पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे.[1] बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशतेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.[2][3] नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’[4]

Thumb
चिनावल येथील पोळा

स्वरूप

हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो.[5] पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर/ओढ्यात नेऊन त्यांना आंघोळ घालतात. नंतर चरायला देऊन घरी आणतात. या दिवशी बैलाच्या खांद्याला (मान जिथे शरीराला जोडली असते तो भाग) हळद व तुपाने (किंवा तेलाने) शेकतात. याला 'खांद शेकणे' अथवा 'खांड शेकणे' म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल (पाठीवर घालायची शाल), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्याघुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी) पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात.[5] बैलाची निगा राखणाऱ्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.[6]

विदर्भात साजरा केला जातो तान्हा बैल पोळा विदर्भातील बऱ्याच भागात बैल पोळा हा सण सलग दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी मोठा बैल पोळा आणि दुसऱ्या दिवशी छोटा बैल पोळा. मोठ्या पोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते, तर तान्ह्या बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची लहान मुले त्यांच्यासाठी आणलेले मातीचे बैल सजवून घरोघरी नेत असतात. त्या बदल्यात या बकगोपालांना लोक पैसे किंवा भेटवस्तू देऊन खुश करत असतात. या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात.[7] गावाच्या सीमेजवळच्या शेतावर (आखरावर) आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील/श्रीमंत जमीनदार) तोरण तोडतो व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.[8] शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो.[9] Thumb

कर्नाटकी बेंदूर

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील काही भागात उदा. कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो.[10] हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो. या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते.[11] पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात. संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो.[12]

पोळा सणावरच्या काही मराठी कविता

  • अमावस्या श्रावणाची, आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने, सजवितो हो बैलाला ...
  • आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सन मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार ... (बहिणाबाई चौधरी)
  • शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली, चढविल्या झुली, ऐनेदार............सण एक दिन, बाकी वर्षभर ओझे मर मर, ओढायाचे. (सण एक दिन : कवी यशवंत)

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.