भारतीय सण आणि उत्सव From Wikipedia, the free encyclopedia
होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे.[1] हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. याव्यतिरिक्त, हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय डायस्पोराद्वारे (देशांतरित जनसमूह)आशियातील इतर प्रदेशांमध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागांमध्ये देखील पसरली आहे.
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
उच्चारणाचा श्राव्य | |||
---|---|---|---|
स्थान | भारत, नेदरलँड्स, नेपाळ | ||
|
होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतु कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे. हे एक रात्र आणि एक दिवस चालते, हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी (पौर्णिमेचा दिवस) चालू होतो, जो इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येतो.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. होळी हा रंगाचा सण आहे.[2] होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, अशी विविध नावे आहेत.[3] होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात.
ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग, फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो म्हणतात. [4]फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणालाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.[5]
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळतात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची रीत आहे.[6] होळीनंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो.[7] याला 'धुळवड' असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते.[8] एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात.[9] यादिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात.[10] होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.[11]
कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो.[15] फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जूनपर्यंत (सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. [16]कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम‘ असे म्हणतात.[17]
फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.
पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशा वेळी तो होम रात्री बारापूर्वी लावतात. या कोंबड्याचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात, याला तिखटाचा सण म्हणतात. काही ठिकाणी रात्री बारा ते पहाटे पाच या वेळात होम लावतात, यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, याला गोडाचा सण असे म्हणले जाते.
ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व त्यावर गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात.[18]
होल्टा होम-
कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या-होमाच्या आदल्या दिवशी, नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन, उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन बाजूला उभे राहतात. दोन बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकांवर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही हा याचा विशेष म्हणावा लागेल.[8]
कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररीत्या सजवतात. रांगोळ्या काढतात. पताका लावतात. फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळी भोवती फेर धरून लोकगीते म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते.
कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून, घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो.
छोट्या गावाचे आणि त्या त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात.[19]
गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथले पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवतात. देवाच्या स्वागताची विशेष तयारी केलेली असते. महाप्रसादाचे आयोजन करतात. प्रत्येक गावची जी पालखी असते तिला ‘सहाण’ असे म्हणतात. या निमित्ताने जे गावजेवण होते त्याला ‘भंग’ असे म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ‘ओटी भरणे’ हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात त्यावेळी त्यांच्यासोबत असतो, त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो.
नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. काटखेळ, डेरानृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, जाखडी नृत्य, पुरुषमंडळीनी स्त्री वेश धारण करून केलेला तमाशा व त्यातील सवाल-जवाब, शंकासुर, नकटा यासारखी सोंगे असे विविध प्रकार यादरम्यान सादर होतात. ढोल-ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून ही नृत्ये सादर होतात. होमासाठी सुरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते.
कोकणात ‘सहाण’ नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते. शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण (चौथरा व छप्पर) देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ या उत्सवातच केला जातो. इतर वेळी तिथे देव ठेवले जात नाहीत.[20]
रत्नागिरीतील ओठी–नवेठ गावात शिमग्यात ‘होलदेव’ साजरा होतो. नवलाईदेवीच्या देवळात एक ५०-६० किलो वजनाचा एक दगड आहे. यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते. भद्रेचा होम ज्यावेळी पेटविला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरुण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात.
देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी, या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात.
कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी- छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकऱ्यांची वस्ती होती.स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो.धूलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही पाळतात.[21]
भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री-पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात.[22] महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो.[8] सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात.[23]
भारताचे विविध प्रांत आणि तेथील होळी उत्सवाची नावे याप्रमाणे[24]-
लाठमार होली- बरसाना- उत्तर प्रदेश
खडी होली- कुमाऊ- उत्तराखंड
बसंत उत्सव आणि दोल जत्रा- बंगाल
बंगालमध्ये विशेषतः रवींद्रनाथ ठाकूर यांच्या प्रेरणेतून शांतिनिकेतन येथे या उत्सवाची सुरुवात झालेली दिसते. जगभरातून हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक येतात. या दिवशी काढली जाणारी विद्यापीठ परिसरातील मिरवणूक हे एक खास आकर्षण असते.[25]
शिग्मो- गोवा
याओसांग- मणिपूर
मणिपूर येथे सहा दिवस उत्सव साजरा होतो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा उत्सव असतो. पौर्णिमेच्या चांदण्यात नृत्याचा आनंद घेणे हे उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. पारंपरिक पोशाख घालून नृत्याचा आनंद घेतला जातो.[25]
फागुवा- बिहार
बिहारमध्ये नृत्य, संगीत, रंग खेळणे अशा प्रकारे या सणाचा आनंद घेतला जातो.[25]
फाकुवा- आसाम
उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्व विशेष आहे. येथील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत.[11] उत्तर भारतातील खेडेगावांत होळीचे महत्त्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटवतात, आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे.[26]
महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजा करतो. होळी समोर गाऱ्हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे. होळी हा रंगाचा सण आहे. होळीमध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात.
विविध पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्ये यामध्ये समाविष्ट असतात. बंजारा समाजामध्ये होळीला फार महत्त्व आहे. बंजारा समाजामध्ये, बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखात नृत्य करतात.
बंगाल प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. वैष्णव संप्रदायात "गौरपौर्णिमा" या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो.[27]
ईशान्य भारतात विशेषकरून मणिपूर मधील विष्णूपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात.[28]
या प्रदेशात एकमेकांवर गुलाल उधळून महिला-पुरुष होळी साजरी करतात.[29] राजस्थानात संस्थान म्हणून मान्यता असताना तत्कालीन रितीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे.[30]
गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो.[31]
होळी हा सण कवींच्या व गायकांच्या आवडीचा आहे. होळीवर अनेक मराठी-हिंदी गीते/ठुमऱ्या आहेत. त्यांपैकी काही :
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.