आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीची जनतेद्वारे निवड करणारे सर्वक्षण From Wikipedia, the free encyclopedia
द ग्रेटेस्ट इंडियन (मराठी : सर्वात महान भारतीय किंवा सर्वश्रेष्ठ भारतीय) हे सीएनएन आयबीएन आणि हिस्ट्री टिव्ही१८ या दूरचित्रवाहिन्यांसोबत आऊटलुक मॅगझीन व रिलायन्स मोबाईलद्वारे आयोजित केले गेलेले सन २०१२ चे एक सर्वेक्षण होते. भारतीय जनतेच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४७) आणि महात्मा गांधी यांच्यानंतरचा ‘सर्वात महान भारतीय कोण’? या संकल्पनेवर जून २०१२ ते ऑगस्ट २०१२ दरम्यान हे सर्वेक्षण आयोजित करण्यात आले होते.[1] ११ ऑगस्ट २०१२ रोजी या सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' म्हणून घोषित केले गेले.[2][3][4][5][6]
सीएनएन-आयबीएन व हिस्ट्री१८ या नामांकित दूरचित्रवाहिन्यांच्या पुढाकारातून 'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षण केले गेले होते. यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील २८ नामांकित व्यक्तींना परीक्षक म्हणून नेमण्यात आले. तीन टप्प्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या (१९४८ च्या नंतरच्या) भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील १०० महान भारतीयांची यादी केली गेली, या यादीत महात्मा गांधी यांचासुद्धा समावेश करण्यात आला होता.
परीक्षकांनी या १०० नावांपैकी ५० नावे निवडली, तसेच इतरांशी स्पर्धा करता येऊ शकत नाही असे कारण देत परीक्षकांनी या १०० नावांमधून गांधींचे नाव वगळले आणि "भारतीय स्वातंत्र्यानंतरचा (१९४८) सर्वात महान भारतीय कोण?" आणि "गांधींनंतरचा सर्वात महान भारतीय कोण?" असा एकत्रित सवाल जनतेसमोर ठेवला. 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवण्यासाठी इतर थोर व्यक्तींसाठी लागू केलेले निकष गांधींसाठी लागू करण्यात आले नाहीत, आणि स्पर्धेविनाच त्यांना "पहिला सर्वश्रेष्ठ भारतीय" घोषित करण्यात आले. यास परीक्षकांची पक्षपाती भूमिका ठरवत अनेकांनी त्यावर टीका केली. ४ वर्षांआधी, 'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षण करणाऱ्या सीएनएन आयबीएन चॅनेलने एप्रिल २००८मध्ये लोकांना एक प्रश्न विचारला होता की, "इज आंबेडकर्स लेगसी मोअर इनड्युरींग दॅन गांधीस?" (आंबेडकरांचा प्रभाव गांधींपेक्षा अधिक आहे का?) त्यावर ७४% लोकांनी "होय" असे उत्तर दिले होते, तर केवळ २२% लोकांनी "नाही" असे मत गांधींच्या बाजूने दिले होते.[7][8]
दूरध्वनी, मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे मत नोंदविण्यात आले. सर्वेक्षणासाठी एसी नेल्सन या कंपनीची मदत घेण्यात आली. या कंपनीने भारतातील १५ शहरांतील नागरिकांची मते दोन टप्प्यांत जाणून घेतली. परीक्षक सदस्यांनीही आपापला पसंतीक्रम नोंदविला होता, ज्यात बाबासाहेब आंबेडकर व जवाहरलाल नेहरू यांना समान मते पडली होती. लोकांची मते, मार्केट रिसर्च आणि परीक्षकांची मते अशा सर्वेक्षणाच्या तीन पद्धतीतून निघालेले निष्कर्ष वेगवेगळे आहेत. मात्र तिन्ही सर्वेक्षणांचा एकंदरीत निष्कर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरवून गेला. एकंदरीत निष्कर्षात पहिल्या दहामध्ये (सर्वोत्तम दहा) बाबासाहेबांनंतर एपीजे अब्दुल कलाम, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, मदर तेरेसा, जे.आर.डी. टाटा, इंदिरा गांधी, सचिन तेंडुलकर, अटलबिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर यांच्या नावांना पसंती मिळाली. लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'द ग्रेटेस्ट इंडियन' ठरविले, लोकांच्या मतांमध्ये बाबासाहेब पहिल्या, अब्दुल कलाम दुसऱ्या, तर वल्लभभाई पटेल तिसऱ्या क्रमांकावर होते. एकूण सर्वेक्षणात जवळपास दोन कोटी (२,००,००,०००) लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपली मते नोंदविली होती.[9]
'द ग्रेटेस्ट इंडियन' सर्वेक्षणाचे निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर सीएनएन आयबीएन चॅनेलने १६ ऑगस्ट २०१२ मध्ये लोकांना असा प्रश्न विचारला होता की, "वॉझ आंबेडकर मोअर ग्रेटर दॅन नेहरू अँड पटेल?" (आंबेडकर हे नेहरू आणि पटेल यांच्यापेक्षा श्रेष्ठ होते का?) त्यावर ५९% लोकांनी "होय" आणि ४१% लोकांनी "नाही" असे मत दिले होते.[10]
