयोजन होते. मंदिरात जाण्यापूर्वी नदी वा तळ्यात स्नान केले जाते. मिरवणुका काढल्या जातात.[१][७] हिंदू लोक या दिवशी गंगा,यमुना,कावेरी ,झेलम अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात.मंदिरात दर्शनाला जातात. आप्त मंडळीसह भोजनाचा आनंद घेतात. हिंदू धर्मात हा दिवस विविध नावांनीही ओळखला जातो.श्रद्धाळू व्यक्ती या दिवशी "कारसेवा" करतात.[५]

Thumb
गुरुद्वारा सुशोभन

या दिवशी गंगा नदीचे अवतरण पृथ्वीवर झाले अशी हिंदू धर्मात श्रद्धा प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी गंगास्नान केले जाते.[२]

नूतन वर्ष

वैशाखीला शीख धर्मियांचे नवीन वर्ष सुरू होते.खालसा संवतानुसार खालसा कालदार्शिका खालसा पंथाच्या स्थापना दिवसापासून सुरू होते. तो दिवस १ वैशाख १७५६ असा असून विक्रम संवतानुसार ३० मार्च १६९९ असा मानला जातो.पंजाब प्रांतात या उत्सवाचे विशेष महत्त्वाचे स्वरूप असते.

उत्सव

वैशाखीचा दिवस हा खालसा पंथाचा स्थापना दिवस म्हणून “खालसा सिरजाना दिवस” किंवा “खालसा सजना दिवस” या नावानेही प्रसिद्ध आहे. इ.स.१६९९ पासून हा दिवस सामान्यत: १४ एप्रिल या दिवशी साजरा होतो. इ.स. २००३ पासून शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने या दिवसाला “बैसाख” (वैशाख) असे नाव दिले असून नानकशाही कालगणनेनुसार तो वैशाख महिन्याचा पहिला दिवस म्हणून साजरा होतो.[८] अमृतसर येथील सुवर्ण मंदिर येथे या दिवसाचा विशेष कार्यक्रम असतो. त्याचं जोडीने तलवंडी साबो या ठिकाणी गुरू गोबिंद सिंह यांनी नऊ महिने निवास करून गुरू ग्रंथ साहिब या ग्रंथाचे लेखन पूर्ण केले तेथेही उत्सव होतो. आनंदपूर साहिब येथिल गुरुद्वारात खालसा पंथाची स्थापना झाली असल्याने तेथेही विशेष उत्सव केला जातो.[९] [१०]

Thumb
उत्सवानिमित्त उसाचा रस वाटताना

नगर कीर्तन

शीख समाजाचे लोक या दिवशी शहरात मिरवणूक काढतात. यामध्ये खालसा पंथाचे पारंपरिक वेशातील पाच सदस्य मिरवणुकीचे नेतृत्व करतात. त्यांना "पंच प्यारा" म्हणतात. रस्त्यातून जाताना लोक गाणी म्हणतात तसेच पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहिब यांच्यातील वेच्यांचे उच्चारण/ पठन केले जाते. काही महत्त्वाच्या मिरवणुकीत गुरू ग्रंथ साहिबाची प्रतही आवर्जून गौरवाने नेली जाते.[११]

Thumb
पंच प्यारा सदस्य

कृषी संस्कृतीतील महत्त्व

पंजाब प्रांतात सर्वदूर कापणीच्या हंगामाचा काल या दिवसात साजरा होतो. रबी मोसमाचा योग्य काल म्हणूनही या दिवसाला महत्त्व आहे.पंजाबातील शेतकरी हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणूनही शेतात साजरा करतात आणि विपुल अन्नधान्य यासाठी देवाला धन्यवाद देऊन प्रार्थना करतात. पंजाबी हिंदू आणि शीख धर्मीय लोक हा सण साजरा करतात. ऐतिहासिक दृष्ट्या २० व्या शतकाच्या पूर्वी हा दिवस शीख,हिंदू यांच्या जोडीने मुसलमान,मुसलमानेतर तसेच पंजाबी ख्रिश्चन लोक देखील साजरा करीत. आधुनिक काळात ख्रिस्ती मंडळीही यात सहभागी होतात.[१२] आवत पौनी ही परंपरा कापणीच्या कामाशी संबंधित आहे. यामध्ये लोक सामूहिक रीत्या गव्हाची कापणी करतात. दिवसभर या कामाला ढोलाच्या वाड्याची साथ दिली जाते. दिवसाच्या अखेरीला ढोल वाजवून लोक दोहे गातात आणि आनंद साजरा करतात. भांगडा हा या कृषीसंस्कृतीशी जोडला गेलेआ एक महत्त्वाचा नृत्यप्रकार या दिवशी केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी जत्रा व मेळे भरतात आणि लोक त्याचा आनंद घेतात.

भारताच्या अन्य राज्यांमध्ये

केरळमध्ये "विशु", उत्तराखंड येथे "बिखोरी",आसामात "बोहाग बिहू",ओरिसात "महा विषुव संक्रांत", बंगाल प्रांतात पहेला वैशाख , तमिळनाडू मध्ये "पुंथंडु", बिहार आणि नेपाळ मध्ये "जुर्शीतल" अशा नावांनी वैशाखाचा पहिला दिवस उत्सव स्वरूपात साजरा केला जातो.

Thumb
पुथनडू उत्सव पूजा
Thumb
बिहू नृत्य करणाऱ्या महिला (4)

संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.