उत्तर महाराष्ट्रतील भौगोलिक प्रदेश आणि इंग्रजांच्या काळात एक जिल्हा, मध्य युगात एक सुभा From Wikipedia, the free encyclopedia
खान्देश (इंग्रजी : Khandesh) भौगोलिक प्रदेशात महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्याचा समावेश व्हायचा, तसेच नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागाचाही खान्देशात समावेश होतो. हा प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश आहे. आता खान्देशमध्ये जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचा समावेश होतो.
खान्देश
| |
---|---|
ऐतिहासिक प्रदेश | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश |
जिल्हे |
१]नंदुरबार २]धुळे ३]जळगाव ४]बऱ्हाणपूर |
भाषा |
मराठी अहिराणी भिली हिंदी |
सर्वात मोठे शहर | जळगाव |
वासीनाम | खान्देशी |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
Elevation | २४० m (७९० ft) |
इंग्रजांच्या काळात खान्देश हा जिल्हा होता, त्यात आताच्या जळगाव, नंदुरबार, नाशिकचा जिल्ह्याचा उत्तर भाग आणि धुळे जिल्ह्याचा समावेश व्हायचा. १९०५ ला खान्देश जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि पश्चिम खान्देश आणि पूर्व खान्देश हे दोन जिल्हे तयार करण्यात आले. पश्चिम खान्देशमध्ये नंदुरबार-धुळे जिल्ह्यांचा समावेश व्हायचा, तर पूर्व खान्देशमध्ये जळगाव जिल्ह्याचा समावेश व्हायचा. प. आणि पु. खान्देशचे मुख्यालय अनुक्रमे धुळे आणि जळगाव होते. खान्देशात शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे.
या प्रदेशाचे प्राचीन नाव ऋषीक होते. हे पूर्वेला बेरार (प्राचीन विदर्भ), उत्तरेस निमाड़ जिल्हा (प्राचीन अनुपा) आणि दक्षिणेस sambhajinagar (प्राचीन मुलका) आणि भीर (प्राचीन अश्मक) जिल्ह्यांनी व्यापलेले होते.[1]
खान्देश राज्याच्या स्थापनेपूर्वी या प्रदेशावर मोर्य, सातवाहन, पश्चिमी क्षत्रप (शक), अभिर, वाकाटक, कलचुरी, विष्णूकुंडिन, चालुक्य, राष्ट्रकूट, पश्चिमी चालुक्य, कल्याणी कलचुरी आणि देवगिरी यादव इ. साम्राज्यांनी राज्य केले.
अभिर साम्राज्य
पश्चिम दख्खनमध्ये सातवाहनांच्या पतनानंतर, अभिर इ.स. २०३ मध्ये सत्तेत आले आणि १० अभिर राजांनी सुमारे ७० वर्षे राज्य केले. या काळात हा प्रदेश अभिरांच्या अधिपत्याखाली आला. पण त्यांचा इतिहास अजूनही अस्पष्ट आहे. त्यांनी राज्य केलेला एकूण कालावधीही अस्पष्ट आहे. वायु पुराणानुसार अभिर राजवंशाने १६७ वर्षे राज्य केले. सध्या, अभिरांना अहिर म्हणून ओळखले जाते. अभिर सामान्यतः अहिराणी आणि संस्कृत या भाषांचा वापर करत असत. ईश्वरसेनचे बहुतेक शिलालेख संस्कृतमध्ये आहेत.
या प्रदेशात दिल्ली सल्तनत सत्तेवर आल्यानंतर, मलिक राजाने खानदेशचे स्वतंत्र राज्य निर्माण केले.
दिल्ली सल्तनत
१२९६ मध्ये जेव्हा दिल्लीच्या अलाउद्दीन खिलजीने खान्देशवर चाल केली तेव्हा खानदेश असिरगडच्या चौहान शासकाच्या ताब्यात होता.
फारूकी राजवंश (खानदेश सल्तनत)
१३८२ ते १६०१ पर्यंत फारूकी राजघराण्याने खानदेशावर राज्य केले. फिरोज शाह तुघलक (१३०९ - २० सप्टेंबर १३८८) ने इ.स. १३७० मध्ये मलिक राजाला थाळनेर आणि करंदा(करवंद) चा जहागीरदार म्हणून नियुक्त केले होते, परंतु इ.स. १३८२ मध्ये मलिक राजा येथील स्वतंत्र शासक बनला आणि त्याने थाळनेरला राजधानी बनविले. त्यानंतरच्या शासक नासिर खानने असिरगडच्या राजा आशा अहिरची हत्या करून असिरगडवर नियंत्रण मिळवले आणि असिरगडला राजधानी बनविले तद्नंतर इ.स. १३९९ मध्ये नवीन राजधानी म्हणून बुरहानपूर वसवले.
