Remove ads

डॉ. जयंत विष्णू नारळीकर (जन्म : कोल्हापूर, १९ जुलै १९३८) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक आहेत. डॉ. नारळीकर हे अचानक आणि अपघाताने घडलेले पण आपली नाममुद्रा कोरलेले साहित्यिक आहेत. 'नारायण विनायक जगताप' या उलट्या क्रमाने आपल्या नावाची आद्याक्षरे होणाऱ्या टोपण नावाने त्यांनी विज्ञानकथा स्पर्धेत भाग घेतला.

जलद तथ्य
जयंत नारळीकर

जयंत विष्णू नारळीकर
पूर्ण नावजयंत विष्णू नारळीकर
जन्म१९ जुलै, १९३८ (1938-07-19) (वय: ८६)
कोल्हापूर
निवासस्थानपुणे
नागरिकत्वभारतीय
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रखगोलभौतिकी
कार्यसंस्था   केंब्रिज विद्यापीठ
   टाटा मूलभूत संशोधन संस्था
आयुका
प्रशिक्षण   बनारस हिंदू विद्यापीठ
   केंब्रिज विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शकफ्रेड हॉईल
वडीलविष्णु नारळीकर
आईसुमती नारळीकर
पत्नीमंगला नारळीकर
अपत्येगीता (कन्या), गिरिजा (कन्या), लीलावती (कन्या)
बंद करा

जीवन

नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इ.स. १९५७ साली त्यांनी विज्ञानात पदवी (B.Sc.) प्राप्त केली.या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज येथे गेले. तेथे त्यांना बीए, एमए व पीएचडीच्या पदव्या मिळाल्या. शिवाय, रॅंग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली.

१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लीलावती. १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून पद स्वीकारले. १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.

डॉ. नारळीकर यांच्या पत्‍नी मंगला नारळीकर ह्या ’नभात हसते तारे’ या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. ’पाहिलेले देश भेटलेली माणसं’ हे त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेले पुस्तक आहे.

Thumb
वाच.जयंत आणि वाच.मंगला नारळीकर
Remove ads

साहित्य संमेलन

दिनांक ३, ४ व ५ डिसेंबर या तारखांना कुसुमाग्रजनगरी, नाशिक येथे ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते.[१]

संशोधन

  • स्थिर स्थिती सिद्धान्त

डॉ. जयंत नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल यांच्यासोबत ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ मांडली.

चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

साहित्यातील भर

नारळीकरांनी 'चार नगरांतले माझे विश्व' या विलक्षण ओघवत्या आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या आत्मकथनाचा समारोप करताना 'विज्ञानप्रसार आणि अंधश्रद्धानिर्मूलन यांच्या मागे लागताना पदोपदी जाणवते की, आपल्या सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या समाजावर देखील अंधश्रद्धांचा पगडा आहे,' असे खेदाने म्हणले आहे. मात्र, लगेच संस्कृत सुभाषिताचे उद्धरण देऊन त्यांनी 'कितीही विघ्ने कोसळली तरी शहाणी माणसे आपले नियतकर्तव्य सोडत नाहीत' असाही उतारा त्याला जोडला आहे.

असे कर्तव्य नारळीकर जन्मभर विविध माध्यमांमधून करत आले आहेत. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली. भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सारे मार्ग चोखाळले. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्येही त्यांनी बरेच लेखन केले आहे. त्यांना आवडणाऱ्या सौम्य इंग्रजी विनोदाप्रमाणे ते गमतीने 'व्याख्यानबाजी' असे आपल्याच भाषणांना म्हणतात खरे; पण त्यांनी हे व्रत अनेक दशके सांभाळले. नारळीकरांचा वैज्ञानिक आणि अंधश्रद्धानिर्मूलनाचा विचार संस्कृती आणि काही विशिष्ट अर्थांनी धर्मही नाकारत नाही. त्यामुळेच, तो संतुलित, उदार आणि समाजाचा साकल्याने विचार करणारा आहे. आजचे महाराष्ट्राचे विचारविश्व कमालीचे गढूळ, कोते आणि ऱ्हस्वदृष्टीचे बनले आहे. त्याला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे निदान दर्शन तरी घडविण्याची गरज आहे. ते घडविण्याची क्षमता आणि अधिकार जयंत नारळीकरांकडे आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रातील एका उज्ज्वल परंपरेला नवी दिशा मिळते आहे. मात्र, हे पाऊल केवळ प्रतीकात्मक राहता कामा नये. मराठी साहित्य आणि संस्कृती व्यवहारांचा पुढचा प्रवास या नव्या दिशेने होत राहिला तरच साहित्य संमेलनाचा हा विज्ञानयोग सार्थकी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे..

