सावित्रीबाई फुले
मराठी भारतीय समाजसुधारक / From Wikipedia, the free encyclopedia
सावित्रीबाई जोतीराव फुले (३ जानेवारी, इ.स. १८३१ - १० मार्च, इ.स. १८९७) या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.[1] भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.[2][3] या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.तत्पूर्वी अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांनी १८२९ मध्ये मुंबईत मुलींची शाळा सुरू केली होती. १८४७ मध्ये, विद्यार्थी साहित्यिक आणि वैज्ञानिक समाजाने मुंबईच्या गिरगाव परिसरात मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल सुरू केले. पेरी चरण सरकार यांनी १८४७ मध्ये बारासात या बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. पारशी समुदाय मुंबईने १८४७ मध्ये मुलींसाठी एक शाळा देखील स्थापन केली होती.[ संदर्भ हवा ]
सावित्रीबाई फुले | |
---|---|
टोपणनाव: | ज्ञानज्योती, क्रांतिज्योती |
जन्म: | ३ जानेवारी, इ.स. १८३१ नायगाव, सातारा, महाराष्ट्र |
मृत्यू: | मार्च १०, इ.स. १८९७ पुणे, महाराष्ट्र |
चळवळ: | मुलींची पहिली शाळा सुरू करणे |
संघटना: | सत्यशोधक समाज |
पुरस्कार: | क्रांतीज्योती |
प्रमुख स्मारके: | जन्मभूमी नायगाव |
धर्म: | हिंदू |
वडील: | खंडोजी नेवसे (पाटील) |
आई: | लक्ष्मीबाई नेवसे |
पती: | जोतीराव फुले |
अपत्ये: | यशवंत फुले |
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले आहे.[ संदर्भ हवा ] इ.स. १८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च, १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.[ संदर्भ हवा ]
३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. १० मार्च १९९८ रोजी भारत सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले. २०१५ मध्ये, पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले. ३ जानेवारी, २०१७ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या १८६ व्या जन्मदिनानिमित्त गूगल डूडल प्रसिद्ध करून गूगलने त्यांना अभिवादन केले.[ संदर्भ हवा ]