भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यांत नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत.

इतिहास

‘भारूड‘ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘धनगर‘ असा आहे. त्याच्या स्पष्टीकरणासाठी महानुभाव पंथाच्या ऋद्धपुर वर्णन या ग्रंथाचा आधार घेऊन ‘रातप्रभेचेनी घोडे, मेंढिया श्रृंगारती भारुडे‘ असे म्हणले आहे. महाभारतात शकुंतला आख्यान, भारूड सांग हा गीतप्रकार होता. म्हणजेच अथर्वशीर्षांच्या रचनेचा काळ हा सुमारे २५०० वर्षांपूर्वीचा होता. त्यावरून ‘भारूड‘ हा शब्द किमान २००० वर्षे इतका प्राचीन असण्याची शक्यता आहे. वेदकाळी व वेदोत्तरकाळी येते प्रसंगी प्राकृत लोकांचे जानपदाचे, करमणुकीचे प्रकार होत. त्यांतून वैदिक देव व त्यांच्या शौर्यप्रसंगांची स्तुती गायली जायची. याज्ञिक लोकांनंतर यज्ञांची जागा देवपूजेने तर संस्कृत भाषेची जागा प्राकृत भाषेने घेतली, तेव्हा कालमानानुसार पालटते रूप घेऊन जानपद वाङ्मय भारूड स्वरूपात आले असावे. भारुडाचे उगमस्थान म्हणजे हरिकीर्तन आणि कीर्तन परंपरेचे जनक म्हणजे नामदेव महाराज. नामदेव नाचून जे कीर्तन करायचे त्याला लळित म्हणतात आणि लळितातून रूपकाचा जन्म झाला. अध्यात्म सांगायचे ते एखाद्या गोष्टीमधून किंवा रूपकाच्या माध्यमातून. भारुडाचा प्रधान हेतु हाच होता. 'बहुरूढ' या शब्दाचा अपभ्रंश 'भारूड' झाला असेही काहींचे मत आहे.[ संदर्भ हवा ]

स्वरूप

एकनाथांच्या भारुडांतून त्यांचा आध्यात्मिक अनुभव अगदी सोप्या भाषेत मांडला गेला आहे. सदाचार आणि नीती यावर त्यांचा मोठा भर होता. त्यामुळे समाजाला कळणारी भाषा व पेलणारे तत्त्वज्ञान त्यांच्या भारुडांत आढळते. नाथांच्या भारुडांत विषयांची विविधता खूप आहे. साऱ्या जीवनाचे अवलोकन आणि चिंतन या भारुडांमधून व्यक्त झाले आहे. भारुडांच्या रचनेत अध्यात्म, मनोरंजन, दोष-दुर्गुणांचे भंजन तसेच गूढगुंजन आहे. भारूड लिहिण्याच्या प्रयोजनांवरून व रचना संकेतांवरून एकनाथांची भारूडे ही आध्यात्मिक उद्बोधन, प्रबोधन व लोकरंजन साधण्यासाठी केलेली रूपकात्मक स्फुट रचना होय. म्हणूनच संस्कृत वाङ्मयात जे स्थान पुराणांचे आहे तेच संत वाङ्मयात भारुडांचे आहे. भारूडरचनांमध्ये नाट्यतत्त्वे ठासून भरलेली असतात. त्यामुळे त्यांचे नाट्यरूपांतर सहजतेने होते.

भारूड हा प्रबोधनासाठी उपयुक्त असा काव्यप्रकार असल्याने बऱ्याच संप्रदायांनी त्याचा उपयोग करून घेतला आहे. संस्कृत किंवा प्राकृत भाषेत भारूड हा शब्द भारूड या गीत प्रकाराला उद्देशून जरी असला तरी या भाषांमध्ये भारूड रचना उपलब्ध नाही. त्यामुळे भारूड या काव्यरचनेचा उगम हा मराठी भाषेतच झाला. संत ज्ञानेश्वर हेच भारुडाचे आद्यरचनाकार असावेत असा एक प्रवाह मानतो. मात्र त्या आधीही भारुडे प्रचलित होती. संत एकनाथ महाराजांनी भारूड या काव्यरचनेला शिखरावर नेऊन पोहोचविले.

भारूडातील विषय हे सर्वसामान्यांच्या परिचयाचे व नित्याच्या व्यवहारात वावरणारे व आढळणारे असतात. व्यवसाय, नाती-गोती, सामाजिक वृत्तिदर्शन, गाव, दैवी भूमिका, भूत-पिशाच्च, पशु-पक्षी, सण आदि बाबी असे विविध विषय एकनाथांच्या भारुडांत दिसून येतात.

प्रकार

भारुडाचे साधारणपणे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात. पैकी भजनी भारूड हे कीर्तनासारखे. कूट भारूड म्हणजे ज्याचा अर्थ लावावा लागतो, जसे 'चिंचेच्या पानी एक देवालय उभारिले, आधी कळस मग पाया रे' किंवा 'मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती...'सारख्या कूट रचना होत.

आजचे स्वरूप

एकनाथमहाराजांनी ४५० वर्षांपूर्वी ‘एडका’ या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रूपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.

सादरीकरण

लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादनही करावे लागते. भारुडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यायाबरोबरच नटही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच भारुडांनी जनमनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य केले आहे. हीच भारुडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारुडात आहे असे म्हणले जाते. मराठी संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारुडांची व्यवस्था केली. हा एक वारकरी कला आविष्कार आहे.

स्त्री भारूड सादरकर्त्या

पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारुडकर्त्या भारुडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप हे भारूड सादरर्कते आहेत. स्वातंंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे व सीताबाई आरोटे (डुंंबरवाडी) यांंनी महाराष्ट्रभर वारकरी भारुडे सादर केली. पुरुषवेष धारण करून या दोघी बहिणींंनी मुंंबईसह महाराष्ट्र गाजविला. मुंबईमध्ये त्यांच्या भारुडासाठी अलोट गर्दी व्हायची.

भारूड महोत्सव

वामन केंद्रे यांनी दरवाडी येथे इ.स. २०११ मध्ये भारूड महोत्सव आयोजित केला होता. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी भारुडाची कला जिवंत ठेवली आहे त्यांनी १४ मे २०१६ पर्यंत ‘बहुरूपी भारूड’चे २१०० प्रयोग केले आहेत.

अधिक माहिती

एकनाथ महाराज तसे इतर संतांची भारुडे मूळ स्वरूपात कृपया विकिस्रोत येथे द्यावीत दुवा :विकिस्रोत

बाह्य दुवे

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.