विविध मराठी नियतकालिकांतून जयंत नारळीकर यांचे विज्ञानविषयक माहितीने भरलेले ललित लेखन सातत्याने प्रसिद्ध होत असते. नारळीकरांच्या पुस्तकांची जगांतील अनेक भाषांत रूपांतरे झाली आहेत.

विज्ञानकथा पुस्तके

  • अंतराळातील भस्मासुर
  • अंतराळातील स्फोट
  • अभयारण्य
  • चला जाऊ अवकाश सफरीला
  • टाइम मशीनची किमया
  • प्रेषित
  • यक्षांची देणगी
  • याला जीवन ऐसे नाव
  • वामन परत न आला
  • व्हायरस


  • अंतराळ आणि विज्ञान
  • आकाशाशी जडले नाते
  • गणितातील गमतीजमती (विकिस्त्रोतवरील आवृत्ती)
  • नभात हसरे तारे (सहलेखक : डॉ. अजित केंभावी आणि डॉ. मंगला नारळीकर)
  • नव्या सहस्रकाचे नवे विज्ञान
  • Facts And Speculations In Cosmology (सहलेखक : Geoffrey Burbidge)
  • युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची (आगामी)
  • विश्वाची रचना
  • विज्ञान आणि वैज्ञानिक
  • विज्ञानगंगेची अवखळ वळणे
  • विज्ञानाची गरुडझेप
  • विज्ञानाचे रचयिते
  • समग्र जयंत नारळीकर (प्रेषित, वामन परत न आला, अंतराळातील स्फोट, व्हायरस व अभयारण्य या पाच कादंबऱ्यांचे एकत्रित पुस्तक)
  • Seven Wonders Of The Cosmos
  • सूर्याचा प्रकोप

आत्मचरित्र

  • चार नगरांतले माझे विश्व
Remove ads

अन्य

  • पाहिलेले देश भेटलेली माणसं
  • समग्र जयंत नारळीकर

पुरस्कार

  • १९६५मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
  • २००४मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
  • २०१०मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
  • त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम.पी. बिर्ला हे पुरस्कारही मिळाले आहेत.
  • २०१४साली मिळालेला तेनाली-हैदराबाद येथील नायुद‍अम्मा ट्रस्टचा डॉ. वाय. नायुद‍अम्मा स्मृती पुरस्कार-२०१३
  • जयंत नारळीकर यांच्या 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा २०१४ सालचा पुरस्कार मिळाला आहे.
  • ’यक्षाची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार
  • अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार (२०१२)
  • फाय फाऊंडेशन, इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार
  • नाशिक येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (सन २०२१)
Remove ads

चरित्र

डॉ. विजया वाड यांनी डॉ. नारळीकर यांचे 'विज्ञान यात्री डॉ. जयंत नारळीकर’ या नावाचे चरित्र लिहिले आहे.

लघुपट

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या व्यक्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा वेध एका लघुपटाद्वारे घेतला गेला आहे. साहित्य अकादमीची निर्मिती असलेल्या एका तासाच्या या लघुपटाचे दिग्दर्शन अनिल झणकर यांनी केले आहे.

हेही वाचा


संदर्भ

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.

Remove ads