विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादी
भारतातील राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री / From Wikipedia, the free encyclopedia
भारतामध्ये २८ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेश (दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर) ह्यामध्येच विधानसभा आहे. या राज्यामध्ये स्वतंत्र प्रशासन असून मुख्यमंत्री हा मंत्रीमंडळाचा प्रमुख असतो. भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यस्तरावर राज्यपाल हा राज्यप्रमुख असून त्याचे अधिकार औपचारिक स्वरूपाचे असतात, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी मुख्यमंत्री व त्याच्या मंत्रीमंडळावर असते. राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यपाल सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रित करतो. हा सत्ताधारी पक्ष आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करतो. विधानसभेचा कार्यकाळ साधारणपणे ५ वर्षांचा असतो. विधानसभेत बहुमत सिद्ध करणाऱ्या उमेदवारालाच मुख्यमंत्री बनता येते. हा उमेदवार विधीमंडळाचा (विधानसभेचा किंवा जर राज्यात विधानपरिषद असेल तर विधानपरिषदेचा) सदस्य असणे बंधनकारक आहे, जर नसेल तर ६ महिन्यात सदस्यत्व मिळवणे आवश्यक आहे.