Remove ads
From Wikipedia, the free encyclopedia
प्योतर अलेक्सेयेव्हिच रोमानोव्ह तथा पीटर पहिला (मे ३०, इ.स. १६७२ - जानेवारी २८, इ.स. १७२५) हा सतराव्या शतकातील रशियाचा झार (उच्चार त्सार म्हणजे राजा) होता. रशियाच्या महान सेनानींमध्ये पीटरची गणना होते.
पीटर अलेक्सिस पहिल्याचा मुलगा होता. पीटरने एप्रिल २७, इ.स. १६८२ पासून मृत्यूपर्यंत राज्य केले. इ.स. १६९६पर्यंत पीटरचा सावत्रभाऊ इव्हान पाचवा व पीटर असे दोघांनी एकत्र राज्य सांभाळले. पीटरने रशियाचे साम्राज्य युरोप व आशियामध्ये सर्वदूर फैलावले व रशियाला जगातील महासत्तेचा दर्जा दिला. या कारणास्तव त्याचा उल्लेख रशियात व इतरत्र पीटर द ग्रेट (प्योत्र वेलिकी, महान पीटर) असा करतात.
थोर राष्ट्रपुरूष पीटर वयाच्या १० व्या वर्षीच रशियाचा त्सार झाला. पण रशियाच्या राजावर तत्कालीन सरदार-उमरावांचा मोठा प्रभाव असल्याने राजा असूनही राष्ट्रापेक्षा स्वतःकडे आणि सरदार-उमरावांकडेच जास्त लक्ष असल्याने रशिया त्याकाळी असंस्कृत, गावंढळ, मागसलेला मानला जाई. पुढील दहा वर्षांच्या काळात त्सार पीटरने सर्व सत्ता आपल्या हातात एकवटली.
रशियाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी स्वतःचे नौदल असावे असे पीटरला वाटू लागले. त्यासाठी त्याने वर्षभरातच युद्धनौका तयार करून तुर्की लोकांच्या अधिपत्याखाली असलेल्या अझोव्ह या बंदरावर हल्ला केला. पण त्यात यश आले नाही. या अपयशाने न खचता पीटरने आपल्या मर्जीतल्या काही मंडळींना युरोपमधील विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ज्ञानर्जनासाठी पाठवून दिले. या विशेष दलात स्वतः त्सार पीटरही नाव आणि वेष बदलून राहिला. तो स्वतः नेदरलँड्स देशातील विविध अभियंते आणि तज्ज्ञ मंडळींना भेटला, त्यातील काहींना त्याने मोठ्या रकमेच्या मोबदल्यात रशियात काम करण्यासाठी पाठवून दिले. पीटर परदेशात असतांनाच रशियातील त्याच्या अंगरक्षकांच्या एका गटाने देशात बंड केल्याचे त्याच्या कानावर आल्याने पीटर आपला दौरा सोडून तातडीने स्वदेशी परतला. त्याने ते बंड मोडून काढले, अनेकांना कठोर शिक्षा दिल्या आणि कित्येकांना मृत्युदंडाची शिक्षाही त्याने दिली. एक राजा म्हणून या परिस्थितीचा फायदा उचलत पीटरने लोकांवर दहशत पसरवत रशियाला आधुनिकतेकडे नेण्यास सुरुवात केली, जनतेला शिस्त लावली.
पीटरने आपल्या देशाचा सर्वांगाने विकास व्हावा म्हणून वस्तु निर्मितीसाठी कारखाने काढले, शेतीच्या पद्धतीत सुधारणा केली, दळणवळणासाठी नवे कालवे खोदले, लोकांना कामाची सवय लावली, शेतीसह सर्व उद्योगातून कर गोळा केला. जमा झालेला सर्व पैसा पुन्हा जनकल्याणासाठीच वापरला. विविध मार्गांनी रशियाची प्रगती सुरू झाली. पण त्यासाठी पीटरला अत्यंत कठोर वागावे लागले. त्याने जनतेला अमानुष वागणूक दिली. सगळ्यांच्या फायद्यासाठी काहींना तोटा सहन करावा लागला.
