From Wikipedia, the free encyclopedia
लोहमार्ग हा एक प्रकारचा वाहतुकीचा मार्ग असून त्यावर आगगाडीद्वारे वाहतूक केली जाते. आगगाडी ज्या लोखंडी पट्ट्यांवरून धावते त्यांना रूळ असे म्हणतात. हा मार्ग लोहाचा म्हणजेच लोखंडाचा असून त्यात २ रूळ असतात. दोन रूळांमधील अंतराला रेल्वे गेज असे म्हणतात.
रेल्वे वाहतूक हे प्रवासी व माल वाहतुकीचे एक साधन आहे. ही वाहतूक रेल्वे ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या रुळांवरून केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेत : सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी इंजिन. इंजिन कोळसा, डिझेल इत्यादी इंधने वापरून चालवतात, तसेच विद्युतशक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे रस्ता वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीमध्ये कमी घर्षण विरोध असतो.
जगातील सर्वात पहिल्या रेल्वे वाहतुकीचे पुरावे इ.स. पूर्व सहाव्या शतकात ग्रीसमध्ये सापडतात. तेव्हा वाहनासाठी इंजिनाऐवजी माणसांचा वापर केला जात असे. सोळाव्या शतकामध्ये युरोपातील अनेक कोळसा खाणींमध्ये नॅरो गेज रेल्वे वापरात होत्या ज्यांना वाहून नेण्यासाठी मनुष्य किंवा जनावरांचा उपयोग केला जायचा. ह्या रेल्वेमार्गांसाठी लाकडी रूळ वापरले जायचे.
अठराव्या शतकात युनायटेड किंग्डममध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लावला गेला व त्यानंतरच्या काळात मोठी रेल्वे क्रांती घडून आली ज्याचे औद्योगिक क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मँचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (स्टँडर्ड गेज: १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला.
रेल्वे वाहतुकीसाठी प्रत्येक देशामध्ये रेल्वे कंपनी जबाबदार असते. काही देशांमध्ये ह्या कंपन्या सरकारी तर इतर ठिकाणी खाजगी आहेत. अनेक देशांमध्ये (उदा. जपान) एकापेक्षा अधिक रेल्वेकंपन्या कार्यरत आहेत. भारतात रेल्वेवाहतुकीची जवळजवळ संपूर्ण मक्तेदारी भारतीय रेल्वे ह्या सरकारी कंपनीकडे आहे.
नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनामुळे सध्या जगात अवजड व अक्षम वाफेच्या इंजिनांचा वापर जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. आजची रेल्वे इंजिने मुख्यतः डिझेल अथवा विद्युत ऊर्जेवर चालतात. २०१८ साली पर्यंत जगातील २६ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
काळानुसार रेल्वेंचा वेग वाढत गेला आहे. सध्या अनेक देशांमध्ये द्रुतगतीने जाणाऱ्या रेल्वे आहेत (उदा. जपानमधील शिंकान्सेन व जर्मनीमधील इंटरसिटी एक्सप्रेस). ह्या द्रुतगती रेल्वेंसाठी वेगळे लोहमार्ग राखून ठेवलेले असतात.
विद्युतीकृत लोहमार्ग / अविद्युतीकृत लोहमार्ग.
एकेरी लोहमार्ग, दुहेरी लोहमार्ग, तिहेरी लोहमार्ग इत्यादी.
लोहमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी गँगमन नेमलेले असतात.
लोहमार्ग मापी (रेल्वे गेज) म्हणजे हे लोहमार्गाच्या दोन रुळांमधील अंतर होय. रेल्वेची इंजिने व डबे केवळ त्यांच्या चाकांमधील अंतरानुसार ठराविक गेजच्या मार्गावरूनच धावू शकतात.
भारतीय रेल्वेने हाती घेतलेल्या गेज समानीकरण प्रकल्पाअंतर्गत देशामधील काही ऐतिहासिक गाड्या वगळता इतर सर्व गेजांचे रूपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्यात येत आहे. आज २०२० साली देशातील ९४% रूळ ब्रॉडगेज आहेत. नॅरो गेज व मीटर गेज हे दोन्ही रेल्वेगेज कमी होत चालले आहे.
गेज | नाव | मार्च २०२० मार्ग लांबी (किमी) | मार्च २०२० प्रमाण | १९५१ मार्ग लांबी (किमी) | १९५१ प्रमाण |
---|---|---|---|---|---|
1676 मिमी | ब्रॉड गेज | 63,391 | 94.03% | 25,258 | 47.0% |
1000 मिमी | मीटर गेज | 2,339 | 3.46% | 24,185 | 45.0% |
762 and 610 मिमी | नॅरो गेज | 1,685 | 2.50% | 4,300 | 8.0% |
एकूण | 67,415 | 100% | 53,743 | 100% |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.