From Wikipedia, the free encyclopedia
हाप्सबुर्ग राजघराणे (जर्मन: Habsburg) हे युरोपामधील सर्वात महत्त्वाच्या शाही राजघराण्यांपैकी एक होते.
जर्मानिया हे नाव रोमन लोकांनी ऱ्हाइन नदी ते उरल पर्वतांमधील भूभागाला दिले होते. परंतु जर्मनी हे नाव बहुतकरून इंग्लिशभाषिक किंवा भूतपूर्व ब्रिटिश वसाहतींमधील देशांत वापरले जाते. खुद्द जर्मनीत जर्मन लोक आपल्या देशाचा उल्लेख 'डोईशलँड' या नावाने करतात.
जर्मनीच्या प्राचीन इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही. जर्मनीचा ज्ञात इतिहास रोमन साम्राज्याबरोबर सुरू होतो. रोमन साम्राज्याअगोदर जर्मानिक टोळ्यांचे येथे वास्तव्य होते असे मानले जाते. या टोळ्यांचा वावर स्कँडिनेव्हिया, डेन्मार्क, उत्तर जर्मनी व पोलंडच्या भागात होता. रोमन सम्राट ऑगस्टसाच्या नेतृत्वाखाली पब्लियस क्विंक्टिलियस वारसाने जर्मानियाच्या भागात आक्रमणे सुरू केली. साधारणपणे २ ऱ्या शतकात जर्मानिक टोळ्या ऱ्हाइन नदी व डोनाउ नदीच्या खोऱ्यात वसल्या. ३ ऱ्या शतकात अलमानी, फ्रांक, सॅक्सन, थ्युरिंगी अशा अनेक जर्मन टोळ्यांचा उदय झाला.
इसवी सनाच्या ९ व्या शतकापासून ते १९ व्या शतकाच्या सु्रुवातीपर्यंत जर्मनी हा पवित्र रोमन साम्राज्याचा भाग होता. याची स्थापना रोमन सम्राट शार्लमेन याने केली होती. हे साम्राज्य इ.स. १८०६ पर्यंत विविध प्रकारे अस्तित्वात होते. उत्तरेस आयडर नदीपासून दक्षिणेस भूमध्य समुद्रापर्यंत भूप्रदेश व्यापलेल्या या साम्राज्यास जर्मन राष्ट्राचे पवित्र रोमन साम्राज्य ("Sacrum Romanum Imperium Nationis Germanicæ") असेदेखील म्हणत. सम्राट ओटो पहिला याच्या राजवटीत तसेच ओटोनियन कालखंडात (इ.स. ९१९ - इ.स. १०२४) लोरें, सॅक्सनी, फ्रांकोनिया, स्वाबिया, थ्युरिंगिया व बव्हेरिया हे भागदेखील साम्राज्यात विलीन झाले. सम्राट ओटोला या भूप्रदेशांचा पवित्र रोमन सम्राट म्हणून इ.स. ९६२ मध्ये राज्याभिषेक करण्यात आला[५]. त्यानंतर सालियन सम्राटांच्या कालखंडात (इ.स. १०२४ - इ.स. ११२५) उत्तर इटली आणि बुर्गुंडी प्रांत साम्राज्यास जोडले गेले. पुढे पवित्र रोमन सम्राटांचा प्रभाव कमी होत गेला आणि अनेक स्थानिक जर्मन राजांनी आपला प्रभाव वाढवला. याच काळात हॅन्सियाटिक लीगच्या माध्यमातून उत्तरेकडची जर्मन शहरे भरभराटीस येऊ लागली. इ.स. १३५६ मध्ये गोल्डन बुल नावाचा करार झाला आणि अनेक राज्ये व सरंजामशाहीत विभागलेल्या साम्राज्याला एक संविधान मिळाले. या करारात सात राज्ये मिळून सर्वांत शक्तिशाली राजाला सम्राट म्हणून मान्यता देतील व मुख्य बिशपाची निवड होईल असे ठरले. १६ व्या शतकामध्ये साधारणतः ऑस्ट्रियाच्या हाब्सबुर्ग घराण्यानेच या निवडणुकीवर प्रभाव राखला. यानंतर युरोपात मार्टिन ल्यूथरच्या नावाने एक धार्मिक वादळ आले. त्याने रोमन कॅथलिक चर्चच्या अन्यायी कारभारावर जाहीर टीका केली आणि प्रोस्टेस्टंट चळवळ उदयास आली. सन १५३० नंतर काही जर्मन राज्यांमध्ये प्रोस्टेस्टंट चर्चला अधिकृत चर्च म्हणून मान्यता देण्यात आली. यामुळे जर्मनीत गृहयुद्ध सुरू झाले (इ.स. १६१८ - इ.स. १६४८). वेस्टफालिया शांती करारामुळे हे धार्मिक युद्ध संपुष्टात आले पण साम्राज्याची अनेक राज्ये, संस्थाने यांमध्ये विभागणी झाली. इ.स. १७४० नंतर ऑस्ट्रियन राज्य आणि प्रशियन राज्य या राज्यांची जर्मन राजकारणावर पकड राहिली. इ.स. १८०६ मध्ये नेपोलियनच्या आक्रमणानंतर पवित्र रोमन साम्राज्य संपुष्टात आले.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.