त्सार पीटर सुदृढ बांध्याचा, जवळजवळ ७ फुट उंचीचा, बलवान होता. तो सतत कोणत्यातरी उद्योगात व्यस्त राहत असे. राजनीती, न्याय, उद्योगधंदे अशा अनेक क्षेत्रात तो जातीने लक्ष घालीत असे. कित्येकदा पीटर २-३ दिवस सतत कामे करीत राही, झोपायला सुद्धा त्याला वेळ मिळत नसे. यातच पीटरने सेंट पीटर्सबर्ग शहर वसविण्यास सुरुवात केली. कालांतराने रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथे हलविण्यात आली.
स्वीडनने साम्राज्यवादाचा पुरस्कार केला व रशियाची अमाप भूमी व साधनसंपत्ती त्यांना खूणवत होती. पीटरने रशियावरील आलेले स्वीडनचे संकट मोठ्या धैयाने परतवून लावले. इ.स. १७०० ते १७२१ असे २१ वर्षे रशियाचे स्वीडनशी युद्ध सुरू राहिले. १७२१ साली स्वीडनने तह करून बाल्टिक समुद्राच्या फार मोठ्या प्रदेशावर रशियाचे वर्चस्व मान्य केले. रशिया सामर्थ्यवान राष्ट्र बनत चालले होते.
एकीकडे युद्ध सुरू असतांनाही पीटरने देशात विकासाच्या कामांशिवाय इतरही फार मोठे बदल करणे सुरूच ठेवले. त्याने संपूर्ण राज्याचे १० भाग केले, प्रत्येक भागावर स्व्तंत्र गव्हर्नरची नेमणूक केली. एकाधिकारी राजेशाही ऐवजी पीटरने सिनेटची स्थापना करून सर्व विभागांसाठी स्वतंत्र मंत्री नेमले. अनेक कामात चर्चची चालत असलेली नाहक ढवळाढवळ त्याने बंद करून चर्चचे वर्चस्व संपुष्टात आणले. जमीनदारांना वंशपरंपरेने मिळत असलेले अनेक अधिकार संपुष्टात आणले तसेच जमीनदारांच्या फक्त ज्येष्ठ वारसालाच मान्यता देऊन वारसांमधील संभावित भाऊबंदकी संपविली. इतर मुलांना नोकरी देऊन त्यांच्या दूरच्या प्रदेशांवर नियुक्ती करण्यात येत असे. शिक्षण सगळ्यांसाठी सक्तीचे केले यातून जमीनदारंच्या मुलांनाही सोडले नाही. केवळ शिक्षणाच्या आधारावरच नोकरीसाठी विचार होत असल्याने लोकांनीही या मोहिमेत भाग घेणे सुरू केले. पीटरने शाळा, विद्यालये मोठ्या प्रामाणात सुरू केली. शाळांमधून शिकविण्यासाठी रशियन भाषा प्रमाण मानण्यात आली. त्या आधीचे फ्रेंच वगैरे भाषांचे असलेले महत्त्व संपवून त्यांचे उच्चाटन करण्यात आले. रशियन भाषेत अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी म्हणून जाणकार भाषांतरकारांची नेमणूक करून युरोपातील सर्व पुस्तके रशियन भाषेत आणण्याचा प्रकल्पही पीटरने राबविला.
वयाच्या ५२ व्या वर्षी त्सार पीटरचे निधन झाले. त्यावेळी रशियात अनेक मूलभूत सोयी-सुविधांसह उद्योगधंदे उभे करण्यात पीटर यशस्वी ठरला होता. लोकांना काम होते, घरोघरी आधुनिकतेचा स्वीकार होऊ लागला होता, मागसलेले, असंस्कृत म्हणून ओळखले जाणारे रशिया जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ लागले होते. सर्वसामन्य लोकांचा छळ झाला तरी देशाच्या दृष्टीने फार मोठी प्रगती पीटरला साध्य करता आली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.