पहिल्या १० सर्वश्रेष्ठ भारतीयांची यादी खालीलप्रमाणे आहे.[11][12] या सर्वांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[13][14]
क्रम | व्यक्तिमत्त्व | प्रसिद्धी | लोकांची मते | |
---|---|---|---|---|
१ | डॉ. बाबासाहेब आंबेडकर | डॉ. भीमराव रामजी आंबेडकर उपाख्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, दलित बौद्ध चळवळीचे जनक, भारतातील जातिप्रथा व अस्पृश्यता यांना त्यांनी विरोध केला. आंदोलनाचे नेते होते. त्यांना 'आधुनिक भारताचे निर्माता' म्हणले जाते. | १९,९१,७३५ (१ले) | |
२ | डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम | डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते, त्यांना 'मिसाईल मॅन' म्हणूनही ओळखले जाते. ते वैज्ञानिक आणि अभियंता (इंजीनियर) म्हणून विख्यात होते. | १३,७४,४३१ (२रे) | |
३ | वल्लभभाई पटेल | वल्लभभाई पटेल हे स्वतंत्रता सेनानी, भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान होते. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व केलेल्या पटेलांना तेथील महिलांनी 'सरदार' ही उपाधी दिली. | ५,५८,५३५ (३रे) | |
४ | जवाहरलाल नेहरू | जवाहरलाल नेहरू हे भारताचे प्रथम प्रधानमंत्री होते आणि स्वातंत्र्याआधी आणि नंतरच्या भारतीय राजकारणामध्ये केंद्रीय व्यक्तिमत्त्व होते. सन १९४७ - १९६४ दरम्यान ते भारताचे पंतप्रधान होते. त्यांना आधुनिक भारतीय राष्ट्राचे शिल्पकार मानले जातात. | ९,९२१ (१०वे) | |
५ | मदर तेरेसा | मदर तेरेसा ह्या रोमन कॅथॅलिक नन होत्या. रोमन कॅथोलिक चर्च द्वारे त्यांना कलकत्ताची संत तेरेसा असे घोषित केले आहे, त्यांचा जन्म अग्नेसे गोंकशे बोजशीयु नावाने एका अल्बेनीयाई परिवारात उस्कुब, उस्मान साम्राज्यात झाला होता. मदर तेरेसा ज्यांनी इ.स.१९४८ मध्ये स्वच्छेने भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते. त्या समाजसेविका होत्या. | ९२,६४५ (५वे) | |
६ | जे.आर.डी. टाटा | जहांगीर रतनजी दादाभाई टाटा भारताचे वायुयान उद्योग आणि इतर उद्योगांचे अग्रणी होते. ते दशकांपर्यंत टाटा ग्रुपचे निर्देशक राहिले. त्यांनी आणि पोलाद, इंजिनियरिंग, होटेल, वायुयान आणि इतर उद्योगांचा भारतात विकास केला. इ.स. १९३२ मध्ये त्यांनी टाटा एअरलाईन्स सुरू केली. भारतासाठी इंजिनियरिंग कंपनी उघडण्याच्या स्वप्नासोबत त्यांनी इ.स. १९४५ मध्ये टेल्कोची सुरुवात केली जी मूलतः इंजिनियरिंग आणि लोकोमोटिव्हसाठी होती. | ५०,४०७ (६वे) | |
७ | इंदिरा गांधी | इंदिरा गांधी ह्या भारताच्या प्रथम आणि एकमेव महिला प्रधानमंत्री होत्या. त्या चार वेळा प्रधानमंत्री पदावर होत्या. त्यांना आयर्न लेडी (लोह महिला) म्हणून ओळखले जाते. | १७,६४१ (८वे) | |
८ | सचिन तेंडुलकर | सचिन रमेश तेंडुलकर हे क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ठ फलंदाज व गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्यांनी कसोटी व एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक शतक मिळवण्याचा विक्रम केला. ते कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज म्हणून ओळखले जातात. तसेच त्याच्या नावावर कसोटी सामन्यात १४,००० धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. एकदिवसीय सामन्यातही त्यांची कामगिरी सर्वोत्तम आहे. | ४७,७०६ (७वे) | |
९ | अटल बिहारी वाजपेयी | अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे माजी प्रधानमंत्री होते. ते भारतीय जनता पक्षाचे नेते, हिंदी कवी, पत्रकार व प्रखर वक्ते सुद्धा होते. ते भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात त्यांचा सहभाग होता आणि इ.स. १९६८ ते इ.स. १९७३ पर्यंत त्याचे अध्यक्षसुद्धा राहिले. ते आयुष्यभर भारतीय राजकारणात सक्रिय राहिले. | १,६७,३७८ (४थे) | |
१० | लता मंगेशकर | लता मंगेशकर, भारताची सर्वात लोकप्रिय गायिका आहे, ज्यांचा सहा दशकांचा प्रदिर्घ गायन कार्यकाळ आहे. त्यांनी जवळजवळ तीस पेक्षा जास्त भाषांत चित्रपट आणि चित्रपटबाह्य गाणे गायली आहेत. त्यांची ओळख भारतीय सिनेमात एक पार्श्वगायक म्हणून राहिलेली आहे. | ११,५२० (९वे) |
१०० नामांकित भारतीयांमधून परीक्षकांनी सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी निवडलेल्या ५० महान भारतीयांची यादी खालीलप्रमाणे आहे.[1][15]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.