६ जानेवारी १६०१ मध्ये जेव्हा मुघल राजा अकबराच्या सैन्याने खानदेशावर कब्जा केला आणि असीरगढ काबीज केले तेव्हा अकबराचा मुलगा दानियालच्या नावावरून काही काळासाठी खानदेशचे नाव दानदेश असे ठेवले गेले होते. १६४० मध्ये शहाजहानने तोदर मलची महसूल प्रणाली खानदेशात सुरू केली (ही महसूल प्रणाली १८१८ मध्ये ब्रिटिश राजवट येण्यापूर्वी पर्यंत वापरली जात होती). १७ वे शतक हे खान्देशचा सगळ्यात समृद्ध काळ मानला गेला आहे. या काळात कापूस, तांदूळ, नीळ, ऊस आणि कापडाचा व्यापार खान्देशात मोठ्या प्रमाणावर होत असे. मराठ्यांनी १७६० मध्ये असीरगड काबीज करेपर्यंत मुघल शासन टिकले.
खान्देशात मराठ्यांचे छापे १६७० मध्ये सुरू झाले आणि पुढील शतकात मुघल आणि मराठ्यांनी नियंत्रणासाठी संघर्ष केला. १७६० मध्ये पेशव्यांनी मुघल शासकाला हरवून खानदेशावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर होळकर आणि शिंदे राज्यकर्त्यांना वाटण्यात आले. बाजीराव IIला जून १८१८ मध्ये ब्रिटिशांना शरण जावे लागले, परंतु तद्नंतरसुद्धा खानदेशात तुरळक युद्ध चालू राहिले हे पेशव्यांच्या पूर्वीच्या प्रदेशांवर ब्रिटिशांनी संपूर्ण ताबा मिळवलेल्या शेवटच्या प्रदेशांपैकी एक होते.
ब्रिटिश काळात बुरहानपुर जिल्ह्याचा मध्य प्रांत (central provinces) मध्ये सामाविष्ट करण्यात आला, तर उर्वरित खान्देशचा मुंबई प्रांत (Bombay Presidency) मध्ये सामाविष्ट केला गेला. खान्देश हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील एक जिल्हा होता. खानदेश जिल्ह्याचे मुख्यालय धुळे शहर होते.
१९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर, १९५६ मध्ये मराठी-गुजराती द्विभाषिक मुंबई (Bombay State) राज्याची निर्मिती करण्यात आली. हे राज्य सन १९६० मध्ये भाषिक आधारावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांत विभागले गेले. त्यानंतर खान्देश हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. पुढे पूर्व खान्देश आणि पश्चिम खान्देश यांची नावे बदलून ती अनुक्रमे जळगाव जिल्हा आणि धुळे जिल्हा अशी करण्यात आली. कालांतराने १ जुलै १९९८ मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून त्यातून नंदुरबार नावाचा जिल्हा बनवण्यात आला. वर्तमान काळात केवळ याच प्रदेशाला (जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना) खान्देश म्हणून ओळखले जाते.
खान्देश हा मध्य भारतात दख्खनच्या पठाराच्या वायव्य कोपऱ्यावर, तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला आहे. हा उत्तरेस सातपुडा पर्वतरांगांनी, पूर्वेला बेरार (वऱ्हाड) प्रदेशाने, दक्षिणेस अजिंठ्याच्या डोंगररांगांनी (महाराष्ट्रातील मराठवाडा क्षेत्राशी) आणि पश्चिमेकडे पश्चिम घाटाच्या उत्तरेकडील पर्वतरांगांनी वेढलेला आहे.
भारतातील हा प्रदेश वर्तमान काळात महाराष्ट्र राज्यातील उत्तरेकडील नाशिक विभागामध्ये आहे. ज्यात नंदुरबार, धुळे, जळगाव इत्यादी तीन जिल्हे येतात.
खान्देशचे मुख्य नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे तापी नदी. उर्वरित दख्खनमधील नद्या पश्चिम घाटात उगम पावतात आणि पूर्व दिशेने बंगालच्या उपसागराकडे वाहतात, या विपरीत तापी नदी दक्षिण मध्य प्रदेशातील डोंगररांगेत उगम पावून पश्चिमेकडे वाहत जात खंबातच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन भेटते. तापीला खान्देशातून तेरा मुख्य उपनद्या जाऊन मिळतात. यापैकी कोणतीही नदी जलवाहतूक करण्यायोग्य नाही. तापी एका खोल खोऱ्यात वाहते ज्यामुळे भौगोलिकदृष्ट्या तिला सिंचनासाठी वापरणे कठीण झाले आहे. खान्देशचा बहुतांश भाग तापीच्या दक्षिणेला आहे येथे तापीच्या गिरणा, बोरी आणि पांझरा या तीन विशाल उपनद्या वाहतात. तसेच अति पूर्वेकडील मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णा ही सुद्धा प्रमुख उपनदी तापीस येऊन भेटते. तापीच्या उत्तरेस असलेल्या जलोदर मैदानामध्ये खानदेशातील काही समृद्ध भूभाग आहेत. ही जमीन सातपुडा टेकड्यांच्या दिशेने उंचावत जाते. मध्य आणि पूर्वेला काही कमी उंचीच्या टेकड्यांव्यतिरीक्त उर्वरीत भूमी समतल आहे, उत्तर आणि पश्चिमेकडील भूभाग हा हळूहळू खडकाळ डोंगरांमध्ये आणि दाट वनक्षेत्रात परिवर्तीत होत जातो.
खान्देश हा विविध भाषा व बोल्यांनी समृद्ध असलेला प्रदेश असून खान्देशातील प्रत्येक बोलीवर अहिराणीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. कारणास्तव, अहिराणी ही खान्देशातील प्रमुख भाषा मानली जाते. १९७१ च्या जनगणनेनुसार अहिराणी बोलणाऱ्यांची संख्या ३,६३,७८० होती. ती २०११ साली १८.६० लाख झाली.
खान्देशात मुख्यतः अहिराणी, लेवा गणबोली, तावडी या बोल्या बोलल्या जातात. यांखेरीज विविध जाती समूहांच्याही बोलीही त्या त्या जाती समूहात बोलल्या जातात. लेवा बोली, गुजर बोली, भिलांची बोली, वंजाऱ्यांची बोली, परदेशी बोली, पावरी बोली इत्यादी बोली ह्या अहिराणी आणि तावडी बोली परिघातल्या आहेत. लेवा गण बोली ही जळगाव जिल्ह्याच्या पूर्व भागात रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर आणि मलकापूर तालुक्यात बोलली जाते. तापी, पूर्णा, वाघूर आणि गिरणा या नद्यांच्या प्रदेशात शेती व्यवसाय असलेल्या लेवा पाटील समाजाची वस्ती आहे. या व्यवसायात असलेल्या बलुतेदारांची ही बोली संपर्क भाषा आहे.
खानदेशातील सकस काळी माती, कोरडे हवामाननी त्याला अनुरूप पिके म्हणजे प्रामुख्याने ज्वारी, तूर, विविध भाज्या, केळी आणि कपाशी. केळीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, त्यामुळे घरी पाहुणे आले, की पंगती केळीच्या पानावरच होतात. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खानदेशी जेवण पाव्हण्यांना मिळते. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात.
जळगाव येथील वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे. येथली भरताची वांगीही पोपटी, पांढरट रंगाची असून इतर वांग्यांपेक्षा चौपट मोठी असतात. त्यात बियाही कमी असतात. ही वांगी भाजून घ्यायची पद्धतही निराळी असते. वांग्यांना तेल लावून, तूर किंवा कपाशीच्या काट्यांवर वांगी भाजली जातात. निखाऱ्यावर भाजलेली वांगी बडगीत ठेचून घेतली जातात. हिरवी मिरचीनी शेंगदाणा, खोबरे यांचा सढळ वापर करून बनवलेले भरीत, कळणाची भाकरी, पुरी, आमसुलाचे सार, कांद्याची पात असे सगळे साग्रसंगीत जेवण केळीच्या पानावर भारतीय बैठकीत आग्रहाने वाढले जाते. ही भरीत पार्टी वाढणाऱ्याचानी खाणाऱ्याचा दोघांचाही आनंद द्विगुणित करते.
तसेच खान्देश मध्ये खापरची पुरी (मांडा) सुद्धा प्रसिद्ध आहे त्यालाच पुरण पोळी किंवा रस पुरी असे सुद्धा म्हणतात अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी या पदार्थांला खूप महत्त्व असते.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.