From Wikipedia, the free encyclopedia
जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा उर्फ जे.आर.डी. टाटा (जुलै २९, इ.स. १९०४ - नोव्हेंबर २९ इ.स. १९९३) हे भारतीय उद्योजक होते. ते पहिले भारतीय वैमानिक असून, भारतातील विमान वाहतूक उद्योगाचे जनक मानले जातात.
जे.आर.डी. टाटा | |
---|---|
जन्म |
२९ जुलै, १९०४ पॅरिस, फ्रान्स |
मृत्यू |
२९ नोव्हेंबर, १९९३ (वय ८९) जिनेव्हा, स्वित्झर्लंड |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | पारशी |
नागरिकत्व | भारतीय |
धर्म | पारशी धर्म |
जोडीदार | थेलमा |
वडील | रतनजी दादाभॉय टाटा |
आई | सुनी बरे |
पुरस्कार | भारतरत्न(१९९२), पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९५७) |
टाटांचा जन्म जुलै २९, इ.स. १९०४ मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झाला. रतनजी दादाभॉय टाटांचे ते दुसरे पुत्र होते. मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन केनॉन स्कूल येथे काही वर्ष ते शिकले, पण टाटांची आई फ्रेंच असल्यामुळे त्यांचे बालपण मुख्यत: फ्रान्सातच गेले. काही कारणाने ते मॅट्रीक परीक्षेपुढे शिकू शकले नाहीत.
इंग्लिश खाडी विमानाद्वारे पहिल्यांदा पार करणारे सुप्रसिद्ध फ्रेंच वैमानिक लुईस ब्लेरिअट यांच्या जीवनकार्याने जेआरडी खूप प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनीही विमान शिकण्याचा ध्यास घेतला. इ.स. १९२९ साली त्यांनी वैमानिकाचा परवाना मिळवला. वैमानिकाचा परवाना मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले. इ.स. १९३२ साली त्यांनी टाटा एरलाईन्स या पहिल्या भारतीय प्रवासी विमानवाहतूक कंपनीची स्थापना केली. पुढे इ.स. १९४६ साली तिचे नाव बदलून एर इंडिया ठेवले गेले.
वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली ते टाटा सन्स उद्योगसमूहाचे चेरमन बनले. ते प्रदीर्घ काळ त्या पदावर होते. त्यांनी पदभार सांभाळला तेव्हा टाटा सन्स उद्योगसमूहाच्या १४ कंपन्या होत्या. टाटांच्या काळात ९१ कंपन्यांची भर पडली. रसायन, वाहन, चहा, माहिती, हॉटेले आणि तंत्रज्ञान अश्या नवीन क्षेत्रांत त्यांनी टाटा उद्योगसमूहाचा विस्तार केला. टाटांच्या पुढाकाराने इ.स. १९५६ साली कंपनीतील कामगारांच्या कल्याणासाठी खास योजना राबविण्यात आली. त्यामध्ये 'दिवसातून आठ तास काम', 'मोफत आरोग्यसेवा', 'भविष्य निर्वाह निधी' आणि 'अपघात विमा योजना' अश्या पायाभूत गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. पुढे या योजना भारतीय केंद्र शासनाने सर्व उद्योग-व्यवसायांसाठी कायदेशीर रित्या बंधनकारक केल्या.
टाटांच्या कारकिर्दीत उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी इ.स. १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय इ.स. १९४१ साली मुंबईत सुरू केले.
नोव्हेंबर २९ इ.स. १९९३ साली वयाच्या ८९ व्या वर्षी जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.