पहेला वैशाख

पश्चिम बंगाल मधील एक सन From Wikipedia, the free encyclopedia

पहेला वैशाख

पहेला वैशाख (बंगाली: পহেলা বৈশাখ) हा पश्चिम बंगालबांगलादेश मध्ये १४ किंवा १५ एप्रिल रोजी साजरा होणारा दिवस आहे.[1] बंगाली कालगणनेचा हा पहिला दिवस असतो.[2]या दिवशी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश येथे शासकीय सुट्टी असते. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि आसामच्या काही भागात जेथे बंगाली संस्कृती जपली जाते तेथे हा दिवस धार्मिक उत्सव स्वरूपात साजरा केला जातो.[2]

Thumb
उत्सवासाठी पारंपरिक पोशाखात सजलेल्या युवती

महत्त्व

बंगाली कालगणनेनुसार सौर वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण असतो. सामान्यतः हा दिवस १४ किंवा १५ एप्रिल रोजी येतो.[3] १४ एप्रिल हाच दिवस सौर कालगणनेची सुरुवात आणि शेतीचा सण म्हणूनही साजरा केला जातो. भारताच्या अन्य राज्यात हा सण बैसाखी (पंजाब), विशु (केरळ) या नावाने साजरा होतो.

Thumb
भोजन

शमसुझमान खान यांच्या मते या नवीन वर्षाची सुरुवात कधी झाली हे नक्की सांगता येत नाही.[4] बंगालच्या ग्रामीण भागात मानले जाते की विक्रमादित्य राजाने या कालगणनेची सुरुवात केली.

स्वरूप

पहेला वैशाख या सणाच्या निमित्ताने मिरवणूक, मेळे, जत्रा यांचे आयोजन केले जाते. शुभो नबोबर्षो अशा बंगाली भाषेत शुभेच्छा दिल्या जातात. बांगलादेशात मंगल शोभाजत्रा होतात. २०१६ साली डाक्का येथील विद्यापीठाने साजरा केलेला हा सण मानवतावादी सांस्कृतिक वारसा म्हणून जाहीर केला होता.[5]

बांगलादेश येथे हा बंगाली वर्षारंभाचा दिवस नृत्य, गायन मिरवणूक यांनी साजरा होतो. व्यापारी वर्गाची नव्या वर्षाची सुरुवात होत असल्याने या दिवशी हिशोबाच्या नव्या वह्या वापरायला सुरुवात होते. लोक नवीन वर्षाचे पारंपरिक स्वागत गीत गातात. लोक नववर्षाच्या स्वागतासाठी सुंदर पोशाख परिधान करतात, तर महिला आकर्षक केशरचना करून त्यात फुले माळतात.[6] या दिवशी पांता भात, हिलसा माशाची भाजी आणि काही गोड पदार्थ आवर्जून केले जातात.[6]

ढाका येथे या वर्षारंभाच्या विशेष दिवसाची सुरुवात रवीन्द्रनाथ ठाकूर यांच्या एषो हे बैसाख या प्रसिद्ध गीताने केली जाते. मंगल शोभायात्रा हे या दिवसाचे विशेष आकर्षण असते. १९८९ सालापासून ढाका येथील विद्यापीठाच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या दिवशी विविध आकाराचे मुखवटे धारण करून लोक यात्रेत सहभागी होतात. वाईट शक्ती दूर जाव्यात अशी यामागे प्रतीकात्मकता आहे. जात, धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन साजरा केला जाणारा उत्सव असे याचे स्वरूप आहे.

त्रिपुरा राज्यात या दिवशी राज्यात सुट्टी दिलेली असते. लोक नवीन पोशाख घालून हिंदू मंदिरांत दर्शनाला जातात. व्यापारी वर्गाचे नवीन वर्षसुद्धा याच दिवशी सुरू होते. हिंदू बंगाली लोक या दिवशी कुमारी पूजन आणि गणपतीचे पूजन करतात. लहान मुले आणि तरुण व्यक्ती आपल्यापेक्षा ज्येष्ठ सदस्यांचे आशीर्वाद घेतात. महिला एकमेकींच्या भांगांत आणि कपाळावर शेंदूर माखून शुभेच्छा देतात.[7]

हे ही पहावे

बैसाखी

चित्रदालन

संदर्भ

Wikiwand - on

Seamless Wikipedia browsing. On steroids.