प्राचीन क्षत्रिय मराठा राजवंश From Wikipedia, the free encyclopedia
अभिर राजवंश हे पश्चिम दख्खनवर राज्य करणारे एक राजघराणे होते. त्यांनी सातवाहन साम्राज्याकडून काही भाग जिंकून आपले अभिर साम्राज्य स्थापन केले, आणि ढोबळमानाने इ.स. २०३ ते २६० पर्यंत राज्य केले. तर, वायु पुराणानुसार अभिर राजवंशाने एकूण १६७ वर्षे राज्य केले. अभिर शिवदत्त हे अभिर राजवंशाचे मूळ संस्थापक होते. त्यांचा नाशिकमध्ये राजा म्हणून राज्याभिषेक करून अभिर साम्राज्याला सुरुवात करण्यात आली होती. म्हणून, येथील अभिर नाशिकचे अभिर म्हणून ओळखले जातात. परंतु काही इतिहासकारांच्या मते अभिर हे खऱ्या अर्थाने ईश्वरसेनच्या अधिपत्याखाली सत्तेत आले. ईश्वरसेनचा नाशिक येथे गुहेत सापडलेला शिलालेख सांगतो की तो अभिर शिवदत्तचा मुलगा होता.
अभिर राजवंश
नाशिकचे अभिर | |
---|---|
इ.स. २०३ ते इ.स. २६० किंवा ३७० | |
प्रकार | साम्राज्य |
शासन | राजतंत्र |
राजधानी | अंजनेरी, थाळनेर, प्रकाशे, भामेर, असिरगड |
वर्तमान स्थान | भारत |
भाषा | अहिराणी, अपभ्रंश, संस्कृत |
संप्रदाय | हिंदू |
पूर्वाधिकारी |
सातवाहन, पाश्चात्य क्षत्रप, विजयपुरीचे ईक्ष्वाकू |
उत्तराधिकारी |
त्रिकूटक, वाकाटक, पाश्चात्य क्षत्रप, कदंब |
या लेखात सुचालनासंबंधी बहुविध बाबी आहेत. कृपया त्यांना सुधारविण्यास मदत करा किंवा याचे चर्चा पानावर त्याबाबत चर्चा करा. ( हा साचा संदेश कसा व कधी काढावयाचा याबाबत जाणा)
|
अभिर शब्दाचा अर्थ तथा नामोत्पत्ती ही अनिश्चित आहे. परंतु अनेक माहिती स्त्रोतांनुसार भिर म्हणजे भय आणि अभिर(अ+भिर) म्हणजे निर्भय होय. अर्थात तो व्यक्ती जो कोणासही भित नाही तो अभिर होय. कालांतराने अभिर शब्दाचा अपभ्रंश होऊन अहिर शब्दाची उत्पत्ती झालेली आढळते.
अभिर हे यदुवंशी कुळी क्षत्रिय होते. ते सातवाहनांच्या पश्चिम दख्खनमधील साम्राज्य जिंकणाऱ्यांपैकी एक होते. त्यांतील काही जण पाश्चात्य क्षत्रप अर्थात शकांच्या सैन्यातही कार्यरत होते. त्यांनी आपल्या शोर्याने या क्षत्रपांना अनेक नवीन आणि महत्त्वाची क्षेत्रे जिंकण्यास मदत केली. इ.स. १८१ पर्यंत क्षत्रप दरबारी त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला होता. त्यांतील काही जण क्षत्रपांचे सेनापती म्हणून सुद्धा नियुक्त होते.
शक संवत वर्ष १०३ (इ.स. १८१) मधील गुंड शिलालेखात अभिर रुद्रभूतीचा क्षत्रप सम्राट रूद्रसिंहाचा सेनापती म्हणून उल्लेख केलेला आहे. शिलालेखात राजा रूद्रसिंहाची विस्तृत वंशावळ देखील दिलेली आहे.
— " जयजयकार! वैषाख मासातील शुक्ल पक्ष पंचमी या तिथीला रोहिणी नक्षत्रातील शुभ काळात, वर्ष एकशे तीन — १०० ३ मध्ये, राजा क्षत्रप भगवान रुद्रसिंह, राजाचा पुत्र महा-क्षत्रप भगवान रुद्रदामन, (आणि) राजाचा नातू क्षत्रप भगवान जयदमन, (आणि) पणतू महा-क्षत्रप भगवान चष्टाना यांच्या राज्यकाळात, सेनापती बापक यांचा पुत्र सेनापती रूद्रभूती यांच्यामुळे रसोपद्रा गावातील सर्व जीवांच्या सुखी जीवनासाठी ही विहीर खोदली(बांधली) गेली ", — -एपिग्राफिया इंडिका XVI, पृष्ट २३३
शिलालेखात कोणत्याही महाक्षत्रपाच्या अस्तित्वाला दुर्लक्षित करून राजा रूद्रसिंहचा केवळ एक क्षत्रप म्हणून उल्लेख केलेला आहे. सुधाकर चट्टोपध्याय यांच्यानुसार, हे दर्शवते की अभिर सेनापती हाच या राज्याचा वास्तविक शासक होता. शिलालेखात (सेनापती) रूद्रभूतीला सेनापती बापकाचा पुत्र म्हणून उल्लेखित केलेले आहे. संभाव्यतः अभिर राजवंश हा याच अभिर रूद्रभूतीशी संबंधित असू शकतो.
अभिरांचा इतिहास खूप अस्पष्टतेने भरलेला आहे. अभिर साम्राज्याची स्थापना ईश्वरसेनने केली होती. महाराष्ट्रातील नाशिक प्रांतात सातवाहनांच्या पतनानंतर पाश्चात्य क्षत्रपांच्या मदतीने व संमतीने ही शाखा सत्तेवर आली. ते गवळी राजा म्हणून ओळखले जात असत, जे दर्शविते की राज्यकर्ते होण्यापूर्वी ते व्यवसायाने गोपालक होते. दख्खनच्या महाराष्ट्र प्रदेशात दहा अभिर राजांनी राज्य केले, ज्यांच्या नावांचा पुराणात उल्लेख नाही. बहरम तृतीय विरुद्धच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासाठी अभिर राजाने पर्शियाच्या सासानिद शहनशाह नरसेहला दूत पाठवला होता.
गुप्त साम्राज्याच्या काळात, भारतीय सम्राट समुद्रगुप्ताने अभिरांची "सीमावर्ती राज्य" म्हणून नोंद केली आहे, ज्यांनी त्याला वार्षिक महसूल दिला. हे समुद्रगुप्ताच्या प्रयागराज स्तंभाच्या शिलालेखात नोंदविलेले आहे, जे २२-२३ व्या ओळींमध्ये पुढील गोष्टी सांगते.
"समुद्रगुप्त, ज्याचा जाचक नियम होता की, समतट, डबाक, कामरूप, नेपाळ, कर्ततृपुर यांसारखे सीमावर्ती राज्यकर्ते, आणि माळवा, अर्जुनायन, यौधेय, मद्र, अभिर, प्रार्जुन, काक, सनकानिक, खरपरीक व इतर राष्ट्रांना महसूल देणे, आदेशांचे पालन करणे आणि आज्ञेनुसार न्यायालयात उपस्थित राहणे सक्तिचे आहे."
— समुद्रगुप्ताच्या प्रयागराज स्तंभ शिलालेखाच्या २२-२३ व्या ओळी (इ.स. ३५०-३७५).
अभिर राजवटीचा कालावधी हा अनिश्चित आहे, बहुतेक पुराणांनी सत्ता सदुसष्ट वर्षे दिली आहे, तर वायू पुराणात एकशे सदुसष्ट वर्षे दिली आहे. वा.वि. मिराशी यांच्या मते, अभिरांचे सामंत पुढीलप्रमाणे होते-
अभिर अपभ्रंश बोलत असत. आणि त्याचसोबत त्यांनी संस्कृतलाही स्विकारल्याचे दिसून येते. ईश्वरसेनचा नाशिकच्या लेणीतील शिलालेख मुख्यतः संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. त्यांच्या राज्यात जनतेची अनेक प्रकारे भरभराट झाली, ज्यात लोकांनी संपत्ती बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. हे अभिरांच्या राज्यातील शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता दर्शवते.
डॉ. भगवान लाल यांच्या मते, अभिर किंवा अहिर राजा ईश्वरदत्त यांनी उत्तर कोकणातून गुजरातमध्ये प्रवेश करून विजयसेन या क्षत्रियचा पराभव केला आणि आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
पतंजलीने आपल्या महाभाष्यात अभिर राजांचा उल्लेख केला आहे. अभिर सरदारांनी शक शासकांचे सेनापती म्हणून काम केले. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात, एक अहिर प्रमुख ईश्वरदत्त हा महाक्षत्रप (सर्वोच्च राजा) झाला. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात सातवाहनांच्या पतनात अभिरांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
अभिर ईश्वरसेनशिवाय माठरीचा मुलगा असल्याचा दावा करणारा दुसरा राजा म्हणजे शकसेन. त्याची ओळख शक सातकर्णी अशीही आहे, ज्याची नाणी आंध्र प्रदेशात सापडली आहेत आणि त्याला सातवाहन राजा आणि यज्ञ श्री सातकर्णीचा उत्तराधिकारी म्हणून ओळखले जाते. तथापि, के.गोपालचारी असे मानतात की शकसेन हा अभिर राजा होता. कारण,
तर यावरून असा निष्कर्ष निघतो की ईश्वरसेनचा पूर्ववर्ती त्याचा मोठा भाऊ शकसेन होता आणि त्याच्या मृत्यूनंतर ईश्वरसेन गादीवर बसला.
शकसेन हा बहुधा पहिला महान अभिर राजा असावा. त्याचे कोकणातील शिलालेख आणि आंध्र प्रदेशातील नाणी असे सूचित करतात की त्याने सातवाहन साम्राज्याच्या मोठ्या भागावर राज्य केले.
ईश्वरसेन हा पहिला स्वतंत्र अभिर राजा होता. तो अभिर शिवदत्त आणि त्याची पत्नी माठरी यांचा मुलगा होता. अश्विनी अग्रवाल यांना वाटते की ते रुद्रसिंह प्रथमच्या सेवेतील एक सेनापती होते ज्याने इ.स. १८८ मध्ये आपल्या स्वामीला पदच्युत केले आणि सिंहासनावर बसले. अश्विनी अग्रवाल पुढे म्हणतात की रुद्रसिंह प्रथम याने त्याला लवकरच पदच्युत केले आणि इ.स. १९० मध्ये सिंहासन परत मिळवले. त्याने (ईश्वरसेनने) एक युग सुरू केले जे नंतर कलचुरी-चेदि युग म्हणून ओळखले जाऊ लागले. त्याच्या वंशजांनी नऊ पिढ्या राज्य केले. ईश्वरसेनची नाणी त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील आहेत आणि ती सौराष्ट्र आणि दक्षिण राजपुतानामध्ये आढळतात.
अपरांत किंवा कोकणातील त्रैकूट राजवट इ.स. २४८ (त्रैकुट युग) मध्ये ईश्वरसेनेच्या राजवटीच्या वेळीच सुरू होते, म्हणून त्रैकूटांची ओळख अभिर राजवंशाशी केली जाते.
सार्वभौम आणि बलवान अभिर शासकांची यादी खालीलप्रमाणे आहे-
अभिरांनी पश्चिम महाराष्ट्रावर राज्य केले ज्यात नाशिक आणि त्याच्या लगतच्या अपरांत, लाट, अश्मक, आणि खानदेश प्रदेशांचा समावेश होता. त्यांच्या मूळ प्रदेशात नाशिक आणि लगतच्या प्रदेशांचा समावेश होता. त्यांच्या प्रदेशात कदाचित माळव्याचाही समावेश असावा, जो त्यांनी हळूहळू क्षत्रपांकडून ताब्यात घेतला होता.
अभिर वशिष्ठीपुत्र वासुसेनच्या मृत्यूनंतर, अभिरांनी बहुधा त्यांचा सार्वभौम आणि सर्वोच्च दर्जा गमावला असावा. अभिरांनी वाढत्या वाकाटक (उत्तर) आणि कदंब (दक्षिण-पश्चिम) या साम्राज्यांकडून त्यांचे बहुतेक क्षेत्र गमावले. अभिरांना अखेर त्यांच्या सामंत आणि त्रैकुटकांद्वारे सत्तेतून बाहेर करण्यात आले. पण तरीही अनेक लहान अभिर सरदार आणि राजे चौथ्या शतकापर्यंत म्हणजे साधारणतः इसवी सन ३७० पर्यंत विदर्भ आणि खानदेशात राज्य करत राहिले, परंतु कुठल्याही सार्वभौमत्वाशिवाय. जेव्हा ते कदंब राजा मयुरशर्मनशी संघर्षात आले तेव्हा त्यांच्या साम्राज्याचा पूर्णपणे अंत झाला.
आधुनिक काळातील अहिर जात ही अभिर लोकांचे वंशज आहेत आणि अहिर ही संज्ञा संस्कृत शब्द अभिरचे प्राकृत रूप आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.