ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. याच्या फळाचे लोणचे करतात.

भोकराची पाने

शास्त्रीय नाव - कॉर्डिया डायचोटोमा (Cordia dichotoma) कुळ - बोऱ्याजिनेएसी (Boraginaceae) स्थानिक नावे - बारगुंड, गुंदन हिंदी नावे - लासोरा, लसोडा, लसोरा गुजराती नावे - पिस्तन, रायगुंडो, गुंदा संस्कृत नावे - बहुवर, श्‍लेष्मान्तक, भुकरबुंदर इंग्रजी नावे - इंडियन चेरी, क्‍लामीचेरी, ग्लुबेरी, सॅबॅस्टन प्लम.

भोकर ही वनस्पती भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान या देशांत आढळते. भारतात ही वनस्पती कोरड्या पानझडी तसेच ओलसर मोसमी जंगलात सर्वत्र आढळून येते. महाराष्ट्रातही सर्वत्र आढळते. पश्‍चिम घाट, सातपुडा, कोकण सर्व ठिकाणी भोकरीचे वृक्ष नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले असतात, तर काही ठिकाणी या वृक्षाची लागवडही करतात.

ओळख - - भोकरी हा 10 ते 12 मीटर उंचीपर्यंत वाढणारा सदापर्णी वृक्ष आहे. त्याची साल धुरकट गडद रंगाची असून, ती खडबडीत व फाटलेली असते. - पाने - साधी, एका आड एक, क्वचित समोरासमोर, रूंद अंडाकृती 7.5 ते 10 सें.मी. लांब व 6.2 ते 10.4 सें.मी. रूंद, गुळगुळीत, वरील भागावर पांढरट ठिपके, पानांच्या कडा अगदी साधारण दंतूर. पानांचे देठ 2 ते 4 सें.मी. लांब, पानांच्या तळाकडील शिरा तीन ते पाच. या वृक्षाच्या फांद्या खाली झुकलेल्या असतात. - फुले - लहान, पांढरी किंवा पांढरट - हिरवी, नियमित, एकलिंगी, नर व मादी फुले एकाच झाडावर येतात. फुले पानांच्या बेचक्‍यातून लोंबणाऱ्या घोसात येतात. पुष्पमंजिरी 2.5 ते 5 सें.मी. लांब. फुलांचे देठ आखूड. पुष्पमुकुट पाच संयुक्त दलांनी बनलेला. पाकळ्या 5, एकमेकांस चिकटलेल्या. पुंकेसर 5, समान लांबीचे, तळाकडे पाकळ्यांना चिकटलेले, केसाळ. बिजांडकोश चार कप्पी, प्रत्येक कप्प्यात एक बीजांड. परागवाहिनी एक, टोकाकडे दोन विभागी. परागधारिणी दोन, टोपीच्या आकाराच्या. - फळे - गोलाकार, चकचकीत बोरांएवढी, पिकल्यावर पिवळसर किंवा गुलाबी पिवळसर रंगाची. 1 ते 4 बिया. फळे आतून बुळबुळीत चिकट रसांनी भरलेली. यामुळे भोकर या वनस्पतीला "इंडियन ब्लू बेरी' असे म्हणतात.

भोकरीचे औषधी गुणधर्म - - फळे - फळेस्नेहन व संग्राहक आहेत. भोकरीचे फळ कृमिनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहे. फळ मूत्रवर्धक व सारक गुणधर्माचे आहे. कोरडा खोकला, छाती व मूत्रनलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, मूत्र जळजळ, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. सांधेदुखी, घशाची जळजळ यासाठीही भोकरीचे फळ उपयोगी आहे. फळे शोथशामक असल्याने खोकला, छातीचे रोग, गर्भाशय व मूत्रमार्गाचे रोग तसेच प्लिहेच्या रोगात भोकरीची फळे वापरतात. - साल - भोकरीची साल संग्राहक व पौष्टिक आहे. भोकरीची साल स्तंभक असल्याने फुफ्फुसांच्या सर्व रोगात उपयुक्त आहे. साल फांटाच्या रूपात गुळण्या करण्यासाठी वापरतात. सालीचा रस खोबरेल तेलाबरोबर आतड्याच्या व पोटाच्या दुखण्यावर उपयुक्त आहे. साल सौम्य शक्तिवर्धक म्हणून उपयोगी आहे. सालीचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचारोगांवर वापरतात. सालीचा काढा जीर्णज्वरात आणि पुष्टी येण्यास देतात. कफ ढिला होण्यास, लघवीची आग कमी होण्यास व अतिसारात फळांचा काढा देतात. यामुळे आतड्यास जोम येतो. भोकराच्या सालीची राख तेलात खलून व्रण लवकर भरून येण्यासाठी लावतात. पिकलेले भोकर फळ, अडूळसा पाने व बेहडा फळे समप्रमाणात घेऊन काढा करून खोकल्यावर देतात. अतिसारावर भोकरीची साल पाण्यात उगाळून देतात. मोडशीवर भोकरीची साल हरभऱ्यांच्या आंबीत उगाळून द्यावी. भोकरीची पाने व्रण व डोकेदुखीवर उपयुक्त आहेत.

भोकराची भाजी करतात व भोकाराचे लोणचे देखील बनवितात. - भोकराच्या कोवळ्या पानापासून तसेच फळापासून भाजी करतात. भोकराच्या फळांच्या भाजीचा उपयोग अतिसारात होतो. या भाजीमुळे आतड्याची ताकद वाढते व पुष्टी येते. - भोकराच्या फळांचे लोणचे खूप चविष्ट असून, हे राजस्थान, गुजरात व महाराष्ट्रात अगदी प्रसिद्ध आहे. भोकराचे लोणचे अग्निवर्धक, भूक वाढविण्यास व पचनासाठी चांगले आहे. रक्तपित्तात भोकरीच्या पानांची भाजी उपयोगी आहे.

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.