समाज माध्यमे
आंतरजालावरील इतर व्यक्तींशी संपर्क ठेवण्याचे साधन / From Wikipedia, the free encyclopedia
इंटरनेटवर उपलब्ध असणारा, विविध व्यक्तींशी संपर्क साधू देणारा व ते जपू देणारा मंच म्हणजे सोशल नेटवर्क सेवा. सोशल नेटवर्क अथवा सामाजिक जाळे म्हणजे असे गट जिथे समान विचारांची, सारख्या आवडीनिवडींची माणसे एकत्र येतात. ह्या संज्ञेत जरी प्रत्यक्ष भेट अथवा थेट संवाद अपेक्षित असला तरी ही संज्ञा इंटरनेटवरील सेवेसही लागू पडते. ही सेवा मुख्यतः इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांच्या मार्फत पुरवली जाते. अश्या संकेतस्थळांना सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे असे म्हणतात. सोशल नेटवर्किंग व सोशल नेटवर्क ह्या व्याख्या अनेकदा समानार्थी वापरल्या जातात. परंतु नेटवर्किंग ह्या शब्दात अनोळखी व्यक्तींशीदेखील नाते जोडणे अपेक्षित आहे तर सोशल नेटवर्क हया शब्दाचा अर्थ व्यापक असून त्यात खऱ्या आयुष्यातील ओळखीच्या लोकांशीदेखील इंटरनेटवर नाते जोडणे अपेक्षित आहे.
एखाद्या सोशल नेटवर्क सेवेचा पाया म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर तयार केलेले 'प्रोफाईल' पान, अर्थात माहिती पान. एखाद्या व्यक्तीचा इंटरनेटवरील आविष्कार किंवा रूप किंवा अवतार म्हणजे हे 'प्रोफाईल' पान. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे व्यक्तीला अश्या प्रकारची प्रोफाईल बनवण्याची, त्या संकेतस्थळांवरील इतर व्यक्तींशी ओळख व मैत्री करण्याची तसेच विविध माहितीची देवाण-घेवाण करायची संधी देतात.
२०० वर्षापूर्वी पृथ्वीतलावर जेवढे लोक नव्हते, तेवढे आज एका फेसबुक नामक सोशल नेटवर्कवर आहेत. लोक भाषा, सीमा विसरून एकमेकांशी जोडण्याच्या भावनेने सोशल नेटवर्कचा भाग होतात. काही लोक हे जुन्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल नेटवर्कवर